फोलपटरावांचा लोकलप्रवास

डीडीच्या दुनियेत फोलपटराव त्या दिवशी अंमळ खुशीतच होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी घराबाहेर पाय ठेवला तेव्हाच त्यांना माहित होतं, की सरकारने आपले खरे कर्तव्य गांभीर्याने मनावर घेतले आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यारस्त्यावर चोख बंदोबस्त असून, एक नागरिक या नात्याने आज आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. सकाळी घरातून जसे निघालो तसेच वन पीस घरी परतणार आहोत. कुठे बाँबस्फोट होणार नाही का कुठे दंगल होणार नाही. रस्त्यावर फारसे पोलिस नसतीलच आणि जे असतील त्यांची जरब गुन्हेगारांवर असणार आहे. आपल्या पाकिटातील ऐवज कोणी चोरू नये म्हणून वाटा घेण्यासाठीच पोलिस उभे आहेत, असे लोकांनाही वाटणार नाही.

अशा रितीने गगनात मावत नसलेल्या आनंदाचा हवाई प्रवास थांबवून फोलपटरावांनी रेल्वे स्टेशनवर पाय ठेवला. त्यावेळी स्टेशनवर अगदी सगळं कसं शिस्तीत चाललं होतं. ऑटोरिक्षा वाट चुकल्यासारख्या रस्त्यात थांबल्या नव्हत्या, का मुसंडी मारणाऱ्या डुकरासारख्या टॅक्सी आवारात ठाण मांडून बसल्या नव्हत्या. आपले सांस्कृतिक संचित मांडून बसलेले भिकारी नव्हते, का उंदरावर झेप घेण्यासाठी सज्ज असलेल्या मांजरांसारखे ट्रॅव्हल एजंट उभे नव्हते. मुख्य म्हणजे फोलपटराव स्टेशनमध्ये शिरत असताना वाट कशी सगळी मोकळी होती. तिकीट काउंटरवर गटार तुंबल्यासारखी लोकांची रांग नव्हती का नाल्यात अडकलेल्या प्लॅस्टिकच्या थैल्यांसारखी कोणाची धक्काबुक्कीही नव्हती.

त्याच वेळेस फोलपटरावांना आपण घरातून फारसे पैसे न घेताच हवाई प्रवास केल्याचं लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब एका टॅक्सीवाल्याला हात करून एटीएमचा रस्ता धरला. जवळचं भाडं असूनही टॅक्सीवाल्याने किंचितही कुरकुर न करता फोलपटरावांना अदबीने ‘चला, साहेब’ असं म्हटलं. माता-भगिनींचा उद्धार न करता टॅक्सीवाल्यानं त्यांच्याशी मातृभाषेतच संवाद साधल्याने फोलपटरावांना अगदी गदगदून आलं. त्यांना जवळपास हुंदकाच आला होता, पण त्यांनी तो खूप प्रयासाने आवरला. इतके दिवस मराठीत बोलण्याची उबळ त्यांनी जशी आवरली होती, तसाच त्यांनी हा हुंदकाही आवरला. एटीएममध्येही रांग नसल्याने त्यांनी लगेच पैसे काढले.

परत येऊन बघितले, तर तेव्हाही तिकीटबारीवर सामसूम होती. आज रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप आहे का, अशी शंकाही त्यांच्या मनाला चाटून गेली. मात्र आज आम आदमींचे राजे फोलपटरावच येणार म्हटल्यावर संपावर गेलेले कर्मचारीही खास कामावर रूजू झाले असते, हे त्यांना माहितच होतं. त्यामुळे त्यांनी काउंटरवर जाऊन शंभराची नोट सरकवली. पलिक़डच्या मराठी माणसाने (होय, तो मराठी होता आणि चक्क सुहास्य वदनाने उभा होता.) फोलपटरावांची नोट घेऊन त्यांना मुकाट्याने चिल्लर परत केले. त्याने त्याच्या नेहमीच्या शैलीत आयमायचा न काढता असे वर्तन करण्याचे कारण फोलपटरावांना माहित होते, ते म्हणजे त्यांच्यावर आयचा वरदहस्त होता.

कोणत्याही प्रकारची वाट न पाहता फोलपटरावांना सहज गाडी मिळाली. आता त्यांना कुठेही ऑफिसमध्ये जायचे नव्हते, दिसल त्या गाडीत त्यांना बसायचे होते त्यामुळे गाडीसाठी खोळंबा होण्याचा त्यांचा प्रश्नच नव्हता. वारूळात येरझारा घालणाऱ्या मुंग्यासारखे लोकं गाडीच्या डब्याला चिकटले नव्हते. त्यामुळे अगदी सावकाश आणि तब्येतीने फोलपटरावांनी डब्यात प्रवेश केला. कोणताही सव्यापसव्य त्यांना करावा लागला नाही का झटापटींमुळे त्यांना इजा झाली नाही. डब्यात असलेल्या इनमीन दहा पंधरा लोकांनी अगदी दोन्ही हात पसारून फोलपटारावांचे स्वागत केले. त्यातलं कोणीही गुजराती किंवा हिंदी बोलत नव्हतं. सगळे अगदी शुद्ध मराठी बोलत होते. त्यातल्या एकाने लगेच सरकून फोलपटरावांना खिडकीशी जागा करून दिली. पुढल्या दोन ते तीन मिनिटांत लोकलच्या खडखडाटासोबतच फोलपटराव आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या गुजगोष्टी सुरू झाल्या. त्यातल्या काहिंनी तर फोलपटरावांना, “तुमच्यासारखे सामान्य लोक प्रवास करतात त्यामुळे या लोकलची शान आहे,” असंही सांगितलं. त्यामुळे फोलपटरावांना उगीचच अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे झाले.

साधारण अर्धा तास प्रवास केल्यानंतर फोलपटरावांना त्या सुखावह प्रवासाचा कंटाळा आला. त्यांचा ‘एक उनाड दिवस’ पुरा झाला होता. एक चांगल्यापैकी स्टेशन बघून त्यांनी सहप्रवाशांचा निरोप घेतला आणि ते डब्यातून खाली उतरले. तिथे मात्र त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धक्याला सामोरे जायचे होते. तिथे काही मंडळी कसलेतरी झेंडे घेऊन उभी होती. तो सगळा जमाव फोलपटरावांच्या दिशेने धावत आला आणि त्यांच्या गळ्यात एक जाडजूड हार घातला. सामान्य मध्यमवर्गीय असल्याने फोलपटरावांना हा सगळा प्रकार नवा होता.

भांबावलेल्या स्वरातच त्यांनी विचारले, “हे काय आहे?”

जमलेल्या मंडळींनी एका स्वरात उत्तर दिले, “आणखी एक दिवस कोणताही अपघात किंवा घातपात न होता लोकलचा सुरक्षित प्रवास केल्याबद्दल आम्ही तुमचा सत्कार करत आहोत.”

अघोरपंथीयांची मात्रा

sadhu12 फेब्रुवारी 2009. सायंकाळी सहा वाजण्याच्या वेळेस हरिद्वारला हिंदु धर्मियांचा सर्वोच्च धार्मिक सोहळा कुंभमेळा एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचला होता. नागा साधुंच्या मानाच्या स्नानानंतर गंगेची आरती सुरु झाली होती. इकडे मुंबईत हिंदुंत्वाचे निशाण खांद्यावर घेतलेली आणि या हिंदुत्वाला देशभक्तीशी जोडणारी शिवसेना चारी मुंड्य़ा चीत झाली होती. एका किरकोळ अभिनेत्याच्या तद्दन चित्रपटासाठी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावून, द्युतात हरलेल्या पांडवांसारखे शल्य उराशी बाळगण्याची वेळ या पक्षावर आली. दीड वर्षांपूर्वी फुसके स्फोट करून हिंदुंची प्रतिष्ठा घालवू नका, असे सांगणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना आता चवली-पावली सारखे चॅनेलवाले हिणवत आहेत.

खरं सांगायचं, तर एक शेंडा-बुडखा नसणारे आंदोलन तब्बल एक आठवड्याहून अधिक काळ चालविल्याबद्दल शिवसेनेचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. सरकार (त्याची कार्यक्षमता संशयास्पद असली तरी धर्मनिरपेक्षतेसारख्या काल्पनिक गोष्टींसाठी ते अगदी इरेला पेटते), पैशास पासरी झालेल्या वृत्तवाहिन्या (यावर बडबड, दृश्य आणि मतांची गटारगंगा धो-धो सारखी वाहत असते म्हणून वाहिन्या) आणि सहकारी राजकीय पक्षही विरोधात असताना सेनेने तिच्य़ा वकुबापेक्षाही जास्त किल्ला लढविला, हे इथे मानलेच पाहिजे. जुने बाळासाहेब अद्याप सक्रिय असते तर काय बिशाद होती सरकार आणि बॉलिवूडची आपलं म्हणणं खरं करण्याची. बाळासाहेबांसाठी खेळपट्ट्या उखडणारे शिशिर शिंदे आणि बाळा नांदगावकरसारखी मंडळी आता मनसेत आहेत. त्यामुळे सेनेच्या योजना मनसुबे या पातळीवरच थांबतात.

अशोक चव्हाण यांचे सरकार खरोखऱच उच्चीचे ग्रह घेऊन आले असावे. कारण आपण आंदोलन करणार नाही, हे सांगून राज ठाकरे यांनी त्यांना आधी बाय दिला. त्यानंतर विचारायला हवे असे प्रश्न सेनेलाही विचारावेसे वाटले नाहीत. उदा. मुंबई आणि नांदेडमध्ये शाहरूखच्या चित्रपटाला मागितले नसताना संरक्षण देणारे सरकार ‘झेंडा’च्या वेळेस काय झोपले होते काय? त्यावेळेस मूग गिळून गप्प बसलेले राणे सरकार यावेळेस मात्र सेनेवर बंदी घालण्याची मागणी कशी काय करू शकतात? आता कोणीतरी म्हणत होतं, शिवसेनेने सीमेवर जाऊन लढावे, तिथे त्यांची जास्त गरज आहे. जणू काही हा एक चित्रपट पाहिल्याने देशातील समस्त हुतात्म्यांना मुक्ती मिळणार होती.

शिवसेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या लाठ्या खात होते, तेव्हा काही मंडळी म्हणत होती, की सेनेच्या गुंडगिरीमुळे महाराष्ट्राची अब्रू जात आहे. मला तसं वाटत नाही. महाराष्ट्राची मान खालण्याचे पुण्य एकट्या त्या पक्षाचे नाही. आपल्या मुलासारख्या नेत्याचे जोडे उचलणारे मंत्री, शेतकरी आत्महत्या करत असताना आयपीएलसाठी जीव खालीवर करणारे  नेते, नित्य भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत असतानाही लोकांना उपदेश करत फिरणारे अधिकारी आणि सरतेशेवटी मूक साक्षीदार बनण्याचे जागतिक विक्रम मोडीत काढणारी जनता यांचा -त्यात सिंहाचा वाटा आहे. शिवसेना ही फार-फार तर या ‘मानमोड्यांची’ ब्रँड अँबॅसिडर म्हणता येईल.

जे अत्याचार करतात त्यांना संपविल्यास पाप लागत नाही आणि जे अत्याचार किंवा यातना सोडवितात त्यांना संपविल्यास मुक्ती दिल्याचे पुण्य लागते, अशी अघोरपंथी साधुंची शिकवण असते. सरळमार्गी साधुंची (इथे द्विरुक्ती झाली) शिकवण हिंदु धर्मियांना पचलेली नाही, हे तर सध्याच्या समस्येवरून दिसतच आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला  आता कदाचित अघोरपंथीयांचीच मात्रा लागू पडेल.

प्राण गेला तरी बेहत्तर, पिक्चर पहावाच लागेल

महाराष्ट्र हे एक प्रगतीशील राज्य आहे. किमान तसं म्हणण्याची प्रथा आहे. या पुरोगामी राज्यात आमच्या सरकारने सगळ्या तरुणांना काम दिले आहे. राज्यातील सगळ्या गरीबांना पोटापुरते अन्न दिले आहे. राज्यातीलच कशाला, उत्तर प्रदेश, बिहार आणि अगदी बांगलादेशातून आलेल्या गरीबांच्या पोटाची खळगी भरण्याची सोयही आमच्या धडाडीच्या सरकारने केली आहे.  त्यामुळे अन्न, पाणी आणि निवारा यांची ददात मिटलेल्या या राज्यात आता प्रश्न केवळ मनोरंजनाचा उरलेला आहे. त्यासाठी लोकांना हवे ते, नको ते असे सगळेच चित्रपट पहायला मिळावेत, यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.

हे पहा, मनोरंजन पुरवावे म्हणजे थिएटर आणि मल्टिप्लेक्स यांत लागणारे चित्रपट असंच आम्हाला अभिप्रेत आहेत. आमच्या विधानांमुळे आणि कृत्यांमुळे कोणाची करमणूक होणार असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.  अगदी कालपरवा मला एक अभिनेता सांगत होता, की मला अभिनय शिकत असताना तुमच्या व्हिडिओ क्लिप्सची खूप मदत झाली. मात्र तो वेगळा प्रश्न आहे. लोकांनी मल्टिप्लेक्समध्ये जावे, चित्रपट पहावे यासाठी आमचा सगळा खटाटोप आहे. काय आहे, आम्ही आमच्या निर्णयांवर मनोरंज कर कसा लावणार? अलिकडे या वृत्तवाहिन्या वाढल्यामुळे सदोदीत आमचं दर्शन घडतं. त्यामुळे आधीच लोकांना थिएटरमध्ये जाण्याची इच्छाच उरलेली नाही. तशात या लोकांनी आंदोलने केली, तर चित्रपटनिर्मात्यांचं किती नुकसान होणार?

नाही, नाही. हा कोणा एका अभिनेत्याला वाचविण्याचा किंवा कोणाची पाठराखण करण्याचा प्रश्न नाही. मुळातच बॉलिवूडला संरक्षण देण्याचे आमचे धोरण आहे. त्याची कारणं तुम्हाला माहितही असतील. एक तर, अलिकडे आमच्या पक्षात किंवा दुसऱ्याही पक्षात, येणारी मंडळी बॉलिवूडमार्गेच येतात. तोच जर पुरवठा बंद केला तर आमचं कसं होणार? दुसरं म्हणजे, गेल्या वेळेस आमच्या निवडणुकीसाठी प्रचार करायला हीच मंडळी आली होती ना. लोकांची गर्दी जमविण्यासाठी आमचे चेहरे चालत नाहीत, बॉलिवूडवालेच लागतात, त्याला आम्ही काय करणार? मग त्यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आम्हाला सज्ज राहावंच लागेल ना.

हो, आम्ही कंबर कसून सज्ज आहोत. राज्यातील बाकी सगळे विषय बाजूला ठेवून आम्ही सगळी यंत्रणा या चित्रपटासाठी पणाला लावण्यास तयार आहोत. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनात आमच्याच मंत्र्यांनी खोडा घातला तेव्हा आम्ही म्हणालो होतो, की कोणी तक्रार केली तर आम्ही संरक्षण पुरवू. मात्र हिंदी चित्रपटांच्या बाबतीत मात्र न मागताही आम्ही सगळी सुरक्षा पुरविली आहे. तुम्हाला एक कळत नाही का, की यानिमित्ताने का होईना सरकारच्या कार्यक्षमतेबाबत लोकांना विश्वास वाटतो हे आम्हालाही कळतंय.  आमच्या सरकारसाठी हा आश्चर्याचा धक्काच आहे. सरकार काही कृती करील म्हणून कोणी आमच्याकडे पाहतं, ही मोठीच घटना नाही का.

तातडीने निर्णय? तातडीने निर्णय घ्यावा, अशी काही प्रकरणेच असतात. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, महागाईचा प्रश्न असो, प्रधान अहवालाचा मुद्दा असो आम्हाला काही कागदपत्रे पहावी लागतात. त्यासाठी मंत्रिमंडळा चर्चा करायची असते. पुन्हा ती चर्चा काय झाली आणि काय झाली नाही, याच्यावर आठवडाभर भवति-न भवति करावी लागते. असं पुन्हा होऊ नये म्हणून काथ्याकूट करावा लागतो. चित्रपटाच्या बाबतीत असं काहीच करावं लागत नाही. आम्हाला वाटलं आणि आम्ही निर्णय घेतला. संपला प्रश्न.

पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही दिली आहेत. त्यामुळे आता एकच सांगतो, प्राण गेला तरी बेहत्तर पण पिक्चर पाहावाच लागेल.

भागवतधर्म

संघचालक मोहन भागवत

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा हाती घेतल्यानंतर मोहन भागवत यांनी भारतीय जनता पक्षाच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली. लोकसभेतील भाजपच्या पराभवानंतर त्यांनी आस्तेकदम त्या पक्षाच्या नेतृत्वातही बदल केला. मात्र मूळच्या महाराष्ट्रीय असलेल्या भागवत यांच्याकडून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही उभारी देण्याचे काम होईल, अशी कोणाला अपेक्षा नव्हती. केवळ एका विधानाच्या माध्यमातून शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यभागी आणण्याचे काम डॉ. भागवतांनी अगदी कौशल्याने केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झंझावातामुळे आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेना काहीशी क्षीण होत होती. अशावेळेस अगदी संजीवनी मिळावी, तशी भागवतांनी उत्तर भारतीयांचे रक्षण करण्याची घोषणा केली. उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेचे आंदोलन 2008 सालापासून चालू आहे. शिवसेनेनेही मध्यंतरी आंदोलन केले. याकाळात संघाने फारसा आवाज केला नाही. त्यामुळे नेमके आताच ही घोषणा करण्यामागचे गौडबंगाल काय असावे? त्यातही शाहरूख खानच्या विरोधात शिवसेनेने चालविलेली मोहीम संघाच्या धोरणांशी अनुकूलच होती. त्यामुळे संघाला उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ पुढे येण्याचे सकृद्दर्शनी तरी काहीही कारण नव्हते.

सकृद्दर्शनी म्हणायचे कारण, खुद्द महाराष्ट्र सरकारने मराठीच्या हिताच्या नावाखाली घेतलेले अनेक निर्णय मनसेच्या पथ्यावर पडणारे होते. त्यातून मनसेला महत्त्व देऊन शिवसेनेला खच्ची करण्याचा डाव सरकारचा होता. हा प्रकार असाच चालू राहिला तर शिवसेना आणि पर्यायाने भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असते, ही गोम युतीच्या धुरिणांना आली असणारच. त्यासाठी डॉ. भागवतांनी मराठी विरूद्ध उ. भारतीय वादाचे पिल्लू सोडून शिवसेनेकडे पास दिला.  त्यांच्या विधानावर पहिली प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली, याचा अर्थ तो पास योग्यप्रकारे घेतला गेला.

भागवत यांची खेळी यशस्वी झाली याची पावती काल राज ठाकरे यांच्या विधानावरून आली. जन्माने महाराष्ट्रीय तोच मराठी असं विधान करून राज ठाकरे यांनी मनसेला पुन्हा झोतात आणण्याचा प्रयत्न केला. राजकारणात वरचढ ठरण्याच्या प्रयत्नात केलेली त्यांची ही घोषणा फाऊल करण्याच्या दिशेने पुढे पडलेले पाऊल आहे. त्याचा फायदा शिवसेनेलाच होणार. त्यातून सेनेचा ‘संघ’र्ष कमी होऊ शकतो.