इतना सन्नाटा क्यों है भाई

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर नरेंद्र मोदी आरूढ होऊन आता पाच दिवस होत आले आहेत. मात्र या काळात मराठी ब्लॉग (अलिकडे कोणत्याही मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा मी यांवर जास्त भिस्त ठेवतो. ) अथवा माध्यमांमध्ये फारशी चर्चा झालेली दिसत नाही, हे खरोखरीच खूप आश्चर्यकारक आहे. मोदी विरूद्ध इतर सर्व असा (निवडणुकीचा) लढा ज्या गुजरातेत झाला, तेथील वर्तमानपत्रे वगळता कोणीही या विजयाबद्दल फारशा कौतुकाने बोलतानाही दिसत नाही. (या घटनेचाच उल्लेख अगदी अपरिहार्य झाले म्हणून केला असल्यास न कळे!) मोदी यांचा पराभव झाला असता, तर हेच चित्र दिसले असते का, हा प्रश्न त्यामुळेच विचारावासा वाटतो.
गुजरातमधील निवडणुकांबाबतचे हे बिनविरोध मौन मात्र निकालानंतरच जाणवत आहे, अशातला भाग नाही. निवडणुका संपल्यानंतर म्हणजे मतदानाचे दोन टप्पे पार पडल्यानंतरही त्याबाबत लक्षणीय सामसूम होतीच. बोटाला शाई लागलेला मतदार केव्हा एकदा बाहेर पडतो आणि केव्हा आपण त्याच्या ताज्या मतदानाचा अदमास घेऊन एक्झिट पोलची पोतडी दर्शकांपुढे रिकामी करू, अशा बेतात असलेल्या वाहिन्याही यावेळी बेताबेतानेच आपले अंदाज व्यक्त करत होत्या. त्यांना शक्य असतं, तर मोदी यांचा सपशेल पराभव होणार, असा जाहीर हाकारा त्यांनी केव्हाच घातला असता. संपूर्ण प्रचाराच्या काळात आणि मतदानाच्या वेळेसही (स्पष्टच सांगायचं तर गेल्या एक दीड वर्षातही) वाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी आडून आडून तसे सुचविलेही होते. मात्र थेट आपली कल्हई उघडी न करता वेगवेगळ्या मिषाने मोदींचा उपमर्द करण्याचा प्रयत्न चालूच होता.
मोदींच्या विरोधात बंड करणारे कोण, त्यांचा इतिहास काय याचा काडीमात्र अभ्यास न करता त्यांच्या बळावर गुजरातेत भारतीय जनता पक्षाला पराभवास सामोरे जावे लागेल, असे भाकित वर्तविणारे काही जण होते. त्याचप्रमाणे सोनिया गांधी यांच्या ‘चाणाक्ष राजकीय’ खेळीमुळे सोहराबुद्दीन प्रकरणाच्या जाळ्यात मोदी सपशेल अडकले, असे ठोकून देणारेही या काळात पाहायला मिळाले. एका मोठ्या मराठी वर्तमानपत्राने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मणीनगरमध्ये (नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ) प्रचार सभा घेऊन कॉंग्रेसच्या बाजूने हवा कशी निर्माण केली, याचा ऑंखो देखा हाल वर्णन केला होता. सोहराबुद्दीनप्रकरणी
तिस्ता सेटलवाड सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर ‘अशा प्रकरणांतून न्यायालयांनी दूर राहायला हवे,’ अशा आशयाचा अग्रलेख ‘मुंबई समाचार’ या १५० वर्षांहून अधिक जुन्या गुजराती वृत्तपत्राने लिहिला होता. मात्र त्याची दखल घेण्याची कोणाला गरज वाटत नव्हती.
रविवारी, २३ डिसेंबरपासून मात्र कोणत्याही तज्ज्ञांचा आवाज ऐकू येईनासा झाला आहे. केवळ हिंदूत्वाच्या आणि पुराणकथांच्या गोष्टी करणाऱयांना विकास काय कळणार, असा प्रश्न विचारणाऱयांना केवळ विकासाच्या मुद्यावर एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याने विजय मिळविल्याचे पाहावे लागावे, यांहून अधिक दुर्दैव ते कोणते? मॅडमनी सांगितले तर मी घरीही बसेन किंवा मॅडमच्या गेल्या पाच पिढ्यांच्या कर्तृत्वामुळेच या देशाला भाग्याचे दिवस आले आहेत, असे सांगणाऱया स्वाभिमानी नेत्यांच्या या देशात, अमेरिकेने व्हीसा नाकारल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्योजकांशी संपर्क साधून विक्रमी गुंतवणूक आकर्षित करणारा नेता काय कामाचा? अशांचे कुठे कौतुक करायचे? त्यामुळे गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या चर्चेची धूळ अचानक खाली बसली आहे. शोलेचे निर्माते जी. पी. सिप्पी यांचे नुकतेच निधन झाले. याच चित्रपटातील एका संवादाची त्यामुळे अवचित आठवण झाली…
“इतना सन्नाटा क्यों है भाई?”

निषेध असो…

पुण्यातील कोणत्याही गल्लीबोळातील, कोणालाही सहजासहजी सापडणार नाही अशा इमारतीतील कुठल्याही एका राजकीय पक्षाचे कार्यालय. साधारण दोन खोल्या बसतील असा एकच हॉल. एका कोपऱयात मोठा टेबल. त्याच्यासमोर तीन चार खुर्च्या. सध्या या खुर्च्या रिकाम्या आहेत. पलिकडच्या बाजूस एक खिडकी. टेबलच्या थेट समोर एक टीव्ही. त्याच्यावर कुठलेतरी गाण्याचे एक चॅनल चालू असल्याचे दिसते. त्यावर हिमेश रेशमिया किंवा बेसुरेपणात त्याच्याशी स्पर्धा करेल, अशा एखाद्या गायकाचा चेहरा झळकतो. अधूनमधून काही जाहिरातीही.

हॉलमधील टेबलवर बसलेली व्यक्ती सर्वात प्रथम नजरेत भरते. साधारणतः चाळीशीची व्यक्ती. डोक्यावर मध्यम आकारचे केस, मात्र त्यांचा भांग पाडून खूप वेळ झाल्याचे चटकन जाणवते. पान किंवा गुटखा खाल्ल्यामुळे लाल झालेले ओठ. या व्यक्तीच्या खिशात एक मोबाईल आणि टेबलवर एक मोबाईल ठेवलेला. शिवाय टेबलवर एक टेलिफोन वेगळा. टेबलवर पडलेल्या वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यातून एक एक वर्तमानपत्र काढून वाचण्यात ही व्यक्ती दंग आहे. प्रत्येक पेपरमधील प्रत्येक पानाचे अत्यंत काळजीपूर्वक वाचन चालू असल्याचे दिसत आहे. तितक्यात आणखी एक व्यक्ती खोलीत प्रवेश करते. सुमारे वीस-बावीस वर्षांचा मुलगा. याच्याही तोंडात गुटखा. मात्र त्यातही कसलेतरी गाणे गुणगुणण्याचा त्याचा प्रयत्न.

“अरे नेते, कधी आलात,” युवकाचा प्रश्न. त्यावर आत्ताच असे नेत्याचे उत्तर. पाठोपाठ नेत्याचा प्रश्न, “काय रे वाचलेस का आजचे पेपर?”

“वाचले ना, काय नाय सापडलं नेते,” युवकाचे लागलीच उत्तर. दरम्यान त्याने गाण्याचे चॅनल बदलून बातम्यांचे चॅनेल लावलेले असते. त्यावर काही वेळ जाहिरातीच चालू. मुलगा पुन्हा बोलू लागतो, “सगळे चॅनेल पाहून झाले. आज काय नाहीच दिसतं. तिकडंबी ते शारुखचं पिक्चर हिट झाल्याचीच बातमी देतायत. नव्या कोण्या पिक्चरची बातच करत नाय कोणी.”

नेते उत्तर देणार एवढ्यात त्यांचा एक मोबाईल वाजतो. सवयीने ते खिशातला मोबाईल काढून बोलू लागतात, “हां, बोलतोय. हां, आरं तयार हायेत पत्रकं सगळी. पन आज काय कोणी चान्स दिलेला दिसत नाय. सगळ्या बातम्या पाहिल्या. कशावर पत्रक काढणार?.”

काही वेळ नेते पलिकडच्या व्यक्तीचं ऐकतात. त्यानंतर पुन्हा सुरू, “हां…पन आज आहे पालिकेला सुट्टी. तिथलं काय लफडं नाही कळालं. तिकडं दिल्लीतल्या सरकारनं जबानच बंद केली ना राव. कोणी काही बोलतच नाही…आरं तो कसला तरी करार आहे ना तेच्यावर. सालं कम्युनिस्ट बी आता तेच्यावर बोलत नाही त्यांचं नंदीग्राम झाल्यापासून. इकडं मुंबईतले सगळे गेलेत गुजरातला. त्यांच्याकडून बी काही ऐकायला मिळत नाही. कोणाला पकडावं आता तूच सांग. सगळा धंदा मंद झालाय भाऊ…”

नेते फोन ठेवतात. त्यानंतर काही वेळ खिडकीशी जाऊन बाहेर पाहात उभे राहतात. मध्येच हाक मारतात, “ए संज्या.” लगेच संज्या त्यांच्याजवळ जाऊन उभा राहतो. “का रे, रस्त्यावर एवढी गर्दी का,” नेते विचारतात.

“रोजच होते ना नेते. शाळा आहे ना पलिकडे. तिथल्या पोरांमुळे इथे ट्रॅफिक जॅम होतं,” संज्या प्रामाणिकपणे माहिती पुरवतो.

“अरे, मग याच्यावरच काढू ना पत्रक. या रस्त्यावर विद्यार्थ्यांमुळे गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दाद घेत नाही. याचा आम्ही निषेध करतो…,”नेत्यांनी तोंडपाठ असल्यासारखा पत्रकाचा मजकूर सांगितला. त्यांना अर्ध्या रात्री उठविलं असतं तरी हाच मजकूर त्यांनी पाकिस्तानकडून बाबर क्षेपणास्त्राची चाचणी किंवा खटखटवाडीत डांबरी रस्ता करण्याकडे दुर्लक्ष अशा कोणत्याही विषयाला धरून सांगितला असता. मात्र त्यांचा आज्ञाधारक सेवक संज्या जागचा हालत नसल्याचे पाहून नेत्यांचा पारा चढू लागतो. तेवढ्यात संज्याच तोंड उघडतो, म्हणजे आधी खिडकीतून गुटखा थुंकायला आणि त्यानंतर नेत्यांना माहिती द्यायला, “नेते, परवाच दिला ना हा मजकूर. तीन पेप्रांत छापून बी आलाय ना.”

या उत्तरावर नेत्यांचा चेहरा गोरामोरा होतो. पुन्हा खिडकीबाहेर पाहून ते शून्यांत हरवतात. पंधरा वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अशी वेळ कधी आली नव्हती. प्रसंग कोणताही येवो, बातमी वर्तमानपत्रांत नंतर छापून यायची अन नेत्यांच्या निषेधाचं पत्रक आदी वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोचायचं. एक दोन वेळेस त्यांच्याकडून पत्रक वेळेवर गेले नव्हते, त्यामुळे काही वर्तमानपत्रांनी मूळ बातमीच छापायला नकार दिला होता. नेत्यांचं पत्रक आलं नाही त्याअर्थी ती बातमी खोटी आहे, अशी बिचाऱया पत्रकारांची समजूत. इतका पत्रकारांचा नेत्यांवर विश्वास! अन आज त्याच नेत्यांवर पत्रकासाठी विषय शोधायची वेळ यावी?

नेत्यांनी एकदा टेबलामागे ठेवलेल्या लेटरहेडच्या गठ्ठ्याकडे पाहिलं. पगाराच्या दिवशी एखाद्याला प्रत्येक दुकानाच्या शो-केसमध्ये ठेवलेल्या वस्तूंना खुणवावं, तसे ती होतकरू पत्रकं त्यांना आव्हान देत होती. थोड्या वेळाने त्यांना पत्नीसमवेत एका हॉटेलमध्ये जायचं होतं. पंधरा मिनिटांच्या आत पत्रक लिहून पाठविणं आवश्यक होतं. नाहीतर उद्या छापून आलं नसतं.

विमनस्कपणे नेते पुन्हा टेबलकडे येतात. चालू असलेल्या चॅनेलवरील कोणताही कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इतका वेळ स्पोर्टस चॅनेलवर रेसलिंगची हाणामारी सुखैनैव पाहणारा संजू अस्वस्थ होतो. “चहा सांगू का,” तो विचारतो. नेते मानेनेच होकार देतात. लगेच संजू कोणातरी छोटूच्या नावाने चहाची ऑर्डर देतो.

थोड्या वेळाने चहा येतो. नेते एक घोट घेतात. दरम्यान आता टेबलवरील मोबाईल वाजलेला असतो. “हो निघालोच,” लगेच पाच मिनिटांत असं काहीबाही बोलून ते संभाषण आटोपतं घेतात. संजू आपले लक्ष नाही असं दाखवितो.

“साखर कमी टाकलीय का रे यानं,” नेत्याच्या या प्रश्नावर तो दचकतो. एका चॅनेलवर बातम्या म्हणून एका हिरोईनचं लफडं दाखवित असतात. त्यात त्याचं लक्ष असतं. चहात साखर कमी असल्यानं त्याला काहीही फरक पडलेला नसतो.

“मला बी वाटलं तसं,” तो उगाच सांगतो. इतक्यात नेते पुढला प्रश्न विचारतात, “साखर संकुलात ती बैठक होती ना रे ती आज?”.

“नाय झाली आज,” संज्या उत्तरतो, “अशा दहा बैठका लिहिल्यात त्या तुमच्या डायरीत. एक बी झाली नाही. त्यात काही झालं असतं तर आपल्याला बरं, नाही का?”

त्याच्या या उत्तरावर नेत्यांचा चेहरा अचानक उजळतो. लगेच ते मागे वळून लेटरहेडचा गठ्ठा काढतात. त्यातील एक लेटरहेड घेऊन लगेच लिहायला बसतात. थोड्या वेळाने लिहून झाल्यावर संज्याला सांगतात, “संज्या, आजचं आपलं पत्रक झालं. आता याची झेरॉक्स काढून सगळ्यांना पाठव. सालं, आलंच पाहिजे उद्या-परवा सगळीकडे.”

संज्याच्या चेहऱयावर प्रश्नचिन्हांची गर्दी होते. त्याला अजून राजकारणात गती नसल्याने पत्रकात काय लिहिलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याचा तो प्रश्न नेते सोडवतात, “ऐक काय लिहिलंय…आपल्या शहरात आणि राज्यात तसेच देशातही अनेक प्रश्नांचं थैमान सुरू आहे. त्यासाठी आमच्या संघटनेने अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर शासनाने समित्यांची नियुक्ती केली. मात्र त्या समित्यांची बैठक होत नाही. राज्याच्या या प्रश्नांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सरकारच्या या वेळकाढूपणाचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात त्वरीत काही कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत…”

नेत्यांच्या या वाक्यासरशी संज्याच्या चेहऱयावरही हास्य खेळू लागतं. निरनिराळ्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयात जाण्यासाठी पेट्रोलचा खर्च म्हणून त्यालाही शंभर-दीडशे रुपये मिळणार असतात अन आपला आजचा निषेधाचा कोटा पूर्ण झाला, या आनंदात नेते पत्नीसह सुखाचा घास घेऊ शकणार असतात…

इंग्लिश पिक्‍चर? कुठं आहेत?

इंग्रजी सिनेमा पाहणे, ही एके काळी प्रतिष्ठेची बाब होती. त्यातील चित्रीकरण (पाहणाऱ्यांच्या शब्दांत फोटोग्राफी!), मोटारींचा पाठलाग, नेत्रसुखद लोकेशन्स अशा गोष्टींवर बोलताना चित्रपट पाहणारे थकत नसत. ज्यांना इंग्रजी चित्रपट समजत नसत, असे बापडे (हेच संख्येने अधिक!) साहजिकच त्यांच्याकडे कौतुकमिश्रित आदराने बघत. चित्रपट जेम्स बॉंडचा असेल, तर त्यातील सुंदरी आणि विविध यांत्रिक करामतींची यात भरच पडत असे. दुसऱयाही काही इंग्रजी चित्रपटांची हवा तेव्हा होती, आताही आहे. त्यांच्याही बाबत उत्सुकता तेव्हा होती, आताही आहे. मात्र आपण बोलत आहोत ते काही प्रतिष्ठीत चित्रपटांविषयीच. कारण मी ज्या वातावरणातून आलो आहे, तिथे इंग्रजी चित्रपटांचे नाव निघाले की ऐकणाऱयांचे डोळे एक तर विस्फारतात तरी किंवा आंकुचित तरी होतात.

दुसऱयाही काही इंग्रजी चित्रपटांची हवा तेव्हा होती, आताही आहे. त्यांच्याही बाबत उत्सुकता तेव्हा होती, आता आहे. मात्र आपण बोलत आहोत ते काही प्रतिष्ठीत चित्रपटांविषयीच. कारण मी ज्या वातावरणातून आलो आहे, तिथे इंग्रजी चित्रपटांचे नाव निघाले की ऐकणाऱयांचे डोळे एक तर विस्फारतात तरी किंवा आंकुचित तरी होतात. अठरा वर्षे वय झालेल्या व्यक्तीनेच (म्हणजे पुरुषांनी) असे चित्रपट पाहावेत, त्याच्यावर आपल्या समवयस्क लोकांतच त्याची चर्चा करावी, असं वातावरण लहानपणापासून पाहात असल्यामुळे मोठं होण्याचे वेध फार लवकर लागले. (टॉकिजमध्ये प्रवेश करण्यासाठी वयाची खात्री कशी पटवावी, असा प्रश्न मला अनेक वर्षे पडला होता. शेवटी अठराचं वय पार केलं आणि तो प्रश्न निकालात निघाला.)

मोठं झाल्यावर इंग्लिश चित्रपट पाहायला मिळतील, ही जी कल्पना होती ती मात्र सपशेल धुळीला मिळाली. साधारण तेरा वर्षांपूर्वी स्टीव्हन स्पिलबर्गचा “ज्युरासिक पार्क’ हिंदीत आला. हॉलिवूडची भारतीय भाषेमधील ही “एंट्री’! त्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे अन्य हॉलिवूड निर्मात्यांनीही चित्रपट डब करायला सुरवात केली. गेल्या काही वर्षांतील महत्त्वाचे चित्रपट आठवून पाहा…त्या सर्वांच्या हिंदी आवृत्त्या चित्रपटगृहांत आल्याचेही तुम्हाला आठवेल. आतापर्यंत हिंदी, तमिळ व तेलुगु भाषेतच हॉलिवूडचे चित्रपट येत असत. गेल्या वर्षी “स्पायडरमॅन ३’ची भोजपुरी आवृत्ती आल्याने आणखी एक पाऊल पुढे पडले. त्यानंतर “ए नाईट इन म्युझियम’ हा चित्रपट “वार्नर ब्रदर्स’ने भारतात हिंदी आणि तमीळ, तेलुगु भाषांमध्येच प्रदर्शित केला. केवळ डीव्हीडीवर तो मूळ इंग्रजीत उपलब्ध आहे. मराठी चित्रपटांची सध्याची चांगली स्थिती पाहता, मराठीतही चित्रपट डब झाल्यास नवल नाही.

आता होतं काय, की इंग्रजी चित्रपट पाहायला हक्काची जागाच राहिली नाही. सध्या मी पुण्यात राहतो. तिथे इंग्रजी चित्रपटांच्या खास जागा म्हणजे अलका आणि विजय टॉकिज. मात्र गेल्या काही काळापासून या दोन्ही चित्रपटांगृहांत इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. “अलका’मध्ये दोन आठवड्यांपासून हॉलिवूडचे हिंदीतील डब चित्रपट दिसत आहेत; तर “विजय’मध्ये इंग्रजी चित्रपटाच्या हिंदी आवृत्त्यांशिवाय हिंदी, मराठी किंवा अगदी कन्नड चित्रपटही झळकत आहेत. मल्टिप्लेक्‍स हीच इंग्रजी चित्रपटांची हक्काची जागा आहे, असं म्हणावं तर “सिटीप्राईड सातारा रोड’मध्येही सध्या “आय ऍम लिजेंड’चा हिंदी अवतार “मैं जिंदा हूं’ चालू आहे. अन्य मल्टिप्लेक्‍समध्येही त्याचे अनुकरण होण्याची शक्‍यता कशी नाकारणार? “मंगला’, “फेम जय गणेश’ आणि “अपोलो’मध्येही हा चित्रपट हिंदीतच आहे. त्याशिवाय “30 नाईट डेज’चीही हिंदी आवृत्ती एक दोन चित्रपटगृहांत सुरू आहे. शिवाय प्रत्येक इंग्रजी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये पाहावा, एवढे काही आपले उत्पन्न अमेरिकेच्या तोडीचे नाही.

पुढील आठवड्यात येणारा “मिनोटॉर’ हा चित्रपटही प्रामुख्याने हिंदीतच येत आहे. त्यामुळे काही दिवसांनी इंग्रजी चित्रपट कुठं आहेत, असंच म्हणावं लागेल! खरं सांगायचं तर तमिळ, तेलुगु किंवा अन्य दाक्षिणात्य आणि चीनी भाषेतील चित्रपटांच्या तुलनेत हॉलिवूडच्या डब चित्रपटांची गुणवत्ता चांगली असते. मात्र इंग्रजी चित्रपटाची इंग्रजीची म्हणून जी मजा असते, ती या चित्रपटांत उतरत नाही. ‘विजय’मध्ये मी ‘ओशन्स ट्वेल्व’, ‘ब्रिजेट जोन्स डायरी-२’ असे एक दोन चित्रपट पाहिले. ‘अलका’मध्ये ‘द मिथ’, ‘ब्रोकबॅक माउंटन’, ‘फ्लाईट ऑफ द फिनिक्स’, ‘प्राईड अँड प्रिज्युडिस’ असे काही चित्रपट पाहिले. आता तिथे हिंदीत चित्रपट पाहणे जीवावर येतं.

डब चित्रपटांचा एक महत्वाचा दोष म्हणजे ते मुख्यत्वे मारधाडीचे चित्रपट असतात. चांगले इंग्रजी चित्रपट भावभावनांना महत्त्व देणारे असतात. त्यामुळे त्या प्रकारचे चित्रपट आवडणाऱयांना डब चित्रपटात काय मजा येणार? तरीही बहुसंख्य लोकांना डब चित्रपट पाहण्यात गंमत वाटत असल्याने चित्रपटगृहांत असेच चित्रपट येणार, हे मी गृहित धरलं आहे. इंग्रजी चित्रपट कुठं आहे, असं विचारण्याची वेळ नक्की येणार, हेही नक्कीच!


खराखुरा दलपती

हिंदीतील ‘अंधा कानून’ या चित्रपटाद्वारे रजनीकांत उत्तर भारतातील प्रेक्षकांना माहित झाला. मात्र त्यापूर्वीच तेलुगु आणि कन्नड प्रेक्षकांचा तो गळ्यातील ताईत झाला होता. तमिळनाडूत तर त्याच्या नावाचे नाणेच तिकिटबारीचालत होते. १९८७ साली एमजी रामचंद्रन यांचे निधन झाले आणि त्यानंतर रजनीकांत राजकारणात येणार अशा अफवा सुरू झाल्या. याचवेळी त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, अध्यात्माच्या ओढीबद्दल, समाजसेवेच्या वृत्तीबद्दल चर्चा होऊ लागल्या.

या सर्वाँचा फायदा चित्रनिर्मात्यांनी घेतला नसता तरच नवल. त्यामुळे रजनीकांतला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट जसे होऊ लागले, तसे रजनीकांतच्या जीवनावरच चित्रपट तयार होऊ लागले. ‘अण्बुळ्ळ रजनीकांत’ हा असा जगात कुठेही बनला नसेल अशा प्रकारचा चित्रपट. या संपूर्ण चित्रपटात रजनीकांतने रजनीकांतचीच भूमिका केली आहे. त्यात त्याचे घर, आध्यात्मिक गुरु यांचे चांगलेच चित्रण घडते.

त्यानंतर ‘अन्नामलै’, ‘मुथु’, ‘पडैयप्पा’, ‘बाशा’ व ‘बाबा’ आणि आता ‘शिवाजी’…अशा चित्रपटांमध्ये पडद्यावर एखाद्या पात्राच्या वेशात रजनी असला तरी त्या पात्राचा सूत्रधार रजनीकांत असल्याचेच जाणवते ते त्यामुळे. त्याच्या सर्व चित्रपटांत रजनीकांत मातृप्रेमी असतो, देवभक्त असतो ते यासाठी. त्याच्या गाण्यातही त्याच्या तत्वज्ञानाच्या ओळी असतात. रजनीकांत बोलतो ते संवादही त्याचेच तत्वज्ञान सांगतात. पडद्यावर तो जे बोलतो त्यात वास्तवाचा अंश असतो असे त्याचे चाहते मानतात. नान ओरु तडवै सोन्ना, नुरु तडवै सोन्न मातिरी (मी एकदा जे सांगितले ते शंभरदा सांगितल्यासारखं आहे) किंवा नान एप्पो वरुवेन एप्पडी वरुवेन यारुक्कुम तेरुयादु. आणा वर वेण्डिय नेरत्तिले नान करेक्टा वरुवेन, (मी कधी येणार कसा येणार कोणालाही माहित नाही. मात्र येण्यासाठी योग्य वेळी मी नक्की येईन) अशा त्याच्या वाक्यांना त्याच्या राजकारणप्रवेशाशी जोडून पाहण्यात येते.

यादृष्टीने ‘पडैयप्पा’ हा चित्रपट रजनीकांतच्या जीवनाचेच पडद्यावरील दर्शन आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या चित्रपटात रजनीकांतच्या समोर खलनायक नाही तर खलनायिका आहे (जयललितांचे रुपक), त्याच्या खऱया जीवनाप्रमाणेच चित्रपटातही दोन मुली दाखविल्या आहेत. चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये त्याच्या तोंडचे संवादही वास्तव जीवनाशी निगडीतच दाखविण्यात आले आहेत. मला आठवते १९९९ सालच्या फेब्रुवारीत हा चित्रपट आला होता. त्यावेळी एन वळी तनी वळी या त्याच्या खास ‘पंच डायलॉग’ने संपूर्ण तमिळनाडूला वेड लावले होते. या चित्रपटाच्या एका दृश्यात तो खलनायिकेला म्हणतो, पोंबळ पोंबळेया इरुक्कनुम. (बाईने बाईसारखे रहावे.) त्यावेळी अख्ख्या थिएटरमध्ये ‘जयललिता…जयललिता’चा आवाज घुमायचा. ‘पडैयप्पा’चे दिग्दर्शक के. एस. रवीकुमार यांनी चित्रपटाच्या यशाचे वर्णन इमालय वेट्री (हिमालयासारखे उत्तुंग यश) असे केले होते.
‘बाबा’ हा तसा (रजनीकांतच्या मानाने) अपयशी चित्रपट. या चित्रपटात एक दृश्य होते…नायिका (मनीषा कोईराला) हिला सिनेमाची तिकिटे हवी असतात. बाबा (रजनीकांत) तिला तिकिटे काढून देण्याची ऑफर देतो. नायिका यावर अविश्वास दाखविते. त्यानंतर बाबाचा मित्र (गौंडमणी) तिला म्हणतो, “याने मनात आणलं तर सिनेमाचीच काय, खासदारकीचीही तिकिटे मिळतात.” या वाक्याला टाळ्यांची दाद मिळाली नसती तरच नवल. ‘शिवाजी’मध्येही अशा प्रत्यक्ष आणि पडद्यावरील जीवनाची सीमारेषा प्रचंड धूसर आहे. रजनीबाबतच्या या वास्तवाचा वेगळाच अनुभव मणीरत्नमलाही आला. ‘दलपती’ चित्रपटात रजनीकांत मुख्य नायक. सोबत अरविंद स्वामी आणि मलयाळम अभिनेता ममूट्टी हेही होते. चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार रजनीकांतचा मृत्यू अपेक्षित होता. मात्र तमिळ प्रेक्षकांना हा शेवट कधीही खपला नसता. रजनीकांतचा मृत्यू असलेला चित्रपट अद्याप तमिळमध्ये निर्माण व्हायचा आहे…अन आता तशी शक्यताही नाही. तर मणीरत्नमला अपेक्षेनुसार मोठी विरोध झाला. वितरकांनीही त्याच्या चित्रपटाला (रजनी असूनही) हात लावायला नकार दिला. अखेर क्लायमॅक्स बदलून त्याला तो चित्रपट तमिळनाडूत वितरित करावा लागला. केरळमध्ये मात्र मूळ क्लायमॅक्स असलेली मलयाळम आवृत्ती वितरित करण्यात आली.

रजनीकांतच्या पडद्यावरील भूमिकेचा वास्तव जीवनात काय परिणाम होतो, हे मी डोळ्यांनी पाहिले आहे. ‘बाशा’ चित्रपटात रजनीकांत ऑटोचालक दाखविला आहे. त्याच्या ऑटोवर प्रसवूक्काक इलवसम (गरोदर स्त्रियांसाठी मोफत) असे ठळक लिहिलेले दिसते. तमिळनाडूत गेलो असताना तेथील अनेक रिक्षांवर मला अशा प्रकारचीच सूचना लिहिलेली दिसली. प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट असा अनुभव चित्रपट क्षेत्रातील अनेकांना येतो. मात्र प्रत्यक्ष आणि प्रतिमा यांच्यातील फरक क्षीण झालेला रजनीसारखा एखादाच. तो मराठी आहे हा योगायोगाचा भाग आहे. काही झालं तरी आमच्यासारख्या ‘मनोरंजन के मारें’चा तो बॉस आहे, हे नक्की!

उद्या ‘बॉस’चा वाढदिवस…

क्रावू नका. मी ‘बॉस’ म्हणजे आपल्या रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड याच्याबद्दल बोलतोय. तमिळनाडूचा सुपरस्टार उर्फ तलैवर उर्फ स्टाईल किंग!

रजनीकांतचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजीचा. म्हणजे उद्या तो वयाची ५७ वर्षे पूर्ण करून ५८ व्या वर्षात प्रवेश करेल. साधा झोपडपट्टीत राहणारा एक मुलगा, नंतर बस कंडक्टर आणि त्यानंतर काही दिवस संघर्ष करणारा अभिनेता ते थेट तमिळ चित्रपटांचा अनभिषिक्त सम्राट होण्यापर्यंत रजनीकांतचा प्रवास झाला. आजही नम्र आणि प्रसिद्धीपराङमुख वर्तनासाठी प्रसिद्ध असलेला हा ‘शिवाजी’ साठीच्या दिशेने प्रवास करतोय.
रामजीराव गायकवाड आणि रमाबाई यांच्या पाच अपत्यांपैकी चौथा शिवाजी. त्याचे बालपण हलाखीत गेले. लहाणपणी रामकृष्ण मिशनच्या शाळेत त्याचे शिक्षण झाले. ते संस्कार आजही कायम असल्याचे तो दाखवितो. बंगळूरच्या शहर बस सेवेत कंडक्टर म्हणून हा मुलगा दाखल झाला. याच काळात विविध नाटकांतून भूमिकाही करायचा. त्याच्या जो़डीला विक्षिप्त तरीही भूरळ घालणारे हातवारे करायचा. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला अभिनेता बनण्याचा आग्रह केला. त्यातून कंडक्टरकी सोडून शिवाजीचा प्रवास झाला चेन्नईतील फिल्म इन्स्टिट्यूटकडे. तिथला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सुरु झाला भूमिका मिळविण्यासाठीचा प्रवास.
यावेळी आलेला एक अनुभव त्याने एकदा सांगितला होता…’त्यावेळच्या एका मोठ्या अभिनेत्याकडे शिफारस मागण्यासाठी गेलो होतो. त्या अभिनेत्याने उद्या ये, म्हणून सांगितले. त्यावेळी रहायचे कुठे हा प्रश्न होता…तेव्हा मग चेन्नई सेंट्रलच्या प्लॅटफॉर्मवर रात्र काढली. दुसऱया दिवशी गेलो, तर पुन्हा दोन दिवसांनी येण्यास सांगितले. पुन्हा मुक्काम प्लॅटफॉर्मवर. अशा रीतीने पाच दिवस काढल्यानंतर मी त्या अभिनेत्याकडे जाणेच बंद केले.’
कन्नड भाषेतील ‘कथा संगम’ हा रजनीकांतचा पहिला चित्रपट. (त्यावेळी त्याला हे नाव मिळाले नव्हते.) ३२ वर्षांपूर्वी म्हणजे १९७५ साली ‘अपूर्व रागङगळ’ या चित्रपटातील काही मिनिटांचे दृश्य हा रजनीकांतचा तमिळ रजतपटावरील पहिला प्रवेश. चित्रपटाची नायिका भैरवी हिच्या कॅन्सरग्रस्त पतीची भूमिका त्याने केली होती. दिग्दर्शक के. बालचंदर यांनी शिवाजीरावला ही भूमिका दिली. तमिळमधील गाजलेल्या ‘बॅरिस्टर रजनीकांत’ या चित्रपटावरून त्यांनी शिवाजीला हे नाव दिले. याच चित्रपटात तमिळ चित्रपटातील त्यावेळी उदयोन्मुख असलेल्या एका कलाकाराची महत्वाची भूमिका होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून पडद्यावर झळकणाऱया या कलाकाराचा तो पंचविसावा चित्रपट होता. काही वर्षांनी रजनीकांतला चित्रपटसृष्टी सोडण्याची इच्छा झाली होती, त्यावेळी याच त्याच्या कलाकार मित्राने त्याला परावृत केले होते. लोकांच्या दृष्टीने रजनीचा प्रतिस्पर्धी असलेला हा मित्र म्हणजे कमल हासन.
मूळात ‘अपूर्व रागङगळ’ कधी आला आणि कधी गेला, हे चित्रपटगृहांच्या कर्मचाऱयांनाही कळाले नसेल. तो यशस्वी झाला असता तरी रजनीकांतला त्याचा फायदा होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र के. बालचंदर यांनी आपल्या सहायकाला जे सांगितलं ते शंभर टक्के खरं ठरलं. “या माणसावर लक्ष ठेव. त्याच्या डोळ्यांत आग आहे. तो एक दिवस खूप मोठा होणार आहे,” ते म्हणाले होते. त्यानंतर ‘मुण्ड्रु मुडिच्चु’, ‘गायत्री’, ‘१६ वयतिनिले’ अशा अनेक चित्रपटांतून त्याने खलनायकाच्या भूमिका निभावल्या. ‘भुवन ओरु केल्विकुरी’ या चित्रपटाने रजनीकांतला खऱया अर्थाने नायक केले. त्यानंतर १९७९ साली आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांतला सुपरस्टार हे बिरुद चिकटविले.
अमिताभ बच्चन नावाचे वादळ उत्तरेतील चित्रसृष्टीत घोंघावत असताना त्याचा प्रभाव दक्षिणेत पडणे स्वाभाविकच होते. त्यानुसार अमिताभच्या हिट चित्रपटांचे सर्व भाषांत आपापल्या मगदुराप्रमाणे रिमेक होत होते. तमिळमध्येही अमिताभच्या रिमेक झालेल्या अनेक चित्रपटांपैकी १२ चित्रपटांत रजनीकांत हिरो होता. अमिताभ, रजनीकांत आणि अन्य अभिनेते या सर्वांचे बहुतांश चित्रपट मी पाहिले आहेत. त्यावरून अमिताभची बरोबरी रजनीकांत करू शकला, असे म्हणता येत नसले तरी तो कुठे पडल्याचेही म्हणवत नाही. अमिताभच्या ‘विजय’ चित्रपटांमध्ये अमिताभ खालोखाल जर कोणी त्याची जादू निर्माण केली असेल तर ती रजनीकांतने. ती (दिवार), पडिक्कादवन (खुद्दार), बिल्ला (डॉन), पय्युम पुली (लावारिस), नंदवनत्तील तलैवन (कस्मे वादें) अशा अनेक चित्रपटांची यासाठी काढता येईल.
यांपैकी १९८० साली आलेल्या ‘बिल्ला‘ने रजनीकांतला अफाट यश मिळवून दिले. हा रजनीकांतच्या कारकीर्दीचा माईलस्टोन मानला जातो. शिवाजी गणेशन आणि एमजी रामचंद्रन यांसारखे जुने अभिनेते काहीसे निवृत्त झाल्याने तरुण रजनीला रान मोकळे होते. एकमात्र कमलहासनचा अपवाद होता. मात्र त्याचा प्रेक्षकवर्ग मर्यादित होता. रजनीच्या स्टाईल आणि टोटल मनोरंजनाच्या फॉर्म्युलाने एक ते दहा पर्यंतची जागा आधीच बुक केली होती. त्यामुळेच ऐंशीच्या दशकात अमिताभच्या रिमेक चित्रपटांत काम करणारा सामान्य रजनीकांत पाच वर्षांच्या आत दक्षिणेतला अमिताभ म्हणून ओळखला जाऊ लागला. याचवेळी बोफोर्समुळे बदनाम झालेल्या अमिताभच्या कारकीर्दीला किंचित ओहोटी लागलेली असली तरी रजनीकांतने कटाक्षाने स्वतःला सर्व वादांपासून बाजूला ठेवले होते. आपला अभिनय, घर आणि अध्यात्म यांतच समाधानी असलेल्या रजनीच्या चित्रपटांनी यशाचे नवे नवे सोपान चढायला सुरवात केली. अन यानंतर सुरू झाला रजनीचा रिल आणि रिअलमधील अंतर संपवणारा सोनेरी अध्याय…

घेता किती घेऊ दो कराने?

मी श्रीमंत व्हावे, ही नियतीचीच इच्छा दिसत आहे. मी सुखात राहावे, चंगळ करावी, खूप पैसा-अडका मला विनासायास मिळावा, देश-परदेशांत भरपूर भटकंती करायला मिळावी, किरकोळ दुकानदारांपासून मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये मी बेधडक प्रवेश करून खरेदी करावी…आणि त्याची किंचितही झळ माझ्या खिशाला लागू नये, अशी सोयच माझ्या नशीबात झालेली दिसत आहे. आता फक्त मी होय म्हणायची खोटी आहे, की बस्स! नेमकं इथंच घोडं पेंड खातंय…

स्थावर घर नसतानाही जगाच्या संपर्कात राहण्यासाठी सोय करून देणारा इ-मेल आला तेव्हा मला काय आनंद झाला होता. मात्र त्याच इ-मेलमुळे मला जगाच्या कानाकोपऱयातून संपत्तीचा वर्षाव होईल, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. मात्र मी मुळातच नशीबाचा सिंकदर, त्यामुळे नायजेरिया, इथियोपिया, इरिटेरिया अशा नाना नावाच्या आणि आकारांच्या देशांतून मला पैसा मिळवून देण्याच्या ऑफर्स येत आहेत. या ऑफर्स एवढ्या अनपेक्षित, अनोख्या आणि अनोळखी देशांतीली आहेत, की मला अनेकदा त्या देशांची जागा बघण्यासाठी जगाच्या नकाशाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागले आहे. या ऑफर्समुळे माझ्या एक लक्षात आलंय हं, की नायजेरियातल्या प्रत्येक दोन माणसांमागे एकाचा शंकास्पद परिस्थितीत मृत्यू झालेला असतो. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर अफाट संपत्ती ठेवलेली असते. (अन ते राष्ट्रसंघाच्या अहवालांतील दुष्काळाची छायाचित्रे, मला तर आता त्यांचीच शंका येत आहे.) मात्र माझ्या सज्जन स्वभावाची, सच्चरित्राची आणि वरती असलेल्या कनेक्शनची ख्याती अख्ख्या जगात असल्याने त्या व्यक्तीचे वारसदार मला मेलद्वारे कळवतात. त्यांची संपत्ती मिळवून देण्याच्या बदल्यात ते मलाही प्रचंड मोठी रक्कम द्यायला तयार असताता म्हाराजा…!

अशा किती ऑफर आल्या आणि म्या करंट्याने त्या तेवढ्या ऑफरचा अव्हेर केला की हो! नायजेरिच्या ७० टक्के, इरिटेरियाच्या ४० टक्के आणि बुर्किना फासोच्या २० टक्के लोकांनी मला अशा प्रकारे मदत देऊ केली आहे. पण माझा स्वभाव पडला भिडस्त आणि दळभद्री. त्यामुळे मी त्यांचा लाभच घेतलेला नाही. तसा घेतला असता तर आतापर्यंत मी किती श्रीमंत झालो असतो, कल्पना करता का. आतापर्यंतच्या ऑफरपैकी अर्ध्या ऑफऱ जरी मी स्वीकारल्या असत्या तरी अमेरिकेचे तीन अध्यक्ष, दोन बिल गेटस आणि एक किंवा दीड अझीम प्रेमजी मी विकत घेऊ शकलो असतो. (लालूप्रसाद यादव किंवा अन्य राजकारणी घेणे मला शक्य नाही, तेवढ्या ऑफर अजूनही मला आल्या नाहीत. याची खरोखर खंत वाटते.)

हे कमी होतं म्हणून की काय, अलिकडे मी न काढलेल्या लॉटरी तिकिटांनाही प्रंचड मोठ्या रकमेची बक्षीसे लागत आहेत. इग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांतील लॉटरी कंपन्या केवळ माझ्या सुखासाठी त्यांची बक्षिसे मला देऊ करत आहेत. माझा इ-मेल ऍड्रेस साक्षात कुबेरानेच तयार केला असल्यामुळे त्या ऍड्रेसवर जगाच्या कानाकोपऱ्यातून बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अगदी गेल्या आठवड्यात मला याहू-एमएसएन या कंपन्यांच्या नावे असलेल्या लॉटरीचे बक्षिस देऊ करण्यात आले. त्यातील रक्कम पाहूनच मला विचार आला, की अंबानी-टाटा वगैरे मंडळी कशासाठी एवढ्या कंपन्या काढतात आणि मेहनत घेतात. त्यांनी इ-मेल अकांउंट काढला तर घरबसल्या त्यांना सध्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा मिळेल. मी मात्र खरोखर या ऑफरचा लाभ घेऊ शकलो नाही. माझी मध्यमवर्गीय मानसिकता माझ्या मला तसं करूच देत नाही, काय करू?

या ऑफरचा लाभ घेतला नाही म्हणून काय झाले. इकडे भारतातल्या कंपन्याही माझ्या सुखासाठी काही कमी धडपड करत नाहीत. काहींनी क्रेडिट कार्ड काढले आहेत, काहींनी तरुणांसाठीच्या विमा योजना काढल्या आहेत, काहींनी गुंतवणुकीच्या आकर्षक योजना काढल्या आहेत. नुसत्या काढल्या आहेत, असे नव्हे. या योजनांचा मी पुरेपूर वापर करावा, याचाही ते प्रेमळ आग्रह करतात. बरं, त्यांचं अगत्य एवढं की मी योजनांचा लाभ करून न घेता माझ्या गरिबीच्या दिवसांत राहिलो तरी त्या योजनांची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट मला कळविल्याशिवाय त्यांना सुखाचा घास जात नाही. एका क्रेडिट कार्डच्या कंपनीने त्यांच्या कार्डचा आकार १० सेंमीवरून आठ सेमी केला, हे त्यांनी मला नऊ वेळा मेल करून कळविले. माणूस अर्धमेला होणे म्हणजे काय हे मला तेव्हा कळाले. एका विमा कंपनीच्या दरात बदल नाही, मुदतीत बदल नाही का प्रिमियममध्ये बदल नाही. तरीही ती कंपनी मला सारखी ती माझ्या पाठीशी उभी असल्याची जाणीव करून देते. कारण काय, तर त्या कंपनीच्या जाहिरातीतील मॉडेल अलिकडे बदलली आहे. पूर्वीची मध्यमवयीन ललनेच्या जागी आता एक षोडशवर्षीय नवोढा आली आहे. आता सांगा, याहून अधिक काळजी कोण घेणार?

माझ्या सौख्यासाठी नेट लावून प्रयत्न केवळ मेलद्वारे होतायत असे नव्हे. प्रत्यक्ष जगातही त्यासाठी अनेकजण दिवसरात्र एक करत आहेत. मोबाईल नामक यंत्राद्वारे त्याची अनेक प्रात्यक्षिके अधून-मधून (म्हणजेच सातत्याने) चालू असतात. एका कंपनीने गुंतवणुकीची खूप छान योजना आणली होती. त्यामुळे मला महिन्याच्या महिन्याला मोठी रक्कम मिळणार होती. ही सर्व माहिती सांगणारी मुलगी अशा सुरांत सांगत होती, की अगदी त्या कंपनीचाच मालक असतो तरी त्या आवाजाल भूलून मी गुंतवणूक केली असता. पण हाय रे दैवा! मी त्या कंपनीचाच काय, मी काम करत असलेल्या कंपनीचाही मालक नाही. त्यामुळे तिची सगळी योजना सांगून झाल्यावर मी तिला एका शब्दांतच सांगितलं, “तुम्ही सांगताय ते खरं आहे. मला तुमची योजना आवडली. पण त्यात गुंतवणूक करण्यासाठी माझा सध्याचा पगार वाढवायला पाहिजे. तुम्ही जरा आमच्या कंपनीत फोन करून सांगता का, त्याबद्दल?”

यानंतर त्या मुलीने संवाद आटोपता घेतला व पुन्हा कॉल केलाही नाही. पण मला विश्वास आहे, की मला परवडेल आणि फायदा होईल, अशी एखादी योजना तयार करायला तिने तिच्या कंपनीला सांगितलेच असेल. पण असे प्रयत्न करणारी ती एकटीच थोडी आहे. विविध क्रेडिट कार्ड, बँका त्यांच्या मोठमोठ्या आणि प्रतिष्ठित ग्राहकांमध्ये माझे नाव जोडण्यासाठी उतावीळ झाल्या आहेत. त्यामुळे माझ्या मोबाईलवर मित्र आणि नातेवाईकांच्या कॉलपेक्षा या कंपन्यांच्या कॉलचीच संख्या जास्त झाली आहे.

या सगळ्यांना नाराज करायला माझ्या जीवावर येतं. पण करणार काय. आपल्याला पडली कष्टाची भाकर खाण्याची सवय. त्यामुळे या सुख-समृद्धीच्या योजना डोळे दिपवून टाकत असल्यातरी नजरेत भजत नाहीत. त्यामुळे मी अजूनही करंट्यासारखा या योजना केवळ वाचून सोडून देतो. या सर्वांचा त्यामुळे हिरमोड होत असेल, याची मला जाणीव आहे. पण शेवटी आपल्या घेण्यालाही मर्यादा आहेतच ना. घेता किती घेशील दो कराने, हे आपल्याला लक्षात घ्यावंच लागतं.

क्रेमलिनचा विजेता

शियाच्या जनतेने संसदेच्या निवडणुकीत “युनायटेड रशिया’ या पक्षाला मोठ्या बहुमताने विजयी केले आहे. मतदारांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शविला आहे. साहजिकच पुतिन यांनीही या आनंदाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एका महान देशाच्या नेतृत्वपदी पुन्हा एक कणखर नेता पाहण्यास यानिमित्ताने मिळणार आहे.
पुतिन यांच्या विजयाबद्दल माध्यमांनी, विशेषतः पाश्‍चिमात्य माध्यमांनी नाराजीचा सूर काढला असून, रशियातील निवडणुकांच्या निष्पक्षपातीपणावरच संशय व्यक्त केला आहे. ही खास पाश्‍चिमात्यांची स्टाईल! त्यांना नेतेही पश्‍चिमेच्या रंगातील हवे असतात आणि लोकशाहीही पश्‍चिमेच्या ढंगाची हवी असती. मात्र खमकेदारपणे रशियाला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या पुतिन यांनी पाश्‍चात्यांच्या या कोल्हेकुईकडे लक्ष न देण्याचे धोरण बाळगले आहे. त्यांच्या परिस्थितीत ते योग्यही आहे. खंडप्राय देशाच्या, तेही अण्वस्त्रधारी देशाच्या प्रमुखावर त्याच्या जनतेचा विश्‍वास असेल, तर त्याने इतरांकडून आपली भलामण होण्याची अपेक्षा का बाळगावी?
रशियातील निवडणूक “वेस्टमिन्स्टर’ पद्धतीने झाली नाही, ही गोष्ट खरी आहे. ही पद्धतच जगात लोकशाहीचा एकमेव मार्ग आहे, असे ज्यांना वाटते त्यांची गोष्ट वेगळी. काही ठिकाणी लोकांना टोकाचा आग्रह करण्यात आला तर काही ठिकाणी त्यांना सामूहिकरीत्या मतदान करण्यास (पण विशिष्ट पक्षाला नव्हे!) भाग पाडण्यात आले, असे “बीबीसी’ आणि “रॉयटर्स’च्या काही बातम्यांमधून दिसते. मात्र त्याच बीबीसीने “जोरदार टीकाही पुतिन यांची लाट झाकू शकत नाही,’ अशीही “स्टोरी’ दिलीच आहे.
व्लादिमीर पुतिन हे नाव घेताच डोळ्यांपुढे येतात धीर, गंभीर चेहऱ्याचे आणि मीतभाषी पुतिन. “केजीबी’शी संबंधित भूतकाळामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच शंकेच्या सुरांत बोलल्या गेलं (आपल्याकडेही!). मात्र गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये रशियाच्या कोणत्याही नेत्याने (किंवा जगातील कोणत्याही नेत्याने असंही म्हणता येईल) न केलेली गोष्ट पुतिन यांनी केली. ती म्हणजे अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या रशियाला स्वतःच्या पायांवर उभं केलं. “पुतिन ः रशिया’ज चॉईस’ या पुस्तकात रिचर्ड साकवा यांनी पुतिन यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. या पुस्तकात लेखक अलेक्‍झांडर झिनाविएव यांचे मत उद्‌धृत केले आहे. झिनोविएव यांच्या मते, “”पुतिन यांचे अधिकारपदी येणे ही रशियाच्या अमेरिकाकरणाला पहिला गंभीर विरोध होण्याचे निदर्शक होते.” पुतिन यांच्या अंगचे गुण माहित असते तर त्यांना अमेरिका किंवा पुतिन यांच्या पुर्वसुरींनी सत्तेवर येऊ दिले असते असेही निरीक्षण झिनोविएव यांनी नोंदविले आहे.
पुतिन यांनी मात्र अमेरिकाविरोध हा आपला “ब्रांड’ म्हणून विकसित केला नाही. आर्थिक सुधारणांबाबत काहीसे समजूतदारपणाचे धोरण बाळगतानाच आणि त्यावर काटेकोरपणे अंमलबजावणी करतानाच आपल्या राष्ट्राचे (देशाचे नव्हे!) स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्यासही त्यांनी कमी केले नाही. मॉस्को येथील थिएटरमधील ओलीस नाट्य असो (शंभर बळी) किंवा बेस्लान येथील ओलीस नाट्य असो (21 शाळकरी मुलांचे बळी), आपल्या धोरणापासून एक इंचही मागे न सरणारा नेता रशियन जनतेने त्यावेळी पाहिला. 2001-2002 मध्ये अमेरिकेने रशियातून आयात होणारा गहू निकृष्ट असल्याचे सांगून त्यावर बंदी घातली. त्यावेळी पुतिन यांनी लगोलग अमेरिकेतून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घालून “हम भी कुछ कम नही’ हे दाखवून दिले. पुतिन यांच्या कारकीर्दीकडे पाहिले असता ते नेहमीच विजेता ठरल्याचे दिसून येते. जुन्या सोव्हिएत संघातून नवा रशिया उभा करण्याची लढाई ते जिंकले, रशियन लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात त्यांना यश आले, आता निवडणुकांमध्ये स्वतःच्या पक्षाला विजय मिळवून देऊन त्यांनी नवा विजय मिळविला आहे. खऱ्या अर्थाने ते क्रेमलिनचे विजेते ठरले आहेत.
——

मृत्यूदूत मांजर…एक सत्यकथा

मांजर हा प्राणी आपल्याकडे काहीसा भीतीदायक मानला जातो. मार्जारवर्गातील वाघ, सिंह बिबट्या अशा प्राण्यांचं सोडा, अगदी घरातील मांजरीकडेसुद्धा संशयाने पाहिलं जातं. त्यात आत्मा, भूत अशा रहस्यात्मक गोष्टींशी त्याची सांगड घातल्या गेल्याने तर समस्त मार्जारवर्गच गूढतेत गुरफटला गेला आहे. अनेक तथाकथित रहस्यपटांमध्ये मांजरीचे दर्शन (तेही काळ्या) ‘बाय डिफॉल्ट’ आवश्यक मानल्या गेल्याने तर त्यात भरच पडली आहे. मात्र एखाद्या रुग्णालयातील मांजर आजारी रुग्णांजवळ जाऊन त्यांच्या मृत्यूचे भाकित करत असल्याचे सांगितल्यास कसे वाटेल. ही प्रत्यक्षात घडलेली कथा आहे आणि विशेष म्हणजे पाश्चिमात्य देशात सध्या घडत आहे. नुकतीच ही कथा मी रेडियो नेदरलँडसच्या साईटवर वाचली.

ही मांजर आहे अमेरिकेतील. ऱहोड आयलंड येथील प्रोव्हिडंस या शहरात स्टीर हाऊस नर्सिंग अँड रिहॅबिटेशन सेटर आहे. या रुग्णालयाने ऑस्कर या नावाच्या एका बेवारस मांजराला आश्रय दिला. या मांजराने मरणपंथाला लागलेल्या अनेक रुग्णांची भविष्यवाणी केली. इतकी की या मांजराच्या वर्तवणुकीवरून आता कोणाचा ‘नंबर’ लागणार आहे, हे रुग्णालयांच्या कर्मचाऱयांना कळून येते.

ऑस्कर काय करतं, तर त्याला एखाद्याच्या मरणाचा वास आला, की त्या रुग्णाच्या खोलीबाहेर ते वाट पाहत थांबतं. यासाठी काही वेळेला अगदी घंटोगणती प्रतीक्षा करण्याची त्याची तयारी असते. एखाद्या नर्ससोबत ते खोलीत जातं आणि थेट रुग्णाच्या अंथरुणात उडी मारून बसतं. तिथं काही वेळ हुंगल्यासारखं करतं आणि तिथेच झोपीही जातं. यानंतर चार तासांच्या आत त्या रुग्णाची जीवनयात्रा संपलेली असते. बरं, हा पेशंट मरत असताना ऑस्करला तिथेच थांबायचं असतं. कोणी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केल्यास ते निषेधाचा आवाज काढते.

अशा रितीने ऑस्करने आतापर्यंत पंचवीस रुग्णांना वरची वाट दाखविली आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या कर्मचाऱयांच्या दृष्टीने त्याला खूप महत्त्व आहे. एखाद्या रुग्णाजवळ ते गेलं की नर्सेस त्या रुग्णाच्या कुटुंबियांना बोलावतात. खास बाब म्हणजे, ऑस्करच्या या जगावेगळ्या गुणाचे रुग्णाच्या कुटंबीयांना मात्र कौतुकच वाटते. ऑस्करच्या कौतुकादाखल रुग्णालयात एक फलकही उभारण्यात आला आहे.

इथपर्यंतचं सारं ठीक होतं. मात्र यातही गमतीचा भाग असा, की न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन या प्रतिष्ठेच्या नियतकालिकातही ऑस्करवर एक लेख प्रकाशित झाला. डॉ. डेविहड एम. डोसा यांनी हा लेख लिहिला आहे. त्यात ऑस्करचे विचित्र गुण आणि वर्तणूक यांची माहिती देतानाच, त्याचे स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला आहे. डॉ. डोसा यांच्या मते, मृत्यूप्राय व्यक्तींच्या शरीरातून काही विशिष्ट रसायने निघत असावीत आणि ऑस्करला त्यांचा गंध लागत असावा. ते काही असले, तरी या लेखावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र नियतकालिकाच्या मते, डॉ. डोसा यांच्या लेखाला काही आधार देता येत नसला तरी त्याला नाकारते येणेही शक्य नाही.

या वादात मात्र ऑस्करचे काम अजून चालूच आहे. आता तो आणखी किती जणांना परलोकाचा रस्ता दाखवितो, ते त्यालाच माहित!.
——–


हेच ते मृत्यूची चाहूल लागणारे जगावेगळे मांजर