दिवस एक, सकाळी नऊ
सकाळी उठलो. चांगल्या तब्येतीसाठी प्रत्येक माणसाने सकाळी उठणे गरजेचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरै उरकून वर्तमानपत्रे चाळायला सुरवात केली. जगाचे भान यायचे असेल, तर वर्तमानपत्राचे वाचन आवश्यक ठरते. वर्तमानपत्रात त्याच त्या बातम्या होत्या. हे लोक काही चांगलं, संदेशात्मक का छापत नाहीत? काय त्या आयटी का फायटीतल्या लोकांना भरपूर पगार मिळतो म्हणतात. काय उपयोग आहे त्याचा…त्या पैशाचा का चांगला उपयोग होतो? उधळपट्टी करतात लेकाचे! कपडे काय घेतात, बूटं काय घेतात! आमच्याकाळी नव्हतं असं!सूनबाईनं चहा दिला. पहिला घोट घेतला न् काहीतरी खटकल्यासारखं झालं…””सूनबाई, चहात केशर नाही का टाकलं परवा ते आणलेलं…,” तिला म्हणालो..””हां, ते प्रतीकनं परवा आणलेलंच नं…हिमाचलला गेला होता तेव्हा…” तिनंही उत्तर देताना प्रश्नच टाकला.आता ते केसर कोण आणलं, हा प्रश्न निरर्थकच नव्हता का? ते चहात टाकायला हवं होतं. तसं सांगितलं तिला मी, तेव्हा कुठं पुन्हा केसर टाकलेला चहा देते म्हणाली.त्यानंतर दुपारपर्यंत काहीच काम नव्हतं. काही वेळ टीव्ही पाहत बसलो. त्यावरही चांगले कार्यक्रम नेमके आपल्याला वेळ नसतानाच लागतात ना…त्यामुळं आलमारीतून काढून पुस्तकं चाळायला सुरवात केली. कॉलेजमध्ये शिकवत होतो तेव्हा काय लोकांनी एक एक पुस्तकं भेट दिली होती…वा! आता लोकं पुस्तक प्रकाशनाला बोलावतात आणि नवी पुस्तके देतात…ती वाचवत नाहीत. काय करणार? आज रविवार, त्यामुळं संध्याकाळी दोन तीन कार्यक्रम आहेत. तिथे भाषणं होतीलच. त्यामुळं आता झोपतो.
दुपारी चार
दुपारची वामकुक्षी घेतली की कसं ताजतवानं वाटतं. झोपेतून उठलो तेव्हा नात (मुलीची मुलगी) भेटायला आली होती. कुठल्याशा कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. महिन्याला अठरा-एकोणीस (आवंढा) हजार पगार आहे. म्हणजे आमच्या प्रतीकसारखंच. त्याच्यासारखंच हीही खरेदी, वगैरे हूंऽऽ…तिला म्हणालो, “”बाई गं, बचत कर. चांगली पुस्तके वाच…”तर ती म्हणाली, “”आजोबा, दर महिन्याला दोन हजार रुपये म्युच्युअल फंडात टाकते. दोन हजार प्रॉविडंड फंडात जातात. महिन्याला एखादं तरी पुस्तक घेतेच…आता परवाच “जावा अँड एचटीएमएल’ घेतलं. बाकी “गुगल बुक्स’वर वाचते…आणखी काय हवं…'”मला काही सांगता आलं नाही…हातात पैसा खळखळू लागल्यानं तरुण पिढी मोठ्यांचा आदर ठेवेनासी झाली आहे. तरुण पिढीत संस्कार रुजविणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्यानंतर माझ्या कार्यक्रमाला निघण्याची वेळ झाली. नातीकडे कार आहेच. तिला म्हणालो, “”मला सोड कार्यक्रमाला…’तर ती म्हणाली, “”आजोबा, मला जायचंय एका ठिकाणी.”शेवटी सुनेनं आग्रह केला म्हणून मला सोडायला तयार झाली…
रात्री दहा
एक पुस्तक प्रकाशन होतं. कुठल्याशा लेखकानं म्हाताऱ्यांसाठी (हल्ली त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतात) लिहिलं आहे…मी गेलो तेव्हा कार्यक्रमस्थळी मोजकीच मंडळी होती…कार्यक्रमासाठी मला मानधनाचा चेक देणारे श्री. हसरे, मानधन देण्यासाठी माझ्याशी घासाघीस करणारे श्री. रडके…अशी आयोजकांपैकी मंडळी होती. कार्यक्रमाला वेळ होता त्यामुळं त्यांना जाऊन म्हणालो, “”प्रवासखर्चाचं पाकिट?”त्यांनीही दिलं. मात्र त्यातही दहा रुपये कमी असल्याचं घरी किट फोडल्यावर कळालं. हल्ली हे नेहमीचंच झालं आहे…त्यानंतक एक एक पाहुणेमंडळी येऊ लागली. गेल्या महिन्यात कुठल्याशा संस्थेचं पारितोषिक मिळाल्यानं अचानक प्रकाशात आलेला एक जण दीपप्रज्वलनासाठी होता. (सूत्रसंचालन करणाऱ्याचा गॅरेजचा धंदा असल्यानं कार्यक्रमात गंमतच झाली. त्याने ऐनवेळी दीपप्रज्ज्वलनाऐवजी “जीपप्रज्ज्वलन’ असा शब्द वापरला.) मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.कार्यक्रम यथातथाच झाला. मी भाषण केलं. आपलं भाषण म्हणजे नेहमी रंगणारा वीडाच! मी म्हणालो, “”बदलत्या काळात जागतिकीकरण हे वास्तव असून, त्यानुसार परिस्थिती बदलत आहे. या वस्तुस्थितीचा स्वीकार करून ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबीयांशी जोडून घ्यावे. स्वस्थ कुटुंबासाठी परस्परांतील संवाद गरजेचा असून, ज्येष्ठ नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.” ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांच्या आशा-आकांक्षा समजून घ्याव्यात, असंही मी म्हणालो. त्याला खूप प्रतिसाद मिळाला, असं टाळ्यांवरून तेव्हा वाटलं. (सभागृहात मुद्दाम “इको इफेक्ट’ची यंत्रणा लावण्यात आली होती, असं मला नंतर समजलं!)अशा रितीने दिवस छान गेला…आता झोपावे…सकाळी लवकर उठायचे असेल, तर लवकर झोपणे आवश्यक आहे……..
Monthly Archives: जून 2007
हिंदुस्थानचा बॉस कोण?

एकच गोष्ट! ही चूक लोकसत्तातील एका लेखातही झाली होती आणि श्री. राऊत यांच्या लेखातही झाली आहे. ‘शिवाजी’ चित्रपटात रजनीकांत ‘मी महाराष्ट्राचा हिरो’ आहे, असे कधीही म्हणत नाही. तो म्हणतो, ’नान पराशक्ती हिरो.’ (मी पराशक्तीचा हिरो आहे.) पराशक्ती हा शिवाजी गणेशन यांचा तमिळमधील ‘माईलस्टोन’ चित्रपट आहे. त्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही.
दुसरे म्हणजे रजनीकांत यांच्या यशात त्याच्या मराठी असण्याचा काही संबंध नाही. आपण मराठी असल्याचे त्यांनी कधी लपविलेही नाही आणि मराठी असल्याची वृथा फुशारकीही मारलेली नाही, हे त्यांचे मोठेपण! रजनीकांत महाराष्ट्रात राहिले असते, तर त्यांना आजचे वैभव पहायला मिळाले असते का, हा खरा प्रश्न आहे.
बाकी मराठीत रजनीकांत यांच्याबद्दल मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी एक आहे. तो लेख येथे वाचता येईल.
http://saamana.com/2007/June/24/Link/Utsav_1.htm
शिवाजीचा पोवाडा
एक ऐतिहासिक परीक्षण
महाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्चर्सची, फालतू बॉलिवूडची ग ग ग ग गऽऽऽऽऽऽ
महाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्चर्सची, फालतू बॉलिवूडची, रडक्या चित्रपटांची
पिक्चर्सचा धंदा कसला हो जी जी धंदा कसला हो जी जीऽऽ
त्यात आला आता ‘बॉस शिवाजी’ हो जी जीऽऽ आला शिवाजी हो जी जीऽऽ
शाहिर ः काळा कभिन्न रजनीकांत, त्याला मानी कोणी ना कलावंत
तो गेला तमिळनाडूत, अन् सुपरस्टार झाला हो जी जी झाला हो जी जीऽऽ
त्याने घेतले सोळा कोटी, त्याची चर्चा किती पराकोटी
पिक्चर यायची खोटी, बुकिंग फुल्ल झाली हो जी जी फुल्ल झाली हो जी जीऽऽ
त्याला बघायला ही गर्दी, त्यात होते किती दर्दी, त्यात काहींना ऍलर्जी तमिळ चित्रपटांची जी जीऽऽ
तमिळ चित्रपटांची गोष्ट, ग ग ग ग ग गऽऽऽ तमिळ चित्रपटांची गोष्ट भली आगळी, रित सारी वेगळी, तोंडे जरी काळी, कला लई भारी त्याचंच रूप शिवाजी र जी जी शिवाजी र र जी जी
शाहिर ः अरुमुगम शिवाजी एनआरआय, त्याला परदेशी पडेना चैन
द्याया गरिबांना शिक्षण, तो येई मायभूमी परतून जी र जी जी जी र जी जीऽऽ
त्यास करती विरोध कितीक, देई लाच ठायी ठाय
त्यापायी होई कफल्लक, अन् मागे भीक जी र जी जी जी र जी जीऽऽ
भीक मिळता रुपयाची, त्यातून करे कोटी कोटी, पुन्हा होय श्रीमंत ग ग ग ग गंऽऽऽऽऽ
भीक मिळता रुपयाची, त्यातून करे कोटी कोटी, पुन्हा होय श्रीमंत चुटकीसरशी, करे मतलबाची पूर्ती त्याच्या ईस्टाईलने जी जी ईस्टाईलने जी जीऽऽ
शाहिर ः या स्टोरीतच त्याची लवस्टोरी, त्याला मिळे एक गोरी पोरी
तिचे साधेपण लई भारी, शिवाचीचा जीव घेई,
घेऊन सवे नातेवाईक, शिवाजी पोचे तिच्या घरी
नाना करून गंमती जमती, लग्नास करे राजी
लग्नासाठीच्या ज्या खटपटी, बसे कनपटी, रंगरंगोटी लई गमती ग ग ग गऽऽऽऽ
लग्नासाठीच्या ज्या खटपटी, बसे कनपटी, रंगरंगोटी लई गमती त्यात जाई निम्मा वेळ नंतर सारा खेळ जी सारा खेळ जी जी
शाहिर ः म्हाराजा, यानंतर येई कथेला वेग
‘शिवाजी’ लई जोरदार, दाखवी अंगचा प्रताप
त्याच्या स्टाईलला नाही तोड, जगावेगळी मारधाड
दुश्मनांना नाही पारावार, त्यांच्या उरावर शिवाजीचे वार
रजनीचे नाना रूप, धक्के पण खूप, सज्जनांना हुरूप ग ग ग गऽऽऽऽ
रजनीचे नाना रूप, धक्के पण खूप, सज्जनांना हुरूप साडे तीन तासांचा खेळ दाखवी ‘दि एंड’ प्रेक्षक पडती बाहेर वाजवीत शीळ हो जी वाजवीत शीळ हो जी जी हो जी जी
शाहिर ः पिक्चरचा डायरेक्टर शंकर, त्याच्या यशाची वर कमान
आता मात्र सुटला तोल, सुपरस्टार ठरे वरचढ
त्यातही काही प्रसंग, आणती सिनेमात रंग
गाणी मात्र जोरदार, त्याला रहमानची जोड
देखणा सोहळा हो जी जीऽऽ सोहळा हो जी जीऽऽऽ
शिवाजीत पैसा वसूल, म्हणे रजनी ‘कूल’, मनोरंजन फुल्ल ग ग गऽऽऽ ग गऽऽ
शिवाजीत पैसा वसूल, म्हणे रजनी ‘कूल’, मनोरंजन फुल्ल, चाले हाऊसफुल त्यातच त्याचे यश हो जी जीऽऽ त्याचे यश हो जी जीऽऽ
आवस वाडा होऽऽ मायऽ

“शिवाजी’ दिसे दिन रजनी

शोधू कुठे मी “शिवाजी

संयुक्त द्विभाषिक अमेरिका?
अमेरिकन संस्कृतीचा डंका जगभर वाजत असताना व त्यामुळे जगभरातील मूळ भाषांच्या अस्तित्वावर गदा येत असताना, खुद्द अमेरिकेत मात्र द्विभाषिक व्यवस्थेचे पडघम वाजू लागले आहेत. शेजारच्या कॅनडाप्रमाणेच अमेरिकेतही इंग्रजीसह अन्य एका भाषेला व्यवहारभाषा म्हणून मान्यता मिळायची चिन्हे आहेत. ही दुसरी भाषा असणार आहे स्पॅनिश. सध्याच अमेरिकन जनतेला विमानांचे आरक्षण करताना, व्यवसायासाठी दूरध्वनीचा वापर करताना किंवा बॅंकेत व्यवहार करताना अनेक पर्यांयापैकी एका भाषेची निवड करावी लागत आहे. “हिस्पॅनिक लोकांची संख्या वाढण्यापूर्वी आम्हाला अशा गैरसोयीला तोंड द्यावे लागत नव्हते,’ अशी तक्रार अमेरिकन जनता करू लागली आहे. दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषक निर्वासित मोठ्या संख्येने अमेरिकेत स्थलांतर करत असतात. त्यांच्यामुळे स्पॅनिश भाषकांची संख्या नजीकच्या काळात इंग्रजी भाषकांच्या संख्येला ओलांडून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा धोका इंग्रजी भाषकांनी एवढ्या गांभीर्याने घेतला आहे, की “यू. एस. इंग्लिश’ या नावाची संघटनाच स्थापन करण्यात आली आहे. इंग्रजीला अमेरिकेची राष्ट्रीय भाषा जाहीर करावे, अशी या संघटनेची मागणी आहे. अमेरिकेची एकात्मता टिकविण्यासाठी हे आवश्यक आहे, असे या पक्षाच्या लोकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान जॉर्ज डब्लू. बुश यांनी हिस्पॅनिक समूहात प्रचार करताना अनेकदा स्पॅनिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे मुख्य स्पर्धक जॉन केरी यांनीही तोच मार्ग चोखाळला होता. अमेरिकेच्या आजूबाजूला स्पॅनिश भाषक देशांची मोठी संख्या आहे. तिथून सातत्याने निर्वासित येत असल्याने, त्या भाषेला “मरण’ नाही, असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेच्या जनगणना खात्याने मार्च महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसारही, 2050 सालापर्यंत देशात हिस्पॅनिक-अमेरिकन वंशाच्या लोकांची संख्या तिपटीने वाढण्याची शक्यता आहे. या वंशाच्या लोकांची संख्या सध्या 3 कोटी 60 लाख आहे, ती 10 कोटी 30 लाख होईल. लोकसंख्येत त्यांचा वाटा 24.4 टक्के असेल, असे या खात्याने म्हटले आहे. मूळ अमेरिकनांचा वाटा सध्या 69.4 टक्के आहे, तो 2050 मध्ये 50.1 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील शतकात अमेरिकेत जाण्यासाठी TOFEL प्रमाणेच TOSFL परीक्षा द्यावी लागल्यास नवल नाही.
सुसंस्कृत ऋणानुबंधांची इतिश्री!

संस्कृत ते ब्राझील-एक मजेदार प्रवास
गिरीश कर्नाड यांच्या कृती आता मराठीतही!
प्रसिद्ध कन्नड नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांनी लिहिलेली दहा नाट्के मराठी प्रेक्षकांसमोर येत आहेत. पॉप्युलर प्रकाशनार्फे ही नाट्के प्रकाशित होणार आहेत. यातील दोन नाट्के एकांकिका असून, ही सर्व नाट्के कर्नाड यांच्या प्रारंभीच्या कृतींपैकी आहेत.
मोठ्या संख्येने असलेल्या वाचकांपर्यंत पोचणे, हा कोणत्याही लेखकासाठी सुखाचा अनुभव असतो, असे मत यानिमित्ताने श्री. कर्नाड यांनी व्यक्त केले. मात्र त्याचवेळेस एखादी कलाकृती भाषांतरीत होत असताना त्यातील काही आस्वाद्य अंश कमी होतो, हेही त्यांनी मान्य केले.
श्री. कर्नाड यांना स्वतःला मराठी उत्तम वाचता व लिहिता येते. त्यामुळेच कन्नडमधून मराठीत येताना त्यांना कमी खळ पोचेल, असे त्यांना वाटते. “मराठी ही कन्नडचीच भाषाभगिनी आहे. त्यामुळे मूळ कृतीतील बहुतांश सौंदर्य त्यात कायम राहते, असे माझे मत आहे. अन्य द्राविड भाषांमध्ये भाषांतर होत असताना ही उणीव अधिक जाणवते. मात्र इंग्रजीत भाषांतर होत असताना ती त्याहूनही अधिक असते,” असे ते म्हणतात.
गिरीश कर्नाड यांचे नाव माहित वसेल, असा नाट्यर्सिक निरळा! आधुनिक भारतीय रंगभूमीवर प्रयोगशीलता, नाविन्य, वैचारिकता आणि वैविध्य या वैशिष्ट्यांनी उठून दिसणारी जी व्यक्तिमत्वे आहेत, त्यांमध्ये श्री. कर्नाड यांचे नाव अग्रणी आहे. मराठी प्रेक्षकांसाठीही श्री. कर्नाड यांचे नाव नवे नाही. त्यांच्या ’तुघलक’ आणि ’नागमंडल’ सारख्या नाट्कांवर एक संपूर्ण पिढी पोसलेली आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी केलेला संवाद, महाराष्ट्र-कर्नाटक वादाला काही काळ तरी विस्मरणात ढकलणारा ठरला होता. लेखकाला राजकीय सीमांचे बंधन नसते, हे दाखवून देणारे गिरीश कर्नाड आता थेट मराठी वाचकांच्या भेटीला येत आहेत.