सगळे साहित्यिक लाचार आहेत

हाबळेश्वर येथे साहित्य संमेलनात संतसूर्य तुकारामचे प्रकाशक सुनिल मेहता यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी त्यांची मी आणि माझा सहकारी तानाजी खोत यांनी भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत मेहता यांनी साहित्यिक आणि साहित्यिकांच्या मिंधेपणावर बोट ठेवलेच. शिवाय यादव यांना राजीनामा भाग पाडण्यामागे राजकारण असल्याचेही सूचित केले. त्यांच्याशी झालेली ही चर्चा…

काल महाबळेश्वरला जो प्रकार घडला….
याबाबत मला एवढेच म्हणायचे आहे, की सगळे साहित्यिक आणि साहित्य संस्था, त्यात महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठवाडा व विदर्भाच्या संस्थाही आल्या या सगळ्या लाचार झाल्या आहेत. एका व्यक्तीच्या मिंधे झाल्या आहेत.

ही व्यक्ती म्हणजे कौतिकराव ठाले पाटील. त्यांनी काय जादू केली…
ते समजत नाही. परंतु एवढ्या वर्षांची परंपरा असलेले हे संमेलन त्यांनी हायजॅक केले. काल आधी त्यांनी मला विचारले, तुम्ही कोण? मी प्रतिनिधी शुल्काची पावती दाखविल्यानंतर त्यांनी संयोजकावर भाषण न देण्याचे खापर फोडले. त्यावेळी डॉ. वि. भा. देशपांडे, रंगनाथ कुलकर्णी ही मंडळी तेथेच बसली होती. त्यांनी कोणी चकार शब्दी काढला नाही. आज ठाले पाटील यांचे विधान छापून आले आहे, की भाषण मिळणार नाही. मग दोन दिवस ते खोटं का सांगत होते. त्यांनी स्वतःलाच अध्यक्ष म्हणून मिरवून घेतले.
या सगळ्या प्रकरणात संमेलनाची जी शोभा झाली तशी कधीही झाली नाही. उदघाटन समारंभाला मावळते अध्यक्ष नव्हते, नवनियुक्त अध्यक्षही नव्हते. शिवाय जी काही गर्दी जमली होती ती आशा भोसले यांना पाहण्यासाठी जमली होती. संमेलनाशी त्यांना काहीह देणं घेणं नव्हतं. आशाताईंचे भाषण संपताच मंडप सगळा रिकामा झाला. आजपर्यंत असं कधीही घडलं नव्हतं.

या सगळ्या प्रकरणावर प्रकाशक परिषदेचे काय म्हणणे आहे?
त्यांचा मला पाठिंबाच आहे. येत्या पंधरा दिवसांत आमची बैठक होणार आहे. त्यात पुढील वर्षीपासून वेगळे संमेलन घेण्यावरही विचार होऊ शकतो.

मुळात महाबळेश्वरला संमेलन घेण्याची योजनाच चुकीची होती. आता परीक्षेचे दिवस आहेत. शिवाय तेथे पर्यटकांशिवाय कोणी येत नाही. त्यांना पुस्तके घेण्यात काडीचाही रस नाही. प्रतिनिधींची सोय करण्याचीही या लोकांनी तसदी घेतली नाही. अध्यक्षांनी राजीनामा दिला तेव्हा या मंडळींनी संमेलन स्थगित का केलं नाही. शिवाय अध्यक्षांचे छापील भाषणही द्यायचे नाही, ही कोणती पद्धत आहे?

वाईट म्हणजे या गोष्टींवर कोणी बोलतही नाही
तेच म्हणतोय मी. सगळेच लाचार झाले आहेत. एक माणूस काहीही निर्णय घेतो आणि बाकी सगळे त्याच्या मागे फरफटत जात आहेत.
(इतक्यात मेहता यांना फोन येतो. पलिकडचे बोलणे ऐकल्यावर उसळून म्हणतात, अहो पत्रक काय काढायचं आणि निषेध काय करायचा? जे घडलं ते वृत्तपत्रांनी अगदी स्पष्ट छापलं तरीही या लोकांना फरक पडत नाही. आपण नुसती पत्रकबाजी काय करायची…आदी)

बरं, ही कादंबरी मागे घेण्याने तुमचे जे नुकसान झाले…
ते नुकसान फारसं आम्ही मनावर घेत नाही. तेवढं एक अंडरस्टँडिंग लेखक आणि प्रकाशका दरम्यान असतंच. व्यक्तिशः मला असं वाटतं, की यादव सरांनी माफी मागायला नको होती. कादंबरी परत घेतली याचाच अर्थ माफी मागितली असा होतो. पण त्यांना कदाचित फोन आले असतील, काही झाले असतील. त्यांनी निर्णय घेतला आणि आम्ही ठामपणे त्यांच्या मागे आहोत.

या सगळ्या प्रकरणात यादव यांच्या पाठिमागे कोणीही उभे राहिले नाही.
तीच तर शोकांतिका आहे. आता सगळं झाल्यावर प्रत्येकजण प्रतिक्रिया देत आहे. वाहिन्यांवरून बोलत आहेत. मात्र गेले दोन महिने हे सर्व लोकं कुठे होते. माध्यमांनीही त्याला काही प्रसिद्धी दिली नाही.

यादव सरांना अध्यक्ष बनू द्यायचं नाही, असे राजकारण यामागे असू शकते का?
निश्चितच आहे. हे सगळं प्रकरण घडवून आणलेलं आहे. त्यामागे राजकारण आहे. मात्र साहित्य क्षेत्रात हे जे काय चालू आहे, ते अत्यंत वाईट आहे. हे संमेलन कदाचित अखेरचे असू शकेल, अशीही एक शक्यता आहे.

वारकऱयांना धन्यवाद

समस्त महाराष्ट्रीय समाजाने आता वारकऱयांना धन्यवाद दिले पाहिजेत. कारण त्यांनी एका जगन्मान्य संताची निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. त्यासाठी त्याच संताच्या विचारसरणीला त्यांना फाटा द्यावा लागला आहे, हा किरकोळ भाग आहे. संत तुकाराम यांच्या मनात जगाच्या सामान्य समजल्या जाणाऱया परंतु हिन पातळीवरच्या कार्यकलापाबाबत जो वितराग निर्माण झाला, तो त्यांची बदनामी करणारा आहे, हे वारकऱयांशिवाय आपल्याला कोण सांगू शकला असता? दारू पिणाऱया आपल्या मित्रांची संगत सोडायला पाहिजे, वाईट धंदे करणाऱया लोकांमध्ये वावरणे टाळायला पाहिजे आहे, असे विचार तुकाराम महाराजांच्या मनात येणं हा केवढा भयानक अपराध आहे, हे आनंद यादव यांना कोणी समजावयाला नको का?

मराठी साहित्यिक संमेलानाला खरोखर कशासाठी जातात, हे वारकऱयांच्या या यशाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातून जवळपास हद्दपार झालेली ब्राह्मणशाही पुन्हा स्थापन करण्याच्या दिशेनेही पाऊल यानिमित्ताने पडले, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. वेदांचा अर्थ आम्हालाच कळतो आणि तुकोबासारख्या तुच्छ माणसाने त्यात लक्ष घालू नये, हीच तर त्यावेळच्या ब्राह्मणांची भूमिका नव्हती काय? मग आता तुकोबांच्या चरित्रावर आमचाच हक्क आहे आणि इतर कोणालाही त्यासंबंधी लक्ष घालू नये, ही वारकऱयांची भूमिका तशीच आहे ना. तेव्हाच्या मंबाजीने तुकोबांना छळले त्यांची परंपरा कोणीतरी चालवायला नको का? असहिष्णुता आणि हटवादीपणाची गादी अशी रिकामी कशी राहू द्यायची? संप्रदायांच्या सुरवातीच्या संतांनी केवळ भक्ती आणि सहिष्णुतेची शिकवण दिली. ती आतापर्यंत पुरली. आता या पिढीने येणाऱया पिढ्यांसाठी काही ठेवा ठेवायला नको? ‘नाठाळांच्या माथी हाणू काठी,’ असे तुकोबांनी सांगितले. आता नाठाळ कोणाला म्हणायचे याचे सर्वाधिकार वारकरी समाजाने आपल्या हाती घेतले आहेत, याबद्दल त्यांचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे.

अध्यात्माची गंगा कितीही मोठी असली तरी माणसाची संकुचितता तिचा एखादा नाला करण्याचाच प्रयत्न करते, हे वारकऱयांनी दाखवून दिले आहे. शेवटी काय, आपला धर्माचा धंदा चालला पाहिजे, ईश्वराची प्राप्ति नाही झाली तरी चालेल, असे कोणीतरी दाखवून द्यायलाच पाहिजे ना? सोने आणि माती मृत्तिकेसमान मानणाऱया तुकोबांच्या देहूत त्यांच्या गाथेचे एक मंदिर उभे राहतय-अख्खं संगमरवरी. या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर गाथेतील अभंग कोरून ठेवलेत. तुकोबांच्या विचाराचा, तत्वज्ञानाचा चुराडा करायचाच आहे, त्यासाठी त्याचे पार्थिव अवशेष जपणे आवश्यक आहे. याचा प्रत्यय दिल्याबद्दल खरोखर हे जग वारकऱयांचे ऋणी राहिल.

एका बाबतीत मात्र वारकऱयांना अपेक्षेपेक्षा अधिक यश आलं. तत्कालिन ब्रह्मवृंद तुकारामांचा छळ करत असताना सर्वसामान्य जनता तुकोबांच्या बाजूने उभा होती. आता मात्र छळ होणाऱया व्यक्तीला पाठिंबा देण्याची कोणाची टाप नाही. अरे, चार शतकांमध्ये समाजाने एवढी तरी प्रगती करावयास नको का? सातशे वर्षांच्या वारकरी संप्रदायाला आणि शहाण्या सुरत्या साहित्यिकांना आपण जातीच्या आधारावर श्रेष्ठत्व ठरविण्याचा सार्वकालिक आणि हमखास फार्म्युला मान्य करायला लावला का नाही? शेवटी मुस्कटदाबी कोणाची होते हे महत्वाचे नाही, त्याची जात कोणती, तो कोणत्या संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये जातो हे महत्वाचे. यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावली म्हणून त्यांनी बहुजन चळवळींशी गद्दारी केली. त्यामुळे त्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी आपली नाही, हे नेहमी घायाळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अँम्बुलन्स सेवा पुरविणाऱया मुखंडांची विचारधारा यानिमित्ताने पुढे आली, हे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि पुरोगामी परंपरेवर केवढे थोर उपकार आहेत? आता येते दोन महिने अनेक वर्तमानपत्रांत आणि वर्षाच्या शेवटी दिवाळी अंकांमध्ये मराठी साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा विषयांवर लेख लिहिण्याचे काम किती हातांना पुरणार आहे, हे विठ्ठलच जाणो. हे काम पुरविण्याबद्दलही वारकऱ्यांना धन्यवाद. अनेकानेक धन्यवाद.