यांना कोणीतरी सन्मान द्या हो!

Shiv Sena begging for respect

शिवसेनेला सध्या सन्मानाची प्रचंड आवश्यकता आहे. राज्याचा सन्मान अनुशेष भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्राणपणाने प्रयत्न चालवले आहेत. याबाबतीत त्यांची, अशाच सन्मान आणि स्वाभिमानाच्या नावाने वेगळी चूल मांडणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेसशी जोरदार स्पर्धी आहे.

अटीतटीचे राजकारण!

चर्चा, मग ती जागा वाटपाची असो किंवा मंत्रिमंडळात जागा मिळण्याची, ती सुरू असली की मला माझेच हे जुने व्यंगचित्र हमखास आठवते. आता सरकारमध्ये सामील होण्यासाठी भाजपशी बोलणी करण्याआधी आणखी एक अट टाकून शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेच एक पाऊल टाकले आहे. त्याआधी भाजपनेही आधी विश्वास प्रस्ताव व मगच मंत्रिमंडळात समावेश, अशी अट टाकून याचप्रकारचे राजकारण केले आहे.
शिवसेना आणि भाजपला जे काही सिद्ध करायचे असेल ते करोत. मग तो विश्वासदर्शक ठराव असो किंवा स्वबळावर जिंकण्याची क्षमता असो. पण त्यासाठी जनतेला वेठीस धरून ही मंडळी काय साध्य करत आहेत?
विधानसभा निवडणुकीपूर्वी या लोकांनी असेच अटी-प्रतिअटींची हुतूतू खेळले आणि दोघांचाही दम निघेल एवढी चिखलफेक केली. ती कमी म्हणून की काय, आता सरकारमध्ये जायचे अथवा नाही, यावर अटीतटीचे राजकारण चालू आहे.

पाच वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाल्यावरही सरकार स्थापनेसाठी 12 ते 17 दिवस लागले होते. कारण तीही मंडळी एकमेकांना अशा स्वतःच्या बेटकुळ्या दाखविण्यात गर्क होती. आज त्यांचे हाल सर्वांच्या समोर आहेत. यांचेही असे न होवो, म्हणजे मिळवली!

नवे मुख्यमंत्री बेबंदशाही थांबवणार का?

1.9 महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण दिले आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची सर्व जण फडणवीस यांच्याकडून अपेक्षा करत असले, तरी राज्याची गाडी रुळावर ठेवण्यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बेबंदशाही या एका शब्दात वर्णन करता येईल, अशी परिस्थिती मागील सरकारने त्यांच्यापुढे ठेवली आहे. कायदा सुव्यवस्था असो का आर्थिक व्यवस्था, सगळीकडे आनंदीआनंद पसरला आहे.

फडणवीस यांनी शपथ घेतली त्याच दिवशी पुण्यात सहा मजली इमारत कोसळली. त्यात एक व्यक्ती दगावली. त्यापूर्वी आठ दिवस आधी अहमदनगर जिल्ह्यात दलित कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. आधीच्या सरकारने घालून ठेवलेल्या घोळाची ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे.

स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणार, असे नवे मुख्यमंत्री ठासून सांगत आहेत आणि त्यांच्या आजवरच्या निष्कलंक चारित्र्याकडे पाहता ते खरे होईलही. परंतु राज्याच्या कारभारात जरब कशी बसवणार, हा प्रश्न त्यांना आधी सोडवावा लागेल.

कमळाच्या चिन्हावर घड्याळ्याची अनेक माणसे निवडून आली आहेत. शिवाय वर बिनशर्त पाठिंब्याचा टाईम बॉम्ब आहेच. त्यामुळे सरकारचा चेहरा बदलला तरी स्वभाव तोच राहीला, असे व्हायला नको. याचीही काळजी फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे.

या उप्पर स्वपक्षातील नाठाळांना वठणीवर लावण्यातही तरुण मुख्यमंत्र्यांची ऊर्जा खर्ची पडणार आहे. गेल्या वर्षी भाजप राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यात झाली होती. त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी केलेली हडेलहप्पी आणि पत्रकारांना गृहित धरण्याची त्यांची वृत्ती, यामुळे अनेक पत्रकारांनी फडणवीस यांच्या उपस्थितीतच वाभाडे काढले होते. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्यावेळी प्रत्यक्ष माफी मागितली होती.

त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बेमुर्वतपणाबद्दल मी फडणवीस यांना इमेलही केला होता आणि त्यावर प्रत्युत्तरादाखल माफी मागणारा इमेलही केला होता. त्यातून त्यांचा प्रांजळपणा दिसला असला तरी ठिकठिकाणच्या अशा स्थानिक नेत्यांना ते कसे आवरणार, हा प्रश्नच आहे. कारण पुण्यातील भाजप नेत्यांच्या वर्तनात त्यानंतरही काही परिणाम पडलेला दिसला नाही. इतका की, ऐन निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

तेव्हा अशा सर्वच आघाड्यांवरील बेबंदशाही रोखण्याचे काम फडणवीस यांना करावे लागणार आहे. हे काम त्यांनी पार पाडावे, हीच मनापासून इच्छा आणि त्यांना शुभेच्छा!