हा हल्ला नव्हे, युद्धच

मुंबईत गेले दोन दिवस जे घडत आहे, ते नवीन आहे ते केवळ पद्धतीमध्ये. एरवी तसाच अचानक हल्ला, सुरक्षा यंत्रणांची तीच हतबलता, मृतांचे वाढत जाणारे आकडे तेच असं सगळं काही तेच ते आणि तेच ते आहे. एवढे दिवस स्वतः छुपे राहून बॉम्बस्फोट घडविणारी मंडळी आता खुलेआम शहरात घुसून माणसांना त्यांच्या इच्छेप्रमाणे टिपू लागली आहेत. हा अतिरेकी हल्ला म्हणायचा का युद्ध यावर संरक्षण क्षेत्रातील काही तज्ञांची मते घेतली. त्यावर त्यांचे म्हणणे हे हल्ला नव्हे, युद्धच आहेः

व्हाईस एडमिरल (निवृत्त) ओमप्रकाश बन्सल यांच्या मते, “बुधवारी मुंबईत घडलेला हल्ला किंवा त्याआधी दिल्ली, अहमदाबाद इ. शहरांमध्ये घडलेले हल्ले हे युद्धाची घोषणाच आहेत. केवळ ते अपारंपरिक युद्धात मोडते, त्यात शांतताप्रेमी नागरिक हे मुख्य लक्ष्य असतात आणि सत्ता नसलेले पक्ष त्यात भाग घेतात. यातील शत्रू हा दहशतवादी असतो आणि त्याला कोणताही देश, जात वा धर्म नसतो. मग आपण कोणाशी लढायचे, चर्चा करायची किंवा विध्वंस करायचा? यात कोणत्याही एका संस्थेचे अपयश नाही. देशात अनेक संस्था आहेत. त्यामुळे हे एकूणच व्यवस्थेचे अपयश आहे. समुद्र किंवा किनाऱयाजवळील प्रत्येक बोटीची तपासणी करणे अशक्यच आहे कारण भारताच्या एवढ्या विशाल किनाऱयावर ते महाकठीण काम आहे. गुप्तचर संस्थांकडून येणारी माहिती संकलीत करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावर कारवाई करणे यासाठी एखादी संस्था असली तर त्याचा फायदाच होईल. मात्र अशा एखाद्या संस्थेला नीट कार्य करायचे असेल तर त्यासाठी संसदेच्या मान्यतेचे पाठबळ हवे. केंद्रीत झालेल्या जबाबदारीची संस्था आपल्याला हवी आहे आणि तिला सर्वांकडून सहकार्य हवे. “

कर्नल (निवृत्त) अजय मुधोळकर म्हणाले, “मुंबईतील संघर्ष हा लो इन्टेन्सिटी कन्फ्लिक्ट आहे. तो निश्चितच युद्ध नाही. कारवाईच्या स्वरूपावरून तिन्ही दलांनी त्यात भाग घ्यायचा अथवा नाही याचा निर्णय घेण्यात येतो. आपल्या सागरी हद्दीत मात्र टेहळणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. एवढा मोठा किनारा आणि फारसे सख्य नसलेले शेजारी देश या पार्श्वभूमीवर टेहळणी सुधारण्याची खरोखर गरज आहे. तेलांच्या विहिरींसारख्या आपल्या आर्थिक हितसंबंधांसाठीही ते महत्त्वाचे आहे. मात्र या क्षेत्रात असलेल्या संस्थांची मोठी संख्या आणि स्पष्ट धोरणाचा अभाव यांमुळे ही घटना या संस्थांचे अपयश नाही तर त्यांनी केलेली हयगय भोवली असे म्हणावे वाटते. आता यासंबंधात स्पष्ट धोरण ठरविण्याची आवश्यकता राज्यकर्त्यांना वाटायला हवी. सगळेच विचारी राजकारणी अशा धोरणाची गरज मांडत आले आहेत, मात्र कोणत्यातही अनाकलनीय कारणांमुळे ते प्रत्यक्षात उतरू शकलेले नाही. खासकरून आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे देशात एखाद्या एकीकृत यंत्रणेची गरज आहेच, कारण अशा तंत्रज्ञानाचा फायदा दहशतवाद्यांनाही होतोच.

पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि धोरणात्मक संशोधन विभागातील प्रपाठक डॉ. विजय खरे यांच्या मते, “भारताच्या धरतीवर आणि परकीय मदतीने लढविले जात असलेले हे पहिलेच असिमेट्रिक वॉर आहे. पोलिस दल, अर्धसैनिक बले आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये अधिक सुसूत्रीकरण हवे. असे सुसूत्रीकरण असते तर करकरे व अन्य अधिकाऱयांचे प्राण वाचले असते. पोलिस दलांना आधुनिक आणि सुटसुटीत शस्त्रे मिळायला हवीत.”

गर्व से कहो अतिरेकी है

सुमारे महिनाभर झाला असेल. आमची तबियत बहोत खुश आहे. काय आहे, की फुसके बॉम्ब करू नका अशी समज खुद्द शिवसेनाप्रमुखांनी दिल्यानंतर देशात माणसांना मारण्यासाठी बॉम्बनामक अस्त्रे वापरण्याची खुबी हिंदुनीही उचलल्याची खात्री आताशा होऊ लागली आहे. हिंस्रपणात मागे राहण्याची जी खंत एवढे दिवस आम्हाला लागून राहिली होती, तिची जागा अभिमानाने घेतली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, शांतता आणि सबुरी पाळण्याची शिकवण सतत ऐकत राहण्याची आता आपल्याला गरज राहिली नाही. आता अन्यधर्मीयांनाही ते ऐकावे लागणार.

म्हणजे बघा, की आताआतापर्यंत काय व्हायचं की कुठेतरी एखादा फटाका उडावा तसा बॉंब फुटायचा अन लगेच सगळीकडे बोंबाबोंब व्हायची. पोलिस कुठेतरी एक-दोघांना उचलायचे. ते नेमके मुस्लिम निघाल्याने पुढील कारवाई काय करायची याची चिंता सरकारला लागायची. (जे बॉंब फोडल्याशिवाय जागचे सरकत नाही, ते सरकार अशी सरकारची अलिकडची व्याख्या आहे.) मग सरकार हिंदु आणि तत्सम बुळबुळीत धर्मीयांना शांतता आणि सलोखा बाळगण्याचा शहजोग सल्ला द्यायचे.
आता मात्र ती परिस्थिती पालटली. आता हिंदुंचे स्वतःचे दहशतवादी तयार झाले आहेत. आता हे पहिल्या पिढीचे दहशतवादी असल्याने फक्त सायकल किंवा मोटारसायकलींचे तुकडे करणे, एक दोन लोकं मारणे असे किरकोळ प्रकार चालू आहेत. थोड्याच काळात मात्र आपल्या या अतिरेकी बंधुंच्या कौशल्यात बऱयापैकी सुधारणा होणार आणि फुल फ्लेज्ड् दहशतवादी कारवाया करण्यासाठी ते सराईत होतील याची आम्हाला शंका नाही.

बाकी हिंदु दहशतवाद्यांची उपद्रवक्षमता काहीशी वादग्रस्त असली तरी त्यांची दखल मात्र अगदी व्यावसायिक दहशतवाद्यांसारखी घेतली जात आहे. आता हेच बघा ना, कोणत्याही घटनेत एखाद्या संशयिताला पकडला, की कशा त्यांच्या शेजाऱयांच्या नाही हो, आम्हाला कधी वाटलंच नाही तो असं काही करत असेल म्हणून, या छापाच्या बातम्या येतात. तो संशयित शाळेत असताना कसा कुशाग्र विद्यार्थी होता, सोसायटीत सगळ्यांना मदत करायचा वगैरै कहाण्या येऊ लागतात. आपल्या हिंदु अतिरेकींबाबतच्या अशा अनेक कथा येऊ लागल्या आहेत. म्हणजे काय, भर रस्त्यातून येता जाता तो ओरडून सांगायचा की मी अतिरेकी आहे, मी अतिरेकी आहे असं अजूनतरी कोणी म्हणालेले नाही, याचा अर्थ आपले अतिरेकी योग्य मार्गावरून जात आहेत.

हिंदु लोकांनी असेच नवनवीन बॉम्बस्फोट घडवून आणले, की मग त्यांनाही आपले खरे जीवन दहा अकरा शतकांपूर्वीच्या कल्पनांनुसार चालवायला हवे, असा साक्षात्कार होईल. पुराणातील कायदे हेच जगाचा उद्धार करू शकतील, हे दाखवून देण्यासाठी हिंदु अतिरेकीही वेबसाईट, ब्लॉग अशा अत्याधुनिक साधनांचा वापर करू लागतील. त्यांचा उद्देश माणसं मारण्याचा नव्हता तर ते गरीब आहेत आणि नोकरी धंदा नसल्याने टाईमपास म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगायला अनेक राजकारणी पुढे येऊ लागतील. मग आधी मुळात दहशतवाद्यांना पकडू न शकलेले आणि पकडलेल्यांना शिक्षा न देऊ शकलेले सरकार लोकांना (म्हणजे स्फोटात मरणे शक्य न झालेल्यांना) शांतता पाळण्याचे आवाहन करू शकेल. त्यामुळेच म्हणा, गर्व से कहो अतिरेकी है.

पहिले दिवाळी लेखन

दिवाळी म्हणजे फराळ, फटाके आणि जाडजूड दिवाळी अंक. दिव्यांच्या उत्सवाची आमच्या मनावर ठसलेली ही छबी. जसजसं वय वाढू लागलं तसतसं या छबीतील अन्य छटा धूसर होऊ लागल्या. नाही म्हणायला दिवाळी अंकांचा उजेड मात्र दरवर्षी पडायचा. त्याच त्या लेखकांची, केवळ नावामुळे झालेली भरती आणि मानधनाच्या हव्यासापायी त्यांनीही केलेले बेचव लेखन यामुळे दिवाळी अंक काय दिवे लावतात हेही लख्ख दिसू लागले. त्यामुळे यथावकाश त्यांच्याशी संबंधच तुटला.

पत्रकारितेत सहा वर्षे घालविल्यानंतरही त्यामुळेच कधी दिवाळी अंकांच्या वाटेला जायचे धाडसच झाले नाही. मात्र काही सहकाऱयांना दसरा उलटला की अगदी सुगीचे दिवस आल्याचा आनंद व्हायचा. “यंदा अकरा अंकांमध्ये हजेरी आहे आपली,” भविष्यापासून पुराणकालीन संस्कृतीपर्यंत तलवारीप्रमाणे सपासप लेखणी चालविणाऱया एका सहकाऱयांनी टाळीसाठी हात पुढे करत सांगितले होते. माध्यमांत पहिलेच वर्ष असल्याने रिकामे बसून अनेक कामे लिलया करणारी अनेक माणसे प्रत्येक संस्थेत वारत असतात, याची तेव्हा जाणीव नव्हती. त्यामुळे त्या सहकाऱयाच्या वाक्याला माझी दाद टाळीच्या स्वरूपात नव्हे तर त्यांना टाळायच्या स्वरुपात होते. मात्र अशा पद्धतीने एका अंकात ‘मी आणि माझा देव’, दुसऱया अंकात ‘एक दुर्लक्षित स्थानः मौजे टुकारवाडी’, तिसऱया अंकात ‘राष्ट्रीय एकात्मता आणि महिला मंडळांचे कार्य’ अशा नाना रितीने मजकूर पाडणाऱया लेखकांकडे भुईनळ्यांकडे पहावे तितक्याच अंचब्याने पाहतो.

गेल्या वर्षी एका दिवाळी अंकात लेख लिहिला होता. दौंड तालुक्यात प्रसिद्ध होणाऱया एका गावप्रसिद्ध (जगप्रसिद्धच्या धर्तीवर) अंकाच्या संपादकांनी अत्यंत प्रेमाने तो मागितला. माझ्याही खिशाची तब्येत तेव्हा अशीच होती, की अशा प्रकारचा कोणताही डोस त्याला चालला असता. सुपरस्टार चिरंजीवीवर लिहिलेला एक लेख मी त्या अंकात खपवला. त्या अंकाचा सगळाच प्रकार हौशी मामला असल्याने त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तरीही मानधनाची रक्कम आणि लेख छापलेला अंक मला त्यावेळी मिळाला, ही त्या हौशी प्रकाशकाची व्यावसायिकता कौतुकास्पदच म्हटली पाहिजेत. कारण ‘लोकमत समाचार’ या हिंदी वर्तमानपत्राला कविता पाठविल्या होत्या तेव्हा मार्चमध्ये छापलेल्या कवितांचे मानधन (तब्बल रु. १५) मे महिन्यात मिळाले होते. पाठविलेल्या पाच कवितांपैकी नक्की कोणत्या कविता छापल्या होत्या हे मला आज बारा वर्षांनीही माहित नाही.

आता हे सांगायचं कारण म्हणजे, यंदाच्या दिवाळीत आमच्या ह्या ‘अनाघ्रात पुष्प’ अशा प्रतिभेला ऑनलाईन पंख फुटले. खऱया अर्थाने चर्चा आणि वाद करत ज्ञानाची आराधना करणाऱया ‘उपक्रम‘ या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवाळी अंकात माझा लेख प्रसिद्ध झाला. भाषा आणि तंत्रज्ञान हे माझे जिव्हाळ्याचे दोन विषय. (या लेखाचे १०० हून अधिक वाचने झाल्याचे दिसते त्यावरून लोकांनाही तो भावला असावा, अशी आशा आहे.) या दोन्ही विषयांची गुंफण असणारा एक लेख लिहिला कारण या विषयावर मराठीत एकही बातमी किंवा लेख मी वाचला नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षभरात बातम्यांच्या निमित्ताने मिळालेल्या माहितीच्या आधारे लेख लिहिला. विशेष म्हणजे ‘उपक्रम’च्या संपादक मंडळानेही तो प्रकाशित करण्याच्या लायकीचे मानले.

उपक्रमच्या दिवाळी अंकाचा हा दुवा आणि माझ्या लेखाचा हा दुवा.