सव्वा शहाणा फडणवीस

“लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!”

बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा शरद पवार यांनी उच्चारलेले हे एक मार्मिक वाक्य. ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्यावर पवारांनी टीका केली असता “पवारांनी हा अहवाल वाचला आहे की नाही, हीच शंका आहे,” असे गोडबोले म्हणाले होते. तेव्हा पवार हे बोलले होते.

वाचन, लेखन, शिक्षण किंवा एकूणच विचारांच्या क्षेत्रावर आतापर्यंत ब्राह्मणांची मक्तेदारी होती. आता ती राहिलेली नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नका, असे पवारांना म्हणायचे होते. कारण विजेचा प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचा ठपका गोडबोले आयोगाने ठेवला होता. आता गोडबोले म्हणजे ब्राह्मण आणि त्यांनी आम्हाला उपदेश करू नये, हा पवारांच्या वक्तव्याचा आशय होता.

अर्थात पवार हे पुरोगामी नेते असल्यामुळे त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हे सूचकपणे सांगितले होते. मात्र जायचा तो संदेश गेला होता. “वीज क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा, जी राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, ती पवार यांनी इतक्या खालच्या पातळीवर नेली आहे की यापुढे मी त्यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घेणार नाही व भाष्यही करणार नाही. माझ्यापुरता हा विषय संपलेला आहे. यापुढे सुजाण समाजानेच समितीच्या अहवालाबाबत मत बनवावे,” असे उद्वेगाने गोडबोले म्हणाले होते.

शिक्षण ही जशी काही काळापूर्वी ब्राह्मणांची मक्तेदारी होती, तशी राजकारण ही साखर कारखानदार, सहकार दरोडेखोर (सम्राट!) आणि पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्यांची मक्तेदारी झाली होती. ती तशी आता राहिलेली नाही, हे पवारांना सांगणारा नेता महाराष्ट्रातच निघाला आहे.

बापट, देशपांडे, जोशी इ. ब्राह्मणांना आम्ही पदरी बांधू, त्यांच्यामार्फतच व्यवसाय-उद्योग चालवू पण त्यांनी आमच्या राजकारणात येऊ नये, हा पवारांचा अलिखित दंडक. त्यांच्या पुरोगामी वगैरे वगैरे गणंगांनी तो प्राणपणाने जपला होता. तो मोडला नागपूरच्या देवेंद्राने. पेशवे, फडणवीस म्हणून ज्या देवेंद्र फडणवीस यांची हेटाळणी केली त्यांनीच पवारांच्या गढीला सुरुंग लावला आहे. पवारांच्याच काय, मुंबई (शिवसेना), पुणे, पिंपरी-चिंचवड (एनसीपी), सोलापूर (काँग्रेस) अशा सगळ्याच गडांना या फडणवीसाने धक्के दिले आहेत.

ऑक्टोबर २०१४ पासून म्हणजे फडणवीस यांनी सत्ता हाती घेतल्यापासून पवार यांनी येता-जाता त्यांची जात काढण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या वरदहस्ताने मोठे झालेल्या झिलकऱ्यांची त्याला साथ होतीच. तसा तो त्यांनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांची जात काढूनही केला होता.

मात्र फडणवीस यांच्या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी. हा कोण मोठा दिड शहाणा लागून गेला, अशाच आविर्भावात प्रस्थापित राजकारणी वावरत होते. म्हणून त्यांच्या कारभाराची फडणवीशी अशा शिवीवाचक शब्दांनी संभावना करण्यात आली. ज्यांच्या ऐतिहासिक उपमा संपल्या त्यांनी डोरेमॉन-शिनचान वगैरेंना हाताशी धरले. आज त्यांचेच कार्टून झाले आहे.

म्हणूनच छत्रपती पेशव्यांना नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना खासदारकी देत आहेत, असा तद्दन जातवाचक उल्लेख त्यांना करावा लागला. “छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत होते. तर पेशवे फडणवीसांची नेमणूक करत होते. पण आता मात्र फडणवीसांनी छत्रपतींची नेमणूक केली,” हे वक्तव्य काही प्रामाणिक पणातून आलेले नाही. त्याच प्रकारे मराठा मोर्चाच्या वेळेस पवारांची भूमिका त्यांच्या स्तुतीपाठकांना वाटते तेवढी पुरोगामी खचितच नव्हती. अन् तरीही फडणवीस यांनी या सर्वावर मात करून एकहाती यश मिळवले आहे.

‘तावद् भयेषु भेतव्यं यावत् भयम् अनागतम्’. म्हणजे भीती वाटते ती गोष्ट येत नाही, तोपर्यंतच तिचे भय असते. ब्राह्मणाचे राज्य आले, तर पेशवाई परत येणार, ही भीती हेच आजपर्यंत काँग्रेस-एनसीपीचे कुरण ठरले होते. फडणवीस आल्यावर तसे काही नाही, हे जाणवल्यानंतर ती भीती सरली आणि त्यासरशी त्या भीतीवर जगणाऱ्यांची दुकानेही उठली. उलट गेल्या काही दिवसांत फडणवीसांचा विश्वास निर्देशांक हा अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा अधिकच झालेला आहे. म्हणून तर “लिहून देतो” म्हणणाऱ्या शदर पवारांवर लोक भरवसा ठेवत नाहीत. “मी शब्द देतो,” म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठेवतात. विश्वास एकदा गेला की गेला..

पालिकेच्या या निवडणुकांसाठी भाजपचे केंद्रीय पातळीवरील कोणतेही नेते वा चेहरे फिरकले नाहीत. अगदी उद्धव ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतरही. प्रचाराची सगळी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली. पायाला भिंगरी लावल्यासारखे फडणवीस हेच राज्यात फिरले. शिवसेनेचे नेते भाजपवर तुटून पडत असले, तरी फडणवीस यांच्यावर त्यांनी हात राखूनच राळ उडवली, हे मान्य करावे लागेल. मात्र काँग्रेस-एनसीपीचा सगळा भर फडणवीस यांच्यावरच होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर फडणवीस यांनाच लक्ष्य केले होते.

फडणवीसांनी अगदी हळूवारपणे आपले काम चालूच ठेवले. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना व्यवस्थित कामाला लावले. इतकेच नाही, तर निवडणुकीतल्या निकालानुसार मंत्र्यांवर कारवाई करणार, असे सांगून चुकार मंत्र्यांना इशाराही दिला. दिल्लीश्वरांचे अभय असल्यामुळे आपले कर्तृत्व दाखवायची पूर्ण संधी त्यांना मिळाली आणि ती त्यांनी 100 टक्के साधली.

स्वच्छ चारित्र्य हे फडणवीस यांचे मुख्य चलनी नाणे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही तीच जमेची बाजू. पण चव्हाण यांनी स्वच्छ चारित्र्य हे निष्क्रियतेचे समानार्थी करून ठेवले होते. ती चूक फडणवीसांनी टाळली. स्वच्छ प्रतिमा हे फडणवीस यांचे बलस्थान. या दोन वर्षांच्या काळात एकही गैरव्यवहार झालेला नसल्याचा आनंद त्यांनी नुकताच व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांनी अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून ते परतवून लावले. तरीही एकनाथ खडसे यांना ते वाचवू शकले नाहीत. या सर्व प्रवासात झाले एवढेच, की राज्यात सरकारचा एकमेव चेहरा बनण्यात फडणवीस यांना यश आले आहे. महापौरपद वगळता अन्य कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेल्या एखाद्या राजकारण्यासाठी हे मोठेच यश आहे. प्रशासकीय कौशल्याबरोबरच आपल्या राजकीय बुद्धिकौशल्याने त्यांनी अनेक पेचप्रसंगावर मात केली आहे.

नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून उत्तर पेशवाईच्या काळात अर्धा शहाणा मानला जाई. काँग्रेस-एनसीपीने 15 वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात उत्तर पेशावईचीच अवस्था निर्माण केली होती. त्याला उत्तर म्हणून लढाया (निवडणुका) खेळून तो जिंकणारा फडणवीस प्रतिस्पर्ध्यांना मिळाला आहे. हा शहाणा पूर्ण शहाणाच नाही, तर सव्वा शहाणा आहे.

– देविदास देशपांडे