हवे आहेत…कार्यकर्ते!

१६ व्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन दोन आठवडे उलटत आले तरी देशातील बहुतांश मतदारसंघात अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. यात महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा पुणे व नांदेड मतदारसंघांचा जसा समावेश आहे, तसा सत्तेसाठी आतुर झालेल्या शिवसेना-भाजप युतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मुंबई व विदर्भातील जागांचा समावेश आहे. निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक असलेले उमेदवार दिल्लीत मुंडावळ्या बांधून तयार असले, तरी प्रत्यक्ष रणांगणात एका गोष्टीची उणीव सर्वांना भासत आहे. ती म्हणजे कार्यकर्त्यांची.
कुठला झेंडा घेऊ हाती म्हणणारे कार्यकर्ते आता इतिहासजमा झाले…झेंडा देऊ कोणाच्या हाती, असे म्हणण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये यूपीए सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने कित्येक आंदोलने पुकारली. मात्र ऐनवेळी कार्यकर्त्यांचा त्यांत सहभाग नसल्यामुळे त्यांचा कसा फज्जा उडत गेला, हे भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यक्रमांवर नजर टाकली तरी कळून येईल. भाजपला रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ मिळते ते केवळ मतदानापुरते. प्रत्यक्ष पक्षाच्या कामात घरोघरी मातीच्या चुली अशीच अवस्था आहे. शिवाय अन्य कुठल्याही पक्षाइतकेच, किंबहुना अधिकच, याही पक्षाला गटबाजीने पोखरले आहे.
लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझी ब्लॉग पोस्ट. पुढील पोस्ट वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

बोक्यांची मन(से)धरणी!

महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविणार मात्र निवडून आल्यास नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार, अशी घोषणा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन बोके आणि माकडाच्या कथेला मूर्त रूप दिले आहे. एक तिरंगी बोका आणि एक संपूर्ण केशरी बोका, असे दोन भांडणारे बोके पंचवार्षिक लोण्याच्या वाटपासाठी रंगीबेरंगी माकडाकडे गेले होते. त्यातील दोघांचेही थोडे-थोडे हातचे राखून राज यांनी स्वतःच्याही पदरात काही पडेल, याची तजवीज केली आहे.
मनसेने निवडणूक लढवावी जेणेकरून भगव्या बोक्याची मते कमी व्हावीत आणि स्वतःचा मार्ग सुकर व्हावा, असा तिरंगी बोक्याचा आग्रह. मनसेने निवडणूक लढवू नये, असा भगव्या बोक्याचा प्रयत्न. त्यासाठी नितीन गडकरी, विनोद तावडे आणि शेलार यांच्यासारख्या तगड्या प्रतिनिधींनी राज यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचाही प्रयत्न केला. गेल्या निवडणुकीसारखी मतविभागणी टाळावी आणि देशातील तिसऱ्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात जागांसाठी फारसे झगडावे लागू नये, हा त्यामागे हेतू.
मनसेने हुशारी दाखवून दोन्ही बोक्यांशी सलगीही ठेवली आणि स्वतःला हवे ते पदरातही पाडून घेतले. आता निवडणूक लढविल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही मनसेवर खुश आणि निवडणुकीनंतर मोदींना पाठिंबा देणार असल्यामुळे भाजपही खुश. मनसेचे भांडण एकट्या शिवसेनेशी (किंबहुना नेमके सांगायचे तर उद्धव ठाकरेंशी), तर त्यांची गोची केल्याचे पुण्यही पदरात पडणार.
लोकसत्ता.कॉमच्या  सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. अधिक वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

उमेदवार व्हायचंय मला…

हॅलो, मला उमेदवार व्हायचंय. काहीही करून, कसंही करून मला लोकांकडे जायचंय, मतं मागायला! तसा मी लोकांच्या मताला फारशी किंमत देत नाही, पण निवडणुकीत जिंकायचं म्हणजे मतं मागावी लागतात. म्हणून मला मतांची भीक म्हणा, दान म्हणा मागण्यासाठी जायचंय. नवरात्रात कसं देवीच्या नावाने जोगवा मागतात, त्यामुळे कोणी भिकारी होतं का? मग लोकशाही देवीच्या नावाने मतं मागितल्याने मी काय भिकारी होतो का?
…तर त्यासाठी हवी उमेदवारी. कुठल्याही पक्षाची चालेल. काँग्रेस म्हणू नका, ‘राष्ट्रवादी’ म्हणू नका, सेना-भाजप, गेला बाजार मनसेसुद्धा…हे आपलं एक चाल म्हणून म्हणालो, नाही तर बाजारचा शब्दशः अर्थ घेईल कोणी. यांच्यापैकी कोणी नाही तर ‘आप’ देईल आणि ‘आप’नेही दिला दगा तर बाप देईल. अरे, स्वतःच्या ताकदीवर अपक्ष म्हणून उभा राहील मी. एका खिशात थैली आणि दुसऱ्या खिशात तरुणांचे तांडे घेऊन फिरतो मी…

(लोकसत्ता ऑनलाईनच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग)...संपूर्ण नोंद कृपया येथे वाचा…

द्राविड मोदीत्व कळगम!

करुणानिधी, रामविलास पासवान, शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला इ. मंडळी ज्या प्रकारे सत्तेच्या दिशेला तोंड करून उभे राहतात, त्यावरून त्यांना आता राजकीय वातकुक्कुट म्हणून मान्यता मिळायला हरकत नसावी. द्राविड मुन्नेत्र कळगम पक्षाचे नेते एम. करुणानिधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांचे चांगले मित्र असल्याचे जे विधान केले आहे, ते याचेच उदाहरण म्हणायला पाहिजे. 
तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीच अशी बनली, की गेली दहा वर्षे भारतीय जनता पक्षाचा वाराही सहन न होणाऱ्या करुणानिधी यांना ही कोलांटउडी घ्यावी लागली आहे. शिवाय येत्या निवडणुकीच्या निकालाचा अंदाजही त्यातून मिळाला आहे. करुणानिधी यांच्या हाडवैरी आणि अण्णा द्रामुकच्या नेत्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आधीच पंतप्रधानपदावर दावा ठोकून राज्यातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याच्या निर्णयाने त्यांनी बऱ्यापैकी जनमतही बाजूला करून घेतले आहे. हा निर्णय योग्य का अयोग्य हा मुद्दा अलाहिदा, मात्र त्यांनी करुणानिधींवर याबाबतीत कडी केली, यात शंका नाही.
(लोकसत्ता ऑनलाईनच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग)…संपूर्ण नोंद कृपया येथे वाचा…