अभ्यासक्रमः त्यांचा आणि आपले

Untitledनास्तिक मताचे आधुनिक अध्वर्यू असलेल्या करुणानिधी, रामस्वामी पेरियार आदींच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम चेन्नई विद्यापीठ तयार करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात तेथे एम. ए. (करुणानिधी) असे  द्वीपदवीधर होऊ घालतील. नास्तिक मतांचाच अभ्यासक्रम त्याला कोणाही पुरोगाम्याचा विरोध होणार नाही, ही काळ्या फळ्यावरची रेघ आहे. बाकी, ईश्वरावर श्रद्धा नसलेल्याला नास्तिक म्हणून त्याची शिकवण इतरांना देणार. पण ज्याची शिक्षणावर श्रद्धा नाही, अशा माझ्यासारख्या नतद्रष्टांचे काय करणार, हे आजपर्यंत ही शिक्षणव्यवस्था ठरवू शकलेली नाही. कांचीच्या शंकराचार्यांच्या मठापुढे एक मशीद आधी होतीच. तिच्याही पुढे पेरियारचा पुतळा उभारून अपशकुन करणाऱ्या करुणानिधींना त्यांची ती प्रसिद्ध हिरवी शाल लाभाची आहे म्हणे. शिवाय प्रत्येक निवडणुकीच्या आधी ज्योतिषाचा सल्ला आहेच. आता अशा व्यक्तिंच्या जीवनचरित्रातून एखाद्याला तत्वज्ञानाचा कोळ काढता येईलही.  त्यातून कोणाच्या पोटापाण्याचा प्रश्न निकालात निघत असेल, तर आपण त्यात खोडे घालणे चांगले नाही, असे मला वाटते. उलट माझं तर म्हणणं आहे, की मद्रास विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यापीठांनीही अशी, हयात असलेल्या आणि अविचारात हयात घालविलेल्या नेत्यांवर अभ्यासक्रमाची गिरणी काढावी. त्यामुळे राजकारणात येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांना रसप्रद वाटेल, असं काहीतरी शिकता येईल. शिवाय राजकारणाचा दांडगा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकांनाही तो शिकविताना फारशी अडचण येणार नाही. समजा, महाराष्ट्रात असे अभ्यासक्रम आणले, तर ते कसे रचता येतील,  याची ही चुणूक.

एम. ए. (शरद पवार)

यात साखर कारखाने, शेती, उद्योग, नातेवाईकबाजी यात स्पेशलायझेशन असेल. साखर कारखाने हा विषय घेणाऱ्यांना केवळ साखर हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळे कसे आणायचे, याचीही उजळणी करावी लागेल. प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर रोखठोक, सरळ आणि मुद्देसूद दिल्यास शून्य गुण मिळतील. प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा असला तरी त्यात काही ना काही आकडेवारी असायलाच हवी. काहीच नाही मिळाली, तर ‘सध्या देशात दीड लाख विद्यार्थी एम. ए. करत असून त्यांपैकी केवळ 9 टक्के शरद पवार या विषयात एम. ए. करत आहेत,’ असं वाक्य टाकलं तरी हरकत नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए साठी थेट प्रवेश मिळण्याची संधी द्यायला हरकत नाही. त्यातही जमिनींचे संपादन आणि व्यवस्थापन या विषयात स्पेशलायझेशन करायला वाव (आणि वावरही) आहे. शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास राज्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये ‘शेतकऱ्यांसाठी शेतीव्यतिरिक्त उपजीविकेचे पर्याय’ या विषयावर अतिथी  प्राध्यापक म्हणून रोजगाराचीही संधी मिळेल. एक आहे, की या विद्यार्थ्यांना एम ए मिळविण्यापेक्षा एमएलए मिळविण्यात अधिक रस असण्याचा संभव आहे.

मात्र एम ए शरद पवार करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 मार्कांची प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागेल. यात माध्यमे आणि पत्रकारांना हाताळायचे प्रात्यक्षिक असणार आहे. विविध जातींचे म्होरके सोबत बाळगूनही पुरोगामी नेते कसे म्हणवून घ्यावे, आपल्याला हवी तशी चर्चा इतरांकडून कशी करवून घ्यावी या बाबींचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवावे लागेल. याशिवाय, वेळवखत पाहून अचानक एखाद दिवशी या विद्यार्थ्यांना अन्य शाखेत सामावून घेतले जाणारच नाही, असे नाही. त्यामुळे प्रवेश घेतला एका कोर्सला आणि प्रमाणपत्र मिळाले दुसरेच, अशी शक्यता या विद्यार्थ्यांना फार.

एम. ए. (शिवसेनाप्रमुख)

ही परिक्षा लेखी कमी आणि तोंडी जास्त आहे. लेखी परीक्षा या अभ्यासक्रमात केवळ तोंडी लावण्यापुरतीच आहे. एकच वाक्य अनेकदा सांगायचे, इतरांना किरकोळीत काढायचे ही या अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये आहेत. या अभ्यासक्रमात प्रवेश घेताना दिलेले विषय आणि अभ्यासक्रम पूर्ण करताना असणारे विषय एकच असतील याचा काही नेम नाही. इतकेच काय, त्यांचा परस्परांशी संबंध असेलच, असेही नाही. मात्र परीक्षकांना आणि प्राध्यापकांनाही भुरळ घालण्याएवढी तुमची वक्तृत्वकला चांगली असलीच पाहिजे, नसता या वाटेला जाण्याचा विचारही करू नका. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगला रोजगार मिळेलच, याची काही खात्री नाही. काहीजणांना खूप रोजगार मिळेलही, मात्र तो कधी हिरावून घेण्यात येईल, याची त्यांना हमी नसते. या अभ्यासक्रमाचा सर्वात मोठा धोका म्हणजे हा अभ्यासक्रम केल्यानंतर याच शाखेत करिअर करावे लागते. नसता त्या माणसाचे प्रमाणपत्र परत घेण्यात येते. त्यामुळे हा अभ्यासक्रम केलेला माणूस एकतर ‘सर्टिफाईड’ असतो नाहीतर ‘सटरफटरफाईड’ असतो.

एक विशेष सांगायला हवा, की या अभ्यासक्रमात शिकविले एक आणि परीक्षेत आले भलतेच, फीस सांगितली एक आणि वसुली केली काहीच्या काही असं कदापि शक्य नाही. अभ्यासक्रमात जे घटक नेमून दिलेत, त्याबाहेरचा शब्द सुद्धा उच्चारण्याची कोणाची काय बिशाद…अगदी सरांचीही नाही. शिवाय सगळ्या अभ्यासक्रमाची अशी एक सॉलिड शब्दावली आहे. भल्या-भल्यांना ती शब्दावली पाठ करावीच लागते.

हा अभ्यासक्रम केलेला माणूस वडा-पावचा तज्ज्ञ मानण्यात येतो. त्यामुळे काही कालावधीत त्याने अंगातील प्रतिभेची चुणूक दाखविली, की त्याची वडा-ताण सुरू होते. अन्य कंपन्यांमध्ये त्याला सन्मानाने बोलाविण्यात येते . या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याला काही ठराविक कालावधी नाही. केवळ निष्ठेने अभ्यास करत राहायचा. अचानक एखादे दिवशी तुम्ही पास झाल्याचे कळविण्यात येते. शिवाय तुम्ही पास झालात तर अचानक पी. एचडी.च्या मानकऱ्यासारखे वागविले जाता आणि तुमचा योग नाही आला, तर झिलकऱ्यांच्या बरोबर तुम्हाला वागविण्यात येते. दरबारी राजकारण ज्यांना जमते त्यांच्यासाठी हा अगदी रामबाण अभ्यासक्रम आहे. अलिकडे त्यात दर आणि बारी, दोन्हींचे प्रस्थ जास्त झाल्याच्या तक्रारी असल्या, तरी या अभ्यासक्रमाने गेली अनेक वर्षे राजदरबारी आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे.

एम. ए. (कॉंग्रेस)

या अभ्यासक्रमाला कोणाही विशिष्ठ व्यक्तीचे नाव नाही. कारण आधी त्याला गांधी हे नाव द्यायचे घाटत होते मात्र  नंतर या नावामुळे लोकांची दिशाभूल होईल, त्यांच्या मनात फारसे आकर्षण राहणार नाही या कारणामुळे ते रद्द करण्यात आले. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे याला स्थळ, काळ आणि परिस्थिती, या कशाचेही बंधन नाही. या अभ्यासक्रमासाठी तुम्ही नावही दाखल करण्याची गरज नाही. साखर कारखाना, सहकारी बँक, शिक्षण संस्था, पोलिस स्टेशन, कारागृह…अशी कोणत्याही ठिकाणी हा अभ्यासक्रम पुरा करता येतो. एक विद्यापीठ बदलून दुसऱ्या विद्यापीठात जाऊनही तो पुरा करता येतो. मात्र या अभ्यासक्रमात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी केंद्रीय परीक्षकांच्या मर्जीस उतरावेच लागले. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या जीवन-मरणाचा निर्णय केंद्रीय परीक्षकांच्या भुवयांच्या हलचालींवर अवलंबून असतो. ते जर खुश झाले तर मात्र या विद्यार्थ्यांचे आकाशातला बापही वाकडे करू शकत नाही. मात्र खुशामदीच्या या प्रॅक्टिकलमुळे या विद्यार्थ्यांना कधी आयचा तर कधी पोराचा आधार घ्यावा लागतो.

या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे येते क्लासमेटस्, म्हणजे वर्गमित्र नावाचा प्रकार नसतो. एखादा मित्र मिळाला तरी तो मित्रच राहिल, याचीही खात्री नसते. त्यामुळे हा अभ्यासक्रम शक्यतोवर वंशपरंपरागत पद्धतीनेच घेतला जाईल. नाही म्हणायला, अन्य अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीवाचून मागास राहिलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे सामावून घेण्याची एक उदात्त परंपरा या अभ्यासक्रमात आहे. या शाखेचा विद्यार्थी कधीही उपाशी मरणार नाही, कारण आपण जे शिकलो ते प्राचीन काळापासून कसं चालत आलेलं आहे, हे पटवून देण्यात त्यांच्या हातखंडा असतो. शिवाय आपण जे करत आहोत, ते जगात पहिल्यांदाच करत आहोत, असाही ते दावा करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला वश करून घेण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. अगदीच काही अडलं तर गांधींचा वापर ते करतात. गांधी हे सर्वात सशक्त चलन आहे हे त्यांना माहित असते गांधीजी असलेले चलनच कोणतेही संकट दूर करू शकते, हे साधं बहुमत या विद्यार्थ्यांना अवगत असते. दहा पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत हा अभ्यासक्रम आला असता, तर विद्यार्थ्यांना गणवेश घालावा लागला असता. मात्र आता ती गरज राहिलेली नाही.

एम. ए. (मुंढे-गडकरी)

हा नावावरून जोड अभ्यासक्रम वाटू शकतो. मात्र तो तसा नसून दोनपैकी एक या प्रकारचा आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडण्याऐवजी एक निवडला की तो दुसऱ्यातून तो बाद असा हा प्रकार आहे. जुन्या पद्धतीच्या वार लावून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केल्याप्रमाणे त्याची रचना आहे. फरक एवढाच की हा अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना खरोखरच वार लावून शिकावे लागते. त्यापेक्षाही त्यांना वार झेलणे आणि ते चुकविणे, याचीही तालीम घ्यावी लागते. शिकलेले घटक आणि परीक्षेतील प्रश्न यांच्यात काही ताळमेळ असेलच असे नाही, त्यामुळे हा सर्वात कठीण अभ्यासक्रम आहे. शिवाय परीक्षा पास झाली तरी रोजगार मुख्यत्वे उत्तर भारतात मिळणार. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना स्पर्धा आहे ती चाटे कोचिंग क्लासेससारख्या वर्गांची. त्यामुळे आजपर्यंत तरी या विद्यार्थ्यांना राज्यात मिळालेले यश हे चिंतनाजनकच आहे. त्याहून अधिक नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत महाजन नावाचा घटक या वि्द्यार्थ्यांसाठी फायदेशीर होता. त्यातून त्यांच्या मार्कांची बेगमी व्हायची. मात्र आता तो घटकच नाहीसा झाला असल्याने यांची स्थिती गमगीन झाली आहे.

या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चाळीस मार्कांचे प्रात्यक्षिक आहे आव्हान द्यायचे. सतत कोणाला न कोणाला, कशावरून तरी, काही का कारणाने आव्हाने द्यायची. हातात काही कागदपत्रे आणि आवाजात धार, ही या प्रात्यक्षिकांत दिसलीच पाहिजेत. जीटी मारली तरी चालेल. पण पाहिजे म्हणजे पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याने प्रात्यक्षिकांच्या वेळी थेट प्राध्यापकांनाच आव्हान दिले, तर ती अतिरिक्त योग्यता मानली जाईल. शिवाय अभ्यासक्रमाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना एम ए असले तरी ‘कमल, कमळ बघ’ इथूनच सुरवात करावी लागते. त्यासाठी प्रबोधिनीची आगळीवेगळी व्यवस्था आहे.

तर हे झाले मुख्य अभ्यासक्रम. सुरवातीस एवढे पुरे. तमिळनाडूत एक तर महाराष्ट्रात चार. आहे का नाही आपण पुढे. या अभ्यासक्रमांचे यशापयश पाहून नंतर मग रिपब्लिकन, राजू शेट्टी असे क्रॅश कोर्सही काढू. हाय काय अन् नाय काय!

तर मग त्यांना दत्तक घ्यायला सांगा…

राणेशाहीचे प्रमाण असं कुठे जास्त होते. अगदी दीडशेपैकी शंभर जागा नेत्यांच्या वारसांनी लढविल्या आहेत, असे झाले आहे का? मग या मुद्द्याचा एवढा का बाऊ करण्यात येत आहे,” हा प्रश्न नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी विचारला. घराणेशाहीचा आरोप या नेत्यांनी त्या पद्धतीने उडवून लावला, ते पाहून जुनी सरंजामदारी व्यवस्था काय वाईट होती, असे वाटून गेल्यास नवल नाही.
या नेत्यांना आपल्याकडे धडा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र त्या तिकडे फ्रांसमध्ये असेच एक नाटक चालू आहे. ते आपल्याकडच्या राजकीय लोकांसाठी उद्बोधक ठरू शकते. या नाटकातील प्रमुख पत्रे आहेत, निकोला आणि जॉन सार्कोझी ही पिता पुत्राची जोडी. जॉन या केवळ २७ वर्षांच्या तरुणाला ‘एपाद’ या संस्थेच्या प्रमुखपदी नेमण्यावरून नाटकाचा पहिला अंक सुरू झाला. त्याचा तिसरा अंक आता सुरू झाला आहे तो आता विरोधी सोशलिस्ट पार्टीच्या आन्दोलनाने. या पक्ष्याच्या युवा आघाडीचे चार कार्यकर्ते अध्यक्ष्यांच्या प्रासादावर पोचले आणि आपल्याला दत्तक घ्यावे अशी मागणी केली. ही मागणी अर्थातच मान्य होण्यासारखी नव्हती आणि अधिकाऱ्यांनी या तरुणांना हाकलून दिले. पण हे प्रकरण इथेच थांबणारे नाही. सोशालीस्त पक्षाने तरुणांना आवाहन केले आहे, की अध्यक्षांनी आपल्याला दत्तक घ्यावे अशी तरुणांनी मागणी करावी. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळावर दत्तकाचा फोर्मही उपलब्ध करून दिला आहे. तरुणांचे भले व्हायचे असेल तर त्यांनी अध्यक्षाचे मुले व्हायला हवे, हा त्यातला संदेश!
ही बातमी मला का महत्वाची वाटली? एक, त्यात विरोधी पक्ष आणि जनतेची सक्रियता, एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याची तयारी दिसून येते. आपल्याकडे पायलीला पन्नास गोतावाळेखोर उभे टाकले तरी मीठ मसाला लावून त्याची चर्चाच करणारेच जास्त! त्याविरोधात आवाज काढणारे कमीच. सुनील देशमुखांचा काय तो अपवाद. त्यांच्या एका बंडखोरीमुळे त्यांची आधीची पापे धुतली जातील.
दुसरे महत्वाचे, ही बातमी दिली आहे फ्रांस रेडीओ इंटरनेशनल या सरकारी माध्यमाने. तुम्हाला काय वाटते, आपल्याकडे असे घडण्यासाठी आणखी किती दशके लागतील?

फोलपटरावांच्या मुलाखती

फोलपटराव राजकारणी भाग 2

प्रश्नः सध्याच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात
फोलपटरावः याबाबत मी अजून काही ठरविले नाही. ठरवू या. कसे आहे, काही झाले तरी आम्ही निवडणुकीच्या वेळेस प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबतच असतो. प्रॉब्लेम निवडणुकीनंतर येतो. आम्ही मुंबईत अडकून अडतो आणि कार्यकर्त्यांना वाटते, की साहेब आपल्याकडे लक्षच देत नाही. आता लोकं आम्हाला लक्षानुलक्ष देत असताना गावाकडे कसे जाणार?

प्रश्नः नाही, आम्ही पक्षाच्या बाजूने या अर्थाने विचारतोय.
फोलपटरावः तसे नाही. आता एवढे पक्ष बदलल्यानंतर मला कुठल्या पक्षाचे कौतुक वाटणार. आताच नवीन निघालेल्या एका तिसऱ्या अडगळीतील चौथ्या आघाडीत मी सामिल झालो. त्याची एक वेगळीच गंमत आहे. त्यांच्या नेत्याने मला विचारले, “फोलपटराव, या पक्षात किती दिवस राहणार” मी उत्तर दिले,”पक्ष पंधरवडा” (परत तेच हासणे.)त्यामुळे सध्यातरी कुंपणावर बसायचे आणि निवडणुकीनंतर शेत खायचे, म्हणजे कोणाला पाठिंबा द्यायचे ते ठरविणार असा विचार आहे.

प्रश्नः या निवडणुकीसाठी तुमचा काही अजेंडा, धोरण आहे का?
फोलपटरावः आमच्यासारखे जे ग्रासरुटचे कार्यकर्ते असतेत, त्यांच्याकडे धोरण नसतं. असतो तो बेत. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने निवडणुका जिंकायच्या, कोणता घोडा विनच्या जवळ आहे तो निवडायचा आणि त्याच्या नावाने तिकिट घेऊन जॅकपॉटची सोय करायची, हा आमचा बेत आहे.

प्रश्नः म्हणजे तुम्ही घोडेबाजाराचे बोलताय…
फोलपटरावः अहो, कसले घोडे आणि कसले काय. हा सगळा शिरगणतीचा प्रताप आहे. निवडणुकांमध्ये लोकांनी गाढवं निवडून द्यायची आणि तुम्हा पत्रकारांनी त्याला घोडेबाजार म्हणायचं, कशाला ही प्रथा पाडता. लोकांच्या फायद्यासाठी आली चार डोकी एकत्र आणि केलं पाच वर्षे तुमचं मनोरंजन, त्याला तुम्ही काय टॅक्स लावणार का. त्यामुळं आम्ही घोडेबाजाराचं बोलत नाही, आम्ही बोलतो प्रॅक्टिकलचं. आता तुम्ही घोडेबाजाराचं बोलताय. घोडं मेलं ओझ्याने शिंगरु मेलं येरझाऱ्यानं तुम्ही ऐकलं असंलच. तर आमचं घोडं न मरता निवडणुकीचं ओझं वाहतंय आणि राजकीय पक्षांचं शिंगरू बंडखोरीच्या, आचारसंहितेच्या येरझाऱ्यानं मरतंय. आता त्यातून या पक्षांचा निकाल लागलाच वाईट, तर आमच्यासारख्या घोड्यांनीच खांदा द्यायला पाहिजेय ना.

प्रश्नः फोलपटरावजी, तुमच्या या यशाचे रहस्य काय?
फोलपटरावजीः सक्रियता. मी नेहमी कार्यरत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तयार असतो. काही वेळेस, समस्या कमी पडू लागल्या तर केवळ सोडविण्यासाठी म्हणून मी नव्या समस्या निर्माण करतो. अखेरचा श्वास असेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आतासुद्धा तुमच्याशी मी बोलत असताना, यातले कोणते वाक्य मी बोललोच नाही असा खुलासा उद्या करायचा, याचा विचार मी करत आहे. मुलाखत संपली की त्याची तयारी झालीच म्हणून समजा.

प्रश्नः सध्या राज्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे असं तुम्हाला वाटतं?
फोलपटरावः कायदा आणि सुव्यवस्था. अहो, या राज्यात कोणाला काही धरबंदच राहिलेला नाही. कोणीही येतं आमच्या फॅक्टरीला आग लावतं, अमुक येतो गाडीवर दगडफेक करतो. अरे, कायदा हातात कशाला घेता. तो जागच्या जागी राहू द्या ना. कशाला वापरायला लावता. परवा आमच्या गावात आमच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार झाला. सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी कार्यकर्त्यांना गोळ्या घातल्या, सरकारच्या आदेशाची पोलिसांनी योग्य अंमलबजावणी केली, हे कदाचित खरे असेल. मात्र त्यावेळी ते कशाच्या अंमलाखाली होते, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. परिस्थिती इतकी वाईट आहे, का परवा मी एका सभेत म्हणालो, सरकारने आता आठवड्यातील सातही वारांना जोडून एक गोळीवारही जाहीर करावा. यादिवशी राज्यात सगळीकडे गोळीबार करता येईल. बाकीच सहा दिवसतरी बरे जातील ना लोकांचे.

प्रश्नः फोलपटरावजी, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगू इच्छिता?
फोलपटरावः राजकारणाचे क्षेत्र वाईट असं कोणी कितीही बोललं तरी लक्ष देऊ नका. कोटी गमावून बसताल. राजकारणात तरुण रक्ताला खूप वाव आहे. मी तर म्हणेन, तरूणांच्या रक्तावरच राजकारण चालतंय. शक्य असेल तोवर एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातल्या माणसाच्या वळचणीला जा. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर जनतेवर छाप पडायला हवी. त्यासाठी खूप पिक्चर पाहा. पिक्चरमधल्या अॅक्टरपेक्षा असा भारी अभिनय करा, की नाटकी अभिनय शिकण्यासाठी त्याने तुमच्या सभांना आलं पाहिजे. शक्यतोवर अभिनेत्रीशी चांगले (आणि नैतिकही) संबंध ठेवा. ज्या काय चळवळी, आंदोलने करायची असतील ती कोणतेही पद किंवा सत्ता मिळविण्यापूर्वीच करा. कारण कोणताही राजकारणी फक्त खुर्ची मिळेपर्यंत जंगम मालमत्ता असतो. त्यानंतर तो स्थावर मालमत्ता होतो. तुमच्या मागे असलेले लोक तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेत का तुमचा पाठलाग करायला आलेत, त्याची एकदा खात्री करा. एक लक्षात घ्या, सगळ्या नेत्य़ांना राज्यापुढच्या, मागच्यापुढच्या सगळ्याच, समस्यांची जाणीव असते. त्याची उत्तरे मात्र कोणाकडेच नसतात.

फोलपटांच्या मुलाखती

फोलपटराव, राजकीय नेते

भाग १
मुलाखतकारः नमस्कार, आज आपण भेटणार आहोत आपले लाडावलेले, माफ करा लाडके नेते फोलपटराव यांना. विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून फोलपटराव यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यामुळेच दर निवडणुकीच्या वेळी जनताही निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भरीस घालते. यंदाच्याही विवडणुकीत ते मतदारांच्या नशिबाची परीक्षा पाहणार असल्याने आपले नशिब आजमावून पाहणार आहेत. तर या आपण त्यांच्याशी संवाद साधू या.तर फोलपटरावजी, आतापर्यंतच्या वीस वर्षांच्या काळात आपण अठरा पक्ष बदलले आणि स्वतःचे दोन पक्ष काढून विसर्जितही केले. यामागचे इंगित काय?
फोलपटरावः त्याचं असं आहे…जनतेचं कल्याण व्हायचे असेल तर राज्यात स्थिर सरकार पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे दहा पक्ष तर आम्ही स्थिर सरकार याच मुद्द्यासाठी बदलले. गेल्या दहा वर्षांत तर आमची ख्यातीच अशी झाली आहे, की ज्याला आपले गव्हर्नमेंट टिकवायचे असेल, त्याला आमची मदतच घ्यावी लागते. आमची इस्त्री बसल्याशिवाय राज्याची घडीच बसत नाही म्हणा ना. दोन पक्ष आम्ही धर्मनिरपेक्षतेसाठी बदलले. जातीय शक्तींना आमच्यामुळे मदत होऊ नये, यासाठी सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी जुळवून घेण्याचे आमचे आधीपासून धोरण आहे. आता त्यात गफलत काय होते, का आम्ही एखाद्या पक्षात गेल्यानंतर तिथे जातीयवाद सुरू झाल्याचे आमच्या लक्षात येते. एक उदाहरण देतो. आम्ही सत्ताधारी पक्षात असताना आमच्या मतदारसंघात दंगल झाली. त्यावेळी आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो, की दंगल लवकर आटोक्यात आणा. दोषी कोण आहे, याची तपासणी करायची गरज नाही. तर गृहमंत्र्यांचे उत्तर होते, आम्हाला माहित आहे या दंगलीत कोण जातीने लक्ष घालत आहे. मग मी सत्ताधारी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. शिवाय माझ्या पक्ष बदलण्याने जनतेला किती फायदा होतो,पहा ना. दरवेळी त्यांना कोरी पाटी असलेला प्रतिनिधी मिळतो. पाट्या टाकणाऱ्या प्रतिनिधीपेक्षा कोरी पाटी असणारा प्रतिनिधी केव्हाही चांगलाच ना (आपल्या विनोदावर स्वतःच हसतात.)
आणखी एक कारण आहे। आपल्या नागरिकांनी, आमच्या अनुयायांनी सर्व प्रकारच्या अनुभवांना, नवीन विचारांना सामोरे जावे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठीही मला असे राजकारणातले आडवळणं घ्यावे लागले.
प्रश्नः परंतु हे सर्व पक्षांतर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी केले, असे लोक म्हणतात…
फोलपटरावः लोक म्हणजे कोण हो? विरोधक! त्यांच्या म्हणण्याला कोण भीक घालतो. समोरच्या उमेदवाराच्या पाठीमागे असं काही बाही बोलण्याची रीतच असते राजकारणात. आता आम्ही काय आमच्या विरोधकांवर कमी आरोप केले. काय झालं त्याचं। तसंच असते ते. राहता राहिला प्रश्न आमच्या फायद्याचा॥ आता असं बघा, आमचा फायदा हा समाजाचा फायदा असतो. दिल्लीतून निघालेला एक रुपया गल्लीपर्यंत पोचेपर्यंत तेरा पैसे होतो, असं राजीव गांधी म्हणायचे. आता आमच्यापर्यंत रुपयाच नाही आला तर खालच्यांना तेरा पैसे तरी मिळतील का तुम्हीच विचार करा. शेवटी आम्हाला थोडेच पैसे खावेसे वाटतात. पण लोकांचे पोट भरण्यासाठी आम्हाला तेही करावे लागते. पापी पेट का सवाल है ना!
प्रश्नः मात्र अलिकडे राज्यातील जमीनींच्या विक्रीत तसेच प्रकल्पांसाठी जमिनी घेण्याच्या बाबतीत तुमचे नाव अनेक वादांमध्ये सापडले…
फोलपटरावः थांबा थांबा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. परवा दिल्लीत मला बिहारचे एक खासदार भेटले. त्यांना मी विचारले, तुम्ही आमच्या राज्यात एवढ्या जमिनी का विकत घेत आहात. त्यांनी मला सांगितले, तुमच्याच राज्यात नाही तर मी सगळ्या भारतात जमिनी घेत आहे. कारण मला राष्ट्रीय नेता व्हायचे आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती सत्ता हे शिवाजी राजांच्या काळी ठीक होतं हो. आता सत्तेच्या किल्ल्या जमिनी ज्याच्याकडे असतात त्यांच्या हाती असते. काय आहे, विकास करायचे म्हणजे सोयीसुविधा, जागा पाहिजे. त्या ताबडतोब मिळायच्या झाल्या तर आपल्या हाती काही तरी पाहिजे ना. यासंबंधात काही वाद व्हावे, असे मला वाटत नाही. शिवाय आपला वेव्हार एकदम स्वच्छ आहे. सगळ्या जमिनी सरकारी भावाने घेतल्या आहेत, तर लोकं काय म्हणणार का सगळ्या जमिनी माझ्या भावाने घेतल्या आहेत. सगळा शब्दांचा खेळ आहे हो सारा.