जनजागृतीचा उत्सव 3

Ganpati  “बरं ते जाऊ दे. तुमच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाने पाण्याचे जे प्रदूषण होतं, त्याचं काय,” प्राध्यापक महाशयांचे युक्तिवाद आणि संयम दोन्ही संपत आला होता. त्यामुळे त्यांनी मला उत्सवकर्त्यांच्या गोटात ढकलून दिले. 
“ती एक वेगळीच गंमत आहे, सर. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गणेश मूर्तींच्या विसर्जनाने वाहतं पाणी प्रदूषित होत नाही. तळं, विहीर इत्यादींमध्ये अस्वच्छता होऊ शकते. मात्र नदी किंवा समुद्रात प्रदूषणाची शक्यता खूप कमी असते. कसे ते सांगतो. त्याआधी तुम्हाला एक गंमत सांगतो. 2005 साली प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात नदीचे प्रदूषण सर्वात कमी होते! वास्तविक प्लास्टर ऑफ पॅरिसने होणारी अस्वच्छता नदीत एकूण होणाऱ्या अस्वच्छतेच्या तुलनेत अगदीच कमी असते. कशी ते सांगतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील बहुतेक शहरे साठ जास्त टक्के पाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीत तशीच सोडून देतात. मुंबईत 80, पुण्यात 64, नाशिकमध्ये 47 तर नागपूरमध्ये केवळ 26 टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पुण्यातील मुला-मुठेचं दुखणं ठसठशीत दाखविलं जातं. त्यामुळे तिथली परिस्थिती पाहिली, तर पुण्यात दररोज पाणीपुरवठा होतो 750 दशलक्ष लिटरचा. त्यात सांडपाणी निर्माण होतं 192 दशलक्ष लिटर. यातील सुमारे चाळीस टक्के पाणी, म्हणजे 48 दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज पुण्याच्या सदाबहार नद्यांमध्ये सोडले जाते.
“आता आपण गणेश विसर्जनाच्या दोन दिवसांतील परिस्थिती पाहू. पुण्यात परवानगीशीर अशी 40,000 गणेश मंडळे असतात. त्यात घरगुती 20-25 हजार छोट्या मूर्तींची भर पडते. अशा एकूण 60-65,000 मूर्ती असतात. आठ ते दहा इंचांची एक मूर्ती 250 ग्रामच्या जवळपास असते. अशा एकूण मूर्तींचं वजन होईल दोन टन. पुण्यातील पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, मुठा-मुळेत दररोज 90 टनांचे सांडपाणी आणि कचरा वाहत जातो. याचाच अर्थ, गणेश मूर्तींचे तथाकथित प्रदूषण एकूण प्रदूषणाच्या दोन टक्क्यांहूनही कमी आहे. राहता राहीला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रश्न. PoP म्हणजे कॅल्शियम सल्फेट म्हणजेच जिप्सम. PoP संबंधात धोक्याचा सर्वात मोठा मुद्दा हा असतो, की पाणी आणि PoP शी संपर्क आल्यास त्वचा भाजली जाण्याची शक्यता खूप अधिक असते. आता मला सांगा, ज्या नदीचं तापमान 30 टक्केपेक्षा जास्त नाही, तिथे किती उष्णता निर्माण होणार? शिवाय, आपल्याकडे बहुतेक मूर्तींचं विसर्जन रात्री केलं जातं. त्यावेळी तापमान आणखीच कमी असतं. मूर्ती पाण्यात टाकल्यानंतर कोणी तिच्यासोबत वाहून जात नाही. त्यामुळं तोही मुद्दा निकालात निघतो. 
“कॅल्शियम सल्फेट पाण्यात विरघळण्यासाठी वेळ लागतो, विरघळतच नाही, असं नाही. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, आता लोकं परत शाडू आणि मातीच्या मूर्ती घ्यायला लागलेत. नैसर्गिक रंगांचा वापरही वाढतोय. त्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं, हाही मुद्दा पटणारा नाही. पुण्यातून जाणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे उजनीचं पाणी लोक वापरत नाहीत. तिथल्या उद्योजकांनीही आता शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी केलीय, हे तुम्हाला माहीतच असेल. या लोकांनी गणेश मूर्तींच्या नावाने खडे फोडण्याची गरज नाही.”
मग शेवटी मी म्हणालो, “असं बघा सर, जगात प्रत्येक देशाला अन् भारतात प्रत्येक राज्याला त्यांची ओळख पटविण्यासाठी एक उत्सव लागतोच लागतो. ब्राझीलचा कार्निवल, जर्मनीचा ओक्टोबरफेस्ट, अमेरिकेचा ख्रिसमस…आपल्याकडे कर्नाटकाला त्यांचा म्हैसूरचा दसरा आहे, बंगालला दुर्गा पूजा आहे, उत्तरेत रामलीला आहे, महाराष्ट्राला कुठला उत्सव आहे? छत्रपती शिवाजीनंतर महाराष्ट्राला अभिमानास्पद असं त्याचं एकमेव ओळखपत्र गणेशोत्सव हेच आहे. या उत्सवाने जेवढे कलावंत दिले, त्यांची कला जगविली तेवढे महाराष्ट्र सरकारनेही जगवले नसतील. काही लोकं तो बदनाम करतात, म्हणून तो संपवून टाकण्याची भाषा? हे म्हणजे भिंतीला तडे गेले म्हणून घरच पाडण्यासारखं झालं. असं समजा, की गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळं बुद्धीहीन लोकांनाच त्याची गरज आहे आणि ते एकत्र येऊन, बुद्धी देण्यासाठी आकांत करतायत. सहन झालं नाही, तरी असा विचार केलात तर किमान तुम्हाला समाधान तरी लाभेल.”
(समाप्त)

लेखातील आकडे सृष्टी इको-रिसर्च इन्स्टिट्यूट, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य अभ्यासकांनी केलेल्या पाहणीवर आधारीत. पुण्यातील मुठा नदीतील गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी प्रदूषणाच्या पातळीत कुठलीही लक्षणीय वाढ झाल्याचे दाखवित नाही.

जनजागृतीचा उत्सव 2

वाजवा रे वाजवा!

Ganesh Festival "अहो पण या गर्दीत आपण कशासाठी सामिल व्हायचं? त्या टोळक्यात सामिल व्हायचं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. आपल्याला काही वैचारिक दर्जा आहे का नाही,” प्राध्यापक काही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते.

"अहो, पण तुम्ही त्यांच्यात सामिल होऊन वैचारिक आदानप्रदान करा ना. कदाचित त्या टोळक्यात आपणे एकटे पडू आणि त्यामुळे आपलं कोणी ऐकणार नाही, असं वाटत असल्यास तुमच्यासारख्या आणखी लोकांना सोबत घ्या ना. तसं पाहिल्यास, तुमच्यासारख्या विचारवंतांनी एकत्र येऊन आदर्श उत्सव साजरा केल्याचं मला कधी आढळलं नाही. त्यामुळं जे करतात त्यांना नावं ठेवण्याचा तुम्हाला, किंवा तुमच्यासारख्यांना अधिकार पोचत नाही. तुमच्या दृष्टीने जे रिकामटेकडे असतात, त्यांना मग जसं जमेल किंवा जे चांगलं वाटेल ते करतात. काही गोष्टी या काळाच्या गतीनुसार होतच असतात. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी, म्हणजे घरातल्या खोक्यात पोशाखी स्त्री-संचलन सुरू झालं नव्हतं, तेव्हा नाही का सगळी मंडळे दहा दिवसांत जुने हिंदी चित्रपट दाखवायचे. आता कुठलंही चित्रपट दाखवत नाही. हा बदल चांगला का वाईट, तुम्हीच विचार करा,” या उत्तराने त्यांचं समाधान होईल ही अपेक्षा नव्हतीच.

"दहा दिवसांच्या कीर्तनानंतर विसर्जन मिरवणुकीचा जो गोंधळ विसर्जन मिरवणुकीत होतो, त्याबाबत तुमचं म्हणणं ऐकायला आवडेल मला,” ते म्हणाले.

“मला काहीच म्हणायचं नाही. समाज किंवा कायद्याने आवाजाची पातळी निश्चित केलेली आहे. प्रश्न हा आहे की ती पातळी पाळली जाते का नाही, यावर लक्ष कोण ठेवणार? ज्यांनी लक्ष ठेवावे अशी अपेक्षा आहे ते ती ठेवतात का,” मी म्हणालो, “तुम्ही म्हणता तसं आवाजाचा त्रास तर सगळ्यांना होतोच. आता समजा मिरवणुकीच्या मार्गावर 100 घरे आहेत. तशी ती जास्तच असतील पण कमी नाहीत. यातील किती जणांनी आतापर्यंत एकत्र येऊन आवाजाचा त्रास झाल्याबद्दल तक्रार केली असेल? केवळ कुठल्या तरी ‘मोफत पीठा’चं दळण काढलं म्हणजे जगात बदल होईल, या अपेक्षेला काही अर्थ आहे का? शिवाय, ध्वनिप्रदूषण झालं, त्याची विशिष्ट पातळी ओलांडली (70 डेसिबल) तर कारवाई करण्याचे अधिकार प्रदूषण मंडळाला आहेत. अशी कारवाई केल्याचे एक तरी उदाहरण आहे का आतापर्यंत. म्हणजे अहो, आमचे पोलीस तुम्हाला धरू शकत नाहीत, किंवा त्यांना तुम्हाला धरण्याची इच्छा नाही. म्हणून जरा चोऱ्या करणं बंद कराल का, असं तुम्ही कोण्या चोराला विचाराल का? तो जर तुमच्या विनंतीला मान देणार असतील, तर गणेश मंडळाचे कार्यकर्तेही तुमच्यासाठी आपला आवाज बंद करतील.”

एवढं सांगितल्याने प्राध्यापक ऐकतील, ही शक्यता नव्हतीच. मग पुढे सांगितलं, “गल्लीभूषण पुढाऱ्यांनी जन्म घेऊन या देशावर उपकार केल्याबद्दल त्यांच्या वाढदिवशी फटाके फोडून दवंडी पिटणाऱ्यांचा देश आहे हा. निसर्गनियमाला धरून वयात आल्यावर लग्न केल्याबद्दल सासऱ्याच्या पैशावर संपूर्ण शहराला तालबद्ध गाण्यांचा आविष्कार घडविणाऱ्यांचा देश आहे हा. तुम्ही गणेशोत्सव बंद केला म्हणून सगळ्या ध्वनिवर्धकांचे गळे धरतील, ही तुमची कल्पना आहे का? हा सगळा गलबला दुसऱ्या कोणत्या मार्गाने बाहेर पडणारच नाही, अशी तुम्हाला खात्री आहे का?”

त्यांना मला आणखी पिडायचं होतं, “सर, नियमानुसार काम हे भारतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नाव आहे. तुम्ही ज्याला गोंधळ म्हणतायत, तो घालण्यासाठी निमित्त लागत नाही आम्हाला. वन्य श्वापदांच्या वरचढ आवाजाचे भोंगे गाड्यांना लावून उंडारणाऱ्या माणसांच्या घरी काही राज्याभिषेक सोहळा चालू असतो, असं वाटलं का तुम्हाला? मोबाईलच्या बहुतेक उपयोगी ‘कळा’ माहीत नसणारे वीरही येथे आजूबाजूच्या लोकांना ‘ताज्या गाण्यामोडी’ ऐकवतात. एक खूप जुनी जाहीरात आठवते का तुम्हाला, ‘आवाज ही नही करता’ वाक्य असलेली. शांतता हे आमच्या येथे बिघाडाचे चिन्ह आहे, आणखी काय सांगणार?”

सल्मान-ए-वालेकुम!

प्यारे सलमान भाई,

हाडाबे-अर्ज. आता हा हाडाब कुठून आला, हा प्रश्न तुला पडणार. आधीच तुझ्या अगाध व समाजहितदक्ष मेंदूवर नाना काळज्यांचा भार पडलेला असताना, अशा क्षुल्लक कोड्यांनी त्यात भर घालण्यात काय हशील? त्यामुळे मीच सांगतो. अदाब-ए-अर्ज या सुंदर अभिवादनाचे हे खास मराठी रूप अर्ज. आता मराठी लोक एका विशिष्ट प्राण्याला घालवताना हा शब्द वापरतात, याची सांगड तू घालू नको. आमच्यामध्ये अद्वातद्वा बोलून कोणी स्वतःची (असो अथवा नसो) अब्रू घालवत असेल, तरी जिभेला हाड आहे का नाही, असं विचारतात. आताशा कोणी जुन्या म्हणी वापरत नाही. पण त्यांची आठवण अधूनमधून होत असते, एवढं खरं.

ही याद आम्हाला तुझ्याएवढी कोणीही आणून देत नाही, भाई. याबाबतीत तुझा हात अथवा जबान धरणारा कोणीही नसेल, हे लिहिताना माझी कलम जराही कचरत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला किंवा जीभेला हाड नसणे, या मराठी भाषेतील वाक्यांना तमाम दुनियेपुढे उलगडण्याचा तू वसाच घेतलाय जणू. वीस वर्षांपूर्वी तू चित्रपटांत येतोस काय आणि एकामागोमाग फडतूस चित्रपट करतोस काय, सारंच अघटीत. पण ती उणीव लोकांना जाणवू देण्यासाठी तू जो काय आटापीटा करतोस, त्याची सर कोणाला नाही. तुझ्या जिभेचे दशावतार एव्हाना साऱ्या देशाने पाहिले आहेत. मग ते ‘बॉलिवूडला हलविणारा मीच माफिया’ अशी एका इमारतीत केलेली गगनभेदी मोबाईल घोषणा असो, किंवा विवेक ओबेरॉय आणि अभिषेक बच्चन यांची धुणी सार्वजनिक जागी धुण्याचे प्रसंग असो, थेटरातील कसर वास्तवात भरून काढण्याची एकही संधी तू सोडलेली नाहीस, याबद्दल तुला मनापासून शुक्रिया. या जिभेच्या नादी लागूनच नाही का राजस्थानात काही काळवीटांना तू मुक्ती दिली आणि मुंबईत काही लोकांना उंची गाड्यांखालून सफर घडवून आणलीस?

आता मी एवढं यारीमध्ये का लिहितोय? अरे, असं का करतोस? मागे मी तुझ्याबद्दल लिहिलं होतं, आठवत नाही का तुला? त्यावेळी हा जालीम समाज तुला कैदेत टाकायला निघाला होता. आता तुझ्या नावाने शिमगा वेगळा करताहेत. त्यासाठीच तुला पत्र लिहितोय. बाकी, या मधल्या काळात मी तुझ्याबद्दल काही लिहिलं नाही. पण ते यासाठी, की तुमच्या भाषेत – उस वक्त मैंने ऐरोंगैरोंपर लिखना छोड दिया था! पण भाई, या वेळेस तू चक्क पॉलिटिक्समध्ये घुसलास. पोरी आणि किस यापलिकडे दुनिया आहे, हे तरी तुला माहितंय का? अन् तू इतिहासाचा कीस पाडणार?

भाई, मी तुझ्यावर खूप रागावलोय. खूप म्हणजे खूप. अरे, क्यों का विचारतोस? नेहमीप्रमाणे तू तुझ्या विद्वत्तेचा उजेड पाडण्यासाठी आणि सखोल चिंतनातून आलेली काही मते मांडलीस. त्यावर गदारोळ होत होता. सगळं कसं स्क्रीप्टनुसार चाललं होतं. सलीमचाचांची हयात गेली स्क्रीप्टा लिहिण्यात पण त्यांनाही असलं टाईमिंग जमलं नाही कधी. गणेशोत्सवात पोलिस बंदोबस्तावर. नेते मतदारसंघात. सारखे गणपतींचे डेकोरेशन दाखवून डोकं दुखायला आलं. खबरा कुठून येणार? काश्मीर पेटलेला ठीकंय, पण त्यासाठी माणसे पाठवावी लागतात. ते कोण करणार. तुझी आयती बातमी आली होती. पाकिस्तानच्या चॅनेलशी केलेली गुफ्तगु. राज ठाकरेंनी तुझ्यासाठी शब्द टाकलेला. दुसऱ्या ठाकरेंनी ‘ठोकरे’ची पोझ घेतली. सगळं कसं सेट झालं होतं. तीन दिवस आहे नाही तो जुन्या नव्या फिल्लमांचा स्टॉक चालवून मजा करण्याचा बेत आखत होतो आम्ही. अन् फु्स्स्स्स्स! तू कम्बख्त माफी मागून मोकळा!

अरे, टाईटल साँगलाच कोणी दि एन्डची पाटी लावते का? बोल ना मला. तुझ्यासारखा अवसानघातकी माणूस पाहिला नाही मी. भाई, ये तूने गलतईच किया. हमारे पेट पे लात मार दी.

अरे भाई, तू जो बोलला होता ना त्यात फार चूक नव्हतं. पण तू पडला फिल्म स्टार. कुठं आणि कसं बरळायचं, तुला कसं कळणार. तुला माहितंय, तु जे बोलला होता तसंच काहीसं कोण बोललं होतं? शिवसेनाप्रमुख!

Talking about those who lit candles in front of Taj Hotel after the last month’s terror attacks, he said, "Those who party at the Taj have lost their watering holes. Hence this outrage. Where were these people when other terror attacks took place?"

हिंदुहृदयसम्राट तेच म्हणतात, मराठी हृदयसम्राट तेच बोलतात आणि मीही तेच बोलतो, भाई. मग तू आमच्या नावावर खपवायचं ना! तुला एक ‘राज’ सांगतो पत्रकारांचा. आपल्याला जे म्हणायचं ना, ते दुसऱ्यांच्या तोंडात कोंबायचा. कोट टाक, आरोप केला बोल. तुम्ही टपोरी लोकं पुण्याचे पेपर वाचत नाही, त्यामुळं हे सगळं शिकवावं लागतं.

और एक भाई, हे असं कुठंही बरळत जाऊ नको. खासकरून मुंबई हल्ल्याबाबत नकोच नको. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना तुझा निषेध करावा लागतो. बहोत बुरा लगता है भाई, मुझे नहीं उनको. अरे, इलेक्षनच्या वेळेस तुम्हा लोकांना फिरवावं लागतं त्यांना तुमच्या मतदारसंघात. नाहीतर कोण कुत्रं जाणार आहे प्रचार सभांना. गेल्या निवडणुकीतच नाही का तू औरंगाबाद का कुठल्याशा शहरात फिरला होतास? तू भले घरी गणपती बसवत असशील, पण उस्मानपुऱ्यातली मतं मिळण्यासाठी तुझा उत्सव करावा लागतो, भाई. एवढी मदत केल्यावर तुझाच निषेध करायचा म्हणजे काय वाटत असेल त्यांना, आँ? नाही केला निषेध तर वांधा व्हायचा भाई. तू राम गोपाल वर्माची एकही फिल्म केली नाही किंवा त्याच्या बरोबर ताजमध्येही गेला नाहीस, तुला काय कळणार भय काय असतं?

आता तुला देशभक्ताचं सर्टिफिकेट मिळालं, भाई, पण आमच्या रोजगार हमीचं नुकसान झालं, ते कोण भरून देणार? असो. पुढच्या वेळेस काळजी घे. म्हणजे माफी मागायची असली तरी जरा वेळ जाऊ दे. आम्हाला बातम्या करू दे. हजारो मुडदे पाडल्यांनतर पंचवीस वर्षांनी माफी मागूनही शेखी मिरविणारा देश आहे हा. तुला एक आठवडा कळ काढता येऊ नये?

आता तरी शहाणा हो. आता थांबतो. पत्र थोडं लांबलंय. तुला मुंबई हल्ल्यामागचे राजकारण कळते, म्हणजे लिहिता-वाचता येत असंल, असं समजून लिहिलंय. तुला जमलं नाही तर दुसऱ्यांकडून वाचून घे. आता परत तुझ्यावर इतक्यात लिहिन असं वाटत नाही. त्यामुळे ट्रेलरला फिल्म आणि बाईटला इंटरव्यू समजून घे.

तुझाच,

डीडी

जनजागृतीचा उत्सव! –भाग 1

Ganesh Festival गणेशोत्सव "लोकमान्य टिळक आज असते, तर त्यांनी गणेशोत्सव बंद केला असता…," प्राध्यापक महाशय माझ्याशी तावातावाने त्यांच्या आवडत्या वाक्यावर आले होते. गायक जसा समेवर येतो किंवा एखादी बाई नवऱ्याबद्दल बोलताना ‘त्याला काही कळत नाही’ हे जसं आळवू-आळवून सांगते, तसं वरचं वाक्य आमच्या प्राध्यापक महाशयांचं त्यांच्यापुरतं चर्चेच्या निष्कर्षाला आल्याचं लक्षण आहे. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात बेडकांचं वर्षागान सुरू होतं. जुलैच्या मध्याला शहरातील भूमिगत गटारे भूतलाला आच्छादून वाहू लागतात. ऑगस्टमध्ये निसर्गात ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो आणि श्रावणानिमित्त बाजारात उपावासाच्या पदार्थांची आवक वाढते. या बाबींचा नैसर्गिक क्रम जेवढा ठरलेला, तेवढाच पोळ्याच्या जवळपास प्राध्यापकांचा गणेशोत्सवाच्या नावाने खडे फोडण्याचा कार्यक्रमही ओघाने येतो. त्यात एखाद दिवस इकडेतिकडे होईल…पण तो कार्यक्रम कधी रद्द झाल्याचं ऐकीवात नाही.

गणेशोत्सव 1893 पासून महाराष्ट्रात जनजागृतीचे काम करतो. त्यावेळी इंग्रजी राजवटीच्या विरोधात त्याने लोकांना जागे केले. आता गणेशोत्सव जवळ आला की वर्षभर शीतनिद्रा घेणारे समाजचिंतक जागे होतात. मग अत्यंत कळकळीची वर्तमानपत्रं जाहिराती लावून उरलेल्या जागेत, ‘गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप’ किंवा ‘उत्सव हवा, उच्छाद नको’ अशा छापाचे लेख बसवितात. त्यामुळंच यंदाही प्राध्यापक महाशय येऊन त्यांची वार्षिक चिंता व्यक्त करू लागले, त्याचं आश्यर्य वाटण्याचा प्रश्नच नव्हता. आता त्यांनी उत्सवाच्या नावाने कंठशोष केलाच होता, तेव्हा त्यांना चहा पाजणं क्रमप्राप्तच होतं. तो वाफाळलेला द्रवपदार्थ घशाखाली गेला, तसा प्राध्यापकांचा पाराही खाली आला. त्यांच्या सगळ्या रणभेरी आधीच वाजून झाल्या होत्या. निकराचा प्रयत्न म्हणून त्यांनी आपले ठेवणीतले वाक्य काढले…तेच ते वर लिहीलेलं. हे वाक्य जसं त्यांनी पहिल्यांदा उच्चारलं नव्हतं, तसंच मीही पहिल्यांदा ऐकलं नव्हतं.

“नसता बंद केला लोकमान्यांनी…” प्राध्यापकांना हे वाक्य ऐकून एकदम 2400 वॅटची डॉल्बीची भिंत त्यांच्या खिडकीशी वाजावी, असा झटका बसला असावा.

"कशावरून?” त्यांनी प्रश्न टाकला.

“कारण लोकमान्य प्रयत्नवादी होते. त्यांच्या काळातही टगेपणा करणारी मंडळी कमी नव्हती किंवा वाया जाणारी युवाशक्तीही कमी नव्हती. पण त्यांनी त्या शक्तीचा उपमर्द न करता त्यांना गणेशोत्सवात आणले. मूळ पुंडपणा करणारे चापेकर बंधू हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे उत्सवाच्या स्वरूपाला नावे ठेवण्यापेक्षा त्यांनी त्यातून काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न केला असता. एवढा मोठा उर्जेचा साठा शंभर वर्षांपासून समाजात उपलब्ध असताना, त्याला नाक मुरडत दिवस काढणाऱ्या संभावितांना ते जमलेले नाही. पण म्हणून लोकमान्यांना त्यासाठी जबाबदार धरणे किंवा ते तुमच्यासारखे वागले असते, हे पटत नाही,” मी म्हणालो.

“हा उर्जेचा स्रोत?” प्राध्यापक महाशय वीज सळसळावी तसे उसळून बोलू लागले. “अहो, बेबंदपणा आहे सगळा. स्वैराचार आहे. ही पोरं दारू पितात, जुगार खेळतात. वर्गणीची खंडणी केलीय. मुळात करायचाय काय उत्सव. आता स्वातंत्र्य मिळालंय. प्रबोधन करायला शाळा आहेत. मग गणपती कशाला पाहिजे?”

“अहो, ती दारू पितात, जुगार खेळतात म्हणजे काय? त्यांना रोखणारे कोणी नाही म्हणूनच ना? ज्यांना आपण समाजातील सचोटी सांभाळू शकतो, असे वाटते त्यांनी मंडळात जाऊन असं गैरकृत्य करणाऱ्यांना जाब विचारावा. त्यांना थांबवावे. तळं राखील तो पाणी चाखीलच ना. तुम्हाला आपल्या वन/टू बीएचकेतून बाहेर पडायचं नाही. जे आपल्या झोपडीतून बाहेर पडतायत त्यांना वाट दाखविणारं कोणी नाहीय. तरीही काही ठिकाणी चांगली कामे होतच आहेत. राहिला प्रबोधनाचा प्रश्न. ज्या राज्यात इतिहासातील चित्रे लागली म्हणून दंगली होतात, पुतळे हालविण्यासाठी धुमश्चक्रीसारखी परिस्थिती निर्माण होते त्या राज्यात तरी प्रबोधनासाठी वाव नाही, हे मला मान्य नाही.”

“वर्गणीची खंडणी…तिचं काय?”

“असं आहे, प्रत्येक धर्मात किंवा संस्कृतीत व्यक्तीने समाजासाठी वाटा उटलण्याची संकल्पना आहे. शीख पंथात आपल्या वार्षिक उत्पन्नाचा 10 टक्के वाटा प्रत्येक व्यक्ती गुरुद्वाराला अर्पण करतो. मुस्लिम लोक 2.5 टक्के जकात देतात. फक्त हिंदु लोकंच याबाबतीत स्वार्थी आहेत. त्यामुळंच दररोज जिथे भ्रष्टाचाराच्या कथा बाहेर पडतात, त्या शिर्डीत वा तिरुपतीत धनांचे हंडे रिकामे होतात, अन् सामाजिक काम करणाऱ्या अनेक संस्थांना-मग त्या धार्मिक का असेनात-दारोदार अपमान सहन करत फिरावे लागते. एखादं मंडळ किंवा संस्था चांगलं काम करतेय, म्हणून तुम्ही स्वतः जाऊन वर्गणी दिलीय का कधी? अशा परिस्थितीत कोणी सार्वजनिक कामासाठी रक्कम मागत असेल, तेही वर्षातून एकदा तर ते देण्यात काय वाईट आहे. आता एकदाची पैसे देऊन कटकट मिटवू असा ‘व्यापारी’ विचार केला, तर मग लोकंही सारखी पैसे मागायला येणारच. कारण ‘अजापुत्रं बलिं दद्यात्!’

"वास्तविक मोठी रक्कम देण्याऐवजी जर लोकांनी सांगितलं, की आम्ही थोडीशी रक्कम देऊ पण मंडळाच्या कामात सहभागी होऊ, तर वर्गणी खंडणी होणार नाही. उलट ती लोकं तुमच्याकडे येणंच बंद होईल. कारण तुमच्यासारखे सच्छील लोकं त्यांना नकोच आहेत. पण वर्गणी घेणाऱ्यांनाही माहीत असतं, की लोकांना पैसे देऊन मोकळं व्हायचंय. कटकट नको म्हणून कितीही आणि कितीदाही पैसे देण्याची लोकांची तयारी आहे. मग ते वारंवार येणारच. आधी दहीहंडी, मग गणेशोत्सव, नंतर नवरात्र…अहो सर, जिथे लोकं आपल्या हिसकावेल्या घरांसाठी पुढे येण्यास तयार नाहीत, तिथे किरकोळ वर्गणीसाठी भांडणं कोण विकत घेणार. मग अशा पुळचट लोकांकडून ‘जबरा’ वर्गणी घेतली नाही, तर त्या कार्यकर्त्यांना वेड्यात काढणार नाहीत का?”


टीपः सदरच्या लेखातील प्राध्यापक ही वास्तवातील व्यक्ती असून, त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या संवादावरच हा लेख आधारलेला आहे.