घुमानच्या निमित्ताने-7 पोट भरण्याची चिंताच नाही!

WP_20150406_010तसे पोट भरायचे झाले तर पंजाबमध्ये खरे तर एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. कुठल्याही गुरुद्वाऱ्यात जावे आणि लंगर साहिबमध्ये बसून मनसोक्त आहार घ्यावा. काही गुरुद्वाऱ्यांमध्ये विवक्षित वेळी लंगर चालतो तर काही ठिकाणी चोवीस तास चालतो. शीख पंथामध्ये लंगर (सामुहिक स्वयंपाकघर आणि अन्नदान) याचे मोठे महत्त्व आहे. शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदास यांची अटच होती, की ‘पहले पंगत फिर संगत’. म्हणजे पाहुण्याने आधी जेवायचे आणि मगच त्यांची भेट घ्यायची. एकदा अकबर बादशहा त्यांची भेट घेण्यास गेला असता त्यालाही ही अट सांगण्यात आली. त्यावेळी मुकाट्याने बादशहालाही सामान्य लोकांसोबत पंगतीत बसावे लागले आणि लंगर घ्यावा लागला.

डोक्यावर रुमाल पांघरायचा, कुठलीही लाज न बाळगता पंगतीत बसावे आणि प्रशादा म्हणून मिळणारी रोटी हातावर झेलावी. ही एवढी तयारी असेल तर मक्के दी रोटी, एखादी भाजी, दाल, चावल आणि पेलाभर चहा मिळून जातो. जात, धर्म किंवा लिंग असा कुठलाही भेदभाव यात असत नाही. हरमंदिर साहिबमध्ये दोनदा गेलो असताना दोन्ही वेळेस मी तेथील लंगर साहिबमध्ये जेवलो. अर्थात पैसे वाचविणे किंवा पोट भरणे हा हेतू नव्हता. कारण वर म्हटल्याप्रमाणे हॉटेलमध्ये कुलचा खाल्ल्यानंतरही मी लंगरमध्ये गेलो होतो. मी गेलो कारण ती सवय आहे. घुमानच्या गुरुद्वारातही लंगर साहिब आहे आणि तेथे मी गेलो होतो. तिथे सुधीर गाडगीळ म्हणाले, "मला भूक लागलीय.”

मी म्हणालो, "चला लंगरमध्ये" आणि त्यांना तेथील लंगरच्या जेवणाचा अनुभव दिला.

नांदेडला चोवीस तास चालणारा एक गुरुद्वारा आहे आणि मुख्य गुरुद्वाऱ्यात, सचखंड साहिबमध्ये, रात्री लंगर लागतो. कधीकाळी मी तेथे जेवलोही आहे आणि सेवाही केली आहे. तशी ती शीख पंथियांमधील बहुतेक मंडळी करत असतात. ही सेवा करणारे लोक कुठले आलतू-फालतू नसून चांगले अनिवासी भारतीय, मोठे व्यावसायिक आणि कर्ती-सवरते लोक असतात. बाहेर कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी व्यक्ती येथे आपले जोडे सांभाळायला असते. त्यामुळे हरमंदिर साहिबचा लंगर पाहण्याची, तेथील अनुभव घेण्याची मला खूप इच्छा होती.

tumblr_nm9zq08oep1u5hwlmo1_500[1]  मात्र हरमंदिर साहिबमध्ये मी जो लंगर पाहिला, तो छाती दडपून टाकणारा होता. एका वेळी किमान एक हजार लोकांची पंगत येथे बसते आणि त्याच वेळेस किमान शे-दोनशे लोक सेवेत गर्क असतात. चोहोकडे भांड्यांचा, ताट-वाट्यांचा खणखणाट चालू असतो. सुवर्ण मंदिरातील लंगर साहिब दोन मजली असून त्याच्या विस्ताराचे काम चालू आहे. एकीकडे चहाची जागा होती. म्हणजे आपल्याकडे जशी पाणपोई असते तशी चहापोई होती. तिकडे जातानाच एक सरदारजी आपल्या हातात वाडगा देणार आणि पुढे फिल्टरच्या टाकीतून आपण तोटीद्वारे पाणी घेतो, तसा तोटीद्वारे चहा मिळणार. त्यासाठी दोन सेवेकरी बसलेलेच असतात. तिकडे न जाता आपण सरळ पायऱ्या चढून वर गेलो, की लंगर साहिबचे मुख्य दालन लागते. लंगर ‘छकणाऱ्या'(सेवन करणाऱ्या) लोकांच्या शेकड्यांनी ओळी बसलेल्या असतात. पद्धत अशी, की भारतीय बैठकीत पाठीला पाठ लावून लोकांनी बसायचे. वाढकरी एकामागोमाग रोटी, दाल, भात इ. पदार्थ घेऊन फिरतात. मी गेलो तेव्हा एकदा शेवयांची खीर आणि एकदा भाताची खीर होती. आता या पदार्थांचे वाटप पंगतीत करायचे म्हणून त्यांच्या दर्जात कोणतीही तडजोड नसते. अख्ख्या मसुराच्या दालीत तुपाचा ओशटपणा आढळणार म्हणजे आढळणार. भात बासमती तांदळाचाच असणार आणि त्यातही तुपाची झाक असणार म्हणजे असणार. तेव्हा असे जेवण जेवल्यानंतर कोणत्या व्यक्तीला आणखी काही खाण्याची इच्छा होणार? गंमत म्हणजे इतके सारे मोफत उपलब्ध असूनही पंजाबमध्ये हॉटेल अगदी भरभरून चालतात.

हरमंदिर साहिबची आणखी एक खासियत येथील प्राकारात तुम्हाला छायाचित्र काढण्यापासून कोणीही रोखत नाही. हवी तेवढी छायाचित्रे काढा. मी तर हरमंदिर साहिबच्या अगदी गाभाऱ्यात प्रवेश करेपर्यंत मोबाईलमध्ये छायाचित्रे काढत होतो. फक्त गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारापासून सेवेकरी छायाचित्रांना मनाई करत होते. आणखी विशेष बाब म्हणजे हरमंदिर साहिबच्या अगदी घुमटापर्यंत जाण्यास प्रत्येकाला मुभा आहे. तेथून आजूबाजूचे दिसणारे दृश्य मनोहर खरे. चारी बाजूला संगमरवराच्या भिंती ढगांशी स्पर्धा करत असतात आणि पांढरे शुभ्र घुमट निळ्या आकाशात घुसखोरी केल्यासारखे दिसतात. चारीकडच्या भिंतींमध्ये दिसणाऱ्या कमानींमधून बसलेले भाविक छायाचित्रकारांसाठी एक पर्वणीच भासतात. कोणी गुरु ग्रंथसाहिबचे पारायणे करतोय, कोणी डोळे मिटून ध्यान करतोय, एखादी स्त्री सोन्याच्या घुमटाकडे तोंड करून हात जोडून आणि डोळे मिटून प्रार्थना करतेय, अशा कमानींच्या पार्श्वभूमीवरच्या प्रतिमा चित्रमय वाटणार नाहीत तर काय? बरं, याच्या जोडीला शुद्ध शास्त्रीय रागांमध्ये बसविलेल्या आणि मंजुळ व सौम्य आवाजात चालणाऱ्या शबद किर्तनांचे पार्श्वसंगीत. या धवल चौकटीच्या बाहेरही काही जग आहे आणि तिथेही काही घडामोडी होतात, याचे विस्मरण ज्याला होत नाही त्याला जगातील सौंदर्य पाहण्याची दृष्टीच नाही, हे छातीठोकपणे सांगता येते.

भुजबळं बलिं दद्यात् सरकारो पवाररक्षक:

bhujbal

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि आधी भारतीय जनता पक्षाचे व नंतर भाजप-शिव सेना युतीचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी शरद ऋतू सुरू होता, ही नियतीचीच इच्छा होती. सत्तेवर आल्यानंतरही या सरकारवर शरदाच्या चांदण्याची छाया असल्याचे गावगन्ना मानले जात होते आणि त्याबद्दल सरकारबद्दल लोकांमध्ये चीडही होती.

ज्या सिंचन गैरव्यवहारावर भाजपने बहुमताचे पीक काढले, त्याची काही तरी तड लावणे त्या पक्षाला आवश्यक होते. पण शिवसेनेच्या संभाव्य दगाफटक्याची दहशत आणि मुळातच ‘राष्ट्रवादी’ला दुखावण्याची अनिच्छा, यामुळे कारवाईचा बांध काही फुटत नव्हता. एकीकडे ‘राष्ट्रवादी’वर कारवाई झाल्याशिवाय, किंवा झालेली दिसल्याशिवाय, लोकांचे समाधान नाही आणि कारवाई करण्याची तर इच्छा किंवा तयारी नाही, अशी जबरदस्त कात्री ‘छत्रपतींचा आशीर्वाद’ मिळविणाऱ्या पक्षाची झाली होती. इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणजे काय, याचा अनुभव भाजपच्या मंडळींना येत होता.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राष्ट्रवादीशी सोयरिक करायची, निरनिराळ्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांत त्यांच्या गळ्यात गळे घालायचे आणि मुंबईत त्यांच्यात म्होरक्यांना जेरबंद करायचे, ही कसरत जमणार तरी कशी?

याच्यावरचा एक जबरदस्त उतारा म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांच्या प्रभावळीतील अधिकाऱ्यांवर या आठवड्यात फिरलेला रोडरोलर. ‘राष्ट्रवादी’चे ‘दादा’ अजित पवार यांना एसीबीच्या चौकशीसाठी प्रत्यक्ष न येण्याची सूट मिळते आणि एका आठवड्याच्या आत भुजबळांच्या भ्रष्ट कारभाराचा एक एक चिरा निरा निखळून काढण्यास सुरूवात केली जाते…सरकारी कामकाजात योगायोग या शब्दाला जागा नसते, हे ज्यांना माहीत असते त्यांना या दोन घटनांमधील संगतीही कळेल.

खुद्द भुजबळ यांना संपविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ची अनेक मंडळी एका पायावर तयार होती. ‘मराठ्यां’च्या मळ्यात हा ‘ओबीसी माळी’ तसा उपराच होता. सुंठीवाचून हा खोकला जाणार असेल तर कोणाला नको होते? त्यामुळे त्यांना निशाण्यावर घेऊन ‘पहिलटकर’ सरकार शिकार करू लागले, तर त्यांना वाचवायला कोण येणार होते?

याच कारणाने अजापुत्रं बलिं दद्यात या न्यायाने राष्ट्रवादीच्या खऱ्या सूत्रधारांना बाजूला ठेवून सरकारने छगन भुजबळाच्या संस्थानात आपले घोडे धाडले आहेत. त्यातून ‘राष्ट्रवादी’ची गचांडी धरल्याचे पुण्यही मिळणार आणि दोस्ताची मैत्रीही कायम राहणार, असा हा खेळ आहे. नाहीतर कुटुंबियांसकट आपल्याला संपविण्याचा हा कट आहे, असा टाहो भुजबळ यांनी फोडला नसता. ‘अश्वं नैव गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च अजापुत्रं बलिं दद्यात देवो दुर्बलघातकः’ हा केवळ श्लोक नाही, ते राजकारणाचे वास्तव आहे. सत्ताधारी कोण, हा प्रश्न गौण आहे.

एरवी भुजबळांच्या पंखांखाली इमले उभे करणारे दीपक देशपांडे सापडतात आणि पवार कुटुंबियांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अनिरुद्ध देशपांडेंच्या ‘अमनोरा’मध्ये मुख्यमंत्री गाणे म्हणतात, हे चित्र काय सांगते? सत्ता गेल्यानंतरही फक्त भुजबळांच्या शाही बंगल्याच्या सुरस कथा बाहेर येतात आणि राष्ट्रवादीच्या बाकी मंत्र्यांची आलिशान जीवनशैली मागील पानावरून पुढे चालू राहते, याचा तरी अर्थ काय?

भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, हे तर खरेच. पण हा डागाळलेला तांदूळ ज्या कुजकट डाळींसोबत आजपर्यंत खिचडी शिजवत होता, त्या दाळींना कोण हात घालणार?

तेव्हा फडणवीस सरकारला खरोखर भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या आवळायच्या असतील तर पवार कुटुंबियांसहित भुजबळांवर कारवाई करावी लागेल. अन्यथा शक्तिशाली महागुरुंना सोडायचे आणि त्यांच्या गणंगांना बळी द्यायची, हीच परंपरा हेही सरकार चालवत आहे, एवढेच म्हणावे लागेल.

घुमानच्या निमित्ताने-6 अमृतसरी कुलचा आणि लस्सी

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo5_500[1] नाही म्हणायला, अमृतसर शहरात आल्याची भरभक्कम जाणीव होते ती येथील हॉटेल आणि लस्सीचे दुकान पाहून. त्यातही हरमंदिर साहिबच्या परिसरातील जी हॉटेल आहेत ती खऱ्या अर्थाने आस्वाद घेतलाच पाहिजे या वर्गवारीत मोडणारी आहेत.

हरमंदिर साहिबच्या आधी जी पहिली गल्ली आहे तिथेच थोडे आत गेले, की शर्मा भोजन भांडार नावाचे हॉटेल आहे. घुमानहून परतल्यानंतर मी हरमंदिर साहिबची परत भेट घेतली तेव्हा सकाळी या हॉटेलमध्ये गेलो होतो. अमृतसरी कुलचा नावाचा पराठ्याचा एक लांबचा नातेवाईक लागेल असा पदार्थ येथे खूप प्रसिद्ध आहे. पराठ्याप्रमाणेच नाना पदार्थ आतमध्ये सारून हा पदार्थ तयार केला जातो. मी आधी गोबी-बटाटा मिक्स कुलचा मागविला. त्याच्यासोबत हरभऱ्याची (चना) भाजी आणि कांदा, मिरची व आणखी काही पदार्थ असा बेत दिसला. शिवाय कुलच्यासोबत चमचाभर लोण्याचा ‘चढावा’ होताच. सर्वात आधी कुलच्याचा तुकडा आणि हरभऱ्याच्या भाजीचा घास घेतला आणि मन तृप्त झाले. शंभर मटणाच्या तोंडात मारेल, असा विसविशीत शिजलेला चना आणि तो कुलचा यांची चव म्हणजे ज्याचे नाव ते. त्यानंतर वाघा सीमेवरून परतल्यानंतर मी परत त्याच ह़ॉटेलमध्ये गेलो आणि दोन कुलचे खाल्ले. एक पनीर कुलचा आणि दुसरा गोबी कुलचा. प्रत्येकासोबत भाजी आणि चटणी होतीच. ही चटणी काही वेगळाच पदार्थ असेल, म्हणून मी वेटरला विचारले, याला काय म्हणतात. तो म्हणाला, "इसे चटनी बोलते है”. मग मात्र मी मूग गिळून गप्प बसावे, त्याप्रमाणे चने आणि कुलचा गिळून गप्प बसलो. अमृतसरी कुलच्याचा हा आस्वाद घेतल्यामुळे नंतर पानीपतला गेल्यावर तिथे जे कुलचे मी पाहिले, ते काही माझ्या गळी उतरले नाहीत. वेगवेगळ्या गाड्यांवर अगदीच लुसलुशीत कुलचे विकायला काढले होते त्यावरून त्यांच्या तोंडी न लागण्यातच शहाणपणा आहे, हे मी ताडले. tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo6_400[1]

अमृतसरच्या आणखी दोन खासियत म्हणजे लस्सी आणि कुल्फी. महाराष्ट्रात मिळणारी लस्सी हे लस्सीच्या नावावर चालणारे थोतांड आहे, असे मी म्हणणार नाही. परंतु  असे म्हणता येईल, की पंजाबी लस्सी म्हणजे कुंभमेळा आहे आणि महाराष्ट्रातील लस्सी ही गावची जत्रा आहे. यहां की लस्सी जैसी कोई नहीं. इतक्या दूर पंजाबमध्ये आल्यानंतर एखादी व्यक्ती लस्सी न पिता परत जाणार असेल तर त्या व्यक्तीकडे रसिकता नावालाही नाही, असे बेलाशक म्हणता येईल. ‘हाय जालीम तूने पीही नहीं,’ असे शायर म्हणतो ते अशा लोकांसाठीच.

आपल्याकडे जे ग्लास असतात त्याच्या साधारण दीडपट उंच आणि गोल स्टीलच्या पेल्यांमध्ये पुढ्यात आलेली थंडगार लस्सी जेव्हा घशाखाली जाते तेव्हा जगात दुःख, दैन्य, उपद्रव, भांडणे वगैरे गोष्टी असल्याची सूतराम आठवणही राहत नाही. उमर खय्याम म्हणतो त्याप्रमाणे थंडगार लस्सीने भरलेली एक सुरई आणि एक कवितेची वही, एवढ्या भांडवलावर कोणा व्यक्तीचे आयुष्य सहजपणे व्यतीत होऊ शकते.

गंमत म्हणजे, कुलच्याबाबत जे झाले ते लस्सीबाबत झाले नाही. अमृतसरला जी लस्सी मिळाली, त्या चवीची नाही परंतु आकार आणि घट्टपणाच्या बाबतीत त्याच तोडीची लस्सी पानीपतलाही मिळाली. त्यामुळे तेथेही मी दोनदा लस्सीशी दोन हात केले. या दोन्ही शहरांमधील लस्सी पिण्याचा उल्लेख केवळ भाषेची सवय म्हणूनच करायला पाहिजे. वास्तविक त्यांच्याबाबत लस्सी खाल्ली असे म्हणायला पाहिजे. तेवढी त्यांची घनता आणि घट्टता होतीच होती. तमिळमध्ये कॉफी पिली असे न म्हणता कॉफी खाल्ली असेच म्हणतात. (कॉफी साप्पिटेन). त्याच प्रमाणे पंजाबमध्ये लस्सी प्यायची बाब नसून खायची बाब आहे आणि कामचलाऊ पोट भरायचे असेल तर तीस रुपयांत पोटभर लस्सी हा उत्तम पर्याय आहे, एवढे ध्यानात घ्यावे. तसेही केवळ जेवायचे म्हटले तरी खुशाल एखाद्या हॉटेलात जावे आणि ३० ते ५० रुपयांत पोटोबाची सोय करून यावी, हे येथे अशक्य नाही.

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo10_500[1] संस्कृतमध्ये लास या शब्दाचा अर्थ उत्सव करणे, नाचणे, मौजमजा करणे असा आहे. उल्लास, विलास वगैरे शब्द त्यांतूनच आलेले आहेत. पंजाबमधील लस्सीचे प्याले पाहिल्यानंतर या लस्सीचे कुळ लासमध्येच असावे, अशी खात्री पटते. एखाद्या मटक्यात ‘लावायला’ ठेवलेली लस्सी मस्त थंडगार झाली आणि ऐन तळपत्या उन्हात ती घशाखाली ओतली, तर मेजवानी, सेलिब्रेशन, स्वर्गसुख अशा सगळ्या कल्पना हात जोडून समोर उभ्या राहतात. अन् अशी मनसोक्त लस्सी पिल्यानंतर पेट भर गया लेकिन दिल नहीं भरा, अशी अवस्था होते. खल्लास!

पीत पुरोगाम्यांनी जात दाखवली!

महाराष्ट्रातील (कु)प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी नामक कोणा व्यक्तीमधील संभाषण सध्या व्हाटस अॅप, फेसबुक आणि ट्विटरवरून गाजत आहे. वागळेंनी ब्राह्मण जातीतील लोकांना ‘ठोक के भाव’ में खूनी आणि दंगेखोर ठरवून टाकल्याचे या संभाषणातून दिसत आहे. फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आधार घेत वागळेंनी मनातील (बहुतांश) सगळी गरळ ओकली असल्याचे कोणालाही ही ध्वनिफीत ऐकल्यावर वाटेल. मोदी सरकार आल्यापासून समस्त पीत पुरोगाम्यांचा झालेला कोंडमारा आणि या सरकारमुळे (किंवा हिंदुत्ववाद्यांमुळे) आपल्याला बेकार व्हावे लागले, या वैफल्यातून कदाचित वागळेंनी ‘पॉईंट ब्लँक’वरून शूट केला असावा. यातील वागळेंची ख्याती अलम जगाला माहीती आहे तर हे अनिरुद्ध जोशी कोण, काळे की गोरे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वागळेंच्या या समाजवादी बहादुरीची ‘मी मराठी’ नावाच्या वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रविंद्र आंबेकर यांनी पाठराखण केली आहे. याच वाहिनीवरून वागळेंचा कार्यक्रम प्रसारित होत असल्यामुळे दोघांनी एकमेकांचे जीवन समृद्ध केलं, तर त्यात कोणाला काही वावगे वाटायचे नाही. प्रामाणिकपणाची कमाई आणि पाठराखण ही नेहमीच कौतुकास्पद असते. ब्राहण जात आणि ब्राह्मणी मनोवृत्ती या वेगळ्या आहेत, अशी मखलाशी आंबेकरांनी केली आहे. अरे बाबा, पण वागळे त्यात चक्क ‘तुम्ही भटांनी, तुम्ही ब्राह्मणांनी’ असे शब्द पेरतो, त्याचे काय?

वागळेंच्या प्रामाणिकपणाबद्दल भाऊ तोरसेकरांसारख्या ज्येष्ठ आणि वागळेंच्या समकालीन पत्रकाराने पुरेसे पुरावे दिलेच आहेत. त्यातून त्यांच्या चारित्र्यावर झक्क उजेड पडतो. चार वर्षे ज्या दर्डा शेठचा पगार खाल्ला, त्यांनीच कामावरून कमी केल्यानंतर ट्वीटरवरून शिव्या घालताना वागळ्यांची जीभ सैलावते. दर्डा हे कोळसा गैरव्यवहारातील आरोपी आहेत, हे यांना आधी माहीत नव्हते का? की केवळ 2014 च्या जून महिन्यांनंतरच हा साक्षात्कार झाला. गुटख्याच्या निर्मात्यांकडून स्वतःच्या पुस्तकाला प्रायोजकत्व मिळवून आपण समाजासाठी काहीतरी भव्यदिव्य केले आहे, अशी फुशारकी मिरविणारे हे पत्रकार.

 

A Police Complaint has been Lodged against Nikhil Wagle for inciting communal hatred @Dev_Fadnavis Plz take Action? pic.twitter.com/ZdwaPkWtT4

— Chandrabhushan Joshi (@MatruBhakt) June 7, 2015

अनिरुद्ध जोशींच्या संभाषणातून वागळेंनी ब्राह्मण जातीवर ज्या दुगाण्या झाडल्या आहेत, त्या त्यांनाच लखलाभ. पण त्यांनी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहू (आणि नव्याने कळलेले पेरियार! तेच ते, "तमिळनाडू हा स्वतंत्र देश आहे, सगळे हिंदी भाषक आणि तमिळ भाषक ब्राह्मण हे सैतानाचा अवतार असून त्यांचे शिरकाण करावे,” असे विचार मांडणारे पेरियार!) यांचे नाव घेऊन हे कृत्य केले आहे, ते जास्त धोकादायक आहे. आंबेडकरवादी, दलित संघटना आणि कोणत्याही प्रागतिक विचाराच्या व्यक्तीने याचा निषेध करायलाच पाहिजे. कारण बाबासाहेब आम्हीही वाचले आहेत आणि त्यांच्या विचारावर आमची श्रद्धाही आहे.

‘कुठल्याही व्यक्तीचे चारित्र्य किंवा गुण हे तो कोणत्या जातीत किंवा धर्मात जन्मला यांवर आधारित नसून तो काय करतो, त्याचे विचार काय आहेत, यावर ठरतात,’ ही बाबासाहेबांची विचारसरणी आहे, असे वाटते. याच्या उलट व्यक्तीला जन्मजात गुण, दोष किंवा योग्यता चिकटविणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एखाद्या वंचित गटातील व्यक्तीचे आई-वडिल निरक्षर आहेत म्हणून ती व्यक्तीही शिकण्यास किंवा इतरांच्या बरोबरीने समाजात भाग घेण्यास नालायक आहे, हे मानणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका ब्राह्मण व्यक्तीने म. गांधींना मारले म्हणून सगळ्या ब्राह्मणांच्या संपत्तीला आगी लावणे, त्यांना जीवे मारणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका शीखाने इंदिरा गांधींना मारले म्हणून सगळ्या शिखांचे शिरकाण करायला निघणे, ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. या उलट प्रत्येक व्यक्तीशी व्यक्ती म्हणून वागणे, हा आंबेडकरवादी विचार आहे.

कुठल्या तरी प्रसंगात ब्राह्मण दोषी आढळला, म्हणून जोशी यांना गृहित धरून वागळे जेव्हा सगळ्या ब्राह्मण जातीला आरोपी बनवितात (पिंजऱ्यात उभे करतात नव्हे!) तेव्हा निखिल वागळे नावाचा एक महाभंपक इसम बाबासाहेबांच्या नव्हे तर ब्राह्मणी विचारांच्या मार्गाने जातो. म्हणून दलित संघटनांनी ताबडतोब त्यांच्यापासून दूर व्हावे. जोशी हे नाव गैर-ब्राह्मणांमध्येही असते हे वागळ्यांना माहीत असायला पाहिजे. आणि तेवढेच असेल तर गेल्या पाच वर्षांतील अॅट्रोसिटी कायद्याखाली नोंद झालेल्या किती प्रकरणांचे आरोपी ब्राह्मण जातीतील आहेत, हे ‘आमच्यामुळे झाला, आमचा इम्पॅक्ट’ असं जेव्हा तेव्हा छाती पिटून सांगणाऱ्या ‘मी मराठी’ वाहिनीने शोध करून सांगावे.

खरं पाहिलं तर निखिल वागळे आणि अरविंद केजरीवाल या दोन इसमांची कारकीर्द एकाच गोष्टीवर उभी आहे – लोकांना चिथावून मारहाण करायला लावायची आणि बघा, मी कसा अत्याचाराला बळी पडलोय याची जाहिरातबाजी करायची. (समानशीलेषु सख्यम). जेव्हा जेव्हा वृत्तपत्र चालत नाही, नोकरी सुटलेली असते किंवा आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, असे दिसते तेव्हा वागळेंना कोणाची तरी छेड काढून मोठे व्हायची तल्लफ येते. बरे, जेव्हा शिवसैनिक मारायला येतात तेव्हा ‘मला मारू नका, मी हर्ट पेशंट आहे’ असा कांगावाही करता येतो.

जोशींशी बोलताना मी धर्मांतर करीन, अशी धमकी वागळे देताना ऐकू येते. असल्या दांभिकांच्या धर्मांतराची काय पर्वा बाळगायची? बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्याला नैतिक अधिष्ठान होते, एक तपश्चर्या होती. त्यांच्याकडे बोट दाखवून कोणीही दुकानदार करू पाहत असेल तर त्याला खुशाल जाऊ द्यावे. प्रासादशिखरस्थो ऽपि काको न गरुडायते (राजमहालावर बसल्याने कावळ्याचा गरूड होत नाही).

वारुणी आणि तरुणी यांचा आस्वाद घेत दलित, शोषितांच्या नावाने बाळंतकळा दाखविणाऱ्या झोळीवाल्यांचे एक पीक गेल्या पन्नासेक वर्षांत फोफावले आहे. याचे उदाहरण म्हणजे सध्या गजाआड असलेला तरुण तेजपाल. हाही असाच समाजाचा सगळा व्यभिचार मीच झाडून काढणार, अशा तोऱ्यात सफाई अभियान करायचा. (याच तहलका आणि तेजपालाच्या प्रत्येक ट्वीटला रिट्वीव करण्याचा पूर्णवेळ उद्योग वागळे करायचे, हे येथे नोंदण्याजोगे). यथावकाश त्याच्या लीला उजेडात आल्या, अन् तेही धर्मांध, प्रतिगामी व फॅसिस्ट सरकार सत्तेत नसताना, आणि तहलका काहीसा हलका झाला. परंतु याच पंथातील आणखी काही मंडळी आपल्या मार्गावरून ढळली नव्हती. माकडांनी एकमेकांनी पाठ खाजवावी, तसे एकमेकांची स्तुती करून मोठे करायचे आणि गरिबांच्या दुखण्यावर आपल्या पोतड्या भरायचा, हा यांचा उद्योग. विशेष म्हणजे या पंथातही ब्राह्मण जातीतील लोकांचीच संख्या जास्त असते.

दारु पिताना तोंडी लावायला खारे शेंगदाणे तोंडात टाकावेत तशी ही मंडळी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहूंची नावे घेणार आणि आपली समाजवादी दुकाने चालविणार, असा हा प्रकार होता.

गेल्या पन्नासेक वर्षांत म्हणायचे कारण म्हणजे त्यापूर्वी जी मंडळी होती ती अस्सल समाजवादी होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सचोटी होती. साने गुरूजी आणि ग. प्र. प्रधान यांच्यासारख्या समाजवाद्यांकडे त्याग होता, प्रामाणिकपणा होता. समाजवादाच्या नावाखाली दाढी वाढवून आपली दुकाने मांडणारी वागळेंसारखी पिढी तेव्हा नव्हती किंवा असली तरी कमी प्रमाणात होती. वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांना मान मिळतो हे पाहिल्यानंतर केवळ संस्कृत पोपटपंची करून पोटार्थी भटांची जशी पूर्वी पैदास झाली तशी अलीकडे समता, बंधुता वगैरे बडबड करून तुंबड्या भरणारी एक जमात उगवली आहे. तीच पीत पुरोगाम्यांची जमात. सवंग, नाटक्या आणि पोकळ पुरोगाम्यांची जमात.

जोपर्यंत वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी ही माध्यमे मूठभर कम्युनिष्ट आणि पीत पुरोगाम्यांच्या ताब्यात होती, तेव्हा यांचे चांगले चालले होते. वाचक-प्रेक्षकांकडे त्यांना आव्हान देण्यासाठी काही साधनेच नव्हती. मात्र आंतरजालाच्या प्रसारामुळे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याची सोय झाली आणि यांच्या पोटात मुरडा आला. तुम्ही जे बोलताय, त्यामागे तर्क काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली तेव्हा यांच्या नाकाला मिरच्या झोंबू लागल्या. त्यात यांच्या आक्रस्ताळी, एकांगी आणि अतार्किक वागण्यामुळे आपल्या ब्रँडला धोका पोचतो, हे कळाल्यावर वागळे-केतकर-राजदीप संप्रदायाला त्यांच्या त्यांच्या मालकांकडून नारळ मिळाले. (अंबानींनी काढल्यानंतर वागळेंना कोणीही घेतले नाही, हे सूचक होते.) पण हे सर्व नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षामुळेच घडल्याचा समज वागळेंचा झाला. आताच दर्डा शेठच्या मदतीने नवीन चॅनल काढून परत हातवारे करायला मिळणार, असा मनसुबा चालला होता. पण तोही फिसकटला आणि प्रसिद्धीला चटावलेल्या या पीत पुरोगाम्याने जोशीच्या निमित्ताने आपली ‘जात’ दाखवली.

(निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी यांच्या संभाषणाची हीच ती ध्वनिफीत – https://t.co/Mx7BOxklCi)

घुमानच्या निमित्ताने-5 भिंडराँवालाचा गुरुद्वारा!

Gurudwara यातीलच एक गुरुद्वारा जर्नैलिसिंग भिंडराँवाला (भिंद्रनवाले) याचाही आहे. पंजाबमध्ये खालसा चळवळ जोरात होती, त्यावेळी या भिंडराँवाला आणि त्याच्या हस्तकांच्या कारवायांमुळे सुवर्णंमंदिर बदनाम झाले होते. ६ जून १९८४ रोजी भिंडराँवालाचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार लष्कराने‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ राबविले. त्यावेळी मंदिराचे बरेच नुकसान झाले. यात भिंडराँवाला मारला गेला. परंतु त्याच्या अनुयायांनी त्याच्या स्मृत्यर्थ एक गुरुद्वारा बनविला आहे.

हा गुरुद्वारा केवळ तीन वर्षांपूर्वी (2012) बांधला आहे. आधी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्थळ बनविण्याची योजना होती. पण केंद्र सरकारने घेतलेला आक्षेप,काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेली टीका आणि लेफ्ट. जन. (निवृत्त) कुलदीपसिंग ब्रार व केपीएस सिंग गिल यांच्यासारख्यांनी केलेला विरोध, यामुळे स्मृतिस्थळाऐवजी गुरुद्वाऱ्यावरच काम भागले.

हरमंदिर साहिबला जाण्यासाठी जी रांग लागते त्या रांगेच्या बाजूलाच हा गुरुद्वारा आहे. भिंडराँवालाला येथेच गोळ्या घालून मारण्यात आले, असे म्हणतात. ‘काँग्रेस सरकारने राबविलेल्या मोहिमेत शहीद झालेले जर्नैलिसिंग भिंडराँवाला’ असा या गुरुद्वाऱ्याच्या पायथ्याशी शिलालेख आहे.

इतकेच कशाला, सुवर्णंमंदिराच्या प्रवेशद्वाराशी शिखांचे संग्रहालय असून त्यात शीख हुतात्मे, लढाया आणि इतिहास यांची माहिती आहे. त्यातही भिंडराँवालाचे गुणगान गायले आहे. मात्र त्याची फिकीर करण्याची गरज वाटली नाही. कारण मी पाहिले, की गुरुद्वाऱ्यात जाणारे भाविक भिंडराँवाला किंवा खलिस्तानबाबत फारशी आस्था बाळगून जात नाहीत. हरमंदिर साहिबच्या प्राकारातील सर्व उपासना स्थळ त्यांना पवित्र वाटतात. त्यामुळे तिथे डोके टेकवून ते जातात. याच प्रांगणात एक बोराचे झाड असून त्यात दैवी शक्ती आहे, असे मानतात. त्या झाडाची लोक जशी पूजा करतात तशीच या गुरुद्वाऱ्यात माथा टेकतात.

दमदमी टाकसाळ किंवा भिंडराँवाला किंवा खलिस्तान अशा बाबींशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. एकीकडे भिंडराँवालाला हुतात्मा बनवून हळूच त्याच्या आंदोलनाची हवा काढण्याची उत्तम राजकीय चाल भारतीय सरकारने खेळली आहे. कारण या गोष्टी उभारण्याची परवानगी दिली नसती, तर विनाकारण खलिस्तान्यांच्या हाती कोलीत मिळाले असते आणि ती नसती डोकेदुखी ठरली असती. तीन वर्षांपूर्वी सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या दिवशी झालेली तलवारबाजी डोळ्यांपुढे आणली, तर कल्पना येईल की काय गहजब झाला असता.

ते असो. पण हरमंदिर साहिबमध्ये फिरताना दोनदा शिरा खाल्ला. गुरुद्वाऱ्याचा प्रसाद म्हणून नांदेडला असताना हा शिरा कितीदा तरी खाल्लेला. आता येथे परत तीच चव, तोच तुपकट ओशटपणा आणि तोच सुगंध. शुद्ध आटीव तुपाचा घमघमाट ल्यालेला हा शिरा हातातून तोंडात टाकण्याची इच्छाच होत नाही. या शिऱ्याच्या बदल्यात शीख धर्म स्वीकारण्याची अट असती तर तीही मान्य केली असती, इतकी त्याची लज्जत भारी. घास न घेता या शिऱ्याचा मुटका ओंजळीत घेऊन त्याचा सुवासच घेत राहावा, अशी इच्छा होत राहते. मात्र त्याही मोहावर विजय मिळवून त्याला गिळंकृत केले.

याच्या जोडीला नांदेडहून आलेली एक यात्रा आणि घुमानला जाण्यापूर्वी आलेले अनेक लोक, असे बहुतांश मराठी लोक त्याचवेळेस हरमंदिर साहिबमध्ये आलेले असल्याने अवतीभवती मराठी स्वर कानावर पडत होते. येथे परत काळ आणि वेळेची गल्लत होऊ लागली. मी कुठे आहे? अमृतसर का नांदेड? आणि पुण्याचे काय झाले? या मधल्या १८ वर्षांचे काय झाले? असे प्रश्न पडू लागले.