घुमानच्या निमित्ताने– 4 हरमंदिर साहिबच्या पवित्र प्रांगणात

Golden Temple Amritsar
अमृतसरला पोचल्यानंतर पहिल्यांदा बसस्थानकावरच राहण्याची खोली घेतली. येथील बस स्थानकावर सामान ठेवण्याची आणि खोलीची चांगली सोय आहे. भाड्यानुसार खोलीचा दर्जा बदलतो. नाही म्हणायला हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) आणि अन्य गुरुद्वाऱ्यांच्या यात्री निवासांमध्ये राहण्याची सोय होते, परंतु मी ऐकले, की एकट्या व्यक्तीला सहसा तिथे जागा मिळत नाही. म्हणून असा खासगी निवासाचा मार्ग पत्करावा लागला. चेन्नई, म्हैसूर अशा ठिकाणी मी ही सोय पाहिली आहे. बस स्थानकावरच राहण्याची सोय उपलब्ध असते. आपल्याकडे मला मुंबईचे माहीत नाही परंतु अन्य शहरात तरी अशी सोय मला दिसली नाही. पुण्यात तर बस स्थानकांचाच पत्ता नाही तिथे राहण्याचा काय ठावठिकाणा?
अमृतसरला आल्यानंतर पाहण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे हरमंदिर साहिब. सुवर्ण मंदिर या नावाने ते अधिक प्रसिद्ध आहे. ते शिखांचे उपासनामंदिर आहे, प्रसिद्घ पर्यटनस्थळ आहे आणि सांस्कृतिक केंद्रही आहे. शहरातील एका भव्य तलावाच्या मध्यभागी वसले आहे. वास्तविक या तलावामुळेच या शहराला अमृतसर हे नाव मिळाले आहे. ज्या तलावातील पाणी अमृत आहे तो अमृतसर. शिखांचे चवथे गुरु रामदास यांनी या शहराची स्थापना केली. तेव्हा या शहराला रामदासपूर असे नाव होते. या गुरुद्वाऱ्याचा उल्लेख स्थानिक लोक हरमंदिर साहेब, दरबार साहेब, हरिमंदिर अशा नावांनीही करतात. 
शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिब पहिल्यांदा या मंदिरात ठेवला गेला. एखाद्या गुरुद्वाऱ्यात गुरु ग्रंथसाहिब ठेवणे याला प्रकाश होना असे म्हणतात. तर गुरु ग्रंथसाहिबचा पहिला प्रकाश पहिल्यांदा येथे प्रकट झाला. त्यामुळे या मंदिराला शीख संप्रदायात सर्वोच्च स्थान आहे. गुरु रामदास यांनी त्याचा पाया घातला. विशेष म्हणजे गुरु रामदास यांनी एका मुस्लिमाच्या हातून पायाचा पहिला दगड रचला. पुढे पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी १५८८–१६०७ दरम्यान त्याचे बांधकाम पूर्ण केले. नंतर वेळोवेळी सभोवतीच्या प्राकारातील वास्तूत बदल होत गेला. मात्र मूळ मंदिराची रचना होती तशीच आहे. 
Golden Temple Amritsar
हरमंदिर साहिबची वास्तू चौरस असून सांडवा किंवा साकवावरुन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मुंबईच्या हाजी अलीची आठवण यावेळी येते. सध्या तेथे भलीमोठी रांग लागते आणि भक्तांना किमान दोन तास वाट पाहावी लागते. मला स्वतःला दोन तास लागले आणि घुमान येथे भेटलेल्या काही जणांनी अडीच-तीन तास लागल्याचेही सांगितले. नुसता वेळच लागत नाही तर या रांगेमध्ये चांगलीच रेटारेटी आणि ढकलाढकली चालू असते. एखाद्या हिंदू मंदिरातील स्थितीची आठवण करून देणारा हा गोंधळ असतो. त्यामुळे हरमंदिर साहिबपर्यंत पोचणे हा मोठाच अवघड प्रसंग ठरतो.
मंदिराची मूळ वास्तू दुमजली आणि त्यावर घुमट अशी आहे. येथे भव्यता कमी आणि पवित्रता जास्त आहे. मुख्य म्हणजे एवढी मोठी वास्तू सोन्याची असल्यामुळे ती झळाळीच डोळ्यांने पारणे फेडते. त्यामुळे भव्यता कमी असली तरी चालून जाते. मंदिराला चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. 
अहमदशहा अब्दाली याने या मंदिरावर विध्वंसक हल्ला केला होता. पुढे शिखांच्या बाराव्या मिस्लने मंदिराची झालेली पडझड दूर करुन पुनर्बांधणी केली. महाराजा रणजितसिंग यांनी मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता त्याची पुनर्बांधणी संगमरवरी दगडात केली व कळस तांब्याच्या पत्र्याने मढवून त्याला सोन्याचा मुलामा चढविला. (नांदेड येथील गुरुद्वाराही महाराजा रणजितसिंह यांनीच बांधून घेतला आहे.) तेव्हापासून ते सुवर्णंमंदिर म्हणून ख्यातनाम आहे.  शिखांच्या संदर्भातील सर्व निर्णय घेणारे ‘अकाल तख्त’ हरिगोविंद यांनी मंदिरासमोर बांधले आहे. मंदिराच्या परिसरात अनेक लहान गुरुद्वारे आहेत. त्यांत शिखांच्या ऐतिहासिक शौर्यगाथा दर्शविणाऱ्या धातूंच्या तबकड्या लावल्या आहेत. त्यावर वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत.

घुमानच्या निमित्ताने– 3 सुवर्ण मंदिराच्या शहरात

tumblr_nm9zlj5iky1u5hwlmo1_1280[2] नवी दिल्लीहून आधी अमृतसर येणे. त्यासाठी दिल्लीच्या महाराणा प्रताप आंतरराज्य बस स्थानकावर यायचे. तिथे गाडी पकडायची, असे सगळे सोपस्कार पार पाडले. परंतु तिथे गेल्यावर लक्षात आले, की दिल्लीहून थेट अमृतसरला बस नाही. म्हणजे गाड्यांवर पाट्या अमृतसरच्याच लागतात परंतु त्या तिथपर्यंत जात नाहीत. मार्गात जालंधर (पंजाबीत जलंधर) येथे थांबतात. त्यातही काही गाड्यांसाठी आधी तिकिट घ्यावे लागते आणि त्यांचे आसन क्रमांक ठरलेले असतात. त्यामुळे जालंधरच्या एका गाडीत चांगला बसलेलो असताना उतरावे लागले.

अशा दोन तीन गाड्या सोडल्यानंतर रात्रीचे साडे दहा-अकरा वाजू लागतात आणि आपला धीर खचायला लागतो. अमृतसरला कधी पोचणार, तिथले सुवर्ण मंदिर कधी पाहणार, जालियांवाला बाग कधी पाहणार, अशा नाना प्रकारच्या चिंता मनात येऊ लागतात. तेवढ्यात देवाने धाडल्यासारखी दिल्ली-अमृतसर अशी पाटी लागलेली एक गाडी येते. हिय्या करून आपण त्याला विचारतो, "गाडी अमृतसर जाएगी ना?" त्यावर तद्दन बाऊन्सरसारखा दिसणारा मात्र कंडक्टरचे काम करणारा इसम आपल्याला सांगतो, की जाईल पण साडे अकराला निघेल. तिकिट मीच देणार आहे, असेही सांगतो. आपल्याला वाटते, झाले, अब अमृतसर दूर नहीं. परंतु तिकिट फाडून हातात देताना कंडक्टर आपल्याला सांगतो, की तिकिटांचे यंत्र जालंधरचे असल्यामुळे जालंधरपर्यंतचे तिकिट घ्या आणि पुढचे नंतर देतो. पाऊण प्रवास झाल्यानंतर तोच कंडक्टर आपल्याला सांगतो, की गाडी जालंधरपर्यंतच जाणार आहे, तिथे अर्धा तास थांबेल. तुम्हाला उशीर होईल म्हणून तुम्ही दुसऱ्या गाडीने जा. शेवटी अडला हरी…ही म्हण मनातल्या मनात घोळत जालंधरच्या अलीकडे चार-पाच किलोमीटरवर आपण दुसऱ्या गाडीत बसतो. दुःखात सुख एवढेच, की कंडक्टर आपल्याला त्या गाडीत लवकर जाऊन बसायला सांगतो आणि दुसऱ्या गाडीच्या चालक-वाहकांना आपल्यासारख्या प्रवाशांसाठी थांबण्यास सांगतो.

असा हा प्रवास करून एकदाचा अमृतसरच्या दिशेने गाडीत जाणाऱ्या गाडीत बसलो. पहाट सरून ऐन सकाळची वेळ. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा आणि संपूर्ण गाडीत आपल्या अवतीभवती पगडीधारी मंडळी. अशा स्थितीत रस्त्यातील पाट्या नि गुरुद्वारे न्याहाळत मी प्रवास चालू ठेवला. अमृतसर…नांदेडमध्ये पहिल्यांदा ब्रॉडगेज ही गाडी धावू लागली (आणि हा मोठा ऐतिहासिक क्षण होता बरं का) तेव्हापासून ज्या शहरास जाणारी वाट नित्य दिसायची तेच हे शहर. नांदेड स्थानकावरून मुंबई पाठोपाठ ज्या शहरासाठी लांब पल्ल्याची गाडी सुरू झाली ते हे शहर. सचखंड एक्स्प्रेसने येथे यायचे, हा मनसुबा ही गाडी सुरू होऊन वीस वर्षे होत आली तरी मनसुबाच राहिला होता. तो काही अंशी पूर्ण होण्याची वेळ आज आली होती.

अमृतसर येण्यापूर्वी एकामागोमाग शुभ्र झळाळत्या घुमटांचे गुरूद्वारे मागे क्षितीजावर दिसू लागले. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे हवते गारवा होता आणि ओलाव्यामुळे या गुरुद्वाऱ्यांचे संगमरवरी पृष्ठभाग आणखीच उजळून निघत होते. अन् येथे काळ व वेळेचा गुंता निर्माण होऊ लागला. ‘अॅन एरिया ऑफ डार्कनेस’ या पुस्तकात सर व्हिवियन नायपॉल यांनी आपल्या जन्मगावाला भेट दिल्यानंतर अनेकदा काळ व वेळेची सरमिसळ झाल्याचा उल्लेख केला आहे. भारतीय खेड्यांमध्ये आपल्या पूर्वजांच्या गावांमध्ये नायपॉल यांना जन्मभूमीच्या, बालपणीच्या खाणाखुणा दिसत जातात आणि आपण कुठे आहोत, नक्की काळ कोणता आहे, असे प्रश्न त्यांच्या मनात उमटत जातात.

इथे उलट घडत होते. जन्मगाव सुटल्यानंतर १९ वर्षांनी एका परक्या प्रदेशात एका व्यक्तीला त्याच्या जन्मगावाशी साधर्म्य सांगणारी परिचित दृश्ये दिसत होती आणि आपण नक्की कुठे आलो आहे, काळ पुढे गेला आहे का मागे गेला आहे, असे विचार मनात गर्दी करू लागले. खुद्द अमृतसरला आल्यानंतर तर अशा ओळखचिन्हांची गिरवणी सुरू झाली. नांदेडची आठवण करून देणारे तेच अरूंद रस्ते, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर तयार होणारे तेच डबके, तशाच पायरिक्षा, तोच गर्दी-गोंधळ आणि रस्त्यांच्या कडेने उघड्या हॉटेलांमधून येणारा तोच पराठा, भाजी व तंदुरी चिकनचा वास! खिशातील तिकिटे आणि खर्च झालेला पैसा यांची जाणीव होती म्हणून, नाही तर आपण परक्या प्रदेशात आलो आहोत, हे कोणी सांगूनही मी मान्य केले नसते.

घुमानच्या निमित्ताने – 2 ‘झेलम’मधील चर्चासत्र

Devidas0633
झेलमचा प्रवास मात्र मस्तच झाला. भोपाळ, ग्वाल्हेर, झाशी अशा मोक्याच्या स्थानकांवर गाडी दिवसा पोचली. त्यामुळे अवतीभवतीचा प्रदेश तर चांगला न्याहाळता आलाच, परंतु दररोज ये-जा करणाऱ्या ‘जिव्हाळ्या’च्या प्रवाशांच्या अनौपचारिक गप्पांमुळे बरीच मनोरंजक माहितीही मिळाली. भारतीय रेल्वेमध्ये बसायची जागा मिळाली, तर त्यासारखे प्रबोधन आणि मनोरंजन करणारे दुसरे साधन नाही, याची प्रचिती परत एकदा आली. सतत येणाऱ्या कंत्राटी फेरीवाल्यांकडून मधूनच चहा घ्यायचा आणि मस्त गप्पा ऐकायच्या. ही ‘चाय पे चर्चा’ आपल्याला एकदम शहाणी करून सोडते.

दरम्यान मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मागे टाकून गाडी परत उत्तर प्रदेशात आली होती. मथुरा पार पडले, की दिल्लीच्या हवेच्या वास यायला लागतो. उत्तर प्रदेशापासूनच गिलावा न केलेल्या उघड्या बांधकामांचे घर दिसायला लागतात. एरवीही संपूर्ण प्रदेशावर गरिबीचीच सावली दिसत राहते. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले दिसत होते. शेतात पिके होती परंतु पिकात जान दिसत नव्हती.
मध्य प्रदेशातील दातिया येथून ग्वाल्हेरपर्यंत आमच्या डब्यात बसलेल्या अधिकाऱ्यांच्या एका गटाची चर्चा चांगलीच रंगली. राज्यातील भ्रष्टाचार, तरुणांमधील बेरोजगारी, ग्ग्रामीण भागातील लोकांचे स्थलांतर अशा अनेक विषयांवर ते बोलत होते. मी सकाळी एक वर्तमानपत्र घेतले होते. पण संपूर्ण वृत्तपत्र वाचून जेवढी माहिती मिळाली, त्याच्या कित्येकपट जास्त माहिती त्या दीड दोन तासांच्या चर्चासत्रात मिळत गेली. शिवराज चौहान यांच्या स्वच्छ कारभाराच्या चकचकीत प्रतिमेवर त्यातून ओरखडे तर पडत होतेच, नव्या पिढीच्या भविष्याची चिंताही सतावत होती.

बच्चों को यहां नौकरी ही नहीं है, साब. हमारे गांव से गुजरात के लिए एक बस हर दिन भरकर निकलती है. अहमादाबाद और राजकोट में सब हमारे लड़के काम कर रहै है,” “हमारे गांव का एक लड़का पूना में पानीपुरी बेचता था. मैंने उसको देखा तो पूछा, ये क्या कर रहे हो. उसने बताया, साब हमने एक फ्लैट ले लिया है. अभी सोचो साब पंदरह साल पहले की बात है, आज उसकी क्या कमाई होगी. मुंबई, पूना में काम है कमाई है, हमारे यहां क्या रखा है,” ही त्यातील काही लक्षात राहिलेली वाक्ये.
त्याच्या पुढची हद्द आणखी पुढे होती.

हमारे गांव के तो कितने लोग महाराष्ट्र-गुजरात में सिक्युरिटी गार्ड का काम करते है,” एकाने सांगितले.

त्यावर दुसऱ्याने विचारले, “हां, और एक दो काण्ड भी करके आए थे ना वो.”

पहिल्याने सांगितले, “हां, किए थे ना.”

आपल्या राज्यातील सर्व भल्या-बुऱ्या गोष्टींची धुणी रेल्वे कपार्टमेंटमधील दोन बाकांवर समोरासमोर बसून ही बाबू मंडळी धूत होती. अन् त्या चर्चेत मी तर पडलोच नव्हतो. शेवटपर्यंत. त्यांच्या आपसातील चर्चेतूनच ही मौलिक माहिती मिळत होती. मी ही चर्चा कान देऊन ऐकत आहे, याची जाणीव असूनही त्यांच्यापैकी कोणी ती थांबविण्याचा किंवा तिला वळण देण्याचा प्रयत्न करत नव्हते. ही बाब मला मोठी लक्षणीय वाटली.

गाडीत पी. जी. वुडहाऊसचे ‘स्मिथ दि जर्नलिस्ट’ हे पुस्तक वाचून पूर्ण केले. आधी हे पुस्तक काहीसे वाचून झाले होते परंतु ते संपविण्यात यश आले ते या प्रवासात. महत्त्वाचे म्हणजे ते वाचले माझ्या मोबाईलवर.

Devidas0628
एरवी १४ तास, १७ तास अशा विलंबाचे छाती द़डपून टाकणारे आकडे नोंदवून झेलम एक्स्प्रेसने सर्वार्थाने आसेतू हिमाचल आपली दहशत निर्माण केली आहे. या गाडीची ही ख्याती ऐकून असल्यामुळे असावे कदाचित, गाडीने केवळ ४५ मिनिटांच्या उशीराने नवी दिल्ली स्थानकावर सोडले, याचे मोठेच कौतुक वाटले.