अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच बसलेली ‘चपराक’!

(आधीचा भाग – दर साल दर शेकडा वादाचे संमेलन)

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर उभ्या केलेल्या शामियान्यात सुदैवाने यातील कुठल्याही घडामोडीचे प्रतिबिंब पडले नव्हते. नाना ठिकाणांहून आलेली मंडळी पुस्तके आणि खाद्य पदार्थांचा यथेच्छ समाचार घेत होती. खाद्य पदार्थांचा अंमळ जास्तच! एरवी या भव्य मंडपाच्या प्रवेशद्वारापासूनच त्याचा कर्ता करविता कोण याची सातत्याने आठवण करून देण्यात येत होती. चित्र आणि शब्दांच्या माध्यमातून डीपीयूहे नाव पाहुण्यांच्या मन:चक्षूंवर कोरण्याची एकही संधी सोडलेली दिसत नव्हती.
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेले ग्रंथदालन असो किंवा संत तुकाराम वा संत ज्ञानेश्वरांचे पुतळे असे, त्यांच्या मागे कोणाचे अधिष्ठान आहे, हे स्पष्ट करण्यात काहीही कसर सोडली नव्हती. 
विशेष म्हणजे संमेलनाच्या मुख्य मांडवात शुद्ध साहित्यिक कार्यक्रमांनाही चांगली उपस्थिती होती आणि त्यात तरुणांची संख्या नजरेत भरण्यासारखी होती. अगदी कोणाला माहीत नसलेल्या परभाषक ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांच्या मुलाखतींनाही रसिक खुर्च्यावर मांड ठोकून बसले होते. एरवी एकाच ठिकाणी जत्रेसारख्या मांडलेल्या दालनाऐवजी पुस्तकांची दोन दोन दालने होती आणि तिथेही बऱ्यापैकी गर्दी होती. (उगाच नाही कोट्यवधींच्या विक्रीचे आकडे साध्य होतात.)
याच दालनात एका ठिकाणी चपराकचाही स्टॉल होता आणि सबनीसांचे पितळ उघडे पाडणाऱ्या लेखांचे अंक तिथे विक्रीला ठेवले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा या स्टॉलवरून चपराकचे अंक उचलून नेण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रयोग झाला होता. त्यावेळी या स्टॉलवर एकच व्यक्ती होती आणि त्यालाही हे अंक का नेण्यात येत आहेत, याची माहिती देण्यात आली नाही.
सुदैवाने या घटनेची माहिती झी24तासने सर्वात आधी दिली. त्यानंतर या कृत्याचा बोभाटा झाला आणि ज्यांनी अंक उचलून नेले, त्यांनीच ते आणून ठेवले. मात्र या दरम्यान जायची ती अब्रू गेलीच होती. ‘बूंद से गई वह हौद से नहीं आती,’ हे कोट्यवधीचा खर्च केल्याने लक्षात येऊच शकत नाही. कारण सुसंस्कृतता आणि उदारमतवाद या काही विकत घेण्याच्या गोष्टी नाहीत. त्या मुळातच असाव्या लागतात.
एकूणच संमेलनाध्यक्षांनी संपूर्ण जत्रेत कॅमेरे आपल्यावर रोखलेले राहतील, याची तजवीज केली होती. त्यामुळे उद्घाटनाच्या सत्राकडे सर्वांचे लक्ष राहिले होते. परंतु या कार्यक्रमात काही होणारच नाही, हे ठरलेलेच होते. कारण सबनीसांनी माफी मागितली ती मुळात भाजपच्या विरोधाला घाबरून नक्कीच नव्हती मागितली. सबनीसांचे काहीही वाकडे करण्याच्या परिस्थितीत भाजप नव्हता. केंद्रात आणि  राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार. त्यात दोन्ही सरकारांनी देशातील सांस्कृतिक वातावरण गढूळ केल्याचे आरोप होतच आहेत. जरा कुठे त्यातून उसंत मिळाली, की हे नवे लचांड कोण मागे लावून घेणार? नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाजीराव मस्तानीच्या वेळेस हे दिसलेच होते. सरड्याची धाव कुंपणापर्यंत! शिवाय भाजप कार्यकर्त्यांनी कितीही जोर-बैठका काढल्या तरी ते शिवसेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पासंगालाही पुरणार नाहीत.  त्यामुळे त्या आघाडीवर भाजपचे भय बाळगण्याची काडीचीही गरज सबनीसांना किंवा ते एक वर्ष भर ज्यांचे मांडलिक असतील, त्या साहित्य महामंडळाला नाही.
हां, असे होऊ शकते, की भाजपची मंडळी नाराज झाली तर सरकार दरबारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपली कामे करून घेताना तोशीस पडेल. अन् हीच फार मोठी आपत्ती होती. कारण साहित्य परिषद काय किंवा साहित्य महामंडळ काय, त्यांची साहित्य सेवा चालणार सरकारी सहकार्याने. कोणीतरी हिकमती कार्यकर्ता, होतकरू राजमान्य राजश्रीपकडायचा, त्याच्या मार्फत दुबई, अंदमान, पंजाब अशा साहित्य सेवेच्या वाऱ्या काढायच्या, स्थानिक शासनाकडे संस्कृती संवर्धनाची गळ घालायची आणि चार दिवस मौजमजा करून मराठीचे भले करायचे…हे एवढे काम करायचे तर सत्तेतील सरकारशी वैर घेऊन चालत नाही.
अमेरिकेने इराकमधील युद्धाच्या वेळी एम्बेडेड जर्नलिझम (अंकित पत्रकारिता) ही संकल्पना आणली होती. मराठी साहित्य विश्वाने ही संकल्पना खूप आधी पचवली होती. म्हणूनच कृषिमंत्री असताना लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या मुकाट पाहणारा नेता यांना जाणता राजा वाटतो. दर वर्षाआड ज्याचे कार्यकर्ते किमान एका वृत्तपत्राचे कार्यालय फोडतात तो नेता यांना रसिक वाटतो. तुकड्यांवर पोसलेल्यांना सत्ताधीशांची नाराजी पेलवत नाही. सरकारी जीआरनुसार लेखनाच्या रांगोळ्या घालून शारदेची सेवा करणाऱ्यांना म्हणूनच सत्ताधारी पक्षाशी पंगा घेता येत नाही. दुर्गा भागवत किंवा पु. ल. देशपांडे अशी नावे एक आपद्धर्म म्हणून घ्यायची. एरवी परस्परं प्रशंसन्ति अहो रुपं अहो ध्वनि:च्या सोहळ्यांचीच संख्या जास्त. 

अन् आतापर्यंत मराठी शारदेच्या प्रांगणात जो जल्लोष सरकारी कृपेने चालला होता, तोच जल्लोष पुढे चालू ठेवण्यासाठी, त्यात आणखी रंगढंग उधळण्यासाठी नवसंस्थानिकांची मदत घेणे आवश्यक बनले आहे. आता तुमच्या संस्कृतीचे चोचले पुरविण्यासाठी जे आपल्या पदराला खार लावणार आहेत, त्यांनी प्रत्येक दाम वाजवून न घेतला तरच नवल. शेवटी मराठी संस्कृतीची जपणूक करण्याच्या नावाखाली माजी  संमेलनाध्यक्षांना भिक्षावळ घालण्यासाठी कोणी शिक्षणसंस्था काढत नाही का मसाल्याचे कारखाने चालवत नाही. म्हणूनच मग संमेलनाच्या प्रांगणात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पुतळ्यांच्या बरोबरीने डीपीयूचे फलक लागले तरी ते कानाडोळा करण्याशिवाय पर्याय नाही. 

दर साल दर शेकडा वादाचे संमेलन

नेमेचि येतो मग पावसाळाया उक्तीतील पावसाने आता आपला नेम सोडला आहे. उलट पावसाने अवकाळी कोसळण्यातच अलीकडे अधिक सातत्य दाखवले आहे. मात्र पावसाच्या बरोबरीने सातत्य राखणाऱ्या साहित्याच्या बरसातीने अद्याप तरी तेवढा दगा दिलेला नाही. त्यामुळे दर साल दर शेकडा या दराने साहित्यिक मंडळी एकत्र जमून वाद-वाद खेळतात. (श्लेष साधल्याचा आनंद काही वेगळाच असतो!) त्यालाच साहित्य संमेलन असे म्हणतात.
साहित्य व कलेच्या नावाने चालणारी ही रंगपंचमी यंदा जरा जास्तच रंगली. दरवर्षी संमेलनाचे ठिकाण किंवा त्याचे नेपथ्य अथवा विषयपत्रिकेवर असलेले नसलेले मुद्दे अशा विषयांवर शाब्दिक आहेर दिले घेतले जातात. यंदा मात्र खुद्द संमेलनाध्यक्षांनीच असा काही पवित्रा घेतला होता, की जणू बघतोच हे संमेलन कसे होते ते, असेच काही ते विचारत होते.
८९व्या साहित्य संमेलनाची चर्चा सुरू झाली ती श्रीपाल सबनीस यांची योग्यता, त्यांनी निवडून येण्यासाठी वापरलेले भले-बुरे मार्ग, साहित्यक्षेत्रातील स्थान इ. विषयांवरून. नंतर त्यांनीच ती वेगळ्या दिशेने वळवली. आधी नको ते बोलून आणि नंतर नको त्या प्रकाराने त्याचे समर्थन करून त्यांनी या वार्षिक मेळाव्याचा नूरच पालटून टाकला. आधी सबनीसांनी उत्तम वातावरण निर्मिती करून आता विचारस्वातंत्र्याच्या यज्ञात पुढची आहुती त्यांचीच पडणार आहे, असा रागरंग निर्माण केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोंदीवरच शरसंधान केल्याने – आणि तेही अध्यक्ष सोडा कुठल्याही साहित्यिक म्हणविणाऱ्या माणसाच्या दृष्टीने लज्जास्पद रीतीने – अचानक त्यांच्यावर पुरोगामीत्वाचा शेंदूर फासला गेला आणि बघता बघता एका दगडाचा शेंदूर झाला. त्यामुळे सगळी विवेकवादी टाळकरी मंडळी त्यांच्या अवतीभोवती जमली. कोणी पत्रके काढली तर कोणी प्रभात फेऱ्या. त्यातच सनातन संस्थेच्या वकीलांनीही पाहुण्याच्या काठीने साप मारावा म्हणून आपलीही दुकानदारी करून घेतली.
मात्र अवतीभोवती जमलेल्या समस्त समाजवाद्यांचा मुखभंग करून श्रीपाल सबनीस यांनी अचानक जाहीर दिलगिरी व्यक्त केली. आदल्याच दिवशी सर्व पुरोगाम्यांच्या साक्षीने आणि साथीने सबनीस सर पुणे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यापासून डॅा. आंबेडकर पुतळ्यापर्यंत चालत गेले होते. खुशाल मला गोळ्या डाला, पण सत्य सांगणे मी सोडणार नाही,’ म्हणत होते. अन् चोवीस तास उलटायच्या आत तेच सबनीस पंतप्रधानांना दिलगिरीचे पत्र लिहिले असल्याचे सांगत होते. तसे हे पत्र त्यांनी पाच जानेवारी रोजीच लिहिले होते. याचा अर्थ आपण आगळीक केली आहे, ती आपल्या अंगावर शेकणार आहे, याचा अंदाज त्यांना आला होता. तरीही गॅलिलिओच्या आवेशाने मी माझे सत्य सोडणार नाही, असे सांगत ते सुटले होते.
याचे कारण म्हणजे नरेंद्र मोदी, रा. स्व. संघ किंवा हिंदुत्ववाद असे विषय आले, की त्यांना विरोध करणे हेच आपले जीवितकार्य आहे, असे ज्यांना वाटते त्यांची फूस किंवा त्यांच्याबद्दलचा विश्वास. भाजपच्या नाठाळ कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शैलीत सबनीसांच्या विरोधात ठणाणा सुरू केला, तेव्हाच सुतकी चेहऱ्याने वावरणाऱ्या पुरोगामी वासरांच्या कानात वारे शिरणार हे नक्की झाले होते. तेव्हा उजव्याविचारसरणीच्या विरोधात तुम्ही तंबू ठोका, आम्ही शिबंदी घेऊन आलोच, असा कोणीतरी सर्वसमावेशक निरोप तरी दिला असावा. नाहीतर मी पुरोगामीत्वाची तलवार उपसल्यानंतर प्रगतीशील विचारांच्या झुंडी आपल्या मागे येणार म्हणजे येणार,’ हा पक्का आत्मविश्वास सबनीस सरांकडे असावा. ज्या अर्थी दिलगिरीचे पत्र खुशाल पाठवून आठ दिवस पुरोगाम्यांना फिरविण्याचावामाचार सबनीसांनी केला, त्याअर्थी दुसरी शक्यता अधिक सबळ वाटते.

ते काही असो. आपल्या तिसऱ्या भूमिकेची अनोखी अदा सबनीसांनी दाखविली आणि सबनीसांच्या नादाला लागून महाराष्ट्रात असहिष्णुता पार्ट २चे खेळ करण्याचे समाजवाद्यांनी केलेले मनसुबे पुरते उधळले गेले.
(क्रमशः)

सबनीसांनी केले सेक्युलरांचे पाखंड उघडे!

सहा महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात एक आगळेवेगळे वातावरण पाहायला मिळत होते. पुरोगामीत्व आणि विवेकवादाच्या टोप्या घातलेले साहित्यिक एकामागोमाग चवताळून उठत होते आणि आपापले ठेवणीतले पुरस्कार परत करत होते. सत्तेवर येऊन ज्या सरकारला जेमतेम एक वर्ष झाले होते, त्या सरकारच्या आश्रयाने देशात असहिष्णुता आणि अतिरेक वाढला असल्याचा शोध या लोकांना लागला होता. मागील सरकारच्या साहित्यिकपणाची प्राणप्रतिष्ठा झालेल्या आणि म्हणून सामान्य रसिकांपासून सहस्त्र योजने लांब असलेल्या व्यक्तींचाच त्यात बहुतांशी भरणा होता, हा आपण केवळ योगायोग मानायचा! आम्ही पुरोगामी म्हणजे किती सोज्वळ आणि राष्ट्रवादाची भाषा करणारे कित्ती कित्तीजहरी, असा आपल्याच विचारांचे सोवळे नेसलेल्या या नवब्राह्मणांचा आविर्भाव होता. सरकारी कृपा सुटलेल्या आणि सूर्यमुखी फुलासारखे इंग्लंड-अमेरिकेच्या दिशेनुसार आपली दिशा बदलणाऱ्या माध्यमांचीही त्यांना साथ लाभली होती. त्यामुळे पुरोगामीपणाला असा काही बहर आला होता आणि भारतातील फॅसिस्ट निर्मूलनाला असा काही ऊत आला होता, की खुद्द हिटलर, मुसोलिनी आणि स्टॅलिनच्या देशांनाही त्याचे अप्रूप वाटावे!
या सेक्युलर नाट्याचा प्रभाव असा काही जबरदस्त होता, की शेषराव मोरे यांच्यासारख्या विद्वानानेही पुरोगामी दहशतवाद संपविण्याचे आवाहन केले, तेव्हा ते हिंदुत्ववादाच्या वळचणीला लागल्याचे आणि हे हिंदुत्ववाद्यांचेच कारस्थान असल्याचे सिद्ध करण्याऱ्या युक्तिवादांनी विवेकवाद्यांच्या संगणकांचे पडदे भरून जाऊ लागले.
पण हाय रे दैवा, केवळ चार महिन्यांच्या आत सेक्युलरांच्या सोवळ्याचे वस्त्रहरण त्यांच्या पंथातील एकाने केले आणि सेक्युलरांची दातखिळी बसली. आणि आता जेव्हा अतिरेक, आक्रस्ताळेपणा आणि माथेफिरूपणा हा केवळ गैर-सेक्युलरांची मक्तेदारी नाही तर आपल्यातही अशी माणसे निपजतात, हे कळाल्यावर विश्वामित्री पवित्रा घेऊन ही मंडळी बसली आहेत.
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्रीपाल सबनीस यांची निवड झाली तेव्हा मराठी साहित्य जगताशी थोडाफार संबंध असलेल्यांच्या चेहऱ्यावर, ओठांवर आणि डोळ्यांमध्ये एकच प्रश्न तरळला – तो म्हणजे कोण हे श्रीपाल सबनीस? तेव्हा आपण दलित, साम्यवादी आणि पुरोगामी चळवळीतून आलेलो आहोत, हे खुद्द सबनीस यांनीच सांगून टाकले. त्यांच्या घरी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली कुळपरंपरा सॉक्रेटिसपासून कबीर, न्या. रानडे, महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सांगितली होती, तेव्हा सदर लेखक तिथे उपस्थित होता. नावांची ही माळ एवढी लांब होती, की त्या वेळेत एखाद्या निष्णात लेखकाने शंभर पानी एखादे पुस्तक लिहिले असते.
येथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे सबनीसांनी ही कुळपरंपरा कथन केली, तेव्हा पुरोगाम्यांच्या कुठल्याही पंथ-उपपंथातून त्याला विरोध किंवा आक्षेप झाला नाही.  याचा अर्थ त्यांनी या परंपरेवर केलेला दावा या लोकांना अमान्य नव्हता किंवा नाही. इतकेच नाही, तर त्यांच्याबद्दल उठलेल्या वादंगानंतर भाई वैद्य आणि विलास वाघ या धर्मनिरपेक्षतेच्या झेंडा हाती घेतलेल्या दोघांनीच आपली भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. आता या दोन्ही नावांचे समाजवादी-साम्यवादी गोटाला वावडे नाही. बाकी य. दि. फडके, ग. प्र. प्रधान ते गंगाधर पानतावणे यांच्यापर्यंत अनेक नावे सबनीस घेतात. याचाच अर्थ सबनीस हे महाराष्ट्रात स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या मंडळींमधीलच एक आहे, याबद्दल शंकेला जागा नाही. 
अन् मग सबनीसांनी आपली ओळख पटविण्यासाठी मुक्ताफळे उधळायला सुरूवात केली. त्यांना मुक्ताफळे म्हणण्याऐवजी बरळणे म्हटले तरी चालेल. सबनीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. “शांतता शांतता करत हा जगभर फिरतो. मोदी पाकिस्तानात गेला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असत्या तर पाडगावकरांच्या मोदींना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर आली असती,” हे सबनीसांचे शब्द आहेत. तसेच “गोध्रातील मोदी हे कलंकित असून असा पंतप्रधान मला चालणार नाही,” असेही म्हटले. त्यानंतर या वक्तव्यावर वादळ उठले तेव्हा माझे शब्द चुकले तरी मला पंतप्रधानांबद्दल आदरच आहे, मी त्यांच्याबद्दल काळजीमुळेच बोललो, अशी मखलाशी त्यांनी करून पाहिली. त्यानंतर मी मोदींना राष्ट्रभक्तच म्हटले, असेही म्हणून पाहिले.
परंतु सबनीसांनी केलेला एकेरी उल्लेख हा मूळ आक्षेप नसावा.  तसा तो आहेच मात्र त्यावर लक्ष केंद्रीत केले तर खऱ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. अशी भाषा पुरोगाम्यांना नवीन नाही. फक्त त्यांच्या गोटातून ती येते तेव्हा ते उद्वेगाचे लक्षण असते आणि हिंदुत्ववाद्याने कोणी वापरली, तर मात्र ती फॅसिस्ट विचारसरणीचा वसा असतो. “माझ्या हाती बंदूक असती तर नरेंद्र मोदींना मी गोळ्या घातल्या असत्या,” हे उद्गार विजय तेंडुलकरांनी काढले होते तेव्हा सेक्युलरांनी ते गोड मानून घेतलेच होते ना. सबनीसांच्या कथनातील आक्षेपाचा मूळ मुद्दा त्यातील खोटेपणा आणि त्यावरची सेक्युलरांची प्रतिक्रिया हा आहे. 
मोदी कलंकित आहेत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपले मत दिलेले आहे. विद्यार्थ्यांपुढे राजकीय भाषण करणाऱ्या प्राध्यापकाला अशा कायदेशीर बाबीकडे दुर्लक्ष करता येते का? का खोटे बोल पण रेटून बोल, या पुरोगामी काव्यानुसार चाललेला हा प्रकार आहे? मोदी यांनी पाकिस्तानात अचानक जावे का नाही, हा वादाचा विषय आहे. परंतु तो वाद करावा कोणी? काय गंमत आहे पाहा, संरक्षण शास्त्र आणि मुत्सद्देगिरीशी जिचा तिळमात्रही संबंध आलेला नाही, अशी व्यक्ती पंतप्रधानाला आंतरराष्ट्रीय राजकारण व युद्धशास्त्र शिकवते. आता याच व्यक्तीने तौलनिक भाषाशास्त्र या विषयाचे आयुष्यभर अध्ययन-अध्यापन केले आहे (असा त्या व्यक्तीचाच दावा आहे) आणि ही व्यक्ती ‘मी खेड्यातून आलो आहे, मला शब्दांची माहिती नाही,’ असे रडवेल्या चेहऱ्याने सांगत आहे. हा जर भंपकपणा आणि अगोचरपणा नसेल, तर आणखी काय असू शकते?
कॉ. पानसरे यांच्या खुनानंतर वाहिन्यांवर चर्चेची गळती सुरू होती, तेव्हा एका स्वयंघोषित पुरोगामी लेखकाने चर्चेत एक वाक्य म्हटले होते – “कोणताही पुरोगामी माणूस कोणाचा खून करू शकत नाही आणि जो खून करतो तो पुरोगामी असू शकत नाही.” थोडक्यात म्हणजे समस्त पुरोगामी आणि विवेकवादी शुचिर्भूतपणाची कवच-कुंडले घेऊनच आलेली असतात. म्हणूनच आता सबनीसांनी आपले रंग दाखवले तेव्हा त्यांनी आपल्या कोंडाळ्यातून दूर करायचे शिताफीचे प्रयत्न चालू आहेत. कानठळ्या बसविणारी शांतता (डीफनिंग सायलन्स) असा एक वाक्प्रयोग इंग्रजीत आहे. त्याची अशा वेळेस आठवण येते. एरवी हिंदुत्ववाद्यांची असहिष्णुता आणि आक्रमकता याबद्दल ज्यांची टकळी थांबता थांबत नाही, असे सगळे मुखंड कोठे नाहीसे झाले आहेत?  
काल एका वाहिनीवर भाई वैद्य येऊन म्हणाले, की झाले गेले ते विसरून हे संमेलन पार पडू द्यावे. याचा अर्थ असा, की पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या कोणाचीही कसलीही आगळीक सगळ्यांनी नजरेआड करावी आणि वैचारिकतेच्या प्रांगणात त्याने मोठे योगदान दिले, म्हणून त्याला मुकाट्याने कुर्निसात करावा. हिंदुत्ववाद्यांना, त्यातही ब्राह्मणांना, मनाला येतील त्या शिव्या घालायच्या आणि पुरोगामीत्वाचा, सेक्युरिझमचा किंवा विवेकवादाचा पासपोर्ट मिळवायचा आणि त्या पासपोर्टवर सांस्कृतिक विश्वाची सैर करायची, असा हा 60 वर्षांचा साचाच या निमित्ताने उघड झाला आहे. श्रीपाल सबनीसांचे साहित्यातील योगदान वाटेल ते असो, हे पाखंड उघडे करण्याचे तरी योगदान त्यांच्या नावावर नक्कीच जमा होईल.

हे आहे ‘विचारवंतां’चे दुःख!

मोठ्या धाडसाने रडणाऱ्यांचे पीक महाराष्ट्रात फोफावले आहे. बोलघेवडेपणाची परिसीमा गाठलेल्या या विचारवंतांचे दुःख कदाचित काहीसे असेच असावे.

एका ट्विटचा परिणाम!

संमेलनाध्यक्षांच्या संपूर्ण साहित्याने समाजाला जेवढे जागृत केले नाही, तेवढे एका ट्विटने सावध केले आहे. बाकी, एक कळाले नाही. ट्विटर या आधुनिक साधनाचा वापर करणे सनातन मूल्यांमध्ये बसते का नाही?

विचारवंतांचे कैसे बरळणे

मराठी साहित्य संमेलनाचा नियोजित अध्यक्ष हार-तुरेच घेत फिरत असतो आणि मी काय काय करणार आहे, हे सांगत फिरत असतो. त्याच्या आधीच्या संमेलनाध्यक्षांनी अशाच प्रकारे काही बाही सांगितलेले असते आणि त्यातील तसूभरही काही केलेले नसते, हे अशा नियोजित संमेलनाध्यक्षाने विसरायचे असते आणि लोकही ते विसरून चालले आहेत, असे मानून चालायचे असते. हारतुऱ्यांसह मिरविण्याची ही परंपरा एवढी जबरदस्त की खुद्द पु. ल. देशपांडे यांनाही त्याची बाधा झाली होती. संमेलनाध्यक्ष म्हणून पु. लं.चे सत्कार जेव्हा अंमळ जास्तच होऊ लागले, तेव्हा ज्ञानेश सोनार यांनी एक व्यंगचित्र काढले होते. त्यात पु. लं.ना दाखवून आता ‘उरलो हारतुऱ्यापुरता’ अशी मल्लीनाथी केली होती. त्याला दाद देताना पु. लं.नीही ‘सोनारांनी कान चांगलेच टोचले आहेत’, असे उद्गार काढले होते.
आता पु.लं.सारख्याचे हे हाल तर श्रीपालांची काय गत? एक तर विचारवंतांना, त्यातही स्वयंघोषित विचारवंताला, कोणी साहित्यिक मानत नाही आणि आलाच साहित्यिकांच्या पंक्तीत तर त्याला कोणी अध्यक्ष करत नाही. तो मणीकांचन योग सबनीस यांच्या नशीबात आला आणि त्या सरशी त्यांची सभा-समारंभात मुशाफिरी सुरू झाली. आता या मुशाफिरीत वेगवेगळे अनुभव तर येणारच. काही लोकांचे, काही पदरचे असे शब्द तर निघणारच. पवनचक्क्यांमध्ये शत्रूचे सरदार पाहणाऱ्या आणि … पाहणाऱ्या डॉन क्विक्झोटप्रमाणे काही नसलेली वीरश्री दाखविण्याचे प्रसंग तर येणारच. 
फक्त एकच झाले. निळा रंग ल्यालेल्या कोल्ह्याने जसे कोल्हेकुई करताच त्याचे अंतरंग प्रकट झाले, तसे विचारवंतांचे बरळणे सुरू झाले तसे त्यांच्या वैचारिकतेची शालही सरकू लागली. विशेषता सर्वविदां समाजे विभूषणं मौनपण्डितानाम् असे म्हणून पूर्वजांनी चार युक्तीच्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. पण पार सॉक्रेटिस आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष काढण्याच्या नादात अशा उपदेशांकडे लक्ष कोण देतो. 
एकुणात पी. डी. पाटील यांच्या कृपेने होणारे साहित्य संमेलन पाडूनच स्वाभिमानी आणि विवेकवादी बुद्धिवंतांचे वैचारिक उद्यापन होणार, असे दिसतेय.