दुःख जापानचे

छायाचित्र सौजन्यः एपी & याहू न्यूज
१९९२-९३ च्या सुमारास आंतरराष्ट्रीय नभोवाणी केंद्रांचे कार्यक्रम ऐकण्यास मी सुरवात केली, तेव्हा रेडिओ जापान हे केंद्र सर्वात आधी ऐकले होते. हिंदीतील कार्यक्रम आणि सोयीच्या वेळा, यांमुळे हे केंद्र आवडण्यास वेळ लागला नाही. त्या कार्यक्रमांमुळे जापानबद्दल खूप काही जाणून घ्यायला मिळाले – अगदी निप्पोन या नावासकट. रेडिओ जापान म्हणजेच निप्पोन होस्सो क्योकाई (एनएचके – जापान ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) दरवर्षी ६ आणि ९ ऑगस्ट रोजी एक कार्यक्रम आवर्जून प्रसारित करायचे, अजूनही करतात..
हिरोशिमा आणि नागासाकीवर १९४५ मध्ये अणुबाँब पडल्यानंतर त्या होरपळीतून गेलेल्या नागरिकांच्या मुलाखतींचा हा कार्यक्रम असायचा.
अणूबाँब फुटताना विद्यार्थी असलेल्यांच्या आणि आता वृद्धावस्थेत असलेल्यांच्या त्या कहाण्या अंगावर काटा आणणाऱ्या असायच्या. त्या ऐकताना सुदैवाने परत कधी असं घडणार नाही, असंही वाटून जायचं. कारण अमेरिका व रशियातील शीतयुद्ध तेव्हा नुकतंच संपून जगभरात खुलेपणाचे वारे वाहत होते. जागतिक दहशतवादाने त्यावेळेपर्यंत तरी डोकं वर काढलं नव्हतं. त्यामुळे आण्विक ससेहोलपट कुणाच्या वाट्याला येईल, हे तेव्हा वाटणंच शक्य नव्हतं.
दुर्दैवाने तीच ससेहोलपट आज परत अनुभवायला मिळाली आहे. या दैवी आपत्तीचा भोग जापानी नागरिकच बनले आहेत, हाही दुर्दैवी योगायोग.

नारायण मूर्तींचा अस्मितेचा धडा

  • आपले कन्नड राज्य दोन हजार वर्षांचा इतिहास बाळगणारे राज्य आहे. राजे-महाराजांनी आपल्या कन्नडची पताका उंचावली. अक्कमहादेवी, बसवण्णा, वचनकार इत्यादी याच मातीत जन्मले आणि त्यांनी ही संस्कृती समृद्ध केली. हे सर्व आपल्याला प्रातः स्मरणीय आहेत… 
  • मी दक्षिण कर्नाटकात जन्मलो आणि उत्तर कर्नाटकात राहिलो. माझी व्यवहाराची भाषा इंग्रजी असली तरी मी सदैव कन्नडीगच राहीन… 
तब्बल २५ वर्षांनतंर विश्व कन्नड संमेलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री यडियूरप्पांना बेळगाववर कर्नाटकाचा हक्क दाखवून द्यायचा होता, तर मूर्तींना स्वतःचे कन्नडिगत्व सिद्ध करावे लागले. 
ही वक्तव्ये आहेत इन्फोसिसचे संस्थापक आणि भारतातील माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे धुरीण डॉ. नागवार रामराय नारायण मूर्ती यांची. आज, शुक्रवार ११ मार्च २०११ रोजी विश्व कन्नड संमेलनाचे उदॆ्घाटन करताना मूर्ती यांनी वरील वक्तव्य केले. या प्रसंगी त्यांनी कन्नडमध्येच भाषण केले, हे विशेष.
कन्नड भाषा आणि संस्कृतीबद्दल आदर व्यक्त करतानाच मूर्ती यांनी त्यांच्यावर आक्षेप घेणाऱ्या कन्नड भाषासमर्थकांनाही चपराक लगावली. इंग्रजी भाषेबाबत मूर्ती यांना प्रेम असल्यामुळे, बेळगावात होणाऱ्या विश्व कन्नड संमेलनासाठी त्यांना बोलावू नये, अशी आग्रही मागणी कर्नाटकातील अनेक साहित्यिकांनी केली होती.  डॉ. बरगुरु रामचंद्रप्पा, चंपा, गौरी लंकेश अशांचा त्यात समावेश होता. त्यामागे मूर्ती यांनी कधीकाळी केलेली,  कर्नाटकात इंग्रजी माध्यमांच्या अधिक शाळा असाव्यात,  ही भलामण होती.  
मूर्ती यांचे उद्योग व सामाजिक जगतातील स्थान ओळखून असलेल्या मुख्यमंत्री यडियूरप्पा यांनी मात्र त्यांनाच उदॆ्घाटनासाठी बोलाविण्याची ठाम भूमिका घेतली. इकडे मूर्ती यांनीही स्वतःची बाजू मांडण्यास सुरवात केली. गेल्या आठवड्यात टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले होते. समाजाच्या खालच्या थरात इंग्रजी शिक्षणाकडे ओढा वाढत आहे आणि त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेशासाठी झुंबड उडते. त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा अधिक काढाव्यात, अशी सूचना मूर्ती यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना केली होती. 
काल बंगळूरु येथे एका सभेत बोलताना त्यांनी याच विषयावर आणखी स्पष्टीकरण दिले.”कन्नड भाषेला बळ मिळायचे असेल, तर त्यासाठी कन्नडिगांना बळ मिळायला पाहिजे, ” असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण ‘किती कन्नड’ आहोत हे सांगण्यासाठी उत्तर कर्नाटकात पूरग्रस्तांसाठी ३० कोटी रुपये दिल्याची आठवणही त्यांना करून द्यावी लागली. 
केवळ आर्थिक प्रगती करून अस्मिता बाळगता येत नाही, त्यासाठी अस्मितेच्या मुखंडांची भाषाही बोलावी लागते, हा धडा तीस वर्षांनंतर का होईना मूर्तींना  गिरवावा लागत आहे, हा या प्रकरणाचा मथितार्थ!