युवराज बहु भाषणात बडबडला

नेहमीच्या शहरी गुत्त्यावरची, म्हणजेच बीअर बारमधील एक संध्याकाळ. नेहमीचीच चार, म्हणजे चार वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतील आणि वाहिन्यांतील कार्यकर्ते. चर्चा नेहमीसारखीच म्हणजेच त्या दिवशीच्या महत्त्वाच्या, म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यात पडलेल्या बातम्यांची. घशाखाली उतरणाऱया प्रत्येक घोटाबरोबर प्रत्येक बातमीची चिरफाड आणि शवविच्छेदन चालू. त्यातच जगात कोणाच्याही डोक्यात न आलेली गोष्ट आपण कशी केली आणि त्यावर (काहीही न समजणाऱया) वरिष्टांनी कसा बोळा फिरविला याची साग्रसंगीत वादावादी चालू। हेही नेहमीचेच. फक्त नेहमीसारखी एकच गोष्ट त्या ठिकाणी आहे ती म्हणजे या चार चतुरांच्या सोबत एक पाचवा, पण न पचवणाराही सामील आहे.

“आज काय विश्वासदर्शक ठराव होता ना,” पहिल्याला ओला कंठ फुटतो.
“हो रे, जाम बोर झालं,” दुसरा ओलेता आवाज जणू काही आपणच सर्वांची भाषणे लिहून दिल्याप्रमाणे सांगतो.
“आडवाणी म्हणजे बोगस माणूस. उगीच बडबड करत होता,” तिसरा कॉकटेल आवाज. यावेळी त्या आवाजाच्या मालकाला प्रत्यक्ष पाहिलं असतं तर खुद्द आडवाणींनाही आपली आख्खी राजकीय कारकीर्द फुकट घालविल्याचे आगळे समाधान लाभले असते. चौथा आणि त्यानंतर परत पहिला ते तिसरा असे आळीपाळीने मग मायावती, लालूप्रसाद, करात, चंद्राबाबू नायडू, शरद पवार यांना काडीचीही अक्कल कशी नाही, याची ग्वाही देत देतात. बरं झालं, जॉर्ज बुश किंवा महात्मा गांधी यांचा या नाट्यात सहभाग नाही. नाही तर त्यांनीही राजकारण आणि प्रशासनाचे धडे याच बारमध्ये बसून कसे घ्यावेत, यावर या चौघांनी बौद्द्धिक घेतले असते, याबाबत पाचव्याला शंका उरत नाही.
एव्हाना पहिली फेरी संपलेली असते। दुसऱया फेरीची मागणी झालेली असते. स्वतःची शुद्ध घालवून बसलेले हे चौघे योग्य का शुद्धीवर असूनही निर्बुद्धासारखे बसलेले आपण मूर्ख असा प्रश्न पाचव्याला पडतो.
“राहुलचे भाषण सॉलिड झालं ना,” चौघांपैकी एकजण नव्या बाटलीसह नवा विषय सुरू करतो. नक्की कोण काय म्हणतंय, याची नोंद करणं पाचव्याने बंद केलेलं असतं.
“बेस्ट. आपल्या विदर्भाच्या दोन बायांचे उल्लेख केले. त्यांच्या घरी जाऊन आला तो,” चौघांपैकी एकजण बरळण्याच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या आवाजात बोलतो.
“तुला माहितेय का, तो जो बोलला ना, की गरीबीचे निर्मूलनही ऊर्जेतूनच होणार आहे, ते भारीच होतं. सही पॉईंट काढला ना, ” आणखी एक कापरा आवाज बोलला.
“आपण मानलं त्याला. नाहीतर हे लोकं,’ पुन्हा सर्व नेत्यांचा उद्धार करत दोन आवाज एक साथ बोलले.
दुसरी फेरी संपत आलेली असते। कोसळण्याच्या बेतात आल्याशिवाय सगळ्या ज्ञानाचे हलाहल पिण्याचे कार्य थांबवायचे नाही, या नेहमीच्या संकेताला अनुसरून तिसरी फेरी सुरू होणार असते.
एकाच टेबलावरच्या दुसऱया काठावर आपला आवाज जात आहे का नाही, याची पर्वा न करता पाचवा बोलू लागतो, “ते तुमचं सगळं ठिक आहे। पण मला एक सांगा, या दोन्ही बाया, ज्यांच्या झोपड्यात तुमचे युवराज गेले त्या विदर्भात गेले होते ना आणि विदर्भातच वीजनिर्मितीचे दोन मोठे प्रकल्प आहेत ना. मग आतापर्यंत ती वीज त्या झोपड्यांत कशी पोचली नाही. दोन झोपड्यांपैकी एका झोपडीतील महिलेच्या नवऱयाने आत्महत्या केली होती. तो विदर्भातीलच शेतकरी असल्याने बाकीच्यांना काही सोयरसुतक नाही हे मी समजू शकतो. पण तेथील शेतकऱयांसाठी पॅकेज जाहीर करून वर्ष होत आले तरी आत्महत्या थांबत नाहीत, त्या कोणती ऊर्जा मिळाल्यानंतर थांबणार आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून (म्हणजे ब्रिटीशमु्क्त) तुमच्या युवराजांच्याच पणजोबा, आजी, वडील आणि आईचे राज्य चालू आहे. त्यांनी कोणते दिवे लावले म्हणून आज कोट्यवधी लोक अशा परिस्थितीत जगत आहेत. त्या भाषणाबद्दल बोलताना आणि लिहिताना तुम्हाला हे प्रश्न पडत नाहीत का रे?”
पाचव्याचे स्वगत संपल्यानंतर चौघेही एकमेकांकडे पाहतात. पार्टी ऐन रंगात आलेली असताना असा थर्ट पार्टी व्यत्यय त्यांना नको असतो. नव्हे, एव्हाना ते याला विसरलेलेही असतात. त्यांची ती अवस्था पाहून पाचवा जायला निघतो. तो गेटबाहेर गेल्याची खात्री झाल्यानंतर पहिला उरलेल्या तिघांना म्हणतो, “तरी मी म्हणत होतो, न पिणाऱयाला आपल्यामध्ये घेत जाऊ नका,” अन ते परत तिसऱया फेरीचे चिअर्स करतात.

विश्वासदर्शक ठराव २०-२० चा हवा

दोन दिवस चाललेल्या उखाळ्या पाखाळ्या, निंदानालस्ती आणि काथ्याकुटीनंतर अखेर डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाने, मात्र प्रत्यक्षात सोनिया गांधी यांनी चालविलेल्या सरकारने आपले बहुमत लोकसभेत सिद्ध केले. लोकसत्ताच्या भाषेत सांगायचे तर या दोन महामानवांच्या विरूद्ध समस्त असुर मंडळींनी छेडलेल्या युद्धात, या असुर टोळ्यांचेच नाक कापले गेले. (सोनिया आणि कॉंग्रेस यांच्या नेतृत्वावर शंका घेणारा कोणताही पक्ष लोकसत्ताच्या दृष्टीने टोळ्या असतो.) 

नेहमीच्या चर्चांप्रमाणे आम्हीही टीव्ही बंद ठेवून ही चर्चा एन्जॉय केली. मात्र त्यात मतदानाच्या वेळी ज्याप्रमाणे चुरस निर्माण झाली, त्यावरून २०-ट्वेंटी स्पर्धेची आठवण झाली की नाही? त्यामुळेच येथून पुढे होणाऱया सर्व चर्चा याच स्पर्धेच्या साच्यात व्हाव्यात, असे आमचे एक मत पडले. त्यासाठी हवे तर काही नियम आपण ठरवायलाही तयार आहोत. शंभर स्पर्धांमध्ये मार खाल्ल्यानंतर योगायोगाने २०-ट्वेंटीमध्ये जिंकल्यानंतर, मुंबईत खेळांडूंची वरात काढून मिरवून घेणारे शरद पवारच संसदेतही फिक्सिंगच्या प्रयत्नात असतात. सोबतीला अंबानी बंधू, विजय मल्ल्या अशी मातब्बर आणि क्रीडाप्रेमी मंडळी आहेतच. त्यामुळे त्या अर्थानेही हा योग योग्यच ठरेल यात काय शंका.

आता तुम्ही विचाराल, की नक्की कशा प्रकारचा फॉर्मॅट हवा, तर असं बघा. सुरवात होईल आय़कॉन खेळाडूंच्या लिलावाने. सोनिया, अडवाणी, करात, अमरसिंग, मायावती अशा आयकॉनला आधी आपण विक्रीसाठी ठेवू. त्यानंतर ते स्वतःच्या बहुमतासाठी अन्य खेळाडू विकत घेतील. म्हणजे लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू, फारूख अब्दुल्ला वगैरै मंडळी. या मंडळींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या खेळात सातत्य नसलं तरी अडचणीच्या वेळी धावून जाण्यात ते वाकबगार आहेत. (धावून जाण्यात म्हणजे मित्रांच्या मदतीला आणि विरोधकांच्या अंगावर, या दोन्ही अर्थाने!) आणखी एक तिसरा प्रकार आहे देवेगौडा, अजितसिंग यांच्यासारख्या खेळाडूंचा. ही मंडळी मुळात आधी कोणत्या टीमकडून खेळतायत याचा नेमच नाही, शिवाय त्यांना खेळापेक्षा जाहिरातीत अधिक रूची आहे. जाहिरातीच्या या छंदापायी ते कधी कधी चिअऱ लीडर्स व्हायलाही तयार असतात, अशी चर्चा आहे. खासकरून फिक्सिंग करणाऱया बुकींच्या दृष्टीने ही मंडळी अधिक आकर्षक असतात, कारण स्वतःच्या परफॉर्मन्सपेक्षा त्यांना इतरांना रन आऊट करण्याची कला अधिक अवगत असते. 

ही अशी उतरंड केली आणि एकदा का खरेदीचा व्यवहार पारदर्शक केला, की कोणाची बिशाद आहे संसदेत घोडाबाजार होतो म्हणायची. (एकूणात, घोडाबाजार हा शब्द शोधून काढणाऱया व्यक्तीने, भारताच्या संसदेत चालणारे व्यवहार बघून घोड्यांना काय वाटते याचा विचार केला नसावा!) तर एवढ्या पूर्वतयारीनंतर ठराव मांडला गेला पाहिजे.

आता २०-ट्वेंटीमध्ये कसं, गडी खेळपट्टीवर आला की अंदाज घ्या, सेट व्हा अशा भानगडीत पडत नाही. महापालिकेचे कर्मचारी कसं, दिसलं कुत्रं की घाल गाडीत अशी मोहीम राबवितात, तसंच हा खेळाडूही दिसला चेंडू की हाण हवेत असं करत राहतो. तो खेळ वगैरे तिकडे, इथं आपल्याला मनोरंजन करायचं हाच त्याचा खाक्या. संसदेच्या आम्ही प्रस्ताव ठेवलेल्या नव्या फॉर्ममध्ये असाच प्रकार असणार आहे. चर्चा कशावर आहे, मुद्दा काय आहे याकडे फारसं लक्ष न देण्याची मुभा सगळ्या खेळाडूंना आम्ही देणार आहोत. प्रत्येकाने फक्त माईक घ्यायचा आणि समोरच्यावर (म्हणजेच विरोधकांवर) आरोप करायचे. आरोप जेव्हढा बेफाम तेवढं आपलं एंटरटेनमेंट जास्त, कसं? हरभजन-इशांत प्रकरणासारखे एखाद्याने तोंडाऐवजी हाताचा वापर केला तर त्यासाठी चौकशी समिती नेमून एकमेकांना पाठिंबा देण्याच्या बोलीवर निर्दोषही सोडले जाईल. (मात्र कोणत्याही परिस्थितीत डोके वापरू देणार नाही, ते काम राजकारण्यांचे नाही!) 

अशारितीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून झाले, चिखलफेक करून झाले की याच खेळाडूंना त्यांच्या सामन्याचा निर्णय घेऊ द्यावा. त्यासाठी कोणत्याही त्रयस्त पंचाचा वेळ जायला नको. आपल्याला बुवा ही आय़डीया खूप आवडली. त्यामुळे संसदेतल्या चर्चा दोन दोन दिवस चालण्यापेक्षा एकाच दिवसांत येतील, कसे? यात फक्त एकच समस्या आहे. बीसीसीआयच्या २०-ट्वेंटी आणि आयपीएलला फक्त आयसीएलची स्पर्धा आहे. संसदेतल्या चर्चेच्या खेळाला मात्र विधानसभा, विधान परिषद, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,नगर पंचायत, ग्राम पंचायत अशी स्पर्धकांची साखळीच आहे. त्याचं बुवा बघा कोणीतरी.  
———-

…तर बुशकडे मदत मागणार?

साहित्याचा आणि माझा तसा काही संबंध नाही. तसा म्हणायला पत्रकारितेत असलो आणि मराठी, इंग्रजी व अन्य भाषांमधून सर्रास उचलेगिरी करत असलो, तरी साहित्यविश्वाशी नाळ जोडण्यासाठी ते पुरेसे आहे का, ,याबाबत माझ्या मनात दाट शंका आहे. लेखन तर कोणीही करते, पण जगात महत्वाचे काही असले तर ते आपले व आपले आवडते लेखनच असा आव जो आणतो त्याला साहित्यिक म्हणायची आजकाल प्रथा आहे। त्यामुळे हाकेच्या अंतरावर साहित्य संमेलन होऊनही ते घरात बसल्या बसल्या टीव्हीवर एन्जॉय करण्याचीच आपली साधी मराठमोळी प्रवृत्ती आहे। हो, ऊगाच खोटं कशाला बोला?
माझ्या मते मराठीत दोन प्रकारचे लेखक आहेत। जे सातत्याने सकस लेखन करतात आणि दुसरे आपण साहित्य संमेलनात का जात नाहीत, याची दिसेल त्या व्यासपीठावर चर्चा करतात असे. त्यातील दुसऱया प्रकारच्या लेखकांशी आपली जरा जास्त जवळीक आहे. म्हणजे काय की, आपण कसं चपलेचा अंगठा तुटलेला आहे हे लपवत लपवत आजकालच्या वस्तूंचा घसरलेला दर्जा आणि पायांचे विकार अशी तात्विक चर्चा करतो, तसे हे दुसरे लेखकही करतात. शेजारून जाणारा माणूस आपल्याला ओळख देणार नाही म्हणून संमेलनाच्या मंडपात न येणारे लेखक, संमेलन म्हणजे केवळ वायफळ खर्च आहे किंवा तत्सम सैद्धांतिक बडबड करतात, त्या एका क्षणात कलेसाठी कला का जीवनासाठी कला असे क्षुल्लक वाद निकाली निघतात. जीवन जगताना खोटं बोलण्यासाठी कला, असं त्याला स्वरूप येतं. एक माजी संमेलनाधध्यक्ष शनिवारवाड्याजवळच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला आले असताना वेटरनेही त्यांना ओळखले नव्हते, ही घटना मी डोळ्यांनी पाहिलेली आहे. नंतर अशाच माणसांची “त्यांनी कोणताही बडेजाव न मिरवता सामान्य माणसासारखं जगले, ” अशी प्रशंसा केलेली बघितल्यावर हसू येणार नाही तर काय होणार?
त्यामुळेच यंदा दोन मराठी साहित्य संमेलने घेण्याची तयारी कौतिकराव ठाले पाटील यांनी दाखविली तेव्हा जरा हायसे वाटले. चला, म्हणजे नेहमीप्रमाणे प्रतिनिधींना पास देण्याची, त्यानिमित्ताने त्यांनीही आपल्या नातेवाईकांना जरा ‘गाव’ दाखवायला आणण्याची परंपरा पाळली जाणार तर. आपल्या नेहमीच्या संमेलनाची संयोजन व्यवस्था उत्तम। भिकार असल्याच्या बातम्या देण्याची सोय झाली. (संयोजन व्यवस्थेबाबतच्या बातम्या एकाआड एक वर्षी अनुकूल वा प्रतिकूल देण्यात येत असाव्यात असा मला अनेक वर्षांपासूनचा वहीम आहे. शेवटी संयोजकांना शिव्या देण्याशिवाय किंवा ते बडे राजकीय आसामी असल्यास त्यांची तारीफ केल्याशिवाय मराठीविषयीची आपली कळकळ, संमेलनाला हजर राहण्याची तत्परता आणि स्वभाषेसाठी कोणतेही कष्ट उपसण्याची तयारी कशी समजून येणार?) नेहमीप्रमाणे अध्यक्षांपेक्षा प्रमुख पाहुण्यांचेच भाषण जोरदार झाल्याचा अभिप्राय यंदाही .येणार तर. शिवाय कोणी मराठीचा अधिकाधिक वापर करायला हवा, असं म्हणालं की यांचीच मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून रकानेही भरणार. (कोणा कोणाची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात यावर पी. एच.डी करणारे पत्रकार आहेत तसे वाचकांचा पत्रव्यवहारचे नेहमीचे यशस्वी कलाकारही आहेत. जणू काही मराठी माध्यमांच्या शाळेत शिकलेले सर्वच विद्यार्थी सरस्वतीच्या दरबारात नाच करतात.) सामाजिक बांधिलकीच्या नावाने गळा काढत गद्य न रचणाऱया कवींना मान्यता न देण्याच्या या काळात, असे मनोरंजक आणि वास्तवाशी संबंधित नसलेले लेखन प्रसवणारा कोण लेखक आहे आज?

बाय द वे, अमेरिकेत संमेलन होणार त्यामुळे महामंडळाच्या ग्लोबल कळवळुचीही बूज राखली जाणार. अमेरिकेतल्या यजमानांनाही वाईट वाटायला नको. तसं बघायला गेलं तर घरटी एक अपत्य अमेरिकेत वा इंग्लंडमध्ये असणाऱया कोणाही साहित्यिकाने किंवा साहित्यिक संस्थेच्या पदाधिकाऱयांनी या संमेलनासाठी खर्च मागू नये. तिथल्या अन्य संस्थांचा विरोध असलातरी त्याची काळजी करण्याची गरज नाही. आपण इथल्या, देशातल्या कोणाच्या विरोधाची पर्वा करतो का?

ठाले पाटील यांना या निर्णयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशनच्या पत्राबाबत विचारले. ते म्हणाले, “अमेरिकेतल्याच दोन संस्थांमध्ये काहीतरी अंतर्गत भांडणे आहेत. त्यामुळे त्यांनी ते पत्र पाठविले आहे.” दोन संस्थांमध्ये भांडणे? ही तर मराठी संस्कृती. ठाले पाटील यांना म्हणालो, “म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आधीच तिथे पोचली म्हणायची.” मात्र ते विनोदाच्या मूडमध्ये नसल्याने माझ्या विनोदावर मीच हसून लाज राखली.

दोन संमेलनाच्या निर्णयाचे द. मा. मिरासदार, राम शेवाळकर यांनीही स्वागत केले. मात्र खरी प्रतिक्रिया दिली ती विठ्ठल वाघ यांनी. ते म्हणाले, “साहित्य संमेलन अमेरिकेत घेण्याचा निर्णय म्हणजे आता मराठीबाबत महाराष्ट्रात काहीही करण्यासारखे नाही, असे होईल. मागच्या वेळी सोलापूर संमेलनात ठाले पाटील बेळगावच्या प्रश्नावर अत्यंत कळवळ्याने बोलले होते. आता ते अमेरिकेतील संमेलनात इराक-इराण प्रश्नावर बुश यांची मदत मागणार आहेत का.”

जाता जाताः कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणेने दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात हवा निर्माण केली होती. या संमेलनाच्या निमित्ताने का होईना रत्नागिरी आणि कॅलिफोर्निया एका पातळीवर येतील.
—————-