टीव्हीशप्पथ हसणार नाही…..

हॅलो…कोण? अच्छा तू होय? का रे कशाला फोन केला? नाही रे, नाही पाहिला तो प्रोग्राम- तुला माहितेय मी असले प्रोग्राम पाहत नाही. अरे, असतं काय त्या कार्यक्रमांमध्ये मला सांग ना? ‘आनंदी आनंद गडे’ असं हे जग असल्याचं आपल्या काही कवितांमध्ये म्हटलं आहे ना मग आता कोणाला आनंद कमी पडला म्हणून हे असले माकडचाळे रे?

…ए ए मला काय हसण्याची ऍलर्जी नाही हां. मलाही जोक कळतात. ….हो हसताही येतं. पण कोणीतरी उगीच डोळ्यापुढे उभं राहतं आणि काहीतरी अंगविक्षेप करून तुम्हाला हसायला भाग पाडतं, यात कसला विनोद? ….तू पाहतोस ना असले कार्यक्रम. मग तुलाच लखलाभ असोत रे ते.

…माझा आक्षेप? अरे, हे कार्यक्रम हसण्यासारखे असण्याऐवजी हास्यास्पद असतात, हाच माझा ऑब्जेक्शन आहे. नाही, विनोदाच्या नावाखाली असे आचरट उद्योग पूर्वीही होत असत. असरानी, जगदीप अशा लोकांची कारकीर्द त्यातच उभी राहिली माहितेय मला. पण दक्षिण भारतातून रिमेक केलेल्या चित्रपटांमध्ये कादरखान-शक्ती कपूर या जोडगोळीने काही काळ अशा प्रकारचा उच्छादच मांडला होता, हे तुला माहित नसावं कदाचित. हिंदी कशाला, आपल्या मराठीतही लक्ष्या-अशोक सराफ जोडीचे अनेक सिनेमे असेच नाहीत का? आता सुद्धा…

…थांब थांब… त्या उच्छादात आणि आताच्या टोळधाडीत एक फरक माहितेय का तुला? तो प्रकार थिएटरपुरता होता. आता हा टीव्हीतून घरात आलाय…अन हिंदी चॅनेल्सनी जे केलं ते मराठीतही झालंच पाहिजे, हा सॅटेलाईटचा नियम यांना पाळायलाच पाहिजे ना…त्यामुळे कोणी ‘हास्यसम्राट’ घ्या कोणी ‘हास्य़ दरबार’ घ्या चालू आहे ना बाबा. आता तुझ्यासारखे काही प्रेक्षक मिळाले की त्यांचे कार्य तडीस गेलेच म्हणून समज…मला कालच माझ्या ओळखीच्या एकाने विचारलं, “ तुम्ही पाहता का असले हसायचे कार्यक्रम?” मी सांगितलं, “ मी एकदा कार्यक्रम पाहायचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुरवातीपासून शेवटपर्यंत हसत होतो. आता कधीतरी त्यात काय असते तेही पाहायचे आहे.”

….एक मिनिट, एक मिनिट…मला एक सांग, तू पु. ल. आचार्य अत्रे वगैरंची पुस्तके वाचली आहेस ना? मग तरीही तुला ही असली थेरं चालतात. नाही म्हणजे आपल्याकडे शिमगा वगैरेला असं काहीबाही चालत असतं…पण त्याचा असा बारमाही रतीब नाही घालत कोणी. अन हसण्यासाठी कोण कोण काय करतं, ते पाह्यलं का? म्हणजे ते पाहून हसू येण्याऐवजी किवच येते की रे. कोणी रेड्यासारखं रेकतं काय, कोणी बेंबीच्या देठापासून ओरडतो काय? एका कार्यक्रमात बालनाट्यातील राजा-प्रधानांसारखी वेशभूषा केलेले परीक्षक आहेत.

काहीच कळेनासं होतं. त्या हिंदीत तर भाड्याने आणल्यासारख्या मॉडेलच आणतात ना. हसण्यासाठी. म्हणजे विनोद फालतू असला तरी यांच्याकडे पाहून हसू यावं! काय रे ही खऱया विनोदाची ट्रजेडी?

तुला एक सांगू. सगळ्या प्राण्यांमध्ये हसू शकणारा प्राणी एकच माणूस. त्यातही कशाला हसावं आणि कशाला नाही, हे ज्याला समजतं तो शहाणा माणूस. तुला माहितेय का, अमेरिकेत एक विनोद आहे. कम्प्युटर कधीही माणसांची जागा घेऊ शकणार नाही, कारण साहेबांच्या विनोदावर हसण्याची कला त्याला येत नाही. तर कळालं ना…हसण्यासाठी आणखी जागा आहेत ना…साहेबांचे विनोद आहेत, चोवीस तास बाता मारणारे बातम्यांचे चॅनेल्स आहेत, गेला बाजार टीव्ही नको असेल तर एखाद्या वर्तमानपत्रातील वाचकांचा पत्रव्यवहार वाच…

…नको ना? ठीक आहे. तू नकोच वाचू. मी वाचेन आणि हसेनही. पण टीव्हीशप्पथ, ते कार्यक्रम पाहून हसणार नाही!

सिनेमातील “खेल खेल में’

चित्रपट आणि क्रिकेट दोन्ही आपल्याकडे लोकप्रिय आहेत. तरीही चंदेरी पडद्यावर त्याचे अभावानेच दर्शन घडते. अन्य खेळांची गोष्टच सोडा. आता गेल्या महिन्यात “चक दे इंडिया’ने हॉकीला केंद्रस्थानी ठेवून एक आकर्षक कथा सादर केली. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तर चित्रपटात खेळ आणि खेळाडूंची अनुपस्थिती आणखी तीव्रतेने जाणवू लागली आहे. त्याचवेळेस खेळांवरील अन्य चित्रपट येत असल्यामुळे भारतात खास क्रीडापटांचा उदय होत आहे, हेही जाणवत आहे.

बॉलिवूडने खेळांना कधी पडद्यावर जागाच दिली नाही, असं नाही. “ऑल राउंडर’, “बॉक्‍सर’, “जो जीता वही सिकंदर’ अशा चित्रपटांमधून खेळांचे दर्शन प्रेक्षकांना झाले. मात्र, ते केवळ तोंडी लावण्यापुरते. मुख्य भर बॉलिवूडच्या परंपरेप्रमाणे नाच गाणे, मेलोड्रामा आणि नायकाचे उदात्तीकरण याच चक्रावर होता. त्यामुळे चित्रपट खेळांशी संबंधित असूनही क्रीडा क्षेत्राला ते कधीही आपले वाटले नाहीत. प्रेक्षकांनीही अशा चित्रपटांचे कधी खुल्या मनाने स्वागत केल्याचा इतिहास नाही. त्यामुळेच की काय, या वाटेने जाणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांची संख्या अगदीच अत्यल्प म्हणावी अशी आहे. आपल्याकडे चित्रपटांचे खेळ होतात पण खेळांचे चित्रपट होत नाही, असं का?

खेळांशी संबंधित चित्रपटांचा आढावा घेतल्यास काय दिसते? अगदी तीस वर्षांपूर्वी आलेल्या “सावली प्रेमाची’ हा चित्रपट घ्या. त्यात विक्रमवीर सुनील गावसकर नायक होता, हीच या चित्रपटाची ओळख. क्रिकेट खेळाडू संदीप पाटील याला हिरो म्हणून झळकावणाऱ्या “कभी अजनबी थे’ या चित्रपटाची कथाही काही वेगळी नाही. त्यापेक्षा कुमार गौरव, विनोद मेहरा आणि रती अग्निहोत्री यांची भूमिका असलेल्या “ऑल राउंडर’ या चित्रपटात क्रिकेटचे अधिक जवळून दर्शन झाले.

भारतात आर्थिक उदारीकरणानंतर आणि उपग्रह वाहिन्यांचे प्रमाण वाढल्यानंतर येथील प्रेक्षकांना सगळ्या प्रकारचे चित्रपट आणि मालिका पाहावयास मिळू लागल्या. त्यामुळे आपले हिंदी चित्रपटही बदलले. त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे क्रीडापट अधिक तयार होऊ लागले. “लगान,’ “इक्‍बाल’, “चक दे इंडिया’ आणि आता येऊ घातलेला “धन धना धन गोल’ असे महत्त्वाचे क्रीडापट गेल्या पाच वर्षांतच आले आहेत, हे लक्षात घ्या. “स्टम्प्ड’ सारखे केवळ क्रिकेटच्या क्रेझचा फायदा घेण्यासाठी आलेले चित्रपट वेगळेच! या ट्रेंडची सुरवात झाली सहा वर्षांपूर्वी आलेल्या “बेंड इट लाइक बेकहम’ या चित्रपटाने. खरं तर हा चित्रपट इंग्रजी होता; मात्र त्यातील कथा भारतीय कुटुंबाची आणि फुटबॉलवेड्या युवतीची होती. त्यामुळे त्या चित्रपटाला मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर अनेकांनी क्रीडा विषयावर चित्रपट काढण्याचे धाडस दाखविले आहे.

———-

(सकाळमध्ये १९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या लेखाची ही संक्षिप्त आवृत्ती)

फटाक्‍यांचे बार आणि स्मृतींच्या पणत्या

स्मृतींचे हे भांडार दिवाळीच्या अन्य बाबींमध्ये जेवढे समृद्ध आहे, त्याहून जास्त समृद्ध ते फटाक्‍यांच्या बाबतीत आहे. अगदीच खरं सांगायचं म्हणजे फटाक्‍यांच्या बाबतीत माझ्या आठवणी खूप स्फोटक आहेत.न उडालेल्या बॉम्बमधील दारू वेगळी काढून घेऊन, ती पुन्हा पेटवावी तशी या आठवणी मी अनेकवेळेस अनेकांना पुन्हा पुन्हा सांगितल्या आहेत. तरीही त्यातली गंमत अजून जशास तशी आहे. या आठवणींबाबत काय सांगू? फटाक्‍यांच्या आतषबाजीची सुरवात दसऱ्याच्या दोन-चार दिवसांनंतर सुरू व्हायची. गल्लीत येता जाता बॉम्ब, टिकल्या आणि नागाच्या गोळ्या विकायला बसलेले छोटे छोटे स्टॉल दिसू लागले, की ठिणगी पडायची. त्यानंतर फटाक्‍यांसाठी वडिलांकडे हट्ट करावा लागे. तोही कितीसा? तर आठ आणे किंवा चार आण्याचा! अन्‌ तरीही वडिलांनी कधीही चर्चेच्या पहिल्या फेरीत मागणीला दाद दिल्याचे आठवत नाही. निवेदने, मोर्चे अशा शांततावादी मार्गांनी पदरात काहीही पडणार नाही, याची खात्री पटल्यानंतर एखाद्या वेळी निषेधाचा मार्ग अवलंबावा लागे. त्यानंतर मात्र वडील कानाखाली असा काही जाळ काढत, की ज्याचं नाव ते! त्यानंतर मग यथावकाश खरेदीचा पूर्वनियोजित कार्यक्रम पार पडे आणि घरात दारूगोळा येऊन पडे.
त्यानंतर प्राधान्य असायचं ते फटाक्‍यांच्या वाटपाचं. कारण पुढच्या सगळ्या गमतीचा आधार तोच असायचा. आपलाच दारूगोळा आपणच उडवून दिवाळी साजरी केली, तर त्या दिवाळीत काहीही अर्थ नाही असं मला अगदी मनापासून वाटतं. त्यामुळे स्वतःच्या वाट्याचे फटाके मागे ठेवून इतरांचे फटाके आधी उडविण्याची लज्जत मी खूपदा अनुभवली. मराठी व्यक्ती असल्याने बहीण-भावंडांवरच या गनिमी काव्याचा वापर करण्याचीही दक्षता मी अनेकदा घेतली. मात्र गल्लीतील अनेक मुले आणि शाळेतील मित्र यांनाही या प्रकारच्या लढाईचा मी अनेकदा प्रसाद दिला. अगदी बंदुकीच्या टिकल्यांपासून सुतळी बॉम्बपर्यंत अनेक प्रकारचे स्फोटके मी अशीच कमावली. त्यानंतर इतरांची रसद संपल्यावर आपल्या भात्यातले अस्त्र काढायचे आणि त्यांना वाकुल्या दाखवत ते उडवायचे…हा हा काय ते रम्य बालपण! आता तर काय, दिवसरात्र मी चॅनेलवर कुठेतरी गोळीबार, बॉंबस्फोट आणि हाणामाऱ्या पाहायचो…पण बालपणीच्या त्या स्वकर्तृत्वाच्या आतषबाजीची मजाच काही और!
दिवाळी म्हटलं, की नवे-नवे कपडे, काही चीजवस्तूंची खरेदी अशा अनेक गोष्टी असायच्या. माझ्या बालपणी तर दिवाळीची खरेदी म्हणजे एक जंगी कार्यक्रमच असे. “तुला नवे कपडे घ्यायचेत,’ असं सांगून आई-वडील मला बाहेर घेऊन जायचे. त्यानंतर दुकानात गेल्यावर वडिलांचे कपडे घेऊन झाल्यावर माझ्या कपड्यांचा विषय अजेंड्यावर यायचा. आता जनरेशन गॅप म्हणा, का आणखी काही, पण आई-वडिलांची पसंती आणि माझी पसंती यात गुढी पाडवा आणि दिवाळीच्या पाडव्याएवढे अंतर पडे. या प्रामाणिक मतभेदांच्या फुलबाज्या मग कपड्यांच्या दुकानातच पडू लागत आणि वडिलांच्या रागाचा सुतळी बॉम्ब फुटल्यानंतर ते अग्निदिव्य पार पडे. अशारीतीने कोणाच्यातरी पसंतीने माझ्या कपड्यांची खरेदी होई, त्यावर भावंडे आणि शाळासोबती कॉमेंट्‌स करून मनोरंजन करून घेत आणि दिवाळी साजरी झाल्याचं समाधान मी करून घेई.
असो. गेले ते दिन गेले. एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है…असं गाणं गात सध्या फिरत आहे. तूर्तास सांगायचं म्हणजे, माझी यंदाची दिवाळी खूप छान गेली आहे. या दिवाळीच्याही काही आठवणी तयार झाल्या आहेत. पण त्या आता म्हातारपणीच प्रकाशित कराव्या लागणार…त्याशिवाय “तरुणपणीच्या दिवाळीची म्हातारपणात मजा नाही,’ अशा वाक्‍याला धार येणार नाही!

दिवाळी, केवळ आठवणींचीच…

दिवाळी म्हटली, की मला आठवणी सुचू लागतात. दरवर्षी दिवाळी आली, की आपल्या बालपणीची दिवाळी किती चांगली होती आणि त्या तुलनेत आजची दिवाळी किती फिकी आहे, याची जाणीव मला होऊ लागते. मराठी जगताच्या परंपरेनुसार भूतकाळातील दिवाळीचे वर्णन करण्यासाठीही मोठी संधी मिळालेली असते. खासगी गप्पा, सार्वजनिक गप्पा, वर्तमानपत्रे, वाहिन्या, गेला बाजार “पवनाकाठचा मावळा’ किंवा “सा. गायब बहाद्दर’ यांसारख्या दिवाळी अंकसुद्धा सध्याच्या दिवाळीपेक्षा बालपणीच्या दिवाळीत आपण काय दिवे लावले, याचीच जास्त खबरबात घेतात. मीही त्यामुळे दरवर्षी नवरात्र संपली की लेखणी सरसावून बसतो. (म्हणजे आताशा किबोर्ड सरसावून बसतो. जुन्या काळची पेन हातात घेण्याची मजा आता राहिली नाही!) लहानपणीच्या दोन-चार आठवणींचा खजिना कोऱ्या पानावर रिता करून, एखाद्या ठिकाणी तो छापून यावा यासारखी मजा शंभर सुतळी बॉंबमध्येही नाही. त्यामुळे दीपावली हा साजरा करायचा सण नसून तो आठवणी काढायचा सण आहे, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे.

यंदाच्या वर्षीही मी माझ्या आठवणींची पोतडी रिकामी करण्यासाठी सज्ज बसलो होतो. पण काय करणार, यंदा कोणीही मला पांढऱ्यावरती काळे करायला आमंत्रण दिले नाही. कोण्या पाहुण्याकडेही जायचा चान्स मिळाला नाही. त्यामुळे माझा अगदी कोंडमारा झाला आहे. पोट फाटेस्तोवर खाल्लेला दिवाळीचा फराळही आता पूर्ण पचत आला आहे, मात्र माझ्या आठवणींचं हे संचित काही जीरता जीरत नाही. त्यामुळे कुठेतरी पोट मोकळं करावंसं वाटतंय! त्यासाठीच हा लेखप्रपंच.

दिवाळी म्हटली, की आनंद, मांगल्य, सुख-समृद्धीच्या शुभेच्छा वगैरे वगैरे…शालेय अभ्यासक्रमात निबंध लिहिण्यासाठी पाठ केलेल्या या ओळी कोणत्याही वेळेस वापरायच्याच असतात ना? पण मला मात्र आता खरं खरं सांगायचंय…त्यामुळे मी खऱ्या आठवणी सांगतो. अन्‌ नीट सांगायचं तर मला लहानपणीच्या कोणत्याही दिवाळीच्या वेळेसचं काहीच आठवत नाही. शेजारच्या पिंटूचे फटाके चोरून तेच दिवाळीत उडविले, आजोळी गेलो असताना लाडू चोरून खाल्ले आणि ती चोरी पकडली गेल्यावर धम्मकलाडूही खाल्ले…अशा काही रंजक घटना सोडल्या तर दिवाळी म्हणजे एकदम संस्मरणीय असं काही आठवतच नाही हो!

एक तर दिवाळी म्हटली की लहानपणी मला हुडहुडी भरायची. कारण दिवाळीच्या चारही दिवसात सकाळी लवकर उठावं लागायचं. (ही शिक्षा अजूनही कमी झालेली नाही!) माझ्या सूर्यवंशी प्राण्याला रामप्रहरी उठायची गरजच काय, हा मूलभूत प्रश्‍न तेव्हा पडायचा. दिवाळीच्या सगळ्या फराळावर अन्‌ फटाक्‍यांवर ताण करणारा हा त्रासदायक प्रकार असायचा. बाहेर झुंजुमुजु व्हायच्या आत घरात झुंज सुरू व्हायची. आईच्या पहिल्या हाकेने युद्धाचा बिगुल फुंकला जायचा. दोन हाकांनंतर चादर अंगावरून काढल्यानंतर लढाई हातघाईवर यायची. या प्रयत्नात दोनदा लाथा झाडून मी अंगावर पुन्हा चादर घ्यायचो. “”मेल्या, दिवाळीच्या काळात तरी लवकर उठत जी नं. एरवी तर पडलेला असतोच दुपारपर्यंत अंथरुणात,” अशी रणगर्जना कानावर आली, की मी पांढरे निशाण फडकावत असे. दिवाळीची सुरवात ‘रागा-रागां’नी करायची असते व त्यासाठी तिकीटही काढावे लागते, हे मला खूप उशिरा अलीकडे कळाले. लहानपणी मात्र माझ्या सर्व दिवाळींची सुरवात रागातच झालेली आहे. अलीकडे मी पार पहाटेच्या वेळेसच झोपतो, मात्र लहानपणी त्या शिव्या खाण्याची मजाच काही और होती.

जी गोष्ट उठण्याची, तीच गोष्ट उटण्याची. तिळाचा तो लिबलिबित लगदा अंगावर चोपडून अंघोळ केल्याने पुण्य मिळते यावर माझा तेव्हाही विश्‍वास नव्हता आणि आजही नाही. मुळात थंडीच्या दिवसांत अंघोळ करण्याची गरजच काय, यावर एक बौद्धिक घेण्याची मला खूप इच्छा होती. पण त्या बौद्धिकाचे रूपांतर लगेच चर्चासत्रात झाले असते, अन्‌ घरातील सगळीच मंडळी त्या चर्चासत्रात माझ्यापेक्षा ज्येष्ठ वक्ते होण्याची शक्‍यता असल्याने माझ्या त्या शुभसंकल्पाला मी अनेक वर्षे आवर घालत होतो. आताही मी दिवाळीत उटणे लावतो, मात्र त्यावेळी त्या उटण्याचा जो कंटाळा यायचा, तो आता येत नाही. असो.

आणखी काही आठवणी “ब्रेक के बाद’…

रजनीरसिकाचा रसास्वाद

जनीकांत का नया ऐक्शन धमाका…पोस्टरवरील हे वाक्य वाचले आणि पावले आपोआप त्या दिशेने वळली. तमिळ सुपरस्टार रजनीकांतचा पुण्यातील एकमेव फॅन म्हणून बहुतेक परिचितांनी नियुक्ती केली असल्याने त्याशिवाय पर्यायही नव्हता. शेवटी किती दिवस रजनीचे तमिळ चित्रपटच पाहणार? रजनीकांतच्या डब चित्रपटांची एक स्वतंत्र मजा असते, हे मुथ्थु महाराजा आणि तत्सम चित्रपट पाहून अगदी तोंडपाठच झालेले. म्हणजे बघा, की डब चित्रपटांमध्ये अगदी कपाळावर आडवे गंध लावलेल्या, इरकली साड्या नेसलेल्या बायका ‘दैया रे दैया’ असा ‘ठेठ’ उत्तर भारतीय उदगार काढताना पाहिल्यावर मनोरंजन होत नाही, असं म्हणायची कोणाची बिशाद आहे?

त्यामुळेच शंकरदादा या अतीव आकर्षक आणि चित्तथरारक नावाने आलेल्या चित्रपटाची वारी करणे क्रमप्राप्तच होते. त्यात पुण्यनगरीचे भूषण ठरलेल्या रतन या चित्रपटगृहात हा सिनेमा आल्यामुळे तर मंगळवारच्या सुट्टीचे नियोजन करायला काहीच अडचण नव्हती. आता ज्यांना रतनची ख्याती माहित नाही, त्यांच्यासाठी सांगायचे तर या चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी कोणताही सामाजिक थर नसून, तिकिट काढणाऱया प्रत्येक व्यक्तीला एकाच पातळीवर आणण्याची किमया साध्य करण्यात आली आहे. चित्रपटगृहाची क्षमता सुमारे शंभर ते दीडशे जणांची असली, तरी एकसमयावच्छेदे करून एवढा जमाव तिथे जमल्याला फार काळ लोटला आहे. त्यामुळे चित्रपट चालू असतानाही अँगल आवडला नसल्यास उठून दुसऱया सीटवर बसण्याचेसुद्धा अन्यत्र दुर्मिळ असलेले स्वातंत्र्य इथे लाभू शकते.

चित्रपटाच्या पोस्टरवर पडैयप्पातील एक दृश्य, चंद्रमुखीतील दोन दृश्ये व मुथ्थुमधील गाण्याची एक झलक, असा सारा जामानिमा बघितल्यानंतर तर एका तिकिटात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पाहायला मिळणार, याची खूणगाठ बांधली. कधी एकदा थिएटरला जाऊन चित्रपट पाहतो असे झाले होते. शेवटीचा तो दिवस आला. सुट्टीचा मुहूर्त साधून स्वारी पोचली थिएटरवर. तिथे अपेक्षेप्रमाणे चार चुकार चेहऱयांव्यतिरिक्त कोणीही नव्हते.

तिकिट काढून आत पोचलो आणि बऱयापैकी, चालू असलेल्या एका पंख्याखालची जागा पटकावली. टॉकिजमधील पंख्याखाली रजनीकांतचा पंखा (फॅन) असा एक पीजेही (मनातल्या मनात) मारून घेतला. आपल्यासारखेच चुकले फकीर पाहून मात्र मन खट्टू झाले. अरे, कुठं रजनीकांतच्या चित्रपटाची रिळे उशिरा पोचल्याने मलेशियाच्या एका थिएटरमध्ये झालेली तोड़फोड आणि कुठं ही रिकामी टॉकिज! ‘रजनीकांतच्या चित्रपटाला प्रेक्षक जमण्याची गरज’…एक हेडिंगही डोक्यात तरळून गेलं. मात्र स्वतःलाच आवरलं…अरे बाबा, तू ऑफिसला आलेला नाहीस…पिक्चर पाहायला आलायस…मग मात्र सगळं शरीर, मन आणि डोकं आवरून धरलं…

शंकरदादा हे चित्रपटाचे नाव असले तरी चित्रपटाशी त्या नावाचा नाममात्र संबंध आहे, हे समजायला साधारण दोन तास लागणार होते. पिक्चर डब करणाऱयांना कदाचित ते महत्त्वाचं वाटलं नसावं…खरं तर आपल्याकडची सिनेमावाली मंडळी बिनकथेचेही चित्रपट काढतात… मग केवळ नावापुरते काढायला काय हरकत आहे. असो. आता दोन तासांच्या हाणामारीची दृश्ये पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथेचा निघालेला निष्कर्ष एवढाच, की रजनीकांत (वीरा) कुठल्यातरी गावात राहत असतो. तो कशासाठी तरी शहरात येतो. एका गायन स्पर्धेत गाणं म्हणतो. (अर्धंच!) कॅसेट कंपनीच्या मालकाच्या मुलीशी त्याचं लग्न होतं. मात्र त्याची आधीची एक बायको असते. ती येते. मध्ये एक दोन प्रसंग घडतात आणि चित्रपट संपतो. वीरा या चित्रपटाची ही हिंदी आवृ्ती आहे, हे आधीच माहित होतं म्हणून बरं.

तिकिटाची संपूर्ण रक्कम मारामारीची दृश्ये पाहण्यासाठी खर्च करण्याचाच प्रेक्षकांनी चंग बांधला आहे, अशी समजूत करून केलेला हा खटाटोप. त्यामुळे हा चित्रपट मुख्यत्वे विनोदी म्हणून मानला जात असला तरी विनोदी दृश्ये शोधण्यातच टाईमपास झाला. नाही म्हणायला गंभीर प्रसंगातील ‘क्यों रे, यहां पर ही तेरे कॅरियर (!) आरंभ हुआ था, यहां पे ही मै उसे खतम करूंगा’ किंवा ‘जब तर तुम मुझ से सामाजिक रूप से विवाह नहीं कर लेते’ अशा वाक्यांनी काय जी विनोदनिर्मिती केली असेल तेवढीच.

शंकरदादा चित्रपटात अभिनेता रजनीकांत असला तरी प्रमुख भूमिका साऊंड इफेक्टचीच आहे. पार्श्वसंगीत खरोखरच चित्रपटाला आवश्यक आहे का, याची चर्चा करणाऱया मंडळींनी एकदा हा चित्रपट पाहावा. रजनीकांत पाऊल टाकतो…ठीश्श ठीश्श ठीश्श…तो मान वर करतो…ठीश्श ठीश्श ठीश्श…हात हलविला…ठीश्श ठीश्श ठीश्श…गुंडाला चोपले…ठीश्श ठीश्श ठीश्श. आता प्रत्येकच चित्रपटागृहात डॉल्बी सिस्टिम असली तर चित्रपटाची मजा ती काय? चित्रपट हे बुद्धीला चालना देणारे असावेत, असं मालकांनी कुठंतरी वाचलं असावं. त्यामुळे त्यांनी संवाद समजून घेण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर टाकली. घ्या बुद्धीला आणि मेंदूला चालना…त्यामुळे अर्धा चित्रपट असाच संवादातल्या रिकाम्या जागा भराचा खेळ खेळत काढावा लागला. असे आणखी चार चित्रपट पाहिले तर आपणही एखाद्या चित्रपटाचे संवाद लिहू शकू बाप. अशा या आवाजाच्या आंधळी कोशिंबीरीत (का बहिरी कोशिंबिरीत!) केवळ ठीश्श ठीश्श ठीश्श…चा आधार फार मोठा वाटू लागला. विशेष म्हणजे थिएटरची शोभा वाढवायला आलेली मंडळीही त्याचा आस्वाद घेत होती, असं दिसलं.

एकूणात हा दोन तासांचा बहारदार कार्यक्रम संपला आणि खूपच ओकेबोके वाटू लागले. पण एका तिकिटात किती मनोरंजन करून घ्यायचं? आपण चित्रपट का पाहतो…तर ममोरंजनासाठी. मग एवढं मनोरंजन करणारा चित्रपट संपल्यावर वाईट तर वाटणारच. असो. मात्र प्रत्येक डब चित्रपट पाहायचा असा निश्चय केलेला मी आता वाट पाहत आहे पुढच्या डब चित्रपटाची. तोही रजनीकांतचा!