
येणारे वर्ष सुखाचे जावो, असे आपल्याला वर्षातून किती वेळेस ऐकायला मिळते, तुम्ही विचार केला आहे का? १ जानेवारी, गुढी पाडवा, दसरा आणि दिवाळी शिवाय तुमचे काही अमराठी मित्र असतील तर त्यांचेही वेगळे…म्हणजे उगादी, पोंगल, विशू, बैसाखी, बिहू इत्यादी. गम्मत म्हणजे, इतक्या शुभेच्छा मिळूनही आयुष्य आहे तसाच आहे. मागील पानावरून पुढे चालू असा म्हणण्याचीही सोय राहू नये, इतके सपक, एकसुरी आणि अर्थहीन. कदाचित म्हणूनच असावे, वर्षांताचे निमित्त काढूनगळ्याखाली दारू उतरविणारे अलीकडे वाढू लागलेत. मध्यरात्रीनंतर इकडे नवे वर्ष लागते आणि बस लागावी तसे दारू पिलेल्यांना ‘सेलिब्रेशन’ लागते! मग पोटात उतरलेली दारू डोक्यात चढते आणि मौज मजेसाठी जमलेले टोळके धिंगाणा घालू लागते. यंदा या धिंगाण्याला मा. न्यायालयानेही हात द्यायचे ठरविले आहे. दारू पिण्याला काल वेळेचे बंधन नसावे असाच जणू काही न्यायालयाचा हेतू असावा. शिवाय दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांना समजून घ्या, असंही सांगितलं आहे. न्यायालय आणि मद्यालय अशी बेधुंद युती जगात बहुधा पहिल्यांदाच अस्तित्वात आली असावी.
आता नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अशी टकळी चालू केल्याबद्दल मला कोणी दोष देईलही. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती कशी बदलेल? ज्या शुभेच्छा दिल्या-घेतल्या आहेत, त्या तरी खऱ्या कुठे आहेत? यांत्रिक संदेशांची देवाण घेवाण हेच त्याचे खरे स्वरूप आहे. मी तर गेल्या दिवाळीत आलेले शुभेच्छांचे मेल यंदाच्या दिवाळीत पुढे पाठविले. सगळी गुगलची कृपा, दुसरे काय. त्याच्यामुळेच असे जुने मेल सांभाळून ठेवता येतात ना. पूर्वीच्या काळी नाही का, बायका एका लग्नात आलेला आहेर जपून ठेवत आणि दुसऱ्या नातेवाईकाच्या लग्नात तो आहेर म्हणून देत. त्याचीच हि आधुनिक आवृत्ती आहे. येणाऱ्या संदेशांमध्ये जुळ्या, म्हणजे अगदी एकसारख्या एक संदेशांची संख्या पहिली, तर माझे समानधर्मा लोक कमी नाहीत, याची खात्री पटते. खरं म्हणजे इतके हुबेहूब संदेश एकावेळी एकत्र पाहिल्याने त्या संदेशांचे अजीर्णच होते. त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदाही शुभेच्छा संदेशांना सुट्टी. जे चाललाय ते खूप छान आहे. ते तसंच चालत राहो ही इच्छा. मात्र त्यासाठी जानेवारी किंवा दिवाळी अशा निमित्तांची गरजच काय? एका इंग्रजी लेखकाची प्रतिमा वापरून लिहायचे तर म्हणावे लागेल…आपल्या शुभकामना या ईश्वरासारख्या असाव्यात…सर्वत्र आणि सगळीकडे उपस्थित मात्र कधीही न दिसणाऱ्या!
