भाजपला झाले तरी काय?

bjp-flag-_new काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांनी एकदा भाजपचे मार्मिक नामांतर केले होते…भागो जनता पकडेगी! भारतीय जनता पक्षाचे आजचे स्वरूप त्यांनी पाहिले तर त्यांनी आणखी तितकेच मार्मिक वाक्य शोधून काढले असते. सलग सहा-सात वर्षे देशाच्या सत्तेवर मांड असलेला हा पक्ष किमान एखादे दशक तरी काँग्रसला पाय रोवण्यास जागा देणार नाही, असे वाटत होते. त्यावेळी कोणीतरी त्यावेळचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना मुदतपूर्व निवडणूक घेण्याचा सल्ला दिला आणि त्यासरशी पक्षात साडेसातीने प्रवेश केला. आता आज तर परिस्थिती अशा पातळीवर आली आहे, की कोणाचा पायपोस कोणाला नाही, अशी परिस्थिती या पक्षाच्या नेत्यांनी निर्माण केली आहे. २००४ साली झालेल्या त्या निवडणुकीत भाजपला अनपेक्षित हार मिळाली आणि त्या धक्क्यातून हा पक्ष आजवर सावरलेला नाही.

सात वर्षांच्या सत्तेनंतर भाजपच्या खासदारांना विरोधी बाकांवर बसावे लागले, त्यावेळी पक्षाला जोरदार धक्का बसला यात आश्चर्य काही नव्हते. त्यानंतर दोन वर्षांच्या आत प्रमोद महाजन यांच्या दुर्दैवी अंतानंतर तर भाजपची वाताहात आणखी जोरात होऊ लागली. मग कधी लालकृष्ण आडवाणी पाकिस्तानात जाऊन वावगी विधाने करू लागले, तर कधी जसवंतसिंह बंडाचा झेंडा फडकवू लागले. उमा भारती आणि कल्याणसिंहांसारखे राज्य पातळीवरील नेते याच काळात पक्षाला सोडून जाऊ लागले.

नितीन गडकरी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरून थेट राष्ट्रीय अध्यक्ष पदावर विराजमान झाले, त्यावेळी ते पक्षाला नवी संजीवनी देतील अशी वेडी आशा काहीजणांना वाटू लागली. राज ठाकरे यांनी विनोद तावडे यांची भेट घेतली, तेव्हा ही नव्या समीकरणांची नांदी असल्याचे त्यामुळेच वाटत होते. मात्र खुद्द गडकरी यांच्या अंगणातच अन् तेही त्यांच्या इशाऱ्यावरून जी नाटके पक्षाच्या नेत्यांनी चालविली आहेत, त्यामुळे २०१४ सालच्या निवडणुकीपर्यंत हा पक्ष राहील का, अशीच शंका उपस्थित होऊ लागली आहे.

गडकरी यांच्या वाढदिवशी पुण्यात विकास मठकरी यांची शहराध्यक्ष पदावर निवड झाली. त्याच दिवशी योगेश गोगावले (जे गोपीनाथ मुंढे गटातील असल्याचे जगजाहीर आहे) यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडाचे निशाण फडकाविले. त्यावेळी शिव सेना-भाजप-रिपब्लिकन पक्षाच्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्यांची देहबोली त्यांची अस्वस्थता उघड करत होती. मठकरी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेची निवडणूक लढविण्याची भाजपची आकांक्षा विनोद तावडे व्यक्त करत होते, मात्र स्थायी समितीचे अध्यक्षपद घेऊन भाजप विरोधी पक्षाचे काम कसे करणार या प्रश्नाचे उत्तर तावडे यांच्याकडे नव्हते. मग “स्थायी समितीचे अध्यक्षपद हे सत्तेचे पद नाही,” असे धाडसी, नागरिकशास्त्राच्या विरोधातील, विधान त्यांना करावे लागले.

पाच महिन्यांपूर्वी दादोजी कोंडदेव पुतळ्याच्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजपने गेल्या महिन्यात राष्ट्रवादीशी घरोबा करून स्थायीचे अध्यक्षपद पदरी पाडून घेतले. त्यामुळे धड ना या बाजूचे धड ना त्या बाजूचे अशी भाजपची अवस्था झाली. या घुमजावचे शिल्पकार स्वतः मठकरीच होत, हेही सर्वांना माहित आहे. दादोजी पुतळा प्रकरणानंतरच्या हाणामारीत मठकरी पुढे असल्याचे टीव्ही कॅमेऱ्यांनी सगळ्या जगाला दाखविले. त्यानंतर स्थायी समितीवर गणेश बिडकर यांची वर्णी लावण्यातही तेच पुढे होते. या अशा तडजोडीच्या आणि फायद्याच्या राजकारणाला कंटाळूनच आमदार गिरीष बापट यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता.

गडकरी गटाने अशी वाकडे पावले टाकली असताना मुंढे यांच्या बाजूनेही तीच रडकथा आहे. एका आठवड्यात दोन कार्यक्रमांना अनुपस्थित राहून मुंढे यांनी स्वतःची प्रतिमा खालावण्यास हातभार लावला. मठकरींच्या निवडीचा निषेध म्हणून मुंढे शिव सेना-भाजप-रिपब्लिकनच्या मेळाव्याला अनुपस्थित राहिले. वास्तविक रिपब्लिकन पक्षाला जवळ ओढण्यात सर्वाधिक वाटा कोणाचा असेल तर तो मुंढे यांचा. युती सरकारच्या काळापासून ते रामदास आठवले यांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. खुद्द आठवले यांनीही ही गोष्ट मेळाव्यानंतरच्या पत्रकार परिषदेत मान्य केली. तरीही पक्षाच्या अंतर्गत राजकारणापायी मुंढे यांनी त्या कार्यक्रमाला फाटा दिला. राष्ट्रीय नेता म्हणून वावरणाऱ्या एखाद्या व्यक्तीला हे खचितच शोभणारे नाही.

त्याच्या एक आठवड्यापूर्वी पुण्यातच भिकूजी इदाते यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती सत्कार समारंभाला आधी जाहीर करूनही मुंढे फिरकले नाहीत. इदाते हे समरसता मंचाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. अगदी शिवसेनेच्या कुबड्या घेऊनही महाराष्ट्रात भाजपला रांगण्यापुरतेही बळ मिळत नव्हते त्यावेळी जी माणसे संघविचाराचा प्रसार करत होती, त्यात इदाते यांचे नाव ठळक होते. संघ कार्यकर्त्यांच्या बळावर बेडकी फुगविणाऱ्या भाजपने कार्यकर्त्यांची प्रतारणा करण्याचा विडाच उचलल्यासारखे हे कृत्य होते. त्या कार्यक्रमात मुंढे यांच्या अनुपस्थितीचे स्पष्टीकरण देताना समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांच्या नाकी नऊ आलेले आणि त्यांची तोंडे पडलेली पाहवत नव्हती.

मुंढे यांच्या अनुपस्थितीला आणखी एक काळी किनार होती. एक महिना आधी कुठल्याशा फुटकळ कारणासाठी पुण्यात आलेल्या मुंढे यांच्या कार्यक्रमाला हजर न राहिल्याबद्दल भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने संघाच्या कार्यवाहाला मारहाण केली होती. त्या प्रकरणावर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी कसाबसा पडदा टाकला होता. त्याही आधी मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांच्याऐवजी राज पुरोहित यांची निवड करण्यासाठी मुंढे यांनी आपले पक्ष सदस्यत्व पणाला लावले होते. आडवाणी यांनी समजूत काढल्याने आणि त्यांच्या हट्ट पुरा केल्याने त्यावेळी त्यांनी बंडाची तलवार म्यान केली. मात्र भाजपला कार्यकर्त्यांपेक्षा सत्तापदांमध्ये अधिक रस असल्याचीच ही लक्षणे आहेत.

पुण्यातील वाद चव्हाट्यावर ही स्थानिक पातळीवरील बाब असल्याचा दावा करायलाही भाजपला वाव मिळाला नाही, कारण अगदी त्याच दिवशी दिल्लीत सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्यातील वाद माध्यमांमधून समोर आला. स्वराज आणि जेटली हे दोघेही मोठे नेते असले तरी लोकाधाराच्या बाबतीत दोघांच्याही खात्यावर फारशी शिल्लक नाही. तरीही पक्षावर वर्चस्व गाजविण्याची ईर्षा काही जात नाही.

अम्मांच्या विजयाचे कवित्व

तमिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत अभूतपूर्व विजय संपादन करून आणि प्रतिस्पर्धी द्राविड मुन्नेट्र कळगमची धूळधाण उडवून राज्याच्या राजकारणात जयललिता यांनी एक नवा अध्याय लिहिला आहे. मागील चुकांपासून योग्य धडा घेऊन आणि प्रतिस्पर्ध्यांच्या उणिवांचा अगदी योग्य पद्धतीने फायदा उचलून त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची तयारी सुरू केली आहे.
कलैञर करुणानिधी आणि त्यांच्या पक्षाला करुणानिधींच्या कुटुंबकबिल्याची हडेलहप्पी भोवली. व्यक्तिभोवती एकवटलेल्या कुठल्याही पक्षाला धडा मिळेल, अशी द्रामुक पक्षाची वाताहात झाली. निवडणूक निकालांच्या पहिल्या विश्लेषणात, अनेक राजकीय तज्ज्ञांनी तर हा अम्मांचा विजय नसून द्रामुकचा पराभव असल्याचे मत व्यक्त केले.
2-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या कौतुकात रंगलेल्या माध्यमांना या पराभवाची चिरफाड करण्यासाठी आयतेच कारण मिळाले. मात्र करुणानिधींची भैरवी सुरू झाली, ती त्यांच्या मुला आणि नातवंडांनी तमिळनाडूत सुरू केलेल्या ‘हम करे सो कायदा’ वृत्तीने. मदुराई जिल्हा आणि त्या शेजारच्या भागात अळगिरी यांनी स्थापन केलेले खाण साम्राज्य, स्टॅलिन व त्याच्या मुलांनी चेन्नैतील चित्रसृष्टीला मुठीत धरण्याचा केलेला आटापिटा आणि मारन कुटुंबियांसोबतच्या भांडणातून कनिमोळींना दिलेले मोकळे रान…या सगळ्या गोष्टी द्रामुकच्या गळ्यातील फास ठरल्या.  ऐन मतदानाच्या दोन दिवस आधी करुणानिधी यांच्या लेखणीतून उतरलेला पोन्नर शंकर हा चि‌त्रपट प्रदर्शित करण्यात आला. थिरुवारुर येथे घरोघरी जाऊन, मी तुमचा मुलगा, सखा, माझ्या मायभूमीतील लोकांनो मला मतदान करा, असा आक्रोश करुणानिधींनी केला. मात्र त्यांच्या भावनिक आवाहनाला यावेळी दाद मिळाली नाही.
निवडणुकीच्या काळात जयललिता प्रचार करत होत्या, त्यावेळी 2-जी स्पेक्ट्रमबाबत त्यांनी फारसा गवगवा केलाच नव्हता मुळी. अनेक राजकीय निरीक्षकांनाही या गोष्टीचे आश्चर्य वाटले होते.
आपले मतदार कोण आहेत आणि राज्याच्या समस्या काय आहेत, याचा पुरता आराखडा पुरट्चि तलैवी (श्रेष्ठ नेत्या) जयललिता यांच्याकडे तयार होता, हे त्यामागचे कारण होते. राज्यातील वाढते भारनियमन, कायदा व सुव्यवस्था आणि महागाई या तीनच मुद्यांभोवती त्यांनी आपला प्रचार फिरता ठेवला होता. मतदानाला येणाऱ्या गोरगरीब जनतेला ७५ हजार कोटी रुपयांच्या काल्पनिक नुकसानीपेक्षा आपल्या घरी वीज गायब असणे महत्त्वाचे, हे शालेय पातळीवर शिक्षण सोडलेल्या अम्मांना माहित होते. त्यांच्या सुदैवाने संपूर्ण निवडणुकीच्या काळात केंद्रीय तपास यंत्रणांनी 2-जी स्पेक्ट्रमचा मुद्दा बातम्यांत येत राहील, याची व्यवस्था केली होती. करुणानिधींच्या विरोधात लोकांमध्ये किती असंतोष भरला होता, याचे उदाहरण काल ‘दिन थंदी’ वृत्तपत्राच्या अग्रलेखात देण्यात आले.
द्रामुकच्या एका मंत्र्याने एका खेड्यातील 10,000 मतदारांना टोकन वाटले होते. त्यांनी या उमेदवाराला मतदान करायचे आणि तालुक्यातील शो-रूममधून टीव्हीएस-50 न्यायची, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्षात केवळ आठ टीव्हीएस-50 नेण्यात आल्या. यावरून लोकांनी किती ठरवून उमेदवारांना घराचा रस्ता दाखवला, याची चुणूक मिळते.
तमिळनाडूत जनतेवर मोठा प्रभाव असलेले चित्रतारकाही द्रामुकच्या विरोधात गेल्याचा सर्वाधिक फटका सत्ताधारी पक्षाला बसला. दोन वर्षांपूर्वी करुणानिधी यांच्या चित्रपट उद्योगातील कामगिरीसाठी त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचे कर्ते-करविते अर्थातच करुणानिधींचे बगलबच्चेच होते. त्या कार्यक्रमात अजित या लोकप्रिय तरुण अभिनेत्याने द्रामुकच्या नेत्यांकडून चित्रपट कलाकारांचा किती छळ केला जातो, या कलाकारांना कसे वेठीस धरण्यात येते याचे जाहीरपणे वाभाडे काढले. तो हा कैफियत मांडत असताना रजनीकांतने उठून उभे राहून आणि टाळ्या वाजवून दाद दिली होती.
‘इळैय दळपदि’ (तरुण सेनापती) या नावाने ओळखला जाणारा विजय याने निवडणुकीच्या काही दिवस आधीच अण्णा द्रामुकमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. विजयच्या दोन चित्रपटांची (वेट्टैकारन् आणि कावलन्) निर्मिती मारन कुटुंबियांच्या सन पिक्चर्सने केली होती. मारन कुटुंबियांशी वितुष्ट आल्यानंतर करुणानिधी कुटुंबाने त्यांच्या व्यवसायात अडथळे निर्माण करण्याची कुठलीही संधी सोडली नाही. त्यात विजयचे चित्रपटही भरडल्या गेले. त्याचा परिपाक त्याने अण्णा द्रामुकशी जवळीक दाखविण्यात झाली. मात्र चतुर जयललिता यांनी यावेळी चित्रपट कलाकारांवर भिस्त न ठेवता स्वतःच्या आराखड्यांनुसारच रणनीती ठेवली. विजयकांत आणि सरतकुमार या दोन अभिनेते-राजकारण्यांच्या पक्षाशी युती केली, तरी त्यांनी त्यांच्यासोबत प्रचारसभा घेतल्या नाहीत. याऐवजी आंध्रातील चंद्राबाबू नायडू यांना आमंत्रित करून त्यांच्या सभा आंध्राच्या सीमेजवळील भागात त्यांच्या सभा घेतल्या.
महाराष्ट्राप्रमाणेच याही निवडणुकीत पैशांच्या आधारावर मतदारांना विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाला. निवडणूक आयोगाने जप्त केलेल्या पैशांचेच प्रमाण ७५ ते ८० टक्क्यांच्या घरात जाते. जयललिता त्यांच्या मागील स्वभावाप्रमाणे वागल्या, तर या पैसे वाटण्याच्या प्रकरणात स्टॅलिनना अडकवून त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावतील, याची दाट शक्यता आहे.  करुणानिधींच्या सत्ताकाळात बांधलेल्या नवीन विधानसभा इमारतीत जाण्याऐवजी जुन्या इमारतीतूनच काम चालविण्याची घोषणा करून जयललिता यांनी स्वतःच्या कणखरपणाची झलक दाखविली आहे.

लोकांनी द्रामुकला इतक्या कठोरपणे धुडकावले आहे, की ३३ जागा मिळविणारा देसिय मुरपोक्कु द्राविड कळगम हा विजयकांत यांचा पक्ष द्रामुकपेक्षा वरचढ ठरला आहे. अण्णा द्रामुकला स्वबळावर सत्ता मिळाली आहे. त्यामुळे युतीतील सहकारी असला, तरी ‘देमुद्राक’ला विरोधी पक्ष म्हणून मान्यता देऊन जयललिता करुणानिधींचा पत्ता साफ करू शकतात. शपथविधी समारंभाला मला बोलाविल्यास मी जाईन, असं विजयकांत म्हणाल्याची आजची बातमी आहे. ती बरीचशी सूचक आहे.