मराठीशी केवळ सख्य…सहवास नको

एका छोट्या शहरातील तितक्याच छोट्या असलेल्या वर्तमानपत्राचे कार्यालय…एक होतकरू व्यंगचित्रकार आपली व्यंगचित्रे घेऊन संपादकाच्या केबिनबाहेर उभा आहे. खूप वेळ वाट पाहायला लावल्यानंतर संपादक महाशय (ज्यांची पदाची एकमेव अर्हता म्हणजे संबंधित वर्तमानपत्राचे मालक असलेल्या राजकारणी व्यक्तीचे ते क्लासमेट…वर्गमित्र आहेत!) आत बोलावतात. सगळी व्यंगचित्रे पाहिल्यानंतर आणि त्यांच्यावर आपल्या मगदुराप्रमाणे भाष्य केल्यानंतर ते प्रवचनबाजीकडे वळतात…

“टाईम्स ऑफ इंडियातील कार्टून पाहात जा. आर. के. लक्ष्मण बघा कसे अगदी फर्स्ट क्लास कार्टून काढतात. व्यंगचित्रात रेखाटनासोबतच कल्पनाही अगदी उत्तम असल्या पाहिजेत. लक्ष्मणना त्यासाठी मानायलाच पाहिजे…,” संपादक महाशयांची रसवंती अशीच चालत राहायची. दोन-तीनदा त्यांच्या केबिनमध्ये आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची प्रशंसा ऐकल्यानंतर व्यंगचित्रकार एकदा थेट मालकांशी संपर्क साधतो. त्यांच्या राजकीय परिस्थितीला अनुकूल असलेले एक व्यंगचित्र निवडून मालक ते छापायला देतात अन ते छापूनही येतं.

सुमारे १३ वर्षांनंतरच्या या घटनेनंतर आजपर्यंत मला त्या व्यंगचित्राचे मानधन मिळालेले नाही. संपादक महाशय मला लक्ष्मण यांचे उदाहरण देऊन थकले मात्र लक्ष्मणना टाईम्स ऑफ इंडिया फुकट राबवून घेत नाही, हे तेव्हा वर्तमानपत्रांच्या धंद्यात नसलो तरी मला कळत होतं. शेवटी मराठीतील व्यंगचित्रांचा नाद सोडून मी जीवनाचे अन्य प्रांत धुंडाळत फिरलो. त्यात एक-दोनदा संस्कृतमध्ये व्यंगचित्रेही काढली आणि ती विनासायास प्रकाशितही झाली!

पोटासाठी अनेक उद्योग केल्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा वर्तमानपत्रांच्याच जगात प्रवेश झाला. मात्र यावेळी भाषा आणि भूमिकाही बदलली होती. ‘आज का आनंद’मध्ये काम करत असताना पत्रकारितेचा आनंद मिळायचा मात्र मराठीत काम करण्याची इच्छा मात्र उसळी मारत होती. खरं तर तशी निकड कोणतीही नव्हती आणि मला हिंदी येत नसल्याची मालक, मुद्रक, प्रकाशक आणि वाचकांचीही तक्रार नव्हती. तरीही काही जणांना नसते उपद्व्याप करण्याचा जीवघेणा छंद असतो. त्यामुळे मराठीत काम करण्याची हौस भागविण्यासाठी केसरीत गेलो. लोकमान्यांचे वर्तमानपत्र म्हणून केसरीबद्दल मला तेव्हा आदर होता. केसरीत गेलो नसतो तर तो, तसेच लोकमान्यांबद्दलचाही आदर तसाच टिकला असता. त्याचे सहानुभूतीत रुपांतर झाले नसते. बिन पगारी फुल अधिकारी हा काय प्रकार असतो ते केसरीत काम करत असताना पहिल्यांदा कळाले. पोटभर पगार आणि मनमुराद काम, ही आपली साधी अपेक्षा. त्याची फलश्रुती इथे पोटापुरता पगार आणि मणभर काम, अशी झालेली होती.

त्यानंतर पुण्यातील सर्वात मोठ्या मराठी वर्तमानपत्रात प्रवेश झाला. आता तरी इतरांसारखा पगार मिळेल, असे काही काळ वाटले. मात्र आपल्याला जे वाटते त्याच वास्तवाशी संबंध असायलाच हवा, असे नाही, हे मला इथे कळाले. शिवाय या लेखाच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे, टाईम्स ऑफ इंडियाचे संदर्भ जोडीला होतेच. शासकीय कर्मचाऱयांना ज्याप्रमाणे हस्तपुस्तिका वाटलेल्या असतात, तसे टाईम्स ऑफ इंडिय हे मराठी वर्तमानपत्रांची हस्तपुस्तिका आहे. मात्र ते केवळ कामाच्या बाबतीत…पगाराच्या नव्हे. पगारासाठी रेफरन्स पॉइंट हा केसरी किंवा प्रभात हाच. तुमच्याकडे किती कौशल्य आहे, तुम्हाला काम काय येतं या मुद्यांना काहीही किंमत नाही. तुम्ही मराठीत काम करत असाल तर तुम्हाला तेवढाच पगार मिळणार. शिरीष कणेकर यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे, “लोकमान्य-आगरकर कशी पत्रकारिता करायचे हे सगळेच सांगतात, ते काय खायचे हे कोणीच सांगत नाही.”

त्यामुळे आता खाण्यासाठी मिळेल, इतपत मिळेल अशा जागी आलो आहे. तात्पर्य एवढेच, की आता मी पुणे मिरर या इंग्रजी दैनिकात रुजू झालो आहे. त्याचमुळे काही कारणांनी नवीन पोस्ट टाकायला उशीर झाला…पण आता नियमित नक्की!