हा पुरस्कार महाराष्ट्राला भूषणावहच!

image

गेल्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सत्तापालट झाला. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधीच्या सरकारच्या तुलनेत वेगळे वाटतील असे फार काही निर्णय घेतले नाहीत. फक्त निर्णय घेणाऱ्या व्यक्ती बदलल्या, निर्णयामागचे तत्वज्ञान आणि विचार बदलले आहे, असे जाणवलेच नाही. जे काही मोजके वेगळे निर्णय घेतले त्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा हा पहिला आणि त्यानंतर आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय हा दुसरा. त्यातील पहिल्या निर्णयाची (निर्णय कमी आणि आदेश जास्त!) उपयुक्तता आणि औचित्य वादग्रस्त आहे मात्र हा दुसरा निर्णय निर्विवादपणे उत्तम आहे. महाराष्ट्राचे भूषण म्हणून हा पुरस्कार दिला जात असला तरी या पुरस्काराचे भूषण महाराष्ट्रालाच वाटावे, असे हे पाऊल आहे.

एरवी महाराष्ट्रात गेली काही वर्षे दुष्काळी परिस्थिती असली तरी पुरस्कारांच्या बाबतीत सुकाळ आहे. कोणतीतरी संस्था, कोणत्या तरी कर्तृत्ववान व्यक्तींना शोधून काढून कोणते तरी भूषण म्हणून ठरवून टाकते. अन् सत्कारार्थी व्यक्तीही ‘अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीन जातं तुण्डम्’ अशा अवस्थेत मंचावर जाऊन त्या पुरस्कारामुळे मी धन्य झालो, असे जाहीर करून टाकते. मात्र काही व्यक्ती अशा स्थानी असतात, की त्या कोणत्याही पुरस्कारांच्या पलीकडे गेलेल्या असतात. बाबासाहेब पुरंदरे हे अशाच व्यक्तीमत्वांपैकी एक!

ज्या लोकांना बाबासाहेबांच्या नावाला विरोध करून आपल्या जातमंडूक (कूपमंडूक तसे जातमंडूक!) वृत्तीचे ढळढळीत प्रदर्शन करायचे आहे त्यांना ते खुशाल करू द्या. ‘आमचेच ऐका नाहीतर खड्ड्यात जा,’ अशा मानसिकतेची ही मंडळी राज्यात सत्ताधाऱ्यांच्या कृपेने पुन्हा डोके वर काढून बसली आहेत. ज्या प्रमाणे उत्तर पेशवाईत रावबाजीच्या आश्रयाने भट-पुरोहितांचे वर्चस्व वाढले आणि त्यांनी सगळ्या समाजाच्या विवेकबुद्धीला ग्रहण लावले तशीच प्रवृत्ती आजही आहे. खरे तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था, किरकोळ मुद्द्यांना आलेले महत्त्व आणि खुज्या लोकांचे वाढलेले महत्त्व, हे पाहिल्यावर ज्यांनी उत्तर पेशवाईचे वर्णन वाचले आहे त्यांना तोच काळ आठवेल.

पुरोगामीपणाचे सोवळे सांभाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रिगेडी बांशिद्यांना मोकळे सोडले. भांडारकरसारख्या निरूपद्रवी आणि बऱ्यापैकी जमिनी बाळगून असलेल्या संस्था ते फोडत होते तोपर्यंत चांगले चालले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मात्र याच लोकांची मजल शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यापर्यंत गेली आणि तेही सरकारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर! त्यानंतर नाकापेक्षा जड होऊ पाहणाऱ्या या मोत्यांचे प्रस्थ हळूहळू आश्रयदात्यांनीच कमी केले. नंतर वाघ्या कुत्र्याच्या निमित्ताने परत या लोकांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला परंतु दादोजींप्रमाणे हा मुद्दा काही फळला नाही. उलट त्याची तीव्र प्रतिक्रिया आली म्हणून तलवारी म्यान करून ही मंडळी बसली. आता बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार मिळणार म्हटल्यावर परत आपले हमखास यशस्वी नाट्य रंगेल म्हणून ही मंडळी आपली शीतनिद्रा सोडून बोलायला लागली आहेत.

बाबासाहेबांच्या कर्तृत्वाविषयी खरे तर आवर्जून सांगायची गरज नाही. आपण इतिहासकार नाही, हे त्यांनी स्वतःच्या मुखाने अनेकदा सांगितले आहे. स्वतःच्या इतिहास वर्णनात काळानुरुप बदल करण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे. तरीही ब्रिगेडींनी एकदा ही जमीन मऊ लागली आणि मग कोपऱ्याने खणण्याची सवय त्यांना लागली. परत त्यांना जितेंद्र आव्हाडांसारखा भक्कम आधारस्तंभ मिळाला म्हणल्यावर काय पुसता? मुंब्र्यातील बेकायदा बांधकाम पाडू न देण्याचा विडा उचलणारे, दहीहंडीची घातक उंची कमी करू देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे आव्हाड याबाबतीत मागे कसे राहतील? राम जेठमलानींनंतर नेहमी चुकीच्या बाजूने सकृद्दर्शनी तार्किक मांडणी करणारा पण रेटून खोटे बोलणारा एक बडबडतज्ज्ञ आव्हाडांच्या रूपाने देशाला मिळाला, एवढेच म्हणायचे. उरला त्यांच्या टिकेचा प्रश्न तर त्याला भर्तृहरीनेच उत्तर देऊन ठेवले आहे – तत्को नाम सुगुणिनां यो न दुर्जनै नाङ्कित (सज्जनांचा असा कोणता गुण आहे ज्यावर कद्रू मंडळी टीका करत नाहीत)?

स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेले पाहवत नाही, अशा कायम दुखणाईत अवस्थेतील ब्रिगेडची मंडळी सकारात्मक गोष्टीसाठी कधी पुढे आल्याचे महाराष्ट्राला आठवत नाही. शिवाजीराजांचे सावत्र राजे व्यंकोजी यांनी राजांचा कायम दुस्वास केला. त्यांच्या सततच्या किरकिरीला कंटाळून राजांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले. त्यात त्यांनी व्यंकोजींना ‘पराक्रमाचे तमाशे दाखवा’ असे एक मार्मिक वाक्य लिहिले आहे. विनाकारण कुरकुर करण्यापेक्षा काहीतरी घडवून दाखवा, असे त्यांनी सांगितले होते. ब्रिगेडच्या सदस्यांना आज परत हेच वाक्य ऐकविण्याची वेळ आली आहे.

घुमानच्या निमित्ताने-9 घुमानचे इष्टकार्यं सिद्धम्!

tumblr_nm9z1uycif1u5hwlmo1_500[1] अमृतसरला हरमंदिर साहेब आणि जालियांवाला बागेचे दर्शन झाल्यानंतर त्या दिवशी तिथेच मुक्काम केला. तेथून परतताना वाघा सीमेवर नेणाऱ्या ऑटोवाल्यांचा पुकारा चालला होता. मात्र एकाच दिवशी हे सर्व करण्याची माझी इच्छा नव्हती. शिवाय संमेलनानंतरचा एक दिवस मी त्यासाठी राखीव ठेवला होता. त्यामुळे त्या दिवशी विश्रांती घेण्याचे ठरवले आणि बस स्थानकावरील खोलीत परतलो.

रात्री बस स्थानकाशेजारीच एका हॉटेलमध्ये जाऊन मिनी थाळी मागविली. तमिळनाडूत ज्या प्रमाणे राईस प्लेट या संज्ञेत चपातीचा समावेश होत नाही, त्याच प्रमाणे पंजाबमध्ये थाली या संज्ञेत भाताचा समावेश होत नाही, अशी माहिती या निमित्ताने झाली. तरीही मिनी थाली ४० रुपये आणि भाताची प्लेट ३० रुपये या हिशेबाने ७० रुपयांत अगदी शाही जेवण झाले. बटाटा आणि टोमॅटोची भाजी आणि शेजारी गरमागरम रोटी असा जामानिमा होता. गायकाला जसा जोडीला तंबोरा लागतो तसा या जेवणाला सोबत करण्यासाठी अख्खा मसूर होताच. आधी ते दृश्यच पोटभर पाहून घेतले. आचार्य अत्रे असते तर ‘तो पाहताच थाला, कलिजा खलास झाला’ असे एखादे गाणे त्यांनी नक्कीच लिहिले असते. मग जेवण जे काय रंगले म्हणता, पाककर्ता सुखी भव असा तोंडभरून आशिर्वाद देऊन मी रजा घेतली आणि झोपेच्या स्वाधीन झालो.

सकाळी खाली उतरून लगेच समोरच्या प्लॅटफॉर्मवर घुमानची गाडी शोधली. पंजाबच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असे झाले असेल, की अमृतसरहून सुटणाऱ्या बसमध्ये पंजाबी लोकांपेक्षा मराठी लोक जास्त असतील. एकूण प्रवाशांपैकी सुमारे अर्धे लोक मराठी होते आणि त्यांच्यापैकी बहुतेकांकडे शबनमी होत्या. परंतु ते संमेलनालाच निघाले होते, हे ओळखण्यासाठी शबनमींची गरजच नव्हती. ज्यांच्याकडे शबनम नव्हती, त्यांच्याही तोंडातून मराठी शब्द बाहेर पडला, की त्यांचे तिकिट कुठले असणार, याचा अंदाज यायचा. एखाद्या जत्रेला निघावे, तशी ही मंडळी घुमानला निघाली होती. त्यात अकोला, बुलढाणा अशा गावांमधून आलेले लोक होते. माझ्याशेजारी बसलेली व्यक्ती पुण्याहून आली होती. त्यांच्यासोबत देहू संस्थानचे माजी विश्वस्त आणि तुकाराम महाराजांचे वंशज होते. ते बियासवरून आले होते. त्यांनी एक गंमत सांगितली. मुंबईहून सुटणारी गाडी येणार म्हणून जागोजागच्या गुरुद्वारांमधील लोकांनी स्वागताची, पाहुणचाराची जय्यत तयारी केली होती. परंतु या गाडीला उशीर झाल्यामुळे त्या लोकांची तयारी फलद्रूप होऊ शकली नाही. माझ्या सोबत बसलेली मंडळी जेव्हा बियासला उतरली तेव्हा या लोकांनी त्यांना बळेबळेच आपल्यासोबत नेले आणि मुक्काम करायला लावला. त्यांना खाऊ-पिऊ घातले.

ते काही असो, घुमानला गाडी पोचली आणि तेथील चौकातच पताका-झेंडे आणि बॅनरनी आमचे स्वागत केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर तर लावले होतेच पण काही स्थानिक शिवसैनिक गळ्यात भगव्या पट्टे घालून उत्साहाने जमले होते. संपूर्ण रस्त्याच्या कडेने पांढरी रांगोळी होती, रस्त्यावर पताका फडकत होत्या. घुमानचा गुरुद्वारा मुख्य रस्त्यापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण रस्ता १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला सजावा तसा सजला होता. जागोजागी लोकांनी लंगर लावले होते आणि चहा-पकोडे मुक्तहस्ते वाटल्या जात होते. मुख्य म्हणजे संपूर्ण गावात पंजाबीपेक्षा मराठी वाक्ये अधिक ऐकू येत होती.

गावात लॉज आहे का, असे मी एकाला विचारले. कारण मी आगाऊ नोंदणी केली नव्हती. संमेलनासाठी पुण्यातून जे वऱ्हाड निघाले होते त्यात मी नव्हतो. इतकेच काय, संजय नहार यांची ओळख असली तरी मी येणार आहे, हे मी त्यांनाही सांगितले नव्हते. त्यामुळे गावात उतरायला जागा मिळेल का, ही माझ्या मनात धाकधूक होतीच. मला उत्तर मिळाले, की गावात लॉज नाही. गुरुद्वाऱ्याचे यात्री निवास आहे, मात्र त्याची नोंदणी आधीच झाली असणार. मग एका इंटरनेट कॅफे चालकाने सल्ला दिला, की शेजारच्या शाळेमध्ये जागा असेल तिथे चौकशी करा. तेथे गेल्यावर जागा आहे का, असे विचारल्यानंतर तेथील व्यक्तीने होकार भरला आणि नाव-गावाची नोंद केल्यानंतर एका मुलाला मला जागा दाखविण्यास पाठविले. दशमेश पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात अशा तऱ्हेने माझा मुक्काम पडला.