क्रिकेट, मनोरंजन का केवळ राजकारण

दुसरी इनिंग
———-
हमदशाह अब्दाली याच्या भारतातवर तीन स्वाऱया झाल्यानंतर त्याला हग्या मार देऊन परत कधीही न येण्यासाठी जाण्यास मराठ्यांनी भाग पाडले. त्याप्रमाणेच गेल्या दीड एक वर्षात सर्व स्पर्धांमध्ये मार खाल्यानंतर अचानक बीसीसीआयच्या संघाने विजय मिळविला. यात त्यांचे कर्तृत्व होतेच. विजयासाठी त्यांचे कौतुक होणेही साहजिकच होते. मात्र ‘अति सर्वत्र वर्जयेत्’ या पूर्वजांच्या सल्ल्याकडे लक्ष देतील तर ते भारतीय कसले? त्यामुळे मग केवळ एखाद्या राजाचा राज्याभिषेक सोहळाच भासावा, असा या खेळाडूंचा जंगी सत्कार करण्याचा घाट घालण्यात आला. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच युवराजची आई, रोहितचे बाबा अशा नामवंत आणि तज्ज्ञांच्या मुलाखती विविध वाहिन्यांवरून दाखविण्यात आल्या, तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र संघ जिंकल्यानंतर पालीचे हे चुकचुकणे डायनासोरच्या गुरगुराटीत बदलले होते.
रणांगण आणि ‘रनांगण’ यात भारतीयांची नेहमीच गल्लत होते. त्यात समोर पाकिस्तान म्हटल्यानंतर तर काही बोलायलाच नको. बीसीसीआयचा संघ मुंबईत दाखल झाला आणि तेथून वानखेडे मैदानापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी अख्ख्या मुंबई महानगरीच्या वाहतुकीला वेठीस धरण्यात आले. मुंबई म्हणजे काही पुणे नाही, की वाहतूक चालेल आपली रामभरोसे. आधीच गणेश विसर्जनासाठी आदल्या दिवशी शहराला विश्रांती मिळालेली नव्हती, त्यात हा त्रास. अनुत्पादक कामासाठी देशाच्या आर्थिक राजधानीला वेठीस धरण्याची काय ही वृत्ती? अन गप्पा करायच्या महासत्ता होण्याच्या.
आता पब्लिक जमा झाली म्हणजे आपले स्वयंघोषित पब्लिक सर्वंटही तिथे पोचणारच. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे या खेळातील ‘मंजे हुए खिलाडी.’ साहेब सर्वांत आधी मैदानात शड्डू ठोकून हजर होते. त्यांच्या जोडीला महाराष्ट्राचे अतिकर्तृत्ववान मुख्यमंत्री विलासराव देशमुखही मांड ठोकून बसले होते. पवार यांच्या कारकीर्दीतच तर भारतीय क्रिकेटची भरभराट झाली ना! इंग्लंड, दक्षिण आफ्रिका दौऱयातील एकदिवसीय सामन्यांतील मानहानीकारक पराभव, चॅपेल गुरुजींच्या ट्यूशन घेऊन गांगुलीच्या कारकीर्दीचा केलेला खेळखंडोबा, त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत १९७९ नंतर न जमलेली पहिल्याच फेरीतील एक्झिट…अशा एकाहून एक चढत्या पायऱयांनी बीसीसीआयचा संघ प्रगती करत होता. त्यात विश्वचषक, मग ती वीस-२०चा का असेना, संघाने जिंकल्यानंतर आपल्या अध्यक्षपदाचे सार्थक झाल्यासे साहेबांना वाटले तर काय नवल? त्यामुळे समस्त भारतीयांना सात शतकांत न मिळालेला गौरव मिळवून दिलेल्यांचा गौरव करण्यासाठी ते ही आले.
‘राष्ट्रवादी’ आल्यावर ‘महाराष्ट्र’वादी न येऊन कसे चालेल. त्यामुळे लातूरचे देशमुखही आले. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी पॅकेज दिल्यानंतरही विदर्भात दीडशे-दोनशे शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. तेव्हा देशमुखांचे मन द्रवल्याचं दिसलं नाही. उलट केंद्रातील शंकरसिंह वाघेला नामक नेत्याच्या साथीने गेल्याच महिन्यात शेतकऱयांबद्दल आक्षेपार्ह उदगार काढल्य़ाबद्दल त्यांचा अनेक ठिकाणी उद्धारही झाला. मात्र वीस-२० स्पर्धेत संघाने विजय काय मिळविला, देशमुखांची देशभक्ती १०० टक्के जागी झाली. त्यातून त्यांनी खेळाडूंसाठी बक्षीसही जाहीर केले. महाराष्ट्रातील पन्नासेक जवान तरी गेल्या वर्षभरात काश्मीर आणि देशाच्या अन्य भागात शहीद झाले. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही केल्याचे, केल्याचे कशाला जाहीर केल्याचेही आठवत नाही.
याच राज्यातील अन्य खेळांतील अनेक खेळाडू प्रोत्साहनावाचून खितपत पडले आहेत. कोल्हापूरच्या वीरधवल खाडे या जलतरणपटूला ऑलिम्पिकमध्ये सहभागाची संधी मिळावी, यासाठी सकाळने गेल्या वर्षी मोहीम चालविली. शिवछत्रपती पुरस्कार आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार जाहीर करूनही अनेक खेळाडूंना ते वेळेवर मिळत नाहीत. त्यावेळी सरकार हलल्याचं दिसत नाही. आता मात्र क्रिकेटपटूंसाठी पुरस्कार वाटण्यात पुढाकार घ्यायला तयार. एकतर बीसीसीआय आणि अन्य पुरस्कर्त्यांनी जाहीर केलेल्या पुरस्कारांपुढे राज्य सरकारचे पुरस्कार म्हणजे हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागते असाच प्रकार आहे. पण काय करणार, सभा हसली की माकडाला हसावंच लागतं.
एकूणात भारतीयांचं सेन्स ऑफ प्रोपोर्शन चांगलंच बहरू लागलंय. आपल्याच देशात आपण असे वागू लागलो, तर परकीय शत्रूंची गरजच काय?

क्रिकेट, मनोरंजन का केवळ राजकारण

सबकुछ ट्वेंटी-२०!

त्रिभुज हिंदुस्तानी उपखंडात एकदिवसीय क्रिकेटचं वेड कमी होतं म्हणून की काय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘आयसीसी’ आता ट्वेंटी-२० क्रिकेट सुरू केलं आहे. खरं सांगायचं तर या सामन्यांना आपला मनापासून पाठिंबा नव्हता. आताही नाही. त्यात या सामन्यांमध्ये डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी पाच साडेपाच फुटांचे हलते आणि जीवंत देखावे उभे केल्यामुळे हे क्रिकेटचे सामने आहेत, की रामगोपाल वर्मा किंवा डेव्हिड धवनचे सिनेमे आहेत, हा कूटप्रश्नच निर्माण झाला.

तरीही भारतीय संस्कार असे एकाएकी थोडेच जाणार? त्यामुळे एकदा सामन्यांना सुरवात झाली आणि ‘मन मॅचरंगी रंगले’ अशी अवस्था झाली. संपूर्ण स्पर्धा बारा-तेरा दिवस चालली. यात दोन वेळेस हृदयविकाराचे झटके येण्याची वेळ आली होती. मात्र त्याच वेळेस गणेशोत्सव चालला असल्याने तेवढे एक विघ्न टळले.

पहिल्या काही सामन्यांमध्ये किरकोळ संघांशी गाठ पडली. नंतर मात्र पाकिस्तानशी सामना आला आणि ट्वेंटी-२० विरोधातील सगळा अभिनिवेश मागे टाकून आपण बीसीसीआयच्या संघाला पाठिंबा दिला. (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत नाही, असे प्रतिज्ञापत्र बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वी दाखल केले होते, आठवते ना.) त्या सामन्यात बीसीसीआयच्या संघाने ट्वेंटी-२०च्या मानाने अत्यंत कमी धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा निकाल ऐकणे आपल्या कानाला झेपणार नाही, याची खूणगाठ बांधली होतीच. मात्र त्या दिवशी निळ्या कपड्यांतील गड्यांनी वेगळाच डाव केला. त्यांनी पाकिस्तान संघाच्या एकामागोमाग विकेट काढल्या. झालं, आता आम्हाला काम सोडून मॅच पाहावा लागणार! झालंही तसंच. हातातलं जे काय काम होतं, ते उरकलं, नाहीतरी दुसऱया दिवशी आम्ही लावलेले पान कोणी वाचणारच नव्हतं. लोकं मॅचची बातमीच वाचणार होते. साधारण अकराच्या पुढे स्वारी दूरचित्रवाणी संचाच्या समोर स्थानापन्न झाली. (म्हणजे उभी राहिली. ऑफिसमधील खुर्च्यांचे बुकिंग आधीच झाले होते.) क्रिकेटच्या मोठ्या सामन्यांचं एक बरं असतं. जमलेली गर्दी त्यांच्या कॉमेंटस् अगदी जीवाच्या कराराने देत असतात, त्यामुळे आपल्यासारख्या नाठाळ क्रिकेटबाजाला सामना कसा चालू आहे, ते कळत राहतं.

गर्दीच्या कॉमेंटमधून वाट काढत मॅच अशा वळणावर पोचला की, आता १९८६ सालच्या शारजातील सामन्याची रिप्ले बघायला मिळणार याची खात्री पटली. मात्र शेवटच्या चेंडूवरही धावा काढण्यात पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले आणि सामना बोल आऊट मध्ये गेला. आता बोल आऊट, फ्री हिट इ. इ. यावर भवती न भवती सुरू झाली. छातीवर मणामणाचं ओझं ठेवणारे ते काही मिनिटे गेले. बॉल आऊट सुरू झालं आणि काही मिनिटांनी बीसीसीआयचा संघ जिंकल्याचंही दिसलं. आपले गंगेत घोडे न्हाले. आता विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकलो गेलो, तरी काळजी नाही, असं निश्चिंत बसलो होतो. पण हाय रे दैवा, यंदा बाप्पा काही वेगळाच प्लॅन करून आले होते. एरवी काळेनिळे होईपर्यंत मार खाणारे मेन इन ब्लू आता पार अंतिम फेरीपर्यंत गेले होते.

सोमवार. २४ सप्टेंबर. सुदैवाने अंतिम सामना साडेपाच वाजता सुरू व्हायचा होता. त्यामुळे स्वारी कार्यालयात असली तरी कामात नव्हती. याहीवेळी समोर पाकिस्तान होता. आता साखळी सामन्याची रिप्ले होणार का छोड दे इंडिया होणार, हे याची देही याची डोळा पाहणे ही काळाची गरज होती. प्रथेप्रमाणे कार्यालयातील टीव्हीसमोर मानाचा शेवटचा प्रेक्षक म्हणजे डीडी आल्यानंतर सामना सुरू झाला. याही वेळी १५७ धावा काढून नीलपुरूष कपड्यांच्या खोलीत (ड्रेसिंग रूम) परतले. आता पुढे काय होणार याची स्थानिक, प्रामाणिक, वैतागिक आणि अगतिक(ही) तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली. काही वेळाने पाकिस्तानचा डाव सुरू झाला. तेव्हाच मॅच संपल्याशिवाय पान लावायला येणार नाही, असा निरोप पाठविला होता. पाकिस्तानचा डाव मागील पानावरून सुरू झाला आणि तिथेच संपला. कोण खेळतंय, कोण हरलंय आणि कोण जिंकलंय, अशा मूलभूत जिज्ञासेपलिकडे जाण्याचा आपला स्वभाव नाही. त्यामुळे कोण बाद झालंय, कोण आबाद झालंय…वगैरे वगैरे बाबींकडे आपलं लक्षच नव्हतं. क्रिकेटचे सामने पहायचे ते केवळ प्रेक्षकांतील हलते देखावे पाहण्यासाठी आणि जाहिरातींद्वारे प्रबोधन करून घेण्यासाठी, असं आपलं नेटकं धोरण आहे.

या धोरणाला पहिला तडा गेला सामन्याच्या शेवटून दुसऱया षटकात. मिस्बाहने एकामागोमाग षटकार आणि चौकारांची मालिका सुरू केली. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही षटकार गेला आणि हृदयविकाराचा दुसरा झटका येण्याची चिन्हे दिसू लागली. चार चेंडू अन् सहा धावा…इकडे बाप्पांचा धावा सुरू झाला. मात्र बाप्पांनी तोपर्यंत तरी निरोप घेतलेला नसल्याने ते धावून आले…मिस्बाहने विनाकारण विकेट फेकली आणि चेंडू उंच भिरकाविला…हाताचा रिस्टबँड नीट करण्यात गुंतलेल्या श्रीशांतनेही तो फटका लीलया झेलला आणि एकदिवसीय क्रिकेटच्या लिंबू-टिंबू स्पर्धेत बीसीसीआयच्या संघाने विजेतेपद पटकावले.

स्पर्धेची एक इनिंग इथे संपली. आता दुसरी इनिंग आपण पाहणारच आहोत, मात्र ते ब्रेक के बाद!

राम बोलो भाई राम बोलो

राम सेतु नामक एका प्राचीन जागेवरून आधुनिक काळात एक ‘ऐतिहासिक वाद’ चालू आहे. या वादाबद्द्ल काही जणांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही मत मतांतरे…

गणेश‘खाद्य’उत्सव

णेशोत्सव म्हणजे (साऊंडसिस्टिमवाल्यांच्या) उत्साहाचा उत्सव! गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचा (दुकानदारांच्या…यात शॉपपासून मंदिरांपर्यंत सर्व आले) काळ. गणेशोत्सव म्हणजे मांगल्याची पर्वणी (दहा दिवसांत दोन सुट्या…शिवाय शनिवार, रविवारे वेगळे…याहू!) अशा या काळात पोट आणि जीभ या दोन्ही अवयवांना सुस्थितीत ठेवण्यासाठी तसेच आनंद द्विगुणित ठेवण्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ करण्यात येतात. मात्र आहे त्याच पदार्थांची पारंपरिक चव घेण्यात काय “चीज’ नाही. त्यासाठी उत्सवाला येणाऱ्या आधुनिक स्वरूपाप्रमाणे काही पदार्थांची वेगळी मांडणी करावी लागणार आहे. अशाच काही “रिमिक्‍स’ पदार्थांची ही वेगळी झलक.
  • अंगाची कडबोळी

हा खास पुण्यासाठी तयार करण्यात येणारा पदार्थ. इतर शहरात लोकांना हा पदार्थ “रुततो,’ पुणेकरांना मात्र हा पदार्थ जरा जास्तच रुचतो. गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या गल्लीबोळांमधून खास या पदार्थाचे अनेक प्रात्यक्षिके चालू असतात. खास करून रात्रीनंतर हा पदार्थ अधिक “आस्वाद्य’ असल्याची “दंतकथा’ आहे. गणेशोत्सवाशी या पदार्थाचा तसा “उत्सवी’ संबंध असला, तरी वर्षभर रस्त्यावर या ना त्या प्रकारे हा पदार्थ उपलब्ध असल्याचा फायदा या शहरातील लोकांना मिळतो.

हा पदार्थ तसा खेडेगावात दुर्मिळ. गर्दीच्या वेळेत आणि गर्दीच्या संगतीतच याची खुमारी वाढते. अन्य ठिकाणीही हा पदार्थ करण्याचे प्रयत्न झाले असले, तरी पुण्यनगरीतच हा पदार्थ खऱ्या अर्थाने खुलतो. त्यासाठी पुण्याची खास भौगोलिक रचना कारणीभूत आहे. या पदार्थामुळे शरीर अगदी लवचिक होते, असे म्हणतात.अरुंद गल्लीबोळ, बेशिस्त वाहनचालक, हेकेखोर फेरीवाले असे अनेक प्रकारचे वाणसामान या पदार्थासाठी लागते.

  • कानाची शंकरपाळी
हाही तसा मूळचा पुण्याचाच, मात्र हळूहळू “अख्ख्या’ महाराष्ट्रात “फेमस’ होत असलेला पदार्थ. शंकरपाळ्याचं जसं वैशिष्ठ्य हे, की ते कितीही दिवस पुरवून खाता येतात, त्याचप्रमाणे हाही पदार्थ! अगदी तीस तीस वर्षांची जुनीच गाणी वाजवून वाजवून या पदार्थाला “साग्रसंगीत’ स्वरूप देता येते. प्रत्येक गणेश मंडळांच्या अध्यक्षाच्या मर्जीनुसार या पदार्थाची चवही बदलते. त्यामुळे कॉलनी-कॉलनी नुसार हा पदार्थ वेगळा लागतो. अलीकडे पुण्यात दिवसभर “इटस हॉट’ करत दिवस व रात्रभर, अन्‌ तेही बारा महिने याच्या अनाहूत विक्रीची व्यवस्था सुरू असते. महाराष्ट्राच्या अन्य शहरातही तो पदार्थ पोचविण्याचे प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कानाच्या पाळ्या गरम होतात, असा अनुभव आहे.
शंकरपाळे हे जसे सपकपासून गोडपर्यंत सर्व चवींमध्ये “ऍडजस्ट’ होऊ शकतात, तसे हा पदार्थही कुठल्याही म्हणजे फिल्मी, पॉप (कॉंटिनेंटल), रिमिक्‍स (ए भाऊ..ते ब्राझील लाव रे जरा!!), पंजाबी (दलेर लाव दलेर!)अशा विविध पद्धतीने मिळू शकतो. या पदार्थाची रेसिपीही तशी सोपी आहे. कुठल्याही कंपनीचा थोडासा “डल’ झालेला “डेक’ कार्यकर्त्याच्या घरून आणायचा. त्यात “कॅसेट’ टाकून तारस्वरात लावायची आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे पाहून फिदीफिदी हसत बसायचं. नंतर दोन “तार सुटल्या’ की झाला “कानाच्या शंकरपाळी’ तयार.

  • गाण्यांचा म्हैसूरपाक
हा खास विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी होणार पदार्थ. अलीकडे नवरात्रात “तोरण’ नावाच्या कार्यक्रमामुळे त्याचा पुनःप्रत्यय येत असतो. म्हैसूरपाक जसा जुना झाल्यावर खाल्यास मजा येते, तसंच या पदार्थाचेही असते, असे जाणकार सांगतात. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक अशा “ओ की ठो’ न कळणाऱ्या भाषेतील कोणत्याही एका गाण्याचे दळण घालायचे, त्याला फक्त ठेक्‍याच्या आचेवर परतायचं की झाला गाण्यांचा म्हैसूरपाक तयार. याचा “बार’ भरल्यानंतर ते सहन झालं नाही, तर काहीजण पेटके आल्यासारखे हात-पाय झाडतात असं काही वरिष्ठांचं म्हणणं आहे. मात्र ज्यांनी एकदा का या पदार्थाची चव घेतली, ते पुन्हा दुसऱ्या पदार्थांकडे वळत नाहीत, असं या पदार्थांची विक्री करणारे सांगतात.
या पदार्थाचं वैशिष्ठ्य असं, की याला गोड, तिखट, कडू अशी कोणतीही चव असण्याचे कारण नसते. खाण्याऱ्यांचाही त्यासाठी काही आग्रह नसतो. हा पदार्थ कशाचा केलेला असतो, याच्याशीही अनेकांना देणे-घेणे नसते. तो विंध्याचलाच्या खालच्या प्रदेशातला असावा आणि फक्त तोंडात टाकला की “किक्‌’ बसली पाहिजे, एव्हढीच माफक अपेक्षा खाण्याऱ्यांची असते. या पदार्थाच्या धर्तीवर काही जिन्नस पाडण्याचे प्रयोग महाराष्ट्र देशातही होत आहेत. मात्र अद्याप तरी त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही, एव्हढे खरे.

  • आराशींचे अनारसे
पुण्यात सुमारे सत्तर-पंचाहत्तर वर्षांपूर्वी जन्माला आलेला आणि महाराष्ट्रात लोणच्याप्रमाणे मुरलेला हा अत्यंत ज्वलज्जहाल पदार्थ. सुग्रास अन्नपदार्थांनी भरलेल्या ताटात चटणीचे जे स्थान, तेच आरास आणि सजावटींचे गणेशोत्सवाच्या “मेनू’त स्थान. थोडक्‍यात म्हणजे अन्न पदार्थांऐवजी सर्वाधिक खपाचा जिन्नस हाच. गणेशोत्सवाचा भटारखाना “मॅनेज’ करणाऱ्या सर्व मंडळांना याच पदार्थावर ध्यान द्यावे लागते. पंचतारांकित हॉटेल्समध्ये ज्याप्रमाणे अधूनमधून “एथनिक फूड फेस्टिव्हल’ असतो, त्याप्रमाणे अपार लोकप्रिय असलेल्या गणेश मंडळांना दरवर्षी विविध भागांतील मंदिरे उभा करावी लागतात, इमारती खड्या कराव्या लागतात. त्याशिवाय या पदार्थाची भट्टी जमत नाही. लोकल टेस्ट येत नाही.

या भटारखान्यांचा धंदा “आराशींचे अनारसे’ नामक पदार्थावर अवलंबून असतो. मात्र या पदार्थाची रेसिपी एव्हढी क्‍लिष्ट आणि महागडी आहे, की त्या भागातील लोकांना आराशीचे अनारसे म्हणजे त्यांच्या राशीला आलेला मंगळच वाटतो. ते काहीही असले तरी आराशींचे अनारसे नामक पदार्थ जमला, तर गणेशोत्सवाच्या मेजवानीला एक वेगळीच रंगत चढते हे नक्की!

  • शिस्तीचे खोबरे

अस्सल लोकांचा पदार्थ. हा पदार्थ केवळ भारतासारख्या लोकशाही देशामध्येच जन्म घेऊ शकतो. कोणताही ठराविक घटक पदार्थ नसलेला, करण्याची पद्धत नसलेला असा हा स्वयंभू पदार्थ आहे. शहरी वातावरणात याची चव जास्त रेंगाळते. चार पादचारी, दोन दुचाकीचालक, एक कार, एक पीएमटी (मुंबई वगळता अन्य शहरांत स्थानिक बसेस चालतील, मुंबईत हा पदार्थ क्वचितच मिळतो) या सर्वांचे एक वाटण करायचे. त्याला बंद ट्रॅफिक सिग्नलच्या मंद आचेवर काही वेळ ठेवावे. त्यात कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये वाद झाला, की कुठल्याही रस्त्यावर अगदी “इन्स्टंटातल्या इन्स्टंट’ फूडपेक्षाही तडकाफडकी असा हा पदार्थ तयार होतो. सायंकाळी करायचा झाल्यास, “आराशींचे अनारसे’ या पदार्थासह तयार होतो. शिवाय भारनियमन, दंगल, मोर्चे अशा प्रसंगीही हा पदार्थ तयार होऊ शकतो. त्यादृष्टीने सर्वात सोपा! थंड हवामान या पदार्थाला अजिबात मानवत नाही, त्याचप्रमाणे खाणाराही थंड डोक्‍याचा असून चालत नाही.

  • देणगीचे मोदक

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी…कोणत्याही स्थळी न चुकता “दर्शन’ देणारा हा पदार्थ. गणेशाला मोदक जरा जास्तच आवडत असल्याने तर गणेशोत्सवात या पदार्थाला काहीसा जास्तच वाव मिळतो. बहुतांश ठिकाणी हा गणेश मंडपातच असतो, मात्र गणपतीच्या आधीच तो नजरेला पडतो. हा स्वभावाने काहीसा “सामिष’ पदार्थ असल्याने एक फार मोठा वर्ग या पदार्थापासून हात राखूनच असतो. याचा एक विशेष असा, की खाणारा आणि खाऊ घालणारा यांतील भेदच हा पदार्थ मिटवून टाकतो.

या पदार्थाला काही चवच नसून, चवीचा केवळ आभास आहे, असं सांगणार एक वर्ग आहे. याउलट जगात खाण्यासारखा असा हा एकच पदार्थ असून, बाकी केवळ “तोंडी लावण्या’साठी आहे, असं मानून चालणारा एक वर्ग आहे. हे दोन्ही वर्ग गणेशोत्सवात एकत्र येतात, त्यामुळे या दहा दिवसांत हा पदार्थ विशेषत्वाने खपतो. बाजाराच्या नियमानुसार ज्याचं दुकान अधिक चकचकीत, त्याच्याकडे हा पदार्थ अधिक खपतो. तरीही हा पदार्थ तयार होण्यास काहीसा वेळ लागतो. गणेशोत्सवासाठी हा पदार्थ तयार करायचा झाल्यास सुमारे एक ते दीड आधीपासून तयारी करावी लागते. तयार करतानाही मिश्रण सारखे “हलवावे’ लागते. सातत्याने चव बघावी लागते. हा पदार्थ दिसायला सर्वत्र दिसला तरी त्याची चव मात्र फार कमी जणांना मिळते. अगदी अल्प स्वल्प संख्येतील काही जण हे वर्गणीचे मोदक पोटभर खातात. पण त्यामुळे त्यांची प्रकृती जी काही सुधारते म्हणता, पोट असे तरारून येते…पुढल्या वर्षी त्यांचा देह साक्षात गणेशमूर्तीशीच स्पर्धा करायला लागतो. अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असे हे खाद्य असल्याचे खाणारे सांगतात.

ही झाली काही वानगीदाखल मांडलेल्या पदार्थांची नावे. खरं तर गणेशोत्सवासारखा उत्सव अशा विविध पदार्थां आणि रंगाढंगांनी भरला आहे. त्याची लज्जत काही औरच आहे. ते सर्व इथे देणे शक्य नाही. तरी ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून हेच गोड घ्यावे. इत्यलम!

युरेका…युरेका! असू दे इंडिया!

युरेका…युरेका! फॉर्म्युला सापडला…! यशाचा हमखास फॉर्म्युला मिळाला आहे. आता या देशात कुठल्याही क्षेत्रात हमखास काही कामगिरी करणे बिल्कुल अशक्‍य नाही. भरघोस काही करायचं असलं, की फक्त एकच करायचं…चित्रपट काढायचा! सत्यघटनेवर असला तर दुधात साखर. मात्र नसला तरी बिघडत नाही. एक स्टार घ्यायचा, बाकी “चांदण्या’ घ्यायच्या…तो रिलीज करायचा आणि घ्या…आपल्या पदरात प्रत्यक्ष घबाड पडणारच!

आशिया चषक हॉकी स्पर्धेत कोरियाला हरवून भारताने विजय मिळविला. त्यामागे संघाला खरी प्रेरणा प्रशिक्षक किंवा खेळाडूची होती का? तुमची जीभ रेटते कशी हो म्हणायला…प्रशिक्षक काय यापूर्वी घसा खरवडून शिकवत नव्हते? खेळाडू त्यांच्या हॉकीचे पाणी मैदानावर दाखवत नव्हते? होते…मात्र “चक दे इंडिया’ आला आणि या खेळाडूंनी हम भी कुछ कम नहीं, हे प्रत्यक्ष दाखवून देण्याची संधी साधली. त्यामुळे आता भारत मार खात असलेल्या अन्य क्षेत्रांत (अन्‌ त्यांची जंत्री केवढी मोठी आहे!) हेच सूत्र वापरून देशाला प्रगतिपथावर नेणे शक्‍य नाही का?
आता हेच बघा ना! अणु कराराच्या मुद्द्यावरून सरकार आणि डाव्यांची केवढी रस्सीखेच चालू आहे? तडजोडी, वाटाघाटी आणि चर्चा करता-करता अनेक युवा कम्युनिस्ट नेते अकाली प्रौढ आणि अकाली वृद्ध होताहेत. त्यांच्यासाठी एखादा चित्रपट काढता येईल. एक नेता परदेशात करार करायला जातो. त्याच्यावर देशात प्रचंड टीका होते. मात्र तो नेता स्तब्ध असतो. (गंभीर किंवा खंबीर नव्हे!) काही दिवसांनी भारतावर शत्रू आक्रमण करत येतो. त्यावेळी आपला नेता शत्रूला कराराचे बाड फेकून मारतो. शत्रू पळून जातो…अन्‌ भारतात करारासाठी देशभक्तीची लाट उसळते…पार्श्‍वभूमीवर गाणं वाजतंय…”साईन कर इंडिया!’ असा एखादा सिनेमा काढायला हवा. त्यामुळे गेले काही दिवस कुंद झालेले राजकीय वातावरण झटक्‍यात मोकळे होईल नाही…?

जे राजकारणात तेच साहित्याच्या बाबतीतही. एक प्रसिद्ध लेखक गेले काही दिवस पडेल कादंबऱ्या लिहित असल्यामुळे टीकेचा धनी झालाय. त्याला प्रकाशकांनीही आता वाळीत टाकलंय. तितक्‍यात या लेखकाला भेटण्यासाठी काही तरुण मुली येतात. त्या लेखकाला नवीन काही तरी लिहिण्याची गळ घालतात. लेखक महाशयही त्या प्रेमळ विनंतीला मान देतात आणि एक नवीन महाकादंबरी लिहितात. पुढे त्याच कादंबरीला नोबेल पारितोषिक मिळते. चित्रपट संपताना पार्श्‍वभूमीवर गाणं वाजतं…”लिहू दे इंडिया..लिहू दे!’
अशा रीतीने विविध क्षेत्रांमध्ये नवीन काही घडामोड घडवून आणण्यासाठी आता हे हुकमी हत्यार हातात आले आहे. त्यासाठी आपण “चक दे इंडिया’ आणि त्यांच्या “टीम’लाच धन्यवाद द्यायला नको का?

जाको राखे साईयां…!

तीन दशकांच्या आयुष्यात अनेक अपघाताचे प्रसंग…अनेक छोट्या मोठ्या घटना जवळून पाहिल्या. आता वर्तमानपत्रात उपसंपादक म्हणून काम करताना तर दररोज अपघाताच्या बातम्या नित्याच्याच झाल्या आहेत. मात्र “अपघात” फेम मुंबई-पुणे “एक्‍स्प्रेस हाय-वे”वर स्वतः अनुभवलेला अपघात आयुष्यातला आतापर्यंतचा सर्वाधिक थरारक अन्‌ भीतीदायक अनुभव ठरला. मृत्यूजवळ येऊन अगदी केसाच्या अं तराने त्यातून बचावणे म्हणजे काय, हे त्यादिवशी कळाले.
लॉजमध्ये असताना नितिन याची ओळख झाली होती. त्यावेळी मला महिना सहा हजार रुपये पगार होता आणि तो नोकरीसाठी वणवण भटकत होता. नंतर सुदैवाने त्याला “एचएसबीसी’त नोकरी लागली. आता तो माझ्यापेक्षा (आताच्या पगारापेक्षाही) तिप्पट कमावतो. गेल्या वर्षी तो लंडनला जाऊन आला. तरीही अजून त्याने आठवण ठेवली आहे. त्याच्या मित्राला लंडनला जाण्यासाठी निरोप देण्यासाठी जायचे होते. त्यामुळे त्याने बोलाविल्यावर मी हो म्हणालो. रात्रीची ड्यूटी आटोपून बाहेर पडलो तेव्हा नितीन त्याच्या मित्रांसह आणि “तवेरा” गाडीसह तयार होता. गाडीत बसल्यावर त्याच्या मित्रांशी ओळख झाली. त्यातील सुरेश हा लंडनला निघाला होता; तर कार्तिक त्याच्यासोबत कंपनीत काम करत होता. कार्तिक समोर ड्रायव्हरशेजारी आणि आम्ही मागे बसलो होतो. सर्वात मागच्या बाजूला सामान होते.
गाडीने पुणे सोडले तेव्हा गाडीचा वेग साठ ते सत्तर किमी होता. एक्‍स्प्रेस वेला लागल्यावर तो वेग 75 वर आला. मात्र ड्रायव्हर चांगली गाडी चालवत असल्याने आमची काही तक्रार नव्हती. मध्ये एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो. त्यावेळी चहासाठी दहा रुपये देताना लक्षात आले, की पाकिटात तीसच रुपये होते. बाकीचे पैसे घरी ठेवले होते. मात्र घरी जायला वेळच मिळाला नसल्याने पैसै तिथेच राहिले. चहाचे पैसे दिल्यानंतर केवळ उरले वीस रुपये. गाडी मित्रांनी भाड्याने केलेली असल्याने तो खर्च माझ्यावर न व्हता. तरीही आणखी खर्चाचे काय करायचे, हा विचार चालू होता.
एव्हाना गाडीतले चालक वगळता सर्वजण झोपले होते. आता मी “बॅटमन’ असल्याने (म्हणजे वटवाघूळ वर्गीय मनुष्य) मी झोपण्याचा प्रश्‍नच नव्हता. केवळ अधूनमधून डोळे झाकत होतो. मध्यंतरी एकदा डोळे उघडले तेव्हा आमची जीप एका ट्रकच्या दिशेने जाताना दिसली. पापणी मिटली आणि ती उघडायच्या आत, किंवा ड्रायव्हरला सावध करण्यासाठी ओरडण्याच्या आत “थाऽऽऽऽड’ असा आवाज झाला. पुढच्या क्षणी डोळे उघडले तेव्हा मी समोरच्या सीटवर पडलो होतो…शेजारील नितीन समोरच्या दोन सीटमधील पोकळीत पडलेला…पलिकडचा सुरेश त्याच्या समोरच्या सीटवर आदळलेला…
सर्वात आधी जाणवले बाजूचा दरवाजा उघडून ड्रायव्हर बाहेर गेला…सहा-सात पावले मागच्या दिशेने गेल्यानंतर तो रस्त्यातच कोसळला. मीही दरवाजा उघडून बाहेर पडलो. सर्वांना बाहेर काढले. कार्तिकचा सर्व चेहरा रक्‍ताने माखला होता. तो बेशुद्धच होता. त्यामुळे बाहेर काढताच तो खाली पडला. नितीनचा ओठ पूर्ण फाटला होता. सुरेशच्या नाकातून रक्त येत होते. त्यांचे रक्ताळलेले चेहरे पाहून मी स्वतःच्या चेहऱ्यावरून दोन-तीनदा हात फिरवून पाहिला. पण मला काहीही झालेले नव्हते. केवळ पायाला थोडेसे खरचटले होते आणि समोरच्या सीटवर पडल्याने मुका मार लागला. त्यावेळी नशीब बलवत्तर असल्याची जाणीव झाली.
चांगले नशीब एवढ्यावरच थांबले नाही. त्यामुळे हा प्रकार घडला नाही तोच पॅट्रोलवर असलेले हायवे पोलिस तिथे दाखल झाले. त्यांनी लगेच ऍम्ब्युलन्सला कॉल लावला. दहा मिनिटांत ती दाखल झाली. त्यापूर्वी पोलिसांनी सर्वांचे नाव-गाव लिहून घेतले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, “तवेरा’ ट्रकला धडकल्‌ यानंतर ट्‌कच्या मागच्या बाजूला अडकली व पुढे घासत गेली. काही असो, गाडीतल पाच जणांपैकी केवळ मीच सहीसलामत राहिल्याने सगळी माहिती, जबाब देण्याची जबाबदारी पडली. ते होईपर्यंत सर्वां ना ऍम्बुलन्समध्ये बसविले. आता ऍम्बुलन्सच्या चालकाशेजारी बसण्याची जबाबदारी माझी होती. पनवेलच्या “लाईफ लाईन’ हॉस्पिटलच्या दिशेने ऍम्बुलन्स निघाली. ते तीस किलमीटर आता मला प्रकाशवर्षांसारखी भासू लागली. एक नजर रस्तावर आणि एक नजर ऍम्बुलन्सच्या स्पीडमीटर वर होती. त्याचा काटा 80च्या पुढे गेल्यावर अंगावरही “काटा’ उभा रहायचा. हॉस्पिटलला गेल्यावर घड्याळात पा हिले…चार वाजून दहा मिनिटे. म्हणजे अपघात साधारण साडेतीन वाजता झाला होता.
रात्री हॉस्पिटलमध्ये सर्व तपासण्या झाल्या. ड्रायव्हर आणि कार्तिक दिसतानाच गंभीर दिसत असल्याने त्यांना तडक “आयसीयू’मध्ये पाठविण्यात आले. सुरेशच्या नाकातील रक्तवाहिनी फुटल्याने आणि डोळ्या ंखाली मार लागल्याने चेहरा सुजला होता. त्याला व नितीनला “रिकव्हरी रूम’मध्ये ठेवण्यात आले. मला सामान आणि काही गरज पडल्यास थांबावे लागले. खिशात वीसच रुपये असल्याने काय करावे, हा प्रश्‍नच होता. पुण्यातील मित्राला फोन करून पैसे घेऊन येण्यास सांगितले. त्याने स्वतः न येता कंपनीतील साहेबांकरवी पैसे मिळण्याची व्यवस्था केली. त्यामुळे तेवढी तरी सोय झाली.
दुसऱ्या दिवशी सकाळी “एचएसबीसी’तील लोकं येण्यास सुरवात झाली. सुरेशला जाता येणार नव्हते. त्‌ याने तिकिटच रद्द केले. डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार, या सर्वांना चोवीस तास ठेवावे लागणार होते. त्यात जो येईल त्याला सर्व घटनेची हकीगत सांगावी लागत असल्याने कंटाळा आला होता. अन्‌ येणारा प्रत्येक जण विचारत होता, “”तुम्हाला कसं काय लागलं नाही?”
त्यांना काय सांगणार, देव तारी त्याला “तवेरा’ काय मारी?
ड्रायव्हर वगळता सर्वांचे मित्र आणि नातेवाईक आल्यानंतर पुण्याकडे निघण्याचा कार्यक्रम होता. त्याप्रमाणे सकाळी साडे सहाला स्टॅंडवर जाऊन बस पकडली. खूप समोर नाही, खूप मागे नाही…अशी बेताची मध्यवर्ती सीट पकडून पुण्यात आलो “वन पीस.’ पुन्हा खासगी गाडीतून रात्रीच्या वेळी प्रवास न करण्याचा निश्‍चय करूनच.

तुमची होते “आग’…आमची होते होरपळ

राम गोपाल वर्मा की आग’ अशी नावापासूनच धग जाणवणाऱ्या चित्रपटाला जाण्याचं काही कारण नव्हतं..तसंच न जाण्याचंही! आपला “लालेट्टा’ म्हणजे मोहनलाल याच्यासाठी त्यातल्या त्यात स्वस्त चित्रपटगृहामध्ये अगदी मोजक्‍या “निमंत्रितां’च्या उपस्थितीत मी हा चित्रपट पाहिला. पाहिला, असं केवळ म्हणायचं. एरवी खरे तर असा चित्रपट पाहून माझ्यासारख्याच्या डोळ्याचे पारणे फिटायला हरकत नव्हती. एकूण चित्रपट पाहून झाल्यानंतर माझं असं मत झालं, की एक विनोदी चित्रपट म्हणून उपरोक्त चित्रपट पहायला हरकत नाही. सात वर्षांपूर्वी “हेराफेरी’ या चित्रपटाच्या यशानंतर हिंदीमध्ये अचानक विनोदपटांची लाट आली. त्यात आताशा बहुतेक विनोदपटांचा ठरीव साचा झाला आहे. त्यादृष्टीने राम गोपाल वर्मा यांनी अथक प्रयत्न करून आणि तब्बल 32 वर्षांच्या अभ्यासानंतर हा एक वेगळा चित्रपट रूजू केला आहे.

बत्तीस वर्षांपूर्वी “कितने आदमी थे…’ करत पडद्यावर धुमाकूळ घालणारा एक विकृत खलनायक भारतात अवतरला. ती भूमिका साकारणारा अभिनेता समर्थ असल्याने खलनायक देशभरात लोकप्रिय झाला. त्यानंतर पडद्यावरील खलनायकाने, म्हणजेच गब्बरसिंगने ठाकूरला पीडले नसेल तेवढे गब्बरसिंगच्या नावावर अनेकांनी आम्हा चित्रपटरसिकांना पीडले आहे. वेष बदलून गब्बर अनेक चित्रपटांत येत राहिला. त्यानंतर टेपरेकॉर्डरच्या जमान्यात कॅसेटच्या रूपाने त्याचा आवाज घुमत राहिला. त्यानतंर टीव्हीच्या जमान्यात जाहिरातींत आणि विनोदाचं सोंग करणारे हास्यास्पद कार्यक्रमांचा क्रमांक आला. आता कुठे “रेडियो मिर्ची’च्या एकसुरी जाहिरीतीत गब्बरचे विडंबन केलेले संवाद ऐकू येण्याचे बंद झाले होते. मात्र त्यात रामगोपाल वर्मा नावाच्या चित्रपटक्षेत्रातील एका “डॉन’चा उदय झाला.
रामूने नंतर चित्रपटांचे असे हप्ते सुरू केले, की हिंदी चित्रपट पाहणे हाच प्रेक्षकांचा गुन्हा वाटावा. बाय द वे, रामूने त्याच्या चित्रपटनिर्मिती कंपनीचे नाव “फॅक्‍टरी’ ऐवजी “गॅंग’ ठेवायला हवे होते. दुर्दैवाने, रामूच्या अंधारलेल्या, इंग्रजी चित्रपटातील फ्रेम्स वापरून केलेल्या “पिक्‍चर्स’ना अनेकांचा तिकिटाश्रय लाभला. त्यामुळे बापाने कौतुकाने आणलेली खेळणी पोरगं ज्या हौसेनं तोडून त्याचा सत्यानाश करतं, त्याच उत्साहाने रामूने जुन्या चित्रपटांचे विचित्रपट काढण्याचा सपाटा लावला. रामूची ही टोळधाड इतरांच्या जीवावर तर उठलीच, त्याचे स्वतःचेही अपत्य या आपत्तीतून सुटले नाहीत.

रामूला चित्रपटाच्या तंत्राची फारशी माहिती नव्हती, तेव्हा त्याने “शिवा’ आणि “रात’ सारखे काही सिनेमे काढले होते. त्यातून चुकून आपलं मनोरंजन होत होतं. मात्र त्याची यत्ता वाढली. मग “शिवा’चीच एक फर्मास हिडीस आवृत्ती साहेबांनी काढली. एखाद्या चित्रपटाचं एवढं सॉलिड भजं इव्हन डेव्हिड धवनही करत नाही. (अगदी रजनीकांतच्या तमिळ “वीरा’चं त्यानं हिंदीत केलेलं “साजन चले ससुराल’सुद्धा त्यामानाने कौतुकास्पद होतं.)एका “रात’च्या विषयावर तर रामूने “भयं’कर चित्रपट काढले. मग त्याच्या चित्रपटांनी घाबरण्याऐवजी तो चित्रपट काढणार म्हटल्यावरच घाबरायला होऊ लागलं. गुन्हेगारी चित्रपटांचा खापरआजोबा “गॉडफादर’ची “फ्रेम बाय फ्रेम’ कॉपी करून गेल्या वर्षी रामूजींनी “सरकार’ नावाचा चित्रपट दिला. हुबेहूब काढल्यामुळे हा चित्रपट प्रेक्षणीय झाला. तरीही मार्केटिंगचे हुकुमी हत्यार म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरण्याचे कसब त्यांनी तेव्हा दाखविलेच.

अशात रामूने जेव्हा “शोले’चं रिमेक करण्याची घोषणा केली, त्यावेळी ठाकूर, गब्बर आणि रामपूरची ग्रामस्थ मंडळींची राखरांगोळी होणार यात शंका उरली नाही. सांगायला आनंद होतो, की राम गोपाल वर्मा यांनी मायबाप प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण करण्यात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. मूळ “शोले’तील जी अजरामर (आमच्या जमान्यापुरती) पात्रे आहेत, त्यांची व्यवस्थित कत्तल करण्यात रामूजींनी आपली संपूर्ण प्रतिभा पणास लावली आहे. अगदी “शोले’च्या कलावंतांचे डुप्लिकेट घेऊन तयार केलेला (केवळ अमजद खान उर्फ गब्बरसिंग यांचा अपवाद वगळून) “रामगढ के शोले’ हा चित्रपटही “शोले’च्या विडंबनात “आग’च्या पासंगालाही पुरत नाही.

बब्बन हे रामूजींच्या ‘आग’चे मुख्य इंधन. राम गोपाल वर्मांनी स्वतःचे छायाचित्र काढावे, अशी विकृती त्याच्यात कुटून कुटून भरली आहे. कुठून कुठून सुचतं हो या माणसाला असं? अमिताभ बच्चन या अभिनयाच्या “शहेनशहा’ला अगदी अलगदपणे रामूजींनी राहुल देव किंवा मुकेश ऋषी यांच्या पंगतीत आणून बसविले आहे. यासाठी त्यांचे खास अभिनंदन! “परवाना’मध्ये अत्यंत संयमित खलनायक साकारणारा, “अक्‍स’मध्ये जगावेगळी भुमिका करणारा हाच का तो “मिलेनियम स्टार’…रजनीकांतला लोकं इतके दिवस दक्षिणेतला अमिताभ म्हणायचे…”आग’मधली अमिताभचे चाळे पाहून आता अमिताभला उत्तरेतला मिथुन म्हणू लागतील. अमिताभचे काही संवाद कानावरून जातात…म्हणजे हे संवाद ऐकण्यासाठी का होईना प्रेक्षकांनी परत थियेटरात यावे…काय आजकाल बॉलिवूडची मार्केटिंग कोणत्या थराला जाईल, याचा काही नेम नाही…

कथा, पटकथा, चित्रण, संगीत…अशा विविध घटकांची जबाबदारी रामूजींनी स्वतःवर न ठेवता इतरांनाही त्यात सहभागी करून घेतले आहे, हे त्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याची चुणूक दाखविते. विशेषतः संवादाच्या बाबतीत त्यांनी “बॉलिवूड’ला “कंटेंपररी’ करण्याची मोलाची कामगिरी केली आहे. त्यामुळे “हमें वो गलती नहीं करनी है, जो अमेरिका ने इराक में की,’ असे ज्ञानवर्धक आणि वास्तववादी संवाद इथे ऐकायला मिळतात. हीच प्रतिभा मूळच्या “शोले’ चित्रपटात असती, तर गब्बरसिंगही म्हणाला नसता का…”रामगढ अफगाणिस्तान नहीं है, जहां रूस की सेना घुस जाय…इ. इ.’ विशेष म्हणजे प्रेक्षकांना झोप येऊ नये म्हणून रामूजींनी अधूनमधून वाद्यकल्लोळाची सोयही केली आहे.

असो…मोहनलालची काही प्रेक्षणीय दृश्‍ये या चित्रपटांत आहेत. अमिताभ आणि रजनीकांत यांचे चाहते त्यांनी केलेल्या कोणत्याही कृतीला उचित ठरविण्यास सज्ज असतात. पहिल्या वर्गातील लोकांनी मला बहुमताने दुसऱ्या वर्गात ढकलले असल्याने त्यांच्यावर सूड घेण्याचा एक वेगळाच आनंद “बब्बन’ पाहताना आला…”शोले’ ही एक कायमस्वरूपी “सूड’कथा आहे ती या अर्थाने! इन्स्पेक्टर नरसिम्हा आणि बब्बन यांच्यातील वैमनस्यापासून सुरू झालेली ही आग ‘अमेरिका हो या कालिगंज…मरता आम आदमी ही है,’ असा मोलाचा संदेश देऊन संपते…ही त्यातल्या त्यात गांभीर्याने घ्यायची गोष्ट.
———–

भागो…मोहन प्यारे!

प्रिय मोहनलाल,
मल्याळम चित्रसृष्टीतील सुपरस्टार आणि प्रियदर्शनच्या भाषेत भारतातला सर्वांत नैसर्गिक अभिनय करणारा अभिनेता, अशी तुझी आतापर्यंत ख्याती ऐकून होतो. तू तीन वेळचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अशीही त्याला एक किनार होती. मात्र मुंबईच्या टोळीयुद्धावर स्वतःची उपजीविका चालविणारे राम गोपाल वर्मा यांच्या “शोले’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तू काम करणार, ही घोषणा झाली आणि पोटात गोळा आला. ही गोष्ट माहीत झाल्यापासूनच तुझ्याविषयी सहानुभूती वाटायला लागली.

याआधी रामूच्याच “कंपनी’ नामे सिनेमात अधूनमधून बंदुकीच्या गोळ्या सुटत नाहीत, अशा तुकड्यांमध्ये तू झळकला होतास. भलेही ती भूमिका तू (नेहमी च्याच) सहजतेने जिवंत केलीस. पण यावेळी प्रकरण वेगळे होते.
तुझ्या कारकिर्दीत आजवर एकाही रिमेकमध्ये तू काम केलेले नाही, म्हणजे आता नव्हते म्हणावे लागेल. “किलुक्कम,’ “काला पानी’, “मुकुंदेट्टा सुमित्रा विळुक्कुन्नु,’ किंवा “तलवाट्टम,’ “उदयोन’ अशा चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका करणारा तू, तुझ्यावर कोणता सूड घेण्यासाठी रामूने तुला “बळीचा ठाकूर’ केले काय माहीत? अन्‌ तुलाही कोणती दुर्बुद्धी सुचली काय माहीत, तूही ती भूमिका स्वीकारली. ओणमच्या निमित्ताने “एशियानेट’वर तुझी मुलाखत चालू होती. हिंदी चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने, त्यातून अधिक “रिस्पॉंस’ मिळत असल्याचे तू त्या मुलाखतीत सांगितले. अशा पडेल चित्रपटांमध्ये फडतूस भूमिका केल्यावर कोणता चांगला प्रेक्षक तुला अनुकूल होणार आहे, हे स्वामी अय्यप्पाच जाणो!

अरे, ती ठाकूरची भूमिका एव्हढी सोपी नव्हतीच. मुळात तू संजीवकुमारच्या तोडीस तोड अभिनय केलाही असतास, मात्र उत्तरेतील “जाणकार’ प्रेक्षकांचे त्याने समाधान झाले असते का? न्यू जर्सी किंवा टेक्‍सासच्या “ऍसेंट’मध्ये बोलणारे हिरो आम्हाला चालतात, पण आपल्याच देशातील मराठी किंवा दक्षिणी ढंगात हिंदी बोललेले चालत नाही आम्हाला. त्यामुळे तू कधीही ठाकूर होऊ शकला नसतास, याबद्दल आमच्या मनात शंका नव्हती.

त्यानंतर रामूने कधीतरी “राम गोपाल वर्मा के शोले’ नावाच्या चित्रपटाचा मुहूर्त केला. त्यावेळी अमिताभ बच्चन याच्या घेतलेल्या पहिल्या दृश्‍याचे छायाचित्र पाहिल्यावरच या “प्रोजेक्‍ट’मध्ये रामू हात पोळून घेणार हे पक्के झाले होते. त्यानंतर चित्रपटाचे नाव “आग’ करण्यात आले आणि या आगीची झळ सर्वांनाच पोचणार, याची खूणगाठ पटली. अमिताभचं काही नाही, तो अशा कित्येक आगींचे रिंगण त्याने पार केले आहे. आपण काय करत आहोत, याचं भान न ठेवता, केवळ कॅमेऱ्यासमोर येण्याचे पैसे घेऊन “डाबर अनारदाना’ पासून “रिड अँड टेलर’पर्यंत; मुलायमसिंहांच्या प्रचारसभांपासून “आयफा ऍवॉर्ड’ समारंभापर्यंत, कुठलाही प्रसंग अथवा जाहिरातची कहाणी “साठा सुफळ’ करण्यात त्याची हयात गेली. तुझं काय?

हिंदी (अन्‌ मराठीही, ते फारसे वेगळे काढणे शक्‍य नाही ) प्रेक्षकांना तुझे नाव आणि क्षमता माहितीही नाही. आता प्रियदर्शनचे चित्रपट पाहून लोकांची हसून हसून पुरेवाट होते. त्यांना काय माहीत, एकेकाळच्या तुझ्याच चित्रपटांचे हे अधिक चकचकीत रिमेकस्‌ आहेत ते? तू केलेल्या करामतीच आज अक्षयकुमार, सुनील शेट्टी आणि प्रियदर्शन कॅंपची अन्य मंडळी करतात व दुनियाभरातली तारीफ मिळवितात. तू तरी इकडच्या प्रेक्षकांपर्यंत येताना काळजी घ्यायला हवी. एकेकाळी रजनीकांतनेही मोठ्या एक्‍स्पोजरसाठी हिंदीत बाष्कळ भूमिका केल्या. त्यानंतर त्याने इथला नाद सोडला. आज तो स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतो आणि इकडच्या लोकांना त्याच्या तमिळ चित्रपटाचीही दखल घ्यावी लागते.

तुझं काम अधिक अवघड करून ठेवण्यास रामू समर्थ आहेच. त्याने “शोले’चा खून, शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार एकाच वेळी करण्याची अद्‌भूत कामगिरी केलीच आहे. त्यात तुझ्यासारख्या एका चांगल्या अभिनेत्याची झालेली गोची आणि मुखभंग आमच्यासारख्यांना वेदना देतो.

त्यामुळे, आता तुला एकच सांगणे आहे…

अलम्‌ दुनियेला तू माहित झाला नाहीस, तरी चालेल. मल्याळममध्ये मनासार ख्या भूमिका कर…यशस्वी हो..अन्‌ चुकूनही मुंबईला येवू नकोस…
भागो, मोहन प्यारे…
तुझ्या अनेक प्रेक्षकांपैकी एक