दुग्धं दर्शयामि चीजं दर्शयामि

तयार झालेले चीज बाहेर पडताना “हे पहा, इथून दूध येतं, हे पहा, इथं त्याचं दही होतं. या टाकीत दही कडक करून त्याचे तुकडे पाडतात. पहा, इथून चीजचे तयार ब्लॉक बाहेर पडतात,” मिश्रा साहेब आम्हाला सांगत होते आणि आम्ही ‘वा वा’, ‘ओ हो’ करून वेळ मारून नेत होतो. त्या असंख्य नळ्या, नळ आणि टाक्या पाहून झाल्यानंतर लक्षात काय राहिलं असेल, तर सर्वात आधी दूध असतं आणि सर्वात शेवटी त्याचं चीज होतं.  हे एक सत्य शिकणं, यातच आमच्या बुद्धीचे चीज झाल्यासारखं आहे.

गोवर्धन या ब्रॅण्डने दुग्ध उत्पादन करणाऱ्या पराग मिल्क यांचा चीज उत्पादनाचा प्रकल्प मंचरजवळ आहे. आशियातील चीजचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. कंपनीचे मालक देवंद्र शहा यांच्या आदेशावरून मिश्रा साहेब आम्हाला अख्खा प्रकल्प फिरवून दाखवत होते. त्यात दूध कुठं जमा होतं, कोणत्या टाक्यात जातं, किती डिग्रीवर उकळतं, हे सगळं कसं स्वयंचलीत आहे, कुठंही माणसाचा हात लागत नाही हे ते यथासांग सांगत होते. मात्र आमच्या टाळक्यात त्यातलं काही जाईल तर शप्पथ. बरं, हे त्यांना सांगता येईऩा. पत्रकार म्हणवून घेतात स्वतःला आणि इतकंही काही समजत नाही, असं त्यांना वाटण्याची शक्यता. मग त्यातल्या प्रत्येक गोष्टीला ‘मम’ म्हणण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच काय होता?

यंत्रांच्या जंजाळातील चीजचे उत्पादन एक तर त्या सगळ्या आसमंतात दुधाचा वास पसरला होता.  मला त्या वासाने काहीसं अस्वस्थ व्हायला होत होतं. त्यात ते अगडबंब नळकांडे पाहिल्यावर काहीसं खट्टू व्हायला होतं. त्यात दुधाच्या पदार्थांबद्दल आमची पाटी अगदी दुधासारखीच पांढरी शुभ्र. त्यामुळं स्लाईसचं चीज आणि पिझ्झाचं चीज याच्यात काय फरक असतो हे आम्हाला कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्या अधिकाऱ्यांनी बिचाऱ्यांनी आपली कामं सोडून आमची ट्यूशन घ्यावी, अशी अपेक्षा तरी कशी करणार. त्यामुळे मुकाट्यानं ते जे सांगत होते ते ऐकून घेण्यापलिकडे आम्हाला काम नव्हते.

त्या तासाभराच्या धड्यानंतर लक्षात राहिलं एवढंच, की या कारखान्यात दिवसाला चाळीस टन चीजची निर्मिती होते आमि त्यासाठी चार लाख लिटर दूध दररोज लागतं. हे दूध साठवण्यासाठी तीन टाक्या बाहेर उभ्या केलेल्या आहेत. टॅंकरमधून सरळ या टाक्यांत दूध जातं आणि तिथून ते गरम होण्यासाठी जाते.  साधारण 30 अंश सेल्सिअस तापमानाला आल्यानंतर एका ठिकाणी 26 मिनिटांत त्याचं दही करण्यात येते. (विरजणासाठी वापरलेले पावडर डेन्मार्कहून आयात करण्यात येतं-मिश्रा) पुढच्या एका टाकीत या दह्यातील पाणी आणि मुख्य पदार्थ वेगवेगळे केले जातात. अगदी रवाळ स्वरूपात असलेल्या या मुख्य पदार्थाचेच नंतर चीज तयार केले जाते.  त्यातील एक चीज मोठ्या ठोकळ्यांच्या स्वरूपात कापले जाते आणि दुसरे पुढे पाठवून पिझ्झासाठीचे (बहुतेक मोझ्झेरेला) चीज तयार केले जाते.

Cheese storage शीतगृहात साठवलेले चीजगोवर्धनच्या ब्रॅण्डखाली अनेक उत्पादन तयार केले जातात. मात्र त्यातील मुख्य आहे चीजचे. महिन्याला 480 टन चीजच्या उत्पादनापैकी साधारण 320 टन कोरियाला निर्यात करण्यात येते.  आम्ही गेलो तेव्हा प्रकल्पाचे काही बांधकाम चालू होते. मात्र मिश्रा आणि त्यांचे सहकारी अगदी भरभरून आम्हाला कारखाना दाखवत होते. उत्पादनच नाही तर स्टोरेजसुद्धा. “आपको सिमला-काश्मीर देखना है,” असं विचारत त्यांनी कोल्ड स्टोरेजचा दरवाजा उघडला. एक सेकंदात उणे तापमानाची शिरशिरी पायांपासून सुरू होऊन अंगभर पसरली. तिथे अगदी चीजचे भांडारच ठेवलेले. बाहेरच्या जगात दुध टंचाई आणि दुधाच्या दरवाढीवर चर्चा चालू होती आणि तिकडे आम्ही दुधाचे भांडार बघत होतो.  त्या दुधाच्या स्रोताबद्दलच आम्हाला उत्सुकता होती. त्याबद्दल पुढच्या पोस्टमध्ये…

सर्वेक्षण माहिती कशी मारून टाकतात

पत्रकार हे सर्वेक्षणाचे सर्वात मोठे गिऱ्हाईक असतात. चुकीची माहिती देण्याची ती एक पद्धत आहे.

सर्वेक्षण करायचे का माहिती द्यायची, ही निवडीची बाब आहे. सर्व विषयांवर आणि कोणत्याही बाबीत का असेना, पाहण्या छापण्याची किंवा दाखविण्याची माध्यमांना सवय असते. राजकीय बातम्यांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी ती पद्धत असते. 2009 वर्ष संपताना, पारंपरिक पाहण्या ही या वर्षाची लाक्षणिक घटना असल्याचे आपण पाहिले आहे. माध्यमं आपल्या कर्मचाऱ्यांना कमी पगार देतील पण पाहण्या करणाऱ्या कंपन्यांना कमी पडू देणार नाही.

सर्वेक्षणांमध्ये दडलेली माहिती, कोणत्याही प्रकारे वाकविली नाही, तिच्यातून अर्थ काढली नाही तर जवळपास नसतेच. तरीही राजकारणी, पत्रकारांना त्यावर भाष्य करायला का आवडते? पहिले कारण सोपे आहे. ते वस्तुनिष्ठ आणि गंभीर असल्याची एक प्रतिमा आहे. त्यावर अधिक चौकशी करायला, त्याचे गहन विश्लेषण करणे सोपे नसते. आपले काम झाकण्याची ती एक पद्धत आहे.

मतांचे प्रसारण

हे अशाप्रकारे झाकण्याला आणखी एक समर्थन आहे. पत्रकाराला त्याचे मत सिद्ध करण्यासाठी काहीतरी हवे असते. त्याला जे काय मांडायचे असते ते खरे आहे हे त्याला दाखवून द्यायचे असते. “हे माझे मत नाही. हा एक निष्कर्ष आहे,” असं त्याला सांगायचं असतं. त्याचा निष्कर्ष हा त्याच्याकडे असलेल्या माहितीवर अवलंबून नसतो तर लोकांना रसप्रद वाटेल, अशा पाहण्यांच्या आवरणाखाली असतो. तो स्वतः पुढाकार न घेता बचावात्मक धोरण घेतो. माहिती न मांडता तो एखादे मोघम मत पुढे प्रसारीत करतो.

हे पुढे मांडलेले मत लोकांपुढे अतिशय चुकीचे चित्र निर्माण करते. पत्रकार या वाचकाला संवाद साधण्यासाठी योग्य अशी व्यक्ती न मानता, जे काय कोणत्यातरी विषयावर मत माडंले आहे ते स्वीकारणारी वस्तु समजतो.  असं मत जे व्यक्त करण्यापेक्षा राखून ठेवलेले बरे वाटावे. स्वाभाविकच, पत्रकार चाकोरीत अडकून किंवा तिला बळी पडून सर्वेक्षणांचे निष्कर्ष पुढे ठेवतो. मात्र त्यातून तो माहिती पुरविण्याची स्वतःची जबाबदारी टाळतो.  त्यातून पत्रकाराची भूमिकाही गमावतो.

————-

पत्रकारितेच्या विषयावरील एका फ्रेंच ब्लॉगचा स्वैर अनुवाद. त्यातील काही संदर्भ फ्रेंच भाषक देशांतील असले तरी आपल्याकडेही सर्वेक्षणांची जी प्रथा बोकाळली आहे,  तिला हे लागू पडते.

दिवस निवडणुकीचे आहेत. अशा वेळेस लोकांना रिझविण्यासाठी नेत्यांना काय काय करावे लागेल याचा नेम नाही.

वारकऱयांना धन्यवाद

समस्त महाराष्ट्रीय समाजाने आता वारकऱयांना धन्यवाद दिले पाहिजेत. कारण त्यांनी एका जगन्मान्य संताची निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. त्यासाठी त्याच संताच्या विचारसरणीला त्यांना फाटा द्यावा लागला आहे, हा किरकोळ भाग आहे. संत तुकाराम यांच्या मनात जगाच्या सामान्य समजल्या जाणाऱया परंतु हिन पातळीवरच्या कार्यकलापाबाबत जो वितराग निर्माण झाला, तो त्यांची बदनामी करणारा आहे, हे वारकऱयांशिवाय आपल्याला कोण सांगू शकला असता? दारू पिणाऱया आपल्या मित्रांची संगत सोडायला पाहिजे, वाईट धंदे करणाऱया लोकांमध्ये वावरणे टाळायला पाहिजे आहे, असे विचार तुकाराम महाराजांच्या मनात येणं हा केवढा भयानक अपराध आहे, हे आनंद यादव यांना कोणी समजावयाला नको का?

मराठी साहित्यिक संमेलानाला खरोखर कशासाठी जातात, हे वारकऱयांच्या या यशाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातून जवळपास हद्दपार झालेली ब्राह्मणशाही पुन्हा स्थापन करण्याच्या दिशेनेही पाऊल यानिमित्ताने पडले, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. वेदांचा अर्थ आम्हालाच कळतो आणि तुकोबासारख्या तुच्छ माणसाने त्यात लक्ष घालू नये, हीच तर त्यावेळच्या ब्राह्मणांची भूमिका नव्हती काय? मग आता तुकोबांच्या चरित्रावर आमचाच हक्क आहे आणि इतर कोणालाही त्यासंबंधी लक्ष घालू नये, ही वारकऱयांची भूमिका तशीच आहे ना. तेव्हाच्या मंबाजीने तुकोबांना छळले त्यांची परंपरा कोणीतरी चालवायला नको का? असहिष्णुता आणि हटवादीपणाची गादी अशी रिकामी कशी राहू द्यायची? संप्रदायांच्या सुरवातीच्या संतांनी केवळ भक्ती आणि सहिष्णुतेची शिकवण दिली. ती आतापर्यंत पुरली. आता या पिढीने येणाऱया पिढ्यांसाठी काही ठेवा ठेवायला नको? ‘नाठाळांच्या माथी हाणू काठी,’ असे तुकोबांनी सांगितले. आता नाठाळ कोणाला म्हणायचे याचे सर्वाधिकार वारकरी समाजाने आपल्या हाती घेतले आहेत, याबद्दल त्यांचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे.

अध्यात्माची गंगा कितीही मोठी असली तरी माणसाची संकुचितता तिचा एखादा नाला करण्याचाच प्रयत्न करते, हे वारकऱयांनी दाखवून दिले आहे. शेवटी काय, आपला धर्माचा धंदा चालला पाहिजे, ईश्वराची प्राप्ति नाही झाली तरी चालेल, असे कोणीतरी दाखवून द्यायलाच पाहिजे ना? सोने आणि माती मृत्तिकेसमान मानणाऱया तुकोबांच्या देहूत त्यांच्या गाथेचे एक मंदिर उभे राहतय-अख्खं संगमरवरी. या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर गाथेतील अभंग कोरून ठेवलेत. तुकोबांच्या विचाराचा, तत्वज्ञानाचा चुराडा करायचाच आहे, त्यासाठी त्याचे पार्थिव अवशेष जपणे आवश्यक आहे. याचा प्रत्यय दिल्याबद्दल खरोखर हे जग वारकऱयांचे ऋणी राहिल.

एका बाबतीत मात्र वारकऱयांना अपेक्षेपेक्षा अधिक यश आलं. तत्कालिन ब्रह्मवृंद तुकारामांचा छळ करत असताना सर्वसामान्य जनता तुकोबांच्या बाजूने उभा होती. आता मात्र छळ होणाऱया व्यक्तीला पाठिंबा देण्याची कोणाची टाप नाही. अरे, चार शतकांमध्ये समाजाने एवढी तरी प्रगती करावयास नको का? सातशे वर्षांच्या वारकरी संप्रदायाला आणि शहाण्या सुरत्या साहित्यिकांना आपण जातीच्या आधारावर श्रेष्ठत्व ठरविण्याचा सार्वकालिक आणि हमखास फार्म्युला मान्य करायला लावला का नाही? शेवटी मुस्कटदाबी कोणाची होते हे महत्वाचे नाही, त्याची जात कोणती, तो कोणत्या संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये जातो हे महत्वाचे. यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावली म्हणून त्यांनी बहुजन चळवळींशी गद्दारी केली. त्यामुळे त्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी आपली नाही, हे नेहमी घायाळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अँम्बुलन्स सेवा पुरविणाऱया मुखंडांची विचारधारा यानिमित्ताने पुढे आली, हे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि पुरोगामी परंपरेवर केवढे थोर उपकार आहेत? आता येते दोन महिने अनेक वर्तमानपत्रांत आणि वर्षाच्या शेवटी दिवाळी अंकांमध्ये मराठी साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा विषयांवर लेख लिहिण्याचे काम किती हातांना पुरणार आहे, हे विठ्ठलच जाणो. हे काम पुरविण्याबद्दलही वारकऱ्यांना धन्यवाद. अनेकानेक धन्यवाद.

नव्या वर्षाचा संकल्प

नव्या वर्षासाठी माझा संकल्प…कोणालाही नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठवायच्या नाहीत. गेल्या वर्षीच्या शुभेच्छा अजून संपल्या नाहीत. अन २००८ ची काया अवस्था झाली आहे हे वेगळे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.

मूर्ती महान व किर्तीही महान…

माणसाने किती नम्र असावे?. गेल्या दोन दिवसांमध्ये दोन मोठ्या माणसांना भेटण्याची संधी मला मिळाली. (याचे कारण अर्थातच पत्रकारितेचा धंदा!) पण या दोन्ही माणसांना भेटून  त्यांच्या साधेपणाची आणि ऋजुतेची चुणुकच मला पहायला मिळाली. दोन्ही व्यक्तिंबद्दल मी यापूर्वी वाचलेलं, ऐकलं होतं. मात्र त्याची प्रचिती मला इतक्यात मिळेल, असे वाटले नव्हते.

यातील पहिली व्यक्ती म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा एन. आर. नारायण मूर्ती. मूर्ती यांच्याबद्दल आधी खूपच ऐकलं होतं. आमच्या वर्तमानपत्राच्या सकाळच्या मिटिंगमध्ये मूर्ती आज शहरात आहेत, असं मी सांगितलं. त्यावर साहेबांचा हुकूम आला, की त्यांची एक एक्स्लूजिव मुलाखत घेऊन ये. मी (मनातल्या मनात) कपाळाला हात लावला. आता नारायण मूर्ती म्हणजे पुण्यातील कोणी पत्रकबाज पुढारी नाहीत, की उचलला मोबाईल अन मिळविली प्रतिक्रिया.

आधी मिडिया को-ऑर्डिनेटरला फोन लावला…त्यानं मोघम उत्तर दिल्यावर केवळ नशिबावरच हवाला ठेवला. त्यानंतर ल मेरिदियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोचलो. मूर्ती तिथे आलेले आहेत, हे कळाल्यावर जीवात जीव आला. पण त्यांच्यापर्यंत पोचायचे कसे ते कुठल्या सूटमध्ये आहेत, हे आधी शोधून काढले. त्यानंतर दारावरच स्वयंसेवकाने अडविले. पुन्हा प्रतिक्षा. थोड्या वेळाने शेवटी धीर करून आणि निर्वाणीचा उपाय म्हणून त्यांना विचारले, “सर, तुमच्याशी दोन मिनिटे बोलता येईल का?”

“नाही, मला आता वेळ नाही. कार्यक्रम सुरू होत आहे,” मूर्ती यांनी फारशा रुक्ष नसलेल्या स्वरात सांगितले. 

“सर, मग कार्यक्रम संपल्यावर तरी बोलूया,” मी चिकाटी न सोडता म्हणालो.

“नाही, कार्यक्रम संपला की लगेच मला विमान पकडून बंगळूरला जायचे आहे,” मूर्तींनी सांगितले. हा संवाद अर्थातच इंग्रजीत चालू होता. 

त्यानंतर मात्र मूर्ती यांची खास मुलाखत मिळण्याची आशा संपली. मात्र मी कार्यक्रमात बसलो होतो आणि आम्हाला हवं तसं ते मोजकेच मात्र पूरेसे बोलले. खासकरून ‘त्यावेळी आम्ही नऊ रुपयांत पोटभर जेवत असू,’ ही त्यांची आठवण मला खूप भावली. त्यातून आमची एक बातमी पूर्ण झाली.


दुसरे दिवशी कोल्हापूरचे राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पुण्यात होते. शिवरायांच्या नावाने आजकाल कोणीही दुकान थाटतो आणि येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवितो. त्यावर महाराजांचे मत मिळवावे, अशी कल्पना मीच मांडली होती. त्याप्रकारे महाराष्ट्रातील गड किल्ले या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते आलेले आसताना त्यांना गाठण्याची संधी साधली. प्रकाशन समारंभानंतर दोन मिनिटांच्या विश्रामकाळात महाराजांकडे जाऊन त्यांना स्वतःची ओळख सांगितली. मग विषयाला हात घातला. त्यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता बोलायला संमती दिली.

“महाराज, आजकाल कोणीही उठतो आणि शिवरायांचे नाव घेतो. त्यातून अनेकदा चुकीच्या गोष्टी घडत आहेत. यावर तुमचे मत काय आहे,” मी त्यांना विचारले. “शिवराय सर्वांचे आहेत. त्यांचे नाव कोणीही घेऊ शकतो. महाराष्ट्रात शिवरायांना वगळल्यास काय राहते. मात्र त्यातून चुकीच्या गोष्टीही घडत आहेत,” शाहू महाराज म्हणाले. त्यानंतरही आमचे प्रश्नात्तेर चालूच होते. कोणताही त्रागा न करता किंवा रुबाब न दाखविता शाहू महाराज उत्तरं देत होतं. कुठलाही लवाजमा न बाळगता आणि ‘पोझ’ न घेता ते बोलत होते. आदल्याच दिवशी काही सरकारी संस्थानिकांचा आणि मंत्र्यांचा बडेजाव आणि नाटकीपणा पाहणाऱया माझ्यासारख्याला हा प्रकार नवा होता. केवळ आजूबाजूच्या लोकांची गर्दी आणि गडबड वाढत असल्याने आम्हाला ती भेट आटोपती घ्यावी लागली.

अशाप्रकारे दोन दिवसांत दोन मोठ्या माणसांची भेट झाली होती. दोघांच्याही साधेपणाचा ठसा मनावर चांगलाच ठसला आहे. 

वाचनाच्या बेटावरील श्रद्धेचा शोध

पूनम छत्रे यांनी त्यांच्या लेखात मनाला भावलेल्या उताऱ्यांचा हा प्रवाह पुढे नेण्याची जबाबदारी टाकली आणि मला पुन्हा वाचनाच्या दिवसांत जावे लागले. गेली काही वर्षे आपणच लिहावं आणि इतरांनी वाचावं, ही भावना प्रबळ होत गेल्यामुळे वाचनसंस्कृती हळूहळू मागे पडली. फक्त “वाचनामुळे माणूस घडतो’ किंवा “उत्तम संस्कृतीसाठी वाचन आवश्‍यक’ अशा सुसंस्कारी सुभाषितां पुरतेच वाचन मर्यादीत झाले होते. मात्र ज्या काळात वाचन केले त्या वाचनाचे ठसे मनावर अद्याप कायम असल्यामुळे त्याच फडताळात जाऊन शोध घेतला. वाचलेल्या पुस्तकांतून आवडता उतारा द्यायचा, त्यातही मराठी उतारा द्यायचा ही जरा जोखमीचीच बाब. कारण शुद्ध मराठी साहित्याची कास सोडूनही मला आता फारा काळ लोटला आहे. असो.
“रॉबिन्सन क्रुसो’ ही महाकादंबरी (सुमारे 500 पृष्ठे ) वाचून मला आता सतरा वर्षे होत आली. डॅनिएल दे फो याने लिहिलेली ही कादंबरी मानवी आकांक्षी, कर्तृत्व आणि प्रयत्नवादाचे एक महास्तोत्रच आहे. त्याहूनही विश्‍वाच्या पसाऱ्यात मानवाचे परावलंबी अस्तित्व आणि ईश्‍वराची महीमा, यांचीही कहाणी सांगणारी ही कथा आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आलेल्या या कथेच्या असंख्य आवृत्या अगदी तीन वर्षांपूर्वी आलेल्या “कास्टअवे’ या चित्रपटापर्यंत निघत आल्या आहेत. मूळ इंग्रजीतील ही कादंबरी मी वाचली ती मराठीतूनच. मात्र अस्सल मराठी वाचकांच्या प्रथेप्रमाणे या वाचनाचे प्रायोजकत्व मी शहरातल्या एकमेव नगरपालिका ग्रंथालयाला दिले होते. त्यामुळे अनुवादकाचे नाव किंवा अन्य तपशील बाळगण्याचे प्रयोजन नव्हते. आता ती कादंबरीही मिळत नाहीशी झालेली. त्यामुळे आवडता उतारा द्यायचा म्हटल्यावर संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरवात म्हणतात, तसे आपणच मूळ कादंबरी शोधून उताऱ्याचे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. (कार्यसिद्धीस गुगुल समर्थ!) त्यामुळे काही उणीवा राहिल्या असल्यास चूकभूल देणे घेणे!
इंग्रज दर्यावर्दी रॉबिन्सन क्रुसो अनेक सागरी सफरींमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या अनुभवांतून गेला असला तरी पुनःपुनः नव्या सफरींसाठी निघण्यास तयार. अशाच एका सफरीदरम्यान वादळात सापडून त्याचे जहाज फुटते आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना जलसमाधी मिळते. फुटलेल्या जहाजाच्या अवशेषासह आणि काही सामानासह क्रुसो एका निर्जन बेटाला लागतो. तेथेच तो 28 वर्षे काढतो आणि स्वतःच्या एकाकी जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. बेटावरील प्राण्यांशी मैत्री करणे, तेथीलच गवत व वनस्पतींपासून झोपडी तयार करणे, गुहेत राहणे, नरभक्षक आदिवासींशी गाठ पडूनही त्यांच्याबद्दल “जगा व जगू द्या’ची भूमिका घेणे…अशा विविध प्रकारांनी आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न क्रुसो करतो. इतिहासात प्रगतीच्या ज्या काही पायऱ्या मानव चढल्या, त्या सर्वांचे प्र तिकात्मक चित्रण या कादंबरीत येतं. त्यामुळे एका अर्थाने माणसाच्या अस्तित्वाच्या लढाईचीच ती कहाणी होते. मात्र मला त्यात सर्वाधिक भावते अन्‌ सतरा वर्षांनंतरही लक्षात राहते तो क्रुसोच्या ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल बदलत्या भूमिकेचे चित्रण. स्वतःच्या परिस्थितीचे निरीक्षण, त्यातून चिंतन करत असतानाच आपण ईश्‍वराच्या इच्छेनेच या परिस्थितीत सापडलो असल्याचा साक्षात्कार क्रुसोला होतो. हा या कादंबरीतला सर्वांत हृद्य प्रसंग.
———————

माझ्या या निष्कर्षांना खोटं ठरवंल, असं काहीही घडलं नाही, त्यामुळे हे सर्व ईश्‍वरानेच घडविले आहे, ही भावना माझ्या मनात आणखी प्रबळ होऊ लागली-त्यानेच मला या दयनीय परिस्थितीत आणून ठेवले आहे, कारण त्याच्याकडे माझ्यावरच नाही, तर जगातील वस्तुमात्रावर स्वामित्व गाजविण्याची शक्ती आहे. त्यानंतर लगेच विचार आला-ईश्‍वराने माझ्यासोबत असे का केले? मी असे काय केले होते?

त्या प्रश्‍नासरशी माझ्या विवेकबुद्धीने मला टोचले, जणू काही मी एखादे पाखंड केले आहे अशा पद्धतीने आणि मला वाटले की ही विवेकबुद्धी माझ्याशी बोलत आहे, “”मूर्खा! तू विचारतोस की तू काय केले आहेस? अतिशय वाह्यातपणे घालविलेल्या आपल्या आयुष्यावर नजर टाक आणि स्वतःलाच विचार, की तू काय काय केलं नाहीस? विचार स्वतःला की तू याआधीच नष्ट का झाला नाहीस? यरमाऊथ रोडसमध्ये तु का वाहून गेला नाहीस, जहाजावर चाचांनी हल्ला केला तेव्हा लढाईत का मारला गेला नाहीस, आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील जंगली प्राण्यांनी तुला मारून का खाल्ले नाही, अगदी तुझे सगळे सहकारी बुडाले असताना तू येथे वाहून गेला नाहीस? तू स्वतःला विचार “मी असं काय केलंय.’
या विचारांसरशी मी स्तब्ध झालो, एखाद्या मूर्तीसारखा. बोलण्यासाठी माझ्याकडे एकही शब्द नव्हता. निराश आणि विचारमग्न अवस्थेतच मी उठलो आणि माझ्या आश्रयस्थळी परत आलो. झोप आल्यासारखं झाल्याने मी माझ्या भींतीकडे गेलो. पण माझ्या विचारांची गर्दी एवढी झाली होती, की झोपण्याची माझी परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी खुर्चीत बसलो आणि अंधार पडू लागल्याने दिवा लावायला घेतला. आता पुन्हा माझी तब्येत बिघडण्याच्या शक्‍यतेने मी एवढा घाबरलो होतो, मला आठवलं ब्राझीलचे लोक त्यांच्या सर्व दुखण्यांवर कोणत्याही औषधाऐवजी तंबाखू घेतात. तंबाखूची एक गुंडाळी एका संदुकीत होती. ती वाळलेली होती. काही हिरवी आणि न वाळलेली गुंडाळीही होती. मी संदुकीजवळ गेलो. त्यामागे नियतीचाच हात होता यात संशय नाही कारण त्या संदुकीत मला माझ्या शरीराचंच नव्हे तर आत्म्याच्याही दुखण्याचं औषध सापडले.
मी संदुक उघडली आणि हवी असलेली तंबाखू शोधली आणि मी जपून ठेवलेली काही पुस्तके तिथेच पडली असल्याने मी आधीच उल्लेख केलेले बायबल उचलले. मला आतापर्यंत हे बायबल वाचायला वेळ मिळाला नव्हता म्हणा वा इच्छा नव्हती म्हणा-त्याला बाहेर काढून ते आणि तंबाखु दोन्ही घेऊन मी टेबलजवळ आलो. माझ्या स्वभावाच्या अस्वस्थतेवर तंबाखूचा काही उपयोग होईल का, ती त्यासाठी चांगली आहे का वाईट, यांबाबत मला काहीच माहित नव्हतं. परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती परिणाम करेल, याबाबत निर्धार केल्यासारखं मी त्या तंबाखुचे अनेक प्रकारे सेवन केले. मी तंबाखुचे एक पान घेतले आणि तोंडात चघळायला सुरवात केली. तंबाखू हिरवी व कडक होती आणि मला तिची सवयही नव्हती. त्यामुळे खरोखरीच माझ्या मेंदूला गुणगुण्या आल्या. त्यानंतर मी काही पाने घेऊन रममध्ये एक-दोन तास बुडवून ठेवली. आडवं पडल्यानंतर ती रम प्यायचा मी निर्णय घेतला. त्यानंतर अखेर मी एका भांड्यात कोळसे पेटवून त्यावर काही पाने जाळली. अगदी सहन होईल तोपर्यंत त्याचा धूर घेण्यासाठी मी माझे नाक धुराजवळ घेतले.
या सर्व उचापतीदरम्यान, मी बायबल घेऊन वाचण्यास सुरवात केली. पण माझे डोके तंबाखूमुळे असे बधीर झाले होते, की किमान त्या वेळेपुरते तरी वाचणे अशक्‍य झाले होते. फक्त चाळण्यासाठी म्हणून पुस्तक उघडले आणि मला आढळलेले पहिले शब्द होते, “”संकटाच्या वेळेस मला हाक मार, मी तुझी सुटका करेन आणि तू माझे नाव घेशील.” माझ्यासारख्याला हे शब्द अगदी चपखल होते. ते वाचून माझ्या मनावर मोठा परिणाम झाला. मात्र त्यानंतरच्या काळात हा परिणाम अधिक होता. कारण सुटका या शब्दाला काही अर्थ नव्हता, असे मी म्हणेल. माझ्या हताश परिस्थितीत ही शक्‍यता एवढी दूर होती, की माझी स्थिती इस्राएलच्या मुलांसारखी झाली. त्यांच्यासाठी खाण्यासाठी मांस देण्याचे आश्‍वासन मिळाल्यावर त्यांनी विचारले होते, “”या उजाड माळरानात भगवंत टेबल मांडू शकतो?” तसंच मीही विचारायला लागलो, “”भगवंत स्वतः मला येथून सोडविणार का?” त्यानंतर अनेक वर्षे काहीही आशा नजरेच्या टप्प्यात न आल्याने तर ही शंका नेहमीच माझ्या विचारविश्‍वात ठाण मांडून राहिली होती.
तरीही या शब्दांनी माझ्यावर खूप परिणाम केला होता व त्याबद्दलच मी नेहमी चिंतन करत असे. आता खूप उशीर झाला होता, आणि मी म्हटल्याप्रमाणे तंबाखूने एवढी गुंगी आली होती की मला झोप येऊ लागली होती. रात्री काही लागलं तर हाताशी असावा, या हेतूने दिवा जळताच ठेवून मी अंथरुणावर पडलो. मात्र पाठ टेकण्यापूर्वी मी ती गोष्ट केली, जी त्यापूर्वी आयुष्यात कधीही केली नव्हती-मी गुडघे टेकले आणि ईश्‍वराने मला दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची, तसेच संकटकाळात मी हाक मारल्यानंतर मदतीला येण्याची प्रार्थना केली. माझी तोडकीमोडकी आणि अडाण प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर, तंबाखूची पाने बुडवून ठेवलेली रम मी प्यायलो. ती एवढी कडक झाली होती आणि तंबाखूच्या चवीनी भरली होती, की माझ्या घशाखाली ती उतरेना. त्यानंतर लगेच मी झोपण्यासाठी आडवा पडलो. त्यामुळे माझ्या डोक्‍यात आग होत होती, तरीही मला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा सूर्याच्या स्थितीवरूनच दुपारचे तीन तरी वाजले असावेत, असा अंदाज मी केला.
————-
असो. मला वाटते या पोस्टमध्ये जरा जास्तच लांबण लावली. एकूणात मला ही संधी दिल्याबद्दल (म्हणजेच माझ्यावर ही जबाबदारी टाकल्याबद्दल) मी आभारी आहे. आता ही जबाबदारी मी आणखी पुढे देतो.

पाण्यात न गेलेले पैसे

देवा, याही देशात पाऊस पाड
देवा, याही शहरात पाऊस पाड…

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी देवाला उद्देशून ही कविता लिहिली. त्यामागे त्यांचे जे काय हेतू असायचे ते असोत. (जर्मनमध्ये तिचं भाषांतर व्हावं, असा हेतू निश्चितच नसावा.) मात्र हीच कविता सध्या मी दिवस रात्र आलापत आहे. मेघराजांची अशी आराधना एखाद्या जातीवंत बेडकानंही केली नसेल. अर्थात तळमळीतील ही उणीव आवाजाने भरून निघते, हा भाग अलाहिदा.
तर, पर्जन्यराजाचा हा असा धावा करण्यामागे माझा काय स्वार्थ असावा, असं वाटलं ना?. शहरातच राहत असल्याने भरपूर पाऊस होऊन चांगले पीक काढावे, असा मी शेतकरीही नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासरशी कवितेचे पाट वाहू घालण्याएवढी काव्यप्रतिभाही आता राहिली नाही. खरं तर, पावसाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. मात्र तरीही पाऊस पडावा, यासाठी मी अगदी चातकासारखी वाट पाहत आहे. कारण…
कारण…माझे जर्कीन उर्फ जॅकेट उर्फ् सामान ठेवायची पिशवी उर्फ….बरंच काही! चार महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या या सर्वऋतूसमभाव चीजेसाठी मला हवाय पाऊस. एकदा या शहरात चांगला दणदणीत पाऊस पडू दे, त्यात न भिजण्यासाठी या प्रावरणाचा उपयोग करू दे…मग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी चिंता नाही, (एक्चुअली कोरडा दुष्काळ असो किंवा ओला दुष्काळ…मी कोणत्याच गोष्टीची चिंता करत नाही. याबाबतीत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि माझं एकमत आहे.) एवढीच माझी आता महत्त्वाकांक्षा आहे.
काय आहे, गेली दोन वर्षे महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टीची परंपरा चालू आहे. त्या दोन संकटांशी झगडता झगडता तनू भागलेल्या जुन्या जर्कीनने यंदा कॉलर टाकली आणि त्याच्या रिप्लेसमेंटची तरतूद करण्याची जबाबदारी आली. आता हा योजनाबाह्य खर्च अंगावर पडल्यावर त्यासाठी हालचाली करणंही आलंच. आधीच खरेदीची काडीचीही अक्कल नसल्याची पंचक्रोशीत ख्याती! त्यात पावसाळ्याचा हंगाम बघून विक्रेत्यांनी केलेली सुगीची बेगमी. मग काय विचारता?
म्या पामराने कसाबसा छातीचा कोट करून जून महिन्यात एक जंगी जर्कीन विकत घेतले. आठशेपासून सुरू झालेली बोली खाली आणत पाचशे रुपयांत विक्रेत्याला पटविले आणि काखोटीला मारून ते गाठोडं आणलं. तरीही मनात धाकधूक होतीच. त्यामुळे आधी नव्या वस्तूचं खासगी प्रदर्शनही सुरू झालं. त्यात सर्वांनी ‘छान छान, चांगलं आहे’ असे शेरे मारल्यावर आमचे गंगेत घोडे न्हाले. आता हा पाऊस आणि हे जर्किन…पहिल्या पावसाच्या मेघगर्जनने मोराने पिसारा फिरवून नाचावे, तसा आनंद झाला.
हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता, हे मला लवकरच कळाले. (दोन अतिपरिचित वाक्यांचे कॉम्बिनेशन करण्याची खुमखुमी बऱयाच दिवसांपासून होती. त्याची आज संधी मिळाली.) खरं सांगायचं तर अपेक्षांवर पाणी फिरले असं म्हणायचंही संधी दिली नाही. जून महिन्यापासून आकाशात ढग जमतायत, वातावरण कुंद होतंय, पण…पावसाचे थेंब काही पृथ्वीपर्यंत येत नाहीत. पावसापासून बचाव करण्यासाठी जर्किन घालून फिरावं आणि घरी परतताना जर्किनमुळे घामाघूम होऊन, ओल्या अंगाने परतावं हेच आता नशिबी आलंय.
हे जर्किन नावाचं प्रकरण अंगावर घेतल्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे पाचशे रुपये पाण्यात गेल्याचं दुःख मला दिवसरात्र खायला लागलं. त्याची नुकसानभरपाई करण्यासाठी या जर्किनचा अधिकात अधिक उपयोग करून घ्यायचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागला. (व्यवस्थापनशास्त्रातील मॅक्झिमाईजिंगची संकल्पना हीच ना?) त्याचा पहिला प्रयोग जर्किनच्या दोन्ही बाजूंच्या खिशांवर झाला. मोबाईल, ऑफिसचे कार्ड, पासबुक…अशा चीजवस्तू वाहण्यासाठी हे दोन्ही खिसे अगदी चपखल कामी आले. त्यामुळे वेगळी एखादी बॅग ऑफिसला नेण्याची गरज नाहिशी झाली. मात्र त्याचा एक परिणाम असा झाला, की जर्किनचे दोन्ही खिसे पाण्याने भरलेल्या पखालीसारखे आकाराने फुगु लागले. त्यामुळे आजबाजूच्या लोकांच्या नजरा वेगळ्या अर्थाने जर्किनवर खिळू लागल्या.
त्यानंतर हीच उपयोगाची क्लृप्ती थोडी ताण देऊन वाढविण्याचा मार्ग पत्करला. जर्किनचा विस्तार तसा ऐसपैस असल्याने याबाबतीत फारसा विचार करावा लागला नाही. पूर्वीच्या काळी धोतराचा ज्याप्रमाणे शरीराचा खालचा भाग झाकण्यापासून अंथरूण-पांघरूण होण्याएवढा सर्वप्रकारे उपयोग होत असे, त्याप्रमाणे या जर्किनचा उपयोग होऊ लागला. छातीपर्यंत चेन ओढून घेऊन सदऱयाचे तुटलेले बटन झाकणे, बसमध्ये मळलेल्या सीटची धूळ टाकण्यासाठी असे जर्किनवर प्रयोग सुरू झाले. अगदी अलिकडे तर रेल्वेच्या बर्थवर झोपण्यासाठी अंथरण्यापर्यंत या वस्तुच्या उपयोगाचे क्षितिज रुंदावले आहे. त्यामुळे डेल कार्नेजीसारखं मीही ‘हाऊ टू यूझ जर्किन इन १०० वेज इन इव्हरी वेदर’ या किंवा तत्सम नावाने एखादे पुस्तक लिहावे असा विचार करतोय. (या प्रस्तावित पुस्तकासाठीची काही टिपणे जर्किनच्या डाव्या खिशात ठेवली आहेत. )
हे एवढे प्रात्यक्षिक करूनही त्यातून मिळतं ते एकप्रकारचं कोरडं समाधानच! एवढे होऊनही माझा आशावाद मला अद्याप सोडून गेलेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजावर कोणाचाही नसेल एवढा माझा विश्वास आहे. आज ना उद्या शहरात पाऊस पडेल, आज ना उद्या पावसापासून बचावल्याच्या आनंदाचा शिडकावा तरी मिळेलच, याची आशा अद्याप माझ्या मनात शिल्लक आहेच. त्यासाठीच…केवळ त्यासाठीच पाऊस पडावा, यासाठी मी देवाचा धावा करतोय!
————–