इंग्रजी पत्रकारितेत आलो, तेव्हा कोणत्या बातम्या कराव्या लागतील किंवा मी करेन, याबाबतीत इतरांइतकीच मलाही शंका होती. मात्र गेल्या महिन्यात मी दिलेल्या दोन बातम्यांमुळेच मला स्वतःला मी करत असलेल्या कामाबाबत अभिमान वाटत आहे। पहिली बातमी विंचूरकर वाड्याच्या बाबत होती. माझी गेली पोस्टही त्याचसंबंधात होती. ती बातमी पुणे मिररमध्ये आल्यानंतर मुंबई मिररनेही छापली. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा त्यात उल्लेख असल्याने त्यांनी या वृत्ताची दखल घेतली. ते स्वतः गणेशोत्सवाच्या काळातच पुण्यातील विंचूरकर वाड्यात येऊन गेल्याचे मला कळाले. तेव्हा त्यांच्याकडे यासंबंधात फॉलो-अपसाठी विचारणा करण्याची जबाबदारी साहजिकच येऊन पडली.त्या कार्यक्रमात तानाजी खोत याच्यासोबत नेट लावून बसलो. चार मंत्र्यांची बडबड, एका राजकीय कार्य़कर्त्याची चापलूसगिरी आणि काही सरकारी अधिकाऱयांची लाचारी सहन केल्यानंतर आबा व्यासपीठावरून उतरताना त्यांना गाठले. पाऊस मी म्हणत होता आणि इकडे आमच्या बातमीदारीचा कस लागत होता. कार्यक्रमाला आलेल्या अन्य सात-आठ बातमीदारांना झुकांडी देऊन, एकदाचा आबांचा कोट आम्हाला मिळाला.
“प्रस्ताव दिला होता त्यांना. आम्ही सुरक्षा पुरवावी अशी त्यांची मागणी आहे. ती फाईल चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आली आहे,” आर. आर. पाटील म्हणाले आणि आमचे घोडे गंगेत न्हाले (म्हणजे शेजारून वाहणाऱया मुळा नदीत) नंतर जेवणावर ताव मारला तरी पोट आधीच भरले होते.
त्यानंतर इतिहास तज्ज्ञांना विचारावे, तर बाबासाहेब पुरंदरे अमेरिकेला गेलेले. त्यामुळे त्यांच्या आधीच्या एका लेखातूनच माहिती घेतली. निनाद बेडेकर यांना फोन केला तर त्यांचे म्हणणे असे, की शिवाजी महाराजांनी अफझलखानाला वाघनखांनी नव्हे, तर तलवारीने मारले होते. कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभूषषण ग्रंथात ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांची वाघनखे आहेत, याचेही ठोस पुरावे नसून, नंतरच्या बखरींनी वाघनखांचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. हा एक नवाच पेच निर्माण झाला होता. होता म्हणजे आहे. त्यात विकिपेडियावर शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे म्हणून जे छायाचित्र आहे, ते म्हैसूरचे असल्याचे त्या फलकावर लिहिले आहे.