नाराज क्यों होते हो भाई?

लोकसभा निवडणुक संपताच आता राजकीय पक्षांची धुळवड सुरु झाली आहे। त्यात शिवसेनेच्या नेत्यांची सॉलिडच गोची झालेली दिसत आहे. तीन दिवसात शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या नावाने फोडायच्या होत्या तेवढ्या खडी फोडल्या. ‘लोकसभेत मुम्बईचा आवाज कोण उठविणार, विचारा राजला,’ ही उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया त्याच स्वरूपाची होती. म्हणजे शिवसेनेला मराठी मते मिळावित, यासाठी राज यांनी आपणहून रास्ता मोकळा करावा, ही उद्धव यांची अपेक्षा दिसते. जिथे राज यांची उपस्थिती नव्हती, अशा मराठवाडा आणि विदर्भातील जागाही शिवसेनेला मिळविता आल्या. त्याची संगती अजून त्यांनी सांगितलेली नाही.
राज यांच्यामुळे मराठी टक्का घसरला किंवा मराठी खासदार निवडून आला नाही, हे मला पटत नाही. देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने निवडणुक लढविण्याचा अधिकार सगळ्याच नेत्यांना वा त्यांच्या पक्षांना आहे. लोकांना ज्या पक्षात विशेष भरोसा वाटतो त्याला ते निवडून देतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेची अनेक मते खाल्ली याबाबत काहीही शंका नाही. मात्र या निवडणुकीत मनसे एक बाजू लावून धरणार आणि मराठी मते मिळविण्याचा प्रयत्न करणार ही गोष्ट तीन वर्षांपूर्वी आपली स्वतंत्र चूल मांडतानाच राज यांनी स्पष्ट केली होती. मात्र त्यावेळी सेनेची मंडळी आणि तथाकथित माहितगार जाणकार लोक मनासेला फारशी प्रतिष्टा देण्यास तयार नव्हते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसेच्या उमेदवारांनी मर्यादित यश मिळविले, त्याचीही संभावना अपयशात करण्यात आली. आता जेव्हा मनसेच्या उमेदवारांनी आपले उपद्रवमूल्य सिद्ध केले, तेव्हा कुठे सर्वांना जाणीव झाली, की हा पक्ष संसदीय राजकारणातही येऊ शकतो. मनसेच्या आतापर्यंतच्या वाटचालीला हे धरूनच झाले.

राज ठाकरे जेव्हा राज्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्यांना भेटत किंवा मुंबईत मी मराठी उत्सवाचे आयोजन करत त्यावेळी त्याची संभावना संक्षिप्त या सदराच्या पलिकडे होत नसे। हा माणूस काहीतरी करतोय, तो आपोआप थंड होईल, द्या त्याला थोडी प्रसिद्धी अशी भावना त्यावेळी होती. त्यानंतर परप्रांतियांच्या मुद्यावर आक्रमक झाल्यावर माध्यमांनी मनसेची दखल घेतली.

राज ठाकरे यांनी मराठी जनतेसाठी काय केले, असा प्रश्नही ही मंडळी विचारत असत। त्याचीच री वर्तमानपत्रेही ओढत असत. मात्र असा प्रश्न विचारणाऱया लोकांनी, थोडक्यात कॉंग्रेस, भाजप किंवा राष्ट्रवादी या पक्षांनी मराठीच जाऊ द्या, लोकांसाठी काय केले हा प्रश्न कोणीही विचारला नाही. ज्यावेळी जेटच्या कर्मचाऱयांवर संक्रांत आली आणि त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली त्याचवेळीस वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज आला होता. मात्र त्यावेळी त्यांनी राज यांना दहशतवादी, गुंड अशी प्रतिमा देऊ केली होती. महाराष्ट्रात एकाही व्यक्तीच्या भाषणात दिसून येणारा, अन्य लेख किंवा पुस्तकातला संदर्भ देण्याचा गुण मुद्दाम दुर्लक्षित करण्यात आला. राज यांची ही राजकीय खेळी निःसंशय, मात्र ते वेगळेपणच ठरावे. उद्धव ठाकरे यांनी विदर्भात शेतकऱयांच्या प्रश्नावर घेतलेल्या लाखा-लाखांच्या सभा मी पाहिल्या आहेत. तो मुद्दा उद्धव यांच्याइतका कोणीही प्रभावीपणे मांडला नाही. त्यांच्या आंदोलनामुळेच केंद्राला शेतकऱयांसाठी पॅकेज जाहीर करावे लागले. असे असूनही, त्यांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. याचा दोष राज यांच्याकडे कसा जातो?
आज शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले, की राज यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडले। मात्र आता गरज संबंध जोडण्याची असताना हे संबंध तोडण्यासारखे आक्रस्ताळे निर्णय जाहीर होत आहेत. मुळात शिवसेना किंवा मनसे एकत्र येण्याने शिवसेनेला मिळणारी मते वाढतील, हे गृहितकच चुकीचे आहे. १९९९ किंवा २००४ मध्ये राज ठाकरे शिवसेनेसोबतच होते ना. मग त्यावेळी पक्षाला अपयश का आले? आज मनसेला मिळणारी मते केवळ मराठी म्हणून नाही. ती तरुणांची मते आहेत. या तरूणांना धर्म, जात किंवा काही प्रमाणात प्रांतांचीही मर्यादा नाही. अरेला कारे म्हणणाऱया या तरूणाला रस्त्यावर येण्यासाठी एका हाकेची गरज आहे. ती हाक देण्याची ताकद सध्याच्या घडीला केवळ राज ठाकरे यांच्याकडे आहे, हे निवडणुकीच्या निकालाने सिद्ध झाले आहे.
त्यामुळे सध्यातरी शिवसेनेने राज यांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा राजकीय डावपेचांचा अधिक विचार करावा. नाहीतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनोरथांमध्ये मोडता घालायला मनसे आहेच.

दिवस निवडणुकीचे आहेत. अशा वेळेस लोकांना रिझविण्यासाठी नेत्यांना काय काय करावे लागेल याचा नेम नाही.

वर्ल्ड डिजिटल लायब्ररी

संयुक्त राष्ट्राच्या जागतिक ज्ञान वारसा प्रकल्पांतर्गत जागतिक ग्रंथालय महाजालावर सुरु झाले आहे. ग्रंथालय प्रेमी असणाऱया माझ्यासारख्या अनेकांना यामुळे मोठी सोय झाली आहे. वर्ल्ड डिजिटल लायब्ररी या नावाचे हे संकेतस्थळ सात भाषांमध्ये उपलब्ध आहे. अमेरिकेच्या लायब्ररी ऑफ कॉंग्रेसचे लायब्ररीयन जेम्स एच. बिंलिग्टन यांची ही मूळ कल्पना. व़ॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्राशी बोलताना बिलिंग्टन यांनी सांगितले, की वापरायला सोपे आणि विद्यार्थी, सर्वसामान्य लोक आणि विद्वान यांच्यासाठी मोफत असा ज्ञानाचा खजिना मोकळा करावा, हा मुख्य उद्देश होता.
संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर मला स्वतःला हा उद्देश बऱयाच अंशी साध्य झाल्याचे माझे मत आहे. या संकेतस्थळावर सर्व दस्तावेज न्याहाळण्यासाठी स्थळ, विषय, प्रकार अशी वर्गवारी तर आहेच शिवाय कालानुक्रमे न्याहाळण्याचीही सोय आहे. सहज चाळा म्हणून मी दोन दस्तावेज पाहिले. एक महाभारतकालिन भारताचा नकाशा होता. विशेष म्हणजे हा नकाशा पुण्यातच १९ व्या शतकात कधीतरी छापलेला असल्याची माहिती या संकेतस्थळावर मिळते. दुसरा विशेष दस्तावेज अधिक रंजक वाटला. तमिळनाडूतील मदुराई प्रांतात १८३७ च्या सुमारास असलेल्या ७२ जाती जमीतींच्या लोकांची ही चित्रे आहेत. त्यातील मराठा सरदार या नावाने असलेल्या चित्रातील मनुष्याचा पेहराव प्रस्थापित कल्पनांना धक्का देणारा वाटला. (किमान माझ्या तरी.)
एक भारतीय म्हणून मात्र काही गोष्टी मला यात खटकल्या. संकेतस्थळावरील १२०० दस्तावेजांपैकी केवळ २० दस्तावेज भारताशी संबंधित आहेत. भारतासाठी (किंवा दक्षिण आशियासाठी) वेगळा विभाग न करता मात्र त्याचा समावेश मध्य आशियामध्ये करण्यात आला आहे. कालमान आणि श्रेय यांबाबतीतही त्यामुळे भारतावर अन्याय होण्याची शक्यता आहे. उदा. जगातील पहिली कादंबरी म्हणून जपानमधील एक कृती मांडण्यात आली आहे. भाषाविषयक दस्तावेजांच्या विभागात भारतातील एकही कृती नाही.

महाराष्ट्रातील सर्व ग्रंथालये एकमेकांशी जोडण्याचा प्रकल्प गेली कित्येक वर्षे सुरु आहे। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाकडे या प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन परीक्षांची तपासणी मॅन्युअली करणाऱया या महामंडळाकडे त्यासाठी वेळ नसावा. राष्ट्रीय पातळीवर डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने काढलेले संकेतस्थळ आहे. मात्र ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या या संकेतस्थळावरील सर्व लिंक अद्यापही कार्यान्वित झालेल्या नाहीत. त्या कधी होतील हेही सांगता येणार नाही कारण सरकारी संकेतस्थळांबाबत काहीही विधान करता येत नाही. पाहिजे तर मनोहर जोशी यांना विचारा. महाराष्ट्र विधानमंडळाचे सर्व दस्तावेज महाजालावर उपलब्ध करू अशी घोषणा जोशी यांनी मुख्यमंत्री असताना म्हणजे १९९८ साली केली होती. आज ११ वर्षांनंतरही विधिमंडळाचे संकेतस्थळ आलेले नाही. त्यामुळे तूर्तास युनेस्कोने सुरू केलेल्या जागतिक ग्रंथालयाचे स्वागत करायला हरकत नाही

सगळे साहित्यिक लाचार आहेत

हाबळेश्वर येथे साहित्य संमेलनात संतसूर्य तुकारामचे प्रकाशक सुनिल मेहता यांना धक्काबुक्की करण्यात आली. त्यानंतर आज सकाळी त्यांची मी आणि माझा सहकारी तानाजी खोत यांनी भेट घेतली. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत मेहता यांनी साहित्यिक आणि साहित्यिकांच्या मिंधेपणावर बोट ठेवलेच. शिवाय यादव यांना राजीनामा भाग पाडण्यामागे राजकारण असल्याचेही सूचित केले. त्यांच्याशी झालेली ही चर्चा…

काल महाबळेश्वरला जो प्रकार घडला….
याबाबत मला एवढेच म्हणायचे आहे, की सगळे साहित्यिक आणि साहित्य संस्था, त्यात महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मराठवाडा व विदर्भाच्या संस्थाही आल्या या सगळ्या लाचार झाल्या आहेत. एका व्यक्तीच्या मिंधे झाल्या आहेत.

ही व्यक्ती म्हणजे कौतिकराव ठाले पाटील. त्यांनी काय जादू केली…
ते समजत नाही. परंतु एवढ्या वर्षांची परंपरा असलेले हे संमेलन त्यांनी हायजॅक केले. काल आधी त्यांनी मला विचारले, तुम्ही कोण? मी प्रतिनिधी शुल्काची पावती दाखविल्यानंतर त्यांनी संयोजकावर भाषण न देण्याचे खापर फोडले. त्यावेळी डॉ. वि. भा. देशपांडे, रंगनाथ कुलकर्णी ही मंडळी तेथेच बसली होती. त्यांनी कोणी चकार शब्दी काढला नाही. आज ठाले पाटील यांचे विधान छापून आले आहे, की भाषण मिळणार नाही. मग दोन दिवस ते खोटं का सांगत होते. त्यांनी स्वतःलाच अध्यक्ष म्हणून मिरवून घेतले.
या सगळ्या प्रकरणात संमेलनाची जी शोभा झाली तशी कधीही झाली नाही. उदघाटन समारंभाला मावळते अध्यक्ष नव्हते, नवनियुक्त अध्यक्षही नव्हते. शिवाय जी काही गर्दी जमली होती ती आशा भोसले यांना पाहण्यासाठी जमली होती. संमेलनाशी त्यांना काहीह देणं घेणं नव्हतं. आशाताईंचे भाषण संपताच मंडप सगळा रिकामा झाला. आजपर्यंत असं कधीही घडलं नव्हतं.

या सगळ्या प्रकरणावर प्रकाशक परिषदेचे काय म्हणणे आहे?
त्यांचा मला पाठिंबाच आहे. येत्या पंधरा दिवसांत आमची बैठक होणार आहे. त्यात पुढील वर्षीपासून वेगळे संमेलन घेण्यावरही विचार होऊ शकतो.

मुळात महाबळेश्वरला संमेलन घेण्याची योजनाच चुकीची होती. आता परीक्षेचे दिवस आहेत. शिवाय तेथे पर्यटकांशिवाय कोणी येत नाही. त्यांना पुस्तके घेण्यात काडीचाही रस नाही. प्रतिनिधींची सोय करण्याचीही या लोकांनी तसदी घेतली नाही. अध्यक्षांनी राजीनामा दिला तेव्हा या मंडळींनी संमेलन स्थगित का केलं नाही. शिवाय अध्यक्षांचे छापील भाषणही द्यायचे नाही, ही कोणती पद्धत आहे?

वाईट म्हणजे या गोष्टींवर कोणी बोलतही नाही
तेच म्हणतोय मी. सगळेच लाचार झाले आहेत. एक माणूस काहीही निर्णय घेतो आणि बाकी सगळे त्याच्या मागे फरफटत जात आहेत.
(इतक्यात मेहता यांना फोन येतो. पलिकडचे बोलणे ऐकल्यावर उसळून म्हणतात, अहो पत्रक काय काढायचं आणि निषेध काय करायचा? जे घडलं ते वृत्तपत्रांनी अगदी स्पष्ट छापलं तरीही या लोकांना फरक पडत नाही. आपण नुसती पत्रकबाजी काय करायची…आदी)

बरं, ही कादंबरी मागे घेण्याने तुमचे जे नुकसान झाले…
ते नुकसान फारसं आम्ही मनावर घेत नाही. तेवढं एक अंडरस्टँडिंग लेखक आणि प्रकाशका दरम्यान असतंच. व्यक्तिशः मला असं वाटतं, की यादव सरांनी माफी मागायला नको होती. कादंबरी परत घेतली याचाच अर्थ माफी मागितली असा होतो. पण त्यांना कदाचित फोन आले असतील, काही झाले असतील. त्यांनी निर्णय घेतला आणि आम्ही ठामपणे त्यांच्या मागे आहोत.

या सगळ्या प्रकरणात यादव यांच्या पाठिमागे कोणीही उभे राहिले नाही.
तीच तर शोकांतिका आहे. आता सगळं झाल्यावर प्रत्येकजण प्रतिक्रिया देत आहे. वाहिन्यांवरून बोलत आहेत. मात्र गेले दोन महिने हे सर्व लोकं कुठे होते. माध्यमांनीही त्याला काही प्रसिद्धी दिली नाही.

यादव सरांना अध्यक्ष बनू द्यायचं नाही, असे राजकारण यामागे असू शकते का?
निश्चितच आहे. हे सगळं प्रकरण घडवून आणलेलं आहे. त्यामागे राजकारण आहे. मात्र साहित्य क्षेत्रात हे जे काय चालू आहे, ते अत्यंत वाईट आहे. हे संमेलन कदाचित अखेरचे असू शकेल, अशीही एक शक्यता आहे.

वारकऱयांना धन्यवाद

समस्त महाराष्ट्रीय समाजाने आता वारकऱयांना धन्यवाद दिले पाहिजेत. कारण त्यांनी एका जगन्मान्य संताची निंदानालस्ती करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. त्यासाठी त्याच संताच्या विचारसरणीला त्यांना फाटा द्यावा लागला आहे, हा किरकोळ भाग आहे. संत तुकाराम यांच्या मनात जगाच्या सामान्य समजल्या जाणाऱया परंतु हिन पातळीवरच्या कार्यकलापाबाबत जो वितराग निर्माण झाला, तो त्यांची बदनामी करणारा आहे, हे वारकऱयांशिवाय आपल्याला कोण सांगू शकला असता? दारू पिणाऱया आपल्या मित्रांची संगत सोडायला पाहिजे, वाईट धंदे करणाऱया लोकांमध्ये वावरणे टाळायला पाहिजे आहे, असे विचार तुकाराम महाराजांच्या मनात येणं हा केवढा भयानक अपराध आहे, हे आनंद यादव यांना कोणी समजावयाला नको का?

मराठी साहित्यिक संमेलानाला खरोखर कशासाठी जातात, हे वारकऱयांच्या या यशाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातून जवळपास हद्दपार झालेली ब्राह्मणशाही पुन्हा स्थापन करण्याच्या दिशेनेही पाऊल यानिमित्ताने पडले, ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे. वेदांचा अर्थ आम्हालाच कळतो आणि तुकोबासारख्या तुच्छ माणसाने त्यात लक्ष घालू नये, हीच तर त्यावेळच्या ब्राह्मणांची भूमिका नव्हती काय? मग आता तुकोबांच्या चरित्रावर आमचाच हक्क आहे आणि इतर कोणालाही त्यासंबंधी लक्ष घालू नये, ही वारकऱयांची भूमिका तशीच आहे ना. तेव्हाच्या मंबाजीने तुकोबांना छळले त्यांची परंपरा कोणीतरी चालवायला नको का? असहिष्णुता आणि हटवादीपणाची गादी अशी रिकामी कशी राहू द्यायची? संप्रदायांच्या सुरवातीच्या संतांनी केवळ भक्ती आणि सहिष्णुतेची शिकवण दिली. ती आतापर्यंत पुरली. आता या पिढीने येणाऱया पिढ्यांसाठी काही ठेवा ठेवायला नको? ‘नाठाळांच्या माथी हाणू काठी,’ असे तुकोबांनी सांगितले. आता नाठाळ कोणाला म्हणायचे याचे सर्वाधिकार वारकरी समाजाने आपल्या हाती घेतले आहेत, याबद्दल त्यांचे करावे तेव्हढे कौतुक कमी आहे.

अध्यात्माची गंगा कितीही मोठी असली तरी माणसाची संकुचितता तिचा एखादा नाला करण्याचाच प्रयत्न करते, हे वारकऱयांनी दाखवून दिले आहे. शेवटी काय, आपला धर्माचा धंदा चालला पाहिजे, ईश्वराची प्राप्ति नाही झाली तरी चालेल, असे कोणीतरी दाखवून द्यायलाच पाहिजे ना? सोने आणि माती मृत्तिकेसमान मानणाऱया तुकोबांच्या देहूत त्यांच्या गाथेचे एक मंदिर उभे राहतय-अख्खं संगमरवरी. या मंदिराच्या प्रत्येक भिंतीवर गाथेतील अभंग कोरून ठेवलेत. तुकोबांच्या विचाराचा, तत्वज्ञानाचा चुराडा करायचाच आहे, त्यासाठी त्याचे पार्थिव अवशेष जपणे आवश्यक आहे. याचा प्रत्यय दिल्याबद्दल खरोखर हे जग वारकऱयांचे ऋणी राहिल.

एका बाबतीत मात्र वारकऱयांना अपेक्षेपेक्षा अधिक यश आलं. तत्कालिन ब्रह्मवृंद तुकारामांचा छळ करत असताना सर्वसामान्य जनता तुकोबांच्या बाजूने उभा होती. आता मात्र छळ होणाऱया व्यक्तीला पाठिंबा देण्याची कोणाची टाप नाही. अरे, चार शतकांमध्ये समाजाने एवढी तरी प्रगती करावयास नको का? सातशे वर्षांच्या वारकरी संप्रदायाला आणि शहाण्या सुरत्या साहित्यिकांना आपण जातीच्या आधारावर श्रेष्ठत्व ठरविण्याचा सार्वकालिक आणि हमखास फार्म्युला मान्य करायला लावला का नाही? शेवटी मुस्कटदाबी कोणाची होते हे महत्वाचे नाही, त्याची जात कोणती, तो कोणत्या संघटनांच्या कार्यक्रमांमध्ये जातो हे महत्वाचे. यादव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर हजेरी लावली म्हणून त्यांनी बहुजन चळवळींशी गद्दारी केली. त्यामुळे त्यांची पाठराखण करण्याची जबाबदारी आपली नाही, हे नेहमी घायाळ अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी अँम्बुलन्स सेवा पुरविणाऱया मुखंडांची विचारधारा यानिमित्ताने पुढे आली, हे महाराष्ट्राच्या वैचारिक आणि पुरोगामी परंपरेवर केवढे थोर उपकार आहेत? आता येते दोन महिने अनेक वर्तमानपत्रांत आणि वर्षाच्या शेवटी दिवाळी अंकांमध्ये मराठी साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा विषयांवर लेख लिहिण्याचे काम किती हातांना पुरणार आहे, हे विठ्ठलच जाणो. हे काम पुरविण्याबद्दलही वारकऱ्यांना धन्यवाद. अनेकानेक धन्यवाद.

अशी झोपडपट्टी सुरेख बाई

  • माणूस चित्रपट पाहायला का जातो?
  1. मनोरंजन हवे म्हणून.
  2. जगाच्या समस्यांबद्दल काथ्याकूट करायचा असतो म्हणून.
  3. चित्रपट महामंडळ किंवा आपली ज्यांच्याशी घसट असते अशा गुंडांकडे भरपूर पैसा असतो म्हणून.
  4. दिग्दर्शकाचे आयुष्य किती कंटाळवाणे आणि किळसवाणे आहे, हे प्रेक्षकांना कळालेच पाहिजे म्हणून.

  • स्लमडॉग मिलिनियर अप्रतिम चित्रपट का आहे?
  1. तो पाश्चात्य दिग्दर्शकाने काढलेला आणि पाश्चात्याळलेल्या लेखकाच्या कादंबरीवर आधारीत आहे म्हणून
  2. त्याला प्रतिष्ठीत ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन मिळालेले आहे म्हणून.
  3. त्यातील मोठ्या अभिनेत्यांपेक्षा लहान मुलांनी अधिक चांगला अभिनय केला आहे म्हणून.
  4. या वर्षी दुसरा कोणताच चांगला चित्रपट आला नाही म्हणून.
  • स्लमडॉग मिलिनियर याचा नक्की अर्थ काय आहे?
  1. झोपडपट्टीत राहणारी कुत्री कधीतरी लक्षाधीशही होऊ शकतात.
  2. झोपडपट्टीत लक्षावधींच्या संख्येने श्रीमंत लोकं कुत्र्याचं जगणं जगतात.
  3. लक्षाधीश असणाऱया व्यक्तींना झोपडपट्टीतील लोंक कुत्र्याप्रमाणे वाटतात.
  4. भारतीय़ लोकं आता लाखो रुपये कमावत असली तरी त्यांची खरी जागा झोपडपट्टीतच आहे.

  1. स्लमडॉग मिलिनियरमध्ये झोपडपट्टीतील जीवनाचे जीवंत चित्रण आहे, असे बहुतांश प्रेक्षकांना का वाटते?
    1. चित्रपटात झोपडपट्टीचे हुबेहुब दर्शन घडविले आहे.
    2. चित्रपटाच्या फ्रेम संथपणे हलत असल्या, की चित्रपटात काहीतरी जीवंत आहे असे समीक्षकांना वाटत असते.
    3. प्रेक्षकांनी कधी झोपडपट्टीचे जीवन जवळून पाहिलेले नसते.
    4. झोपडपट्ट्यांतही अलीकडे झपाट्याने आधुनिक जीवनशैली प्रवेश करत आहे.

  • स्लमडॉग मिलिनियरबाबतच्या कोणत्या गोष्टीला तुम्ही दाद द्याल?
  1. आपल्या मनातील ठाशीव प्रतिमा पडद्यावर उतरून त्यामागे मोठे संशोधन असल्याचा दावा करणाऱया दिग्दर्शकास
  2. केवळ ऑस्करसाठी नामांकन झालेले असल्यामुळे चित्रपटाबद्दल पाने भरभरून लिहिणाऱया समीक्षकांस
  3. हजारो फ्रेम्सच्या ठिगळांना फक्त जाहिरातीच्या बळावर चित्रपट म्हणून खपविणाऱया मार्केटिंगच्या तंत्रास
  4. दोन आठवड्यांपासून चित्रपटाचे खेळ जोरात चाललेले असतानाही गरीब मुलांसाठी चित्रपटांचे मोफत खेळ आयोजित न करणाऱया सामाजिक संघटनांना
  • थ्री मस्केटिअर्स ही कादंबरी काय आहे?
  1. इंग्रजी साहित्यातील मापदंड मानली जाणारी कांदबरी
  2. महापालिकेच्या शाळेतील तिसरीच्या विद्यार्थ्यांना लावलेले पाठ्यपुस्तक
  3. बाजारातील विक्रीमूल्य संपलेले एक पुस्तक.
  4. मानवी जीवनाबद्दल अडीच तासांत चिरंतन सत्य सांगणारा एक पवित्र ग्रंथ.

मुख्यमंत्र्यांचे शहर

नांदेडमहाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या या शहराला गेल्या महिन्यापासून मुख्यमंत्र्याचे शहर म्हणून ओळख मिळाली आहे. वास्तविक अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ मुदखेड. मात्र त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात त्यांनी या शहरापासून केली आणि तेव्हापासून त्यांची तीच ओळखच बनली. अशोकरावांचे वडील कै. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे पहिले नगराध्यक्ष. त्यांच्यामुळे देशाच्या नकाशावर या शहराला ठळक स्थान मिळाले. १९८६ मध्ये खासदारकीची निवडणूक लढवून अशोकरावांनी येथूनच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. मात्र नंतर १९९० साली पराभव झाल्याने त्यांनी हा मतदरासंघ बदलला. मात्र आता ते मुख्यमंत्री झाल्याने नांदेडला एक आगळा मान मिळाला आहे. एकाच शहरातील दोन व्यक्ती मुख्यमंत्री होण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. आता येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यास अजित पवार मुख्यमंत्री होतील व बारामतीलाही तो मान मिळेल. मात्र त्यातही पहिलेपणाचा मान नांदेडचाच. तरीही शहरात फिरताना मुख्यमंत्र्यांची चापलुसी करणारे बॅनर्स फारसे दिसत नाहीत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

नांदेड झपाट्याने बदलत आहे. अगदी ओळखू न येण्याइतपत. मात्र हा सारा बदल केवळ तीनचार वर्षांतील आहे. अनेक वर्षांनंतर शहराचा फेरफटका मारून या बदलाचा आढावा घेतला.

प्रथम तुज पाहता

से Nanded
नांदेडचे रेल्वे स्थानक आता भव्य आणि खरोखर व्यग्र असल्याचे भासते. ही सगळी ब्रॉडगेजची किमया. एरवी या स्थानकाने आतापर्यंत तीनपेक्षा जास्त वेळेस आपले रूप बदलले आहे. जिल्हा परिषद, टपाल कार्यालय, न्यायालय, आधी पालिका आणि आता महापालिकाअशा अनेक कार्यालयांपासून हाकेच्या अंतरावर असणारा भाग आता मध्यवर्ती भाग म्हणून ओळखल्या जातो. आमच्या लहानपणी तो शहरापासून दूर वाटायचा. याचं कारण शहरातील मुख्य वस्ती स्टेशनच्या अलिकडे होती. स्टेशनमध्ये कोळशाची इंजिने यायची तेव्हा त्याची शिट्टी घरापर्यंत ऐकू यायची.

नांदेडला पहिली रेल्वे धावली १९०४ मध्ये. त्यावेळी निजामाने मराठवाड्यात मीटरगेज रुळ टाकले. अनेक वर्षे संघर्ष केल्यानंतर (ज्यात दिवंगत स्वातंत्र्यसैनिक गोविंदभाई श्रॉफ आणि दैनिक प्रजावाणीचे संपादक सुधाकर डोईफोडे आघाडीवर होते) इथे ब्रॉडगेज गाडी आली १९९५ मध्ये. विशेष म्हणजे गेल्या १०५ वर्षांत मराठवाड्यात एक फुटाचाही रेल्वेमार्ग वाढलेला नाही. त्यामुळे बीडसारख्या जिल्ह्यात परळी वगळता कुठेही रेल्वे जात नाही. एवढ्या वर्षांमध्ये स्टेशनचा विस्तार अनेकदा झाला. मात्र तेव्हाही घरात करमत नाही म्हणून वेळ काढायला इथे येऊन बसणाऱयांची कमतरता नव्हती. चित्रकलेच्या विद्यार्थ्यांना तर त्यांच्या सरावासाठी ही हक्काची जागा होती.

लोकांची ती सवय सहजासहजी जाणारही नव्हती. ब्रॉडगेजनंतर मुंबई आणि दिल्लीशी येथील गाड्यांची घसट वाढत गेली आणि रेल्वे स्थानकाला व्यावसायिकस्वरूप येऊ लागले. शहरात येणाऱया पाहुण्याला पहिली झलक मिळते ते येथे. आता गुरूतागद्दीच्या निमित्ताने त्याला एखाद्या तारांकीत हॉटेलचे रुप देण्यात आले आहे. तरीही स्टेशनच्या स्वच्छ आणि छाप पाडणाऱया आवाराबाहेर येताच कचऱयाचे ढीग स्वागत करतातच. हे स्टेशन रोडवर पन्नास पन्नास वर्षे धंदा करणाऱया हॉटेलवाल्यांचे पाप ! नोकरशाहीत हेडमास्तर या नावाने प्रसिद्ध असलेले आणि दोन वेळा केंद्रीय अर्थमंत्री, दोनदा गृहमंत्री आणि दोनदा मुख्यमंत्री झालेले शंकरराव चव्हाण नांदेडकरांना शिस्त लावू शकले नाहीत. तिथे गुरुतागद्दीसाठी ती अंगी बाळगण्यात येईल, अशी अपेक्षा कशी करायची.

रेल्वे स्टेशन हे आमच्यासाठी एका आणखी गोष्टीसाठी प्रसिद्ध होते. ते म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळेस आणि रात्री उशिरापर्यंतही, तेथे वर्तमानपत्रे आणि नियतकालिकेही मिळायची. पेपरचे स्टॉल हा प्रकार माझ्या लहानपणी तरी नांदे़मध्ये अनोळखी प्रकार होता. वर्तमानपत्रे एक तर घरी पोऱया टाकायचा किंवा बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशनहून येणारी एखादी व्यक्ती ते आणायची. त्यामुळे सकाळी घरी पेपर आला नाही तर रेल्वे स्टेशनपर्यंत जाऊन ते आणावे लागायचे. विशेष म्हणजे या स्टॉलवर मराठीपेक्षाही हिंदी किंवा तेलुगु नियतकालिके अधिक मिळायची.

सध्या दिल्ली ते बंगळूर धावणाऱया एक्स्प्रेस गाड्यांची वर्दळ नांदेडच्या स्थानकावर चालू असते. तिकिट तपासनीस कठोरतेने तिकिट तपासतात आणि फलाटांवर गप्पा मारणाऱयांपेक्षा प्रवाशांची संख्या अधिक दिसते. थोडक्यात म्हणजे गावाचा प्रवास शहराकडे होतोय!

संथ वाहते गोदावरी

से Nanded

गोदावरी ही नांदेडची ओळख मानण्यात येते. खरं तर पावसाळ्यात दुथडी भरून वाहताना गोदावरी पाहण्यात जी मजा आहे ती अन्य कशात नाही. मात्र ते पाणी अन्य ऋतुंत तसेच वाहिल याची खात्री नाही. शिवाय वाढत्या लोकसंख्येचे दुखणेही नाल्याच्या रुपाने तीला वाहावे लागते. गोदावरीची अगदीच मुळा मुठा झालेली नाही. त्यामुळे अजूनही तीत पाणी आणि रसायने वेगवेगळी ओळखता येतात. शिवाय नांदेडमध्ये उद्योग चालण्यापेक्षा बंद पडण्याचेच प्रमाण अधिक असल्याने त्या तुलनेत अजूनही येथे पाणी वाहते.

अगदी अलिकडे , कदाचित गुरुतागद्दीच्या निमित्ताने असावे, पण गोदावरीच्या एका काठाचे चांगलेच सुशोभीकरण झाले आहे. नव्या पुलावरून (तसा तो बांधूनही तीसएक वर्षे झाली असतील पण निजामाच्या राजवटीत बांधलेल्या पुलाच्या तुलनेत तो नवा आहे), सायंकाळच्या वेळी गुरुद्वारा लंगर साहिब, गुरुद्वारा नगीना घाट असे ओळीने गुरुद्वारे रोषण झालेले असतात. नदीवर नव्याने बांधलेले घाट या गुरुद्वारांवरील दिव्यांच्या उजेडात नदीपात्रातील आपले सुंदर प्रतिबिंब न्याहाळत असतात. केंद्र सरकारकडून आलेल्या १३०० कोटी रुपयांपैकी काही अंश तरी खर्च झाला आहे, हे या सुशोभित घाटांवरून दिसून येते. एरवी गोवर्धन घाटापासून नगीना घाटपर्यंत पूर्वी घाणीचेच साम्राज्य होते. त्याजागी ही रम्य आणि सुशोभित जागा माणसांना किमान पाच मिनिटे तरी खिळवून ठेवते. ही नव्याची नवलाई न ठरता कायमस्वरूपी हेच दृश्य दिसावे, अशीच इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे.

म्हातारा इतुका न

से Nanded

नाही. मी या पुतळ्याबद्दल बोलत नाही आहे. हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला सोडविल्याबद्दल कृतज्ञता म्हणून तो उभारण्यात आला आहे. त्यांच्या मागे जो टॉवर आहे, तो मात्र सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा आहे. एकेकाळी सर्वात उंच बांधकाम म्हणून तिला मान होता. आता अवतीभवतीच्या इमारती आणि मुख्यतः गल्लीभूषण, रस्ताभूषणांच्या बॅनरची गर्दी झाल्यामुळे टॉवरची रया गेल्यात जमा आहे. आधी साध्या चुन्याच्या असलेल्या टॉवरला पंधरा पर्षांपूर्वी काळ्या टाईल्सचे चिलखत लावण्यात आले. त्यामुळे तो बिचारा आणखी बापुडवाणा दिसू लागला. शिवाय त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात उष्णता वाढू लागल्याचेही वाद सुरू झाले. आता यंदा जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण योजनेच्या निमित्ताने त्याला पुन्हा मेकअप करण्यात येत आहे. तो झाल्यावर टॉवर पुन्हा नायक होणार, चरित्र नायक होणार का एखादे विनोदी पात्र बनून वर्तमानाची खिल्ली उडविणार, काळच जाणे. (कारण त्याची साक्ष काढायला टॉवरवरचे घड्याळ अद्याप चालू आहे.)

तरी उघड्यावर असल्याने टॉवर सुदैवाने लोकांना दिसतो तरी. नांदेडमध्ये एक किल्ला आहे हे त्या शहरात राहणाऱया अनेकांना माहितही नाही. गोदावरीच्या काठीच वसलेल्या त्या नंदगिरीच्या किल्ल्यावर पालिकेने (आता महापालिकेने) कब्जा करून तिथे डंकिन केले आहे. त्यामुळे सामान्य लोकांना तिथे प्रवेशच नाही.

तीन सौ साल गुरु दे नाल

से Nanded

गेल्या अनेक वर्षांमध्ये नांदेडच्या दृष्टीने घडलेली सर्वात चांगली घटना म्हणजे गुरुतागद्दी सोहळा. या सोहळ्याच्या निमित्ताने नांदेडमध्ये अनेक चांगली कामे झाली, रस्ते सुधारले, नव्या इमारती झाल्या. परदेशातून आलेल्यांसाठी खास एक एनआरआय भवन उभे राहिले. मागे १९९९ साली शहरात खालसा त्रिशताब्दी सोहळा झाला होता. त्यावेळी सुमारे पाच लाख लोक जमले होते तरीही प्रशासनाची कोंडी झाली होती. यंदा मात्र अंदाज २० लाख शीख यात्रेकरू (सरकारी भाषेत भाविक) जमले असतानाही सर्व काही सुरळीत सुरू होते. याचे श्रेय चव्हाण यांना निश्चितच जाते. तत्कालिन मुख्यमंत्र्यांचे असहकार्य असतानाही त्यांनी या सर्व कामांची नीट संपादनी केली. त्यानंतर पंतप्रधान आणि त्यांच्या वरिष्ठ मॅडम यांना नांदेडमध्ये आणून आपण कसे काम करतो, याची झलकही दाखविली. त्याचे फळ म्हणून त्यांना दोन महिन्यांतच मुख्यमंत्रीपद मिळाले असावे.

से Nanded

बाहेरच्या लोकांनी विचारले, तुमच्याकडे पाहण्यासारखे काय आहे, की नांदेडकर हमखास गुरुद्वाऱयाचे नाव घेतात. त्याचे महत्त्व आहेही तसेच. मात्र गुरु गोविंदसिंह यांची समाधी असलेल्या सचखंड साहिबशिवाय शहर व परिसरात आणखी आठ ते नऊ गुरुद्वारे आहेत. गुरद्वारा नगीनाघाट साहिब, गुरुद्वारा माता साहिब, बंदाघाट साहिब यांसाऱखे गुरुद्वारे केवळ पाहण्यासाठीच नाहीत, तर ते अनुभवण्यासारखेही नक्कीच आहेत. मालटेकडी साहिब सारखे नवे गुरुद्वारेही येथे नव्याने उभारण्यात येत आहेत.

शीख संप्रदायाचे नांदेडशी असलेले नाते शहरात जागोजागी दृष्टीस पडते. त्यात काही असाहजिक आहे, असे मला वाटतही नाही. गुरु गोविंदसिंह रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंह इंजिनियर कॉलेज अशा संस्था आहेत, तशा गुरु गोविंदसिंह चषकासाऱख्या हॉकी स्पर्धा आहेत. अशा बाबी पाहून अनेकांना नांदेड महाराष्ट्रात आहे का पंजाबमध्ये असा प्रश्न पडतो. त्यात शहरात सर्रास वापरण्यात येणारी हैदराबादी हिंदीतो एक वेगळाच सांस्कृतिक धक्का आहे. विशेष म्हणजे नांदेडमधील शीखांची भाषा पंजाबी शीष अगदी थट्टेवारी नेतात.

तरीही पंजाबमधील राजकारणाची अपरिहार्य़ सावली येथे पडलेलीच असते. पंजाबमधील दहशतवाद ऐन भरात असताना, १९८६ साली गुरुद्वारा लंगर साहिबमध्ये शीखांमधीलच एका पंथाच्या प्रमुखाचा मुक्काम होता. हा धर्मगुरु दहशतवाद आणि खासकरून त्यासाठी धर्माचा वापर याच्या विरोधात होता. तर त्याची लंगर साहिबच्या दारात स्टेनगनने गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आता, गुरुतागद्दी व्यवस्थापन समितीचे कामकाज आणि तिचे अध्यक्ष एम. एस. गिल यांच्याबद्दलच्या तक्रारी, यांनी स्थानिक वर्तमानपत्रांना गेले वर्षभर खाद्य पुरविले.

नांदेडचा मुख्य गुरुद्वारा, सचखंड साहिब हा गुरु गोविंदसिंग यांच्या समाधीस्थळी बांधलेला आहे. राजा रणजितसिंह यांनी त्यांच्या कालखंडात या गुरुद्वाऱयाचे बांधकाम करवून घेतले. गुरु गोविंदसिंग यांचे दागिने, शस्त्र येथे ठेवलेले आहेत. मुख्य म्हणजे ते सर्वसामान्यांना पाहताही येतात. केवळ चॅनेल किंवा माध्यमांसमोर तोंड उघडणाऱया बोलघेवड्या विश्वस्तांपुरते ते मर्यादित नाहीत. प्रत्येक शीख व्यक्तीला त्याच्या उत्पन्नाच्या दहा टक्के हिस्सा गुरुद्वाऱयाला द्यावा लागतो. शिवाय वयाच्या साठाव्या वर्षीपर्यंत एकदा तरी सचखंड साहिबचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे घुमटाला सोन्याचा पत्रा आणि आत सोन्याची नक्षी असलेल्या या प्रार्थनास्थळाला उत्पन्नाची वानवा नाही. मात्र एकूणच भक्तांना देवाआधी दानपेटीचे दर्शन घडविण्याची जाज्वल्य परंपरा गुरुद्वाऱयांमध्ये नसते. तरीही, अगदी आपापल्या क्षेत्रात मोठी उंची गाठलेली मंडळी येथे भक्तीभावनेने सेवा करतात. इंग्लंडमध्ये मोठा उद्योग सांभाळणारी आसामी येथे येणाऱ्यांची पादत्राणे सांभाळत असते तर पी. एचडी. केलेले प्राध्यापक लंगरमध्ये वाढपी काम करतात. तेथे कोणीही कोणत्याही प्रकारचा बडेजाव नाही. गुरु गोविंदसिंग यांच्याशी संबंधित आठ गुरुद्वारे नांदेडमध्ये आहेत. शिवाय घोड्यांची पागाही आहे. पंजाबमधील अत्यंत उंची जातीचे घोडे येथे पाहायला मिळतात. होळी आणि दसऱयाला हे पांढरेशुभ्र घोडे जेव्हा शहरात मिरवणुकीने फिरतात, त्यावेळी डोळ्यांचे पारणे फिटते.

सर्वे यस्य वशात् गात् स्मृतिपथं

से Nanded
नांदेडला महापालिका मिळाली १९९७ मध्ये. त्यासाठी नदीपलिकडील वाघाळा आणि सिडको, हडको हा भाग शहराला जोडण्यात आला. आता तरोडा हा नांदेडच्या सीमेवर वसलेल्या खेड्याचा समावेश पालिका ह्द्दीत करण्याची योजना आहे. त्याला विरोध म्हणून आंदोलने सुरू झाली आहेत. पन्नास वर्षॉपूर्वी पालिकेचे कामकाज ज्या इमारतीत होत होते, ती इमारत आता पूर्णपणे पाडण्यात आली आहे. त्याजागी नवीन इमारतीचे बांधकाम चालू आहे. पालिकेच्या इमारतीशेजारी ग्रंथालय आणि वाचनालय होते. तेही जमीनदोस्त करण्यात आले आहे. पालिकेच्या इमारतीतील लालबहादूर शास्त्री सभागृह हे पूर्वी शहरात प्रसिद्ध होते. १९८३८४ साली जेव्हा पहिल्यांदा दूरदर्शनचे प्रक्षेपण शहरात सुरू झाले, तेव्हा भारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये झालेले दौरे आम्ही याच सभागृहात वाचनालयातील टीव्हीवर पाहिले होते.

आता नवीन होणाऱया इमारतीत सभागृह असेल मात्र त्याला लालबहादूर शास्त्रींचे नाव असेल का नाही, याबाबत मला शंका आहे. वाचनालय आणि ग्रंथालयाच्या बाबतीत तर आणखीच गंमत आहे. हे दोन्ही आता शिवाजीनगर आणि गोकुळनगर भागात हलविण्यात आले आहेत. मात्र जुन्या ग्रंथालयाच्या जाण्याने जनता राजवटीची नांदेडमधील शेवटची आठवण नाहीशी झाली आहे. एरवी शहरभर निरनिराळ्या इमारतींना कॉंग्रेसच्या नेत्यांची अथवा गुरु गोविंदसिंहांचे नाव आहे. ही एकमेव संस्था होती जी राम मनोहर लोहिया यांच्या नावाने उभी होती. सर्व सरकारी संस्था कॉंग्रेसच्या ताब्यात असण्याच्या आणि राजकीयदृष्ट्या शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पक्ष अशा पक्षांचा जोर असतानाच्या काळात आता स्थलांतरीत वाचनालयाला त्यांचे नाव देण्याची मागणी आता कोण करणार. या वाचनालयात बसून एमपीएससीयूपीएससीचा अभ्यास करणाऱयांची संख्या खूप मोठी होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगु, उर्दू या सहा भाषांतील नियतकालिके, वर्तमानपत्रे या वाचनालयात येत असत. मला वैयक्तिकदृष्ट्या राम मनोहर लोहिया वाचनालयाबद्दल विशेष ममत्व होते. कारण व्यंगचित्रांची माझी पहिली ओळख येथेच झाली. टाईम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्स्प्रेस, हिंदू, इलेस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया, संडे, धर्मयुग, जनसत्ता . चे वाचन मी येथेच केले. नांदेडमध्ये हाताच्या बोटांपेक्षाही कमी असे माझे जे मित्र होते ते या वाचनालयातच भेटले होते. सर्व भारतीय भाषा एकाच लिपीचे वेगवेगळे रुप घेऊन लिहिल्या जातात, हे सांगणारे भारतीय वर्णमाला हा ग्रंथ मी येथेच वाचला. त्यामुळे पुढे मला निरतिशय फायदा झाला. थोडक्यात म्हणजे आज मी जो काय आहे तो या वाचनायलामुळे आहे.

पुढे मी अमेरिकन लायब्ररी, ब्रिटीश लायब्ररी, एशियाटिक सोसायटी (सेंट्रल लायब्ररी), मॅक्स म्युल्लर भवन, पुण्यातील नगर वाचन मंदिर विभागीय ग्रंथालय अशी अनेक वाचनायलये पालथी घातली. मात्र रा. . लो. वाचनालयासारखा मोकाट संचार कुठेही केला नाही. त्या वाचनालयात पुस्तके फारशी उत्कृष्ट होती, सुविधा चांगल्या होत्या अशातला भाग नाही. मात्र तेथील कर्मचारी वर्ग आमचा दोस्त झाला होता शिवाय आम्हाला हवं ते तिथे मिळत होतं. ते वाचनालय उभं असलेली जमीन बोडकी झालेली परवा पाहिली आणि त्या सगळ्या आठवणी आल्या. सर्वे यस्य वशात् गात् स्मृतिगात्पथं कालाय तस्मै नमः….!

———————

०८ चे आठवावे अनुभव

जानेवारी ०८
डिसेंबरच्या शेवटास झालेल्या जुन्या मित्राचा मृत्यू आणि नव्या नोकरीसाठी झालेली मुलाखत अशा संमिश्र वातावरणात वर्ष सुरू झाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कॉल येईल असे सांगितलेले असल्याने त्याची वाटच पाहत होतो. अशात ४ तारखेच्या सुमारास इकडची पगारवाढ आणि तिकडची नोकरी असे दोन्ही एकाच वेळेस योग आले. अशा वेळेस दुसरा पर्याय लाथाडणे हा मूर्खपणा ठरला असता. त्यामुळे तोच स्वीकारला. त्याचा फायदा एवढाच झाला की आठ ते दहा दिवसांची सुट्टी मिळाली. या काळात नांदेडला मुक्काम केला आणि आठवण्यासारखी गोष्ट म्हणजे शेवटच्या चार दिवसांत केलेला सुमारे एक चतुर्थांश भारताचा प्रवास! आधी ता. १४ ला नांदेडहून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गेलो. तेथे एक दिवसाचा मुक्काम करून दर्शन वगैरे करून परतलो. मध्ये एक दिवसाचा खंड करून १६ तारखेला नांदेडहून आधी सिकंदराबादला गेलो. का? तर पॉंडिचेरीच्या नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग निवडायचा म्हणून. शिवाय नियोजन करून प्रवास करण्याने माणसाने भौतिक स्थानांतरण होते, पण त्याच्या अकलेत काडीमात्र बदल होत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. ‘यस्तु संचरते देशान’ वगैरे झाल्यानंतर ‘तैलबिंदुरिवाम्भसा’ होण्यात नियोजन हा फार मोठा अडसर आहे. 

असो. मग गाडी थेट सिकंदराबादला जात नाही म्हणून सिताफळमंडी येथे उतरणे, तेथून सिंकदराबादला जाणे असे सव्यापसव्य केले. सिकंदराबादला कळाले, की तेथून चेन्नईला जाण्यासाठी गाडी नाही. मग सिंकदराबादहून हैदराबादला जाणे क्रमप्राप्त झाले. जायचे कसे हे तर माहित नाही. ऑटोरिक्षाला विचारले तर ८० रु. भाडे. शेवटी तीन ठिकाणी विचारणा करून सिटीबसमध्ये चढलो. हैदराबादच्या स्थानकावरून अनेक वर्षांपूर्वी चारमिनार एक्सप्रेसने चेन्नईला गेलो होतो. आता गेलो तर तिथूनही चैन्नईला दुसऱया दिवशीच गाडी असल्याचे कळाले. मला तर तीन दिवसांत पुण्याला परतायचे होते. त्यासाठीही आधी खासगी ट्रॅवल्सकडे चौकशी केली. अशा चार लोकांशी बोलल्यानंतर एवढेच लक्षात आले, की चैन्नईला जाणाऱया बसेस नेल्लुरूहून जातात आणि तिथले भाडे चारशेच्या खाली नाहीत. मग तेथून बस स्थानक गाठले. त्यासाठीही रिक्षावाल्यांशी चार समजुतीच्या गोष्टी बोलून झालेच होते. 

सुदैवाने आंध्र प्रदेशच्या राज्य परिवहन सेवेची भाड्यांच्या बाबतीत तरी खासगी गाड्यांशी स्पर्धा नाही. त्यामुळे दोनशे रुपयांत नेल्लुरूचे तिकिट मिळाले. थंडी मी म्हणत असताना केलेला रात्रभराचा प्रवास आजही मला आठवतो!
 
नेल्लुरूला बारा वाजता पोचल्यानंतर तेथून पुन्हा चैन्नईसाठी गाडी पकडणे आलेच. माझी अपेक्षा अशी होती, की ज्याअर्थी सगळ्या ट्रॅव्हल ऑपरेटर्सच्या तोंडी नेल्लुरूचे नाव होते, त्याअर्थी ते चेन्नईपासून जवळ असेल. मात्र दुपारी दोनच्या सुमारास गाडीत बसल्यावर जेव्हा साडे सहा वाजले तरी चैन्नईची चिन्हे दिसेनात तेव्हा काळजी वाटायला लागली. सरतेशेवटी दिवेलागणीच्या सुमारास चेन्नईच्या भूमीवर पाय टेकले. नांदेडहून निघून एव्हाना चोवीस तासात रेल्वे, ऑटो, सिटीबस आणि दोन राज्यांच्या बस असा एकूण वीस तासांचा प्रवास केला होता. त्यामुळे कोयम्बेडु मोफुसिल बस टर्मिनसवर उपलब्ध असलेल्या डॉर्मिटरीचा उपयोग करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

दुसऱया दिवशी सकाळी पॉंडिचेरीकडे प्रस्थान केले. तिथे श्री अरविंद आश्रमाच्या विश्रामगृहात एक दिवस मुक्काम. तिथेही एका दिवसाच्या बोलीवर खोली मिळाली. त्यामुळे आदल्या दिवशी अकरा वाजता ताबा घेऊन दुसऱया दिवशी सकाळी नऊ वाजता तिथून निघावेही लागले. मलाही एका दिवसापेक्षा जास्त थांबणे शक्य नव्हते. दुपारी पॉंडिचेरीहून निघालो आणि संध्याकाळी चैन्नईला पोचलो. तिथून मुंबई मेल रात्री निघत असल्याने स्टेशनवरच वेळ काढला आणि गाडीत बसलो. तिथून सुमारे चोवीस तासांनंतर पुण्यात उतरलो तेव्हा स्वयंस्फूर्त प्रवासाची हौस मोठया प्रमाणात भागली होती.

आता वर्षभराच्या दगदगीनंतर आणि बंदिस्त जीवनशैलीनंतर मला कोणी विचारलं, असा प्रवास पुन्हा करणार का तर उत्तर देईनः नक्कीच!


यस्तु संचरते देशान पंडितानपर्युपासते
विस्तारते तस्य बुद्धी तैलबिंदुरिवाम्भसा

जो विविध प्रदेशात प्रवास करतो आणि विद्वानांची सेवा करतो, त्यांच्या सहवासात राहतो त्याची बुद्धी तेलाचा थेंब ज्याप्रमाणे पाण्यावर पसरतो त्याप्रमाणे विस्तारते.

नव्या वर्षाचा संकल्प

नव्या वर्षासाठी माझा संकल्प…कोणालाही नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठवायच्या नाहीत. गेल्या वर्षीच्या शुभेच्छा अजून संपल्या नाहीत. अन २००८ ची काया अवस्था झाली आहे हे वेगळे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.