देशाच्या सुरक्षेबाबत देशात मोठी चर्चा चालू आहे. जेथे मूळ हल्ला झाला त्या राज्यात मात्र वेगळीच समस्या उभी आहे.

हा हल्ला नव्हे, युद्धच

मुंबईत गेले दोन दिवस जे घडत आहे, ते नवीन आहे ते केवळ पद्धतीमध्ये. एरवी तसाच अचानक हल्ला, सुरक्षा यंत्रणांची तीच हतबलता, मृतांचे वाढत जाणारे आकडे तेच असं सगळं काही तेच ते आणि तेच ते आहे. एवढे दिवस स्वतः छुपे राहून बॉम्बस्फोट घडविणारी मंडळी आता खुलेआम शहरात घुसून माणसांना त्यांच्या इच्छेप्रमाणे टिपू लागली आहेत. हा अतिरेकी हल्ला म्हणायचा का युद्ध यावर संरक्षण क्षेत्रातील काही तज्ञांची मते घेतली. त्यावर त्यांचे म्हणणे हे हल्ला नव्हे, युद्धच आहेः

व्हाईस एडमिरल (निवृत्त) ओमप्रकाश बन्सल यांच्या मते, “बुधवारी मुंबईत घडलेला हल्ला किंवा त्याआधी दिल्ली, अहमदाबाद इ. शहरांमध्ये घडलेले हल्ले हे युद्धाची घोषणाच आहेत. केवळ ते अपारंपरिक युद्धात मोडते, त्यात शांतताप्रेमी नागरिक हे मुख्य लक्ष्य असतात आणि सत्ता नसलेले पक्ष त्यात भाग घेतात. यातील शत्रू हा दहशतवादी असतो आणि त्याला कोणताही देश, जात वा धर्म नसतो. मग आपण कोणाशी लढायचे, चर्चा करायची किंवा विध्वंस करायचा? यात कोणत्याही एका संस्थेचे अपयश नाही. देशात अनेक संस्था आहेत. त्यामुळे हे एकूणच व्यवस्थेचे अपयश आहे. समुद्र किंवा किनाऱयाजवळील प्रत्येक बोटीची तपासणी करणे अशक्यच आहे कारण भारताच्या एवढ्या विशाल किनाऱयावर ते महाकठीण काम आहे. गुप्तचर संस्थांकडून येणारी माहिती संकलीत करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावर कारवाई करणे यासाठी एखादी संस्था असली तर त्याचा फायदाच होईल. मात्र अशा एखाद्या संस्थेला नीट कार्य करायचे असेल तर त्यासाठी संसदेच्या मान्यतेचे पाठबळ हवे. केंद्रीत झालेल्या जबाबदारीची संस्था आपल्याला हवी आहे आणि तिला सर्वांकडून सहकार्य हवे. “

कर्नल (निवृत्त) अजय मुधोळकर म्हणाले, “मुंबईतील संघर्ष हा लो इन्टेन्सिटी कन्फ्लिक्ट आहे. तो निश्चितच युद्ध नाही. कारवाईच्या स्वरूपावरून तिन्ही दलांनी त्यात भाग घ्यायचा अथवा नाही याचा निर्णय घेण्यात येतो. आपल्या सागरी हद्दीत मात्र टेहळणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. एवढा मोठा किनारा आणि फारसे सख्य नसलेले शेजारी देश या पार्श्वभूमीवर टेहळणी सुधारण्याची खरोखर गरज आहे. तेलांच्या विहिरींसारख्या आपल्या आर्थिक हितसंबंधांसाठीही ते महत्त्वाचे आहे. मात्र या क्षेत्रात असलेल्या संस्थांची मोठी संख्या आणि स्पष्ट धोरणाचा अभाव यांमुळे ही घटना या संस्थांचे अपयश नाही तर त्यांनी केलेली हयगय भोवली असे म्हणावे वाटते. आता यासंबंधात स्पष्ट धोरण ठरविण्याची आवश्यकता राज्यकर्त्यांना वाटायला हवी. सगळेच विचारी राजकारणी अशा धोरणाची गरज मांडत आले आहेत, मात्र कोणत्यातही अनाकलनीय कारणांमुळे ते प्रत्यक्षात उतरू शकलेले नाही. खासकरून आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे देशात एखाद्या एकीकृत यंत्रणेची गरज आहेच, कारण अशा तंत्रज्ञानाचा फायदा दहशतवाद्यांनाही होतोच.

पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि धोरणात्मक संशोधन विभागातील प्रपाठक डॉ. विजय खरे यांच्या मते, “भारताच्या धरतीवर आणि परकीय मदतीने लढविले जात असलेले हे पहिलेच असिमेट्रिक वॉर आहे. पोलिस दल, अर्धसैनिक बले आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये अधिक सुसूत्रीकरण हवे. असे सुसूत्रीकरण असते तर करकरे व अन्य अधिकाऱयांचे प्राण वाचले असते. पोलिस दलांना आधुनिक आणि सुटसुटीत शस्त्रे मिळायला हवीत.”

गर्व से कहो अतिरेकी है

सुमारे महिनाभर झाला असेल. आमची तबियत बहोत खुश आहे. काय आहे, की फुसके बॉम्ब करू नका अशी समज खुद्द शिवसेनाप्रमुखांनी दिल्यानंतर देशात माणसांना मारण्यासाठी बॉम्बनामक अस्त्रे वापरण्याची खुबी हिंदुनीही उचलल्याची खात्री आताशा होऊ लागली आहे. हिंस्रपणात मागे राहण्याची जी खंत एवढे दिवस आम्हाला लागून राहिली होती, तिची जागा अभिमानाने घेतली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, शांतता आणि सबुरी पाळण्याची शिकवण सतत ऐकत राहण्याची आता आपल्याला गरज राहिली नाही. आता अन्यधर्मीयांनाही ते ऐकावे लागणार.

म्हणजे बघा, की आताआतापर्यंत काय व्हायचं की कुठेतरी एखादा फटाका उडावा तसा बॉंब फुटायचा अन लगेच सगळीकडे बोंबाबोंब व्हायची. पोलिस कुठेतरी एक-दोघांना उचलायचे. ते नेमके मुस्लिम निघाल्याने पुढील कारवाई काय करायची याची चिंता सरकारला लागायची. (जे बॉंब फोडल्याशिवाय जागचे सरकत नाही, ते सरकार अशी सरकारची अलिकडची व्याख्या आहे.) मग सरकार हिंदु आणि तत्सम बुळबुळीत धर्मीयांना शांतता आणि सलोखा बाळगण्याचा शहजोग सल्ला द्यायचे.
आता मात्र ती परिस्थिती पालटली. आता हिंदुंचे स्वतःचे दहशतवादी तयार झाले आहेत. आता हे पहिल्या पिढीचे दहशतवादी असल्याने फक्त सायकल किंवा मोटारसायकलींचे तुकडे करणे, एक दोन लोकं मारणे असे किरकोळ प्रकार चालू आहेत. थोड्याच काळात मात्र आपल्या या अतिरेकी बंधुंच्या कौशल्यात बऱयापैकी सुधारणा होणार आणि फुल फ्लेज्ड् दहशतवादी कारवाया करण्यासाठी ते सराईत होतील याची आम्हाला शंका नाही.

बाकी हिंदु दहशतवाद्यांची उपद्रवक्षमता काहीशी वादग्रस्त असली तरी त्यांची दखल मात्र अगदी व्यावसायिक दहशतवाद्यांसारखी घेतली जात आहे. आता हेच बघा ना, कोणत्याही घटनेत एखाद्या संशयिताला पकडला, की कशा त्यांच्या शेजाऱयांच्या नाही हो, आम्हाला कधी वाटलंच नाही तो असं काही करत असेल म्हणून, या छापाच्या बातम्या येतात. तो संशयित शाळेत असताना कसा कुशाग्र विद्यार्थी होता, सोसायटीत सगळ्यांना मदत करायचा वगैरै कहाण्या येऊ लागतात. आपल्या हिंदु अतिरेकींबाबतच्या अशा अनेक कथा येऊ लागल्या आहेत. म्हणजे काय, भर रस्त्यातून येता जाता तो ओरडून सांगायचा की मी अतिरेकी आहे, मी अतिरेकी आहे असं अजूनतरी कोणी म्हणालेले नाही, याचा अर्थ आपले अतिरेकी योग्य मार्गावरून जात आहेत.

हिंदु लोकांनी असेच नवनवीन बॉम्बस्फोट घडवून आणले, की मग त्यांनाही आपले खरे जीवन दहा अकरा शतकांपूर्वीच्या कल्पनांनुसार चालवायला हवे, असा साक्षात्कार होईल. पुराणातील कायदे हेच जगाचा उद्धार करू शकतील, हे दाखवून देण्यासाठी हिंदु अतिरेकीही वेबसाईट, ब्लॉग अशा अत्याधुनिक साधनांचा वापर करू लागतील. त्यांचा उद्देश माणसं मारण्याचा नव्हता तर ते गरीब आहेत आणि नोकरी धंदा नसल्याने टाईमपास म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगायला अनेक राजकारणी पुढे येऊ लागतील. मग आधी मुळात दहशतवाद्यांना पकडू न शकलेले आणि पकडलेल्यांना शिक्षा न देऊ शकलेले सरकार लोकांना (म्हणजे स्फोटात मरणे शक्य न झालेल्यांना) शांतता पाळण्याचे आवाहन करू शकेल. त्यामुळेच म्हणा, गर्व से कहो अतिरेकी है.

पहिले दिवाळी लेखन

दिवाळी म्हणजे फराळ, फटाके आणि जाडजूड दिवाळी अंक. दिव्यांच्या उत्सवाची आमच्या मनावर ठसलेली ही छबी. जसजसं वय वाढू लागलं तसतसं या छबीतील अन्य छटा धूसर होऊ लागल्या. नाही म्हणायला दिवाळी अंकांचा उजेड मात्र दरवर्षी पडायचा. त्याच त्या लेखकांची, केवळ नावामुळे झालेली भरती आणि मानधनाच्या हव्यासापायी त्यांनीही केलेले बेचव लेखन यामुळे दिवाळी अंक काय दिवे लावतात हेही लख्ख दिसू लागले. त्यामुळे यथावकाश त्यांच्याशी संबंधच तुटला.

पत्रकारितेत सहा वर्षे घालविल्यानंतरही त्यामुळेच कधी दिवाळी अंकांच्या वाटेला जायचे धाडसच झाले नाही. मात्र काही सहकाऱयांना दसरा उलटला की अगदी सुगीचे दिवस आल्याचा आनंद व्हायचा. “यंदा अकरा अंकांमध्ये हजेरी आहे आपली,” भविष्यापासून पुराणकालीन संस्कृतीपर्यंत तलवारीप्रमाणे सपासप लेखणी चालविणाऱया एका सहकाऱयांनी टाळीसाठी हात पुढे करत सांगितले होते. माध्यमांत पहिलेच वर्ष असल्याने रिकामे बसून अनेक कामे लिलया करणारी अनेक माणसे प्रत्येक संस्थेत वारत असतात, याची तेव्हा जाणीव नव्हती. त्यामुळे त्या सहकाऱयाच्या वाक्याला माझी दाद टाळीच्या स्वरूपात नव्हे तर त्यांना टाळायच्या स्वरुपात होते. मात्र अशा पद्धतीने एका अंकात ‘मी आणि माझा देव’, दुसऱया अंकात ‘एक दुर्लक्षित स्थानः मौजे टुकारवाडी’, तिसऱया अंकात ‘राष्ट्रीय एकात्मता आणि महिला मंडळांचे कार्य’ अशा नाना रितीने मजकूर पाडणाऱया लेखकांकडे भुईनळ्यांकडे पहावे तितक्याच अंचब्याने पाहतो.

गेल्या वर्षी एका दिवाळी अंकात लेख लिहिला होता. दौंड तालुक्यात प्रसिद्ध होणाऱया एका गावप्रसिद्ध (जगप्रसिद्धच्या धर्तीवर) अंकाच्या संपादकांनी अत्यंत प्रेमाने तो मागितला. माझ्याही खिशाची तब्येत तेव्हा अशीच होती, की अशा प्रकारचा कोणताही डोस त्याला चालला असता. सुपरस्टार चिरंजीवीवर लिहिलेला एक लेख मी त्या अंकात खपवला. त्या अंकाचा सगळाच प्रकार हौशी मामला असल्याने त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तरीही मानधनाची रक्कम आणि लेख छापलेला अंक मला त्यावेळी मिळाला, ही त्या हौशी प्रकाशकाची व्यावसायिकता कौतुकास्पदच म्हटली पाहिजेत. कारण ‘लोकमत समाचार’ या हिंदी वर्तमानपत्राला कविता पाठविल्या होत्या तेव्हा मार्चमध्ये छापलेल्या कवितांचे मानधन (तब्बल रु. १५) मे महिन्यात मिळाले होते. पाठविलेल्या पाच कवितांपैकी नक्की कोणत्या कविता छापल्या होत्या हे मला आज बारा वर्षांनीही माहित नाही.

आता हे सांगायचं कारण म्हणजे, यंदाच्या दिवाळीत आमच्या ह्या ‘अनाघ्रात पुष्प’ अशा प्रतिभेला ऑनलाईन पंख फुटले. खऱया अर्थाने चर्चा आणि वाद करत ज्ञानाची आराधना करणाऱया ‘उपक्रम‘ या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवाळी अंकात माझा लेख प्रसिद्ध झाला. भाषा आणि तंत्रज्ञान हे माझे जिव्हाळ्याचे दोन विषय. (या लेखाचे १०० हून अधिक वाचने झाल्याचे दिसते त्यावरून लोकांनाही तो भावला असावा, अशी आशा आहे.) या दोन्ही विषयांची गुंफण असणारा एक लेख लिहिला कारण या विषयावर मराठीत एकही बातमी किंवा लेख मी वाचला नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षभरात बातम्यांच्या निमित्ताने मिळालेल्या माहितीच्या आधारे लेख लिहिला. विशेष म्हणजे ‘उपक्रम’च्या संपादक मंडळानेही तो प्रकाशित करण्याच्या लायकीचे मानले.

उपक्रमच्या दिवाळी अंकाचा हा दुवा आणि माझ्या लेखाचा हा दुवा.

आधीच मर्कट त्यात…कॅमेरा मिळाला

नाशिक जिल्ह्यातील वणी हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. तेथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दुरदुरून लोक येतात. (त्यांना सरसकट भाविक असं म्हटलं जातं.) महाराष्ट्रात मांगल्य कायम असलेल्या मात्र ते झपाट्याने गमावत असलेल्या काही स्थळांपैकी ही जागा. ज्याला पर्यटनाला जायचे त्याने पर्यटनाला जावे आणि त्याला श्रद्धेने जायचे त्याने श्रद्धेने जावे अशी ही विशिष्ट जागा आहे.
सर्वच डोंगराळ भागांमध्ये असतात तसेच येथेही माकडं आहेत. देवीच्या दर्शनाला आलेल्या लोकांच्या हातातील, स्वतःला हवाशा वाटतील त्या वस्तू हिसकावून घेणे हा या माकडांचा हातखंडा प्रयोग. शिवाय त्यांनी तसे हिसकावून घेतलेच, तर परत ५०० पायऱया उतराव्या लागतील म्हणून या दर्शनार्थ्यांनी प्राणपणाने स्वतःच्या वस्तू जपण्यासाठी केलेली धडपड, हे त्यातील ऍडिशनल मनोरंजन. देवीच्या मंदिरात त्या माकडांना पाहून लोकांना जेवढी गंमत वाटते, त्याहून कित्येकपट गंमत त्या माकडांना या लोकांच्या चेष्टा पाहून होत असाव्यात असं माझं ठाम मत आहे.

अलिकडे तर कॅमेरा आणि मोबाईलच्या सुळसुळाटामुळे माकडांचे वंशज खूपच चेकाळले आहेत. माकडांना गाण्यातील काही कळत नाही, दुर्दैवाने त्याच्या वंशजांना गाता तर येतेच शिवाय ते गाणे कुठंही वाजविण्याची सोय मोबाईलमुळे झाली आहे. त्यामुळे तारस्वरात कुठला तरी गदारोळ चालू करून मोबाईल मिरविण्याचा चंग बांधणारे वीर आताशा जास्त दिसू लागले आहेत. परवाच एके ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलेला प्रकारः
सकाळचे पावणे पाच वाजले आहेत. समोर बसलेली व्यक्ती कोणालातरी मोबाईलवरून कॉल करते. त्या तेवढ्याच धन्य पुरुषाने लावलेली डायलर टोन याला इतकी आवडते की ही पहिली व्यक्ती स्पीकर फोन सुरू करते. ज्याला कॉल केलेला असतो तो चरफडत फोन उचलतो, या वेळेला कशाला त्रास देतो म्हणून शिव्या घालतो (स्पीकरफोन चालू बरं का!) आणि फोन ठेवून देतो.
पहिली व्यक्ती पुन्हा फोन लावते. तो पुन्हा उचलतो.पुन्हा चरफडणे. पहिली व्यक्ती समोरच्याला फोन सायलंट करायला सांगते. त्यानंतर सार्वजनिक शांतता भंगाचा तो अत्याधुनिक बिग बँग प्रयोग चालू राहतो.
तर आपण वणीत होतो. या ठिकाणी माकडांना भरपूर खाद्य मिळत असल्याने त्यांची गर्दी असणे हे नवल नव्हते. मात्र त्यांच्या लीला पाहून माझ्यासकट सगळ्याच कॅमेराबाजांनाही चेव आला. मग काय, मंदिरात माकड पुढे पळतंय आणि आम्ही आपले कॅमेरे घेऊन त्यांच्यामागे पळतोय, अशा दृश्यांची मालिका सुरू झाली. तेही बेटे आपले फोटो सेशन करण्यासाठी नाना क्लृप्त्या करत होते.
काही वेळ असे फोटो काढल्यानंतर मात्र कंटाळा आला. आपण आलो कशासाठी आणि करतोय काय, असं वाटायला लागलं. आधीच मर्कट त्यात मदिराच प्याला, अशी काहीशी म्हण ऐकलेली होती. मात्र मदिरा न घेताही कशा मर्कटलीला करता येतात, हे या वेळी कळाले.
(या मर्कटचेष्टांची क्षणचित्रे इथे आहेत.)

चल भाऊ, डोकं खाऊ!

मी पुण्यात राहतो. आता खरं तर हे आपणहून सांगायची गरज नाही. कारण कोणतीही व्यक्ती इतरांना न कळालेली गोष्ट आपल्याला कळाली आहे अशा आविर्भावात सांगू लागला, की तो एकतर पुण्यात राहतो किंवा केव्हा ना केव्हा पुण्याचं पाणी चाखलेला आहे हे लक्षात येतं. पुण्यात राहणार्‍या प्रत्येकाला नागरिकत्वाचा दाखला मिळो न मिळो, पण शहाणपणाचा मक्ता मिळालेला असतो हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट नाही तरी शनिवारवाड्याइतके उघड खचितच आहे.
तर अशा या शहाणपणाच्या पुण्यनगरीत अन्य लोकांना असतात तशाच सवयी मलाही आहेत. ‘अभिमानाने सांगाल रांगेत उभे राहून या हॉटेलमध्ये जेवलो,’ हे माझही ब्रीद आहे. ‘ज्ञान मिळविताना असे मिळवा की आपल्या कधी मॄत्यू येणारच नाही, पुण्य करताना असा विचार करा की आपल्याला उद्याच मॄत्यू येणार आहे,’ असं एक संस्कॄत वचन आहे. त्यात बदल करून मी असं वागतो, की ‘जेवण करताना मी असं करतो की आपल्याला उद्याच मरण येणार आहे आणि जगाला उपदेश देताना असा देतो, की जगाच्या सुरवातीपासून मी येथे एकटाच शहाणा आहे.’ तास तासभर दरवाजाजवळ ‘ताट’कळत उभे राहिल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. आणि एकदा का पोट भरलं की अख्ख्या जगाला फुकटची शिकवणी देण्याची जी मजा आहे, ती अन्य कशात आहे काय?
असं एकूण बरं चाललं असलं तरी आपण जास्त खातो की काय, अशी एक शंका मनाला चाटून जात होती. सांगणारे असंही सांगतात, की मी जगण्यासाठी खात नसून खाण्यासाठी जगत असतो. अन त्या खाण्याची रेंजही मोठी आहे. मात्र माझ्या या भूकेला आता शास्त्रीय आधार मिळाला आहे. मी माझ्या आयुष्यासाठी, वैयक्तिक फयद्यासाठी खावखाव करत नसून त्याचा माझ्या कौतुकास्पद बुद्धिमत्तेशी थेट संबंध आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, बौद्धिक काम करणारी माणसं अधिक खातात. माझ्यावर खार खाऊन असणार्‍या लोकांच्या हे संशोधन पचनी पडणार नाही, हे मला पक्कं ठाऊक आहे। मात्र कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहतो थोडाच? आता शास्त्रज्ञांनी आणखी एक उपकार करावा। त्यांनी बुद्धिमान माणसे आळशी असतात असाही एक शोध लावावा. दिवस रात्र बसून राहणारी, कोणतंही काम व करणारी आणि आराम करायला मला वेळ पुरत नाही, अशी तक्रार अभिमानाने करणारी जी मोजकी मंडळी आहेत, त्यांची बुद्धिमत्ता इतरांपेक्षा जास्त असते, असा निष्कर्ष काढणारे एखादे संशोधन त्यांनी करावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी लागेल तितक्या वेळा सँपलिंग करण्यासाठी इतरांना सांगण्याचे माझी तयारी आहे। म्हणजे कसं, माझी प्रोफाईल पूर्ण होईल.

वाघनखांचा शिर ‘पेच’

इंग्रजी पत्रकारितेत आलो, तेव्हा कोणत्या बातम्या कराव्या लागतील किंवा मी करेन, याबाबतीत इतरांइतकीच मलाही शंका होती. मात्र गेल्या महिन्यात मी दिलेल्या दोन बातम्यांमुळेच मला स्वतःला मी करत असलेल्या कामाबाबत अभिमान वाटत आहे। पहिली बातमी विंचूरकर वाड्याच्या बाबत होती. माझी गेली पोस्टही त्याचसंबंधात होती. ती बातमी पुणे मिररमध्ये आल्यानंतर मुंबई मिररनेही छापली. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा त्यात उल्लेख असल्याने त्यांनी या वृत्ताची दखल घेतली. ते स्वतः गणेशोत्सवाच्या काळातच पुण्यातील विंचूरकर वाड्यात येऊन गेल्याचे मला कळाले. तेव्हा त्यांच्याकडे यासंबंधात फॉलो-अपसाठी विचारणा करण्याची जबाबदारी साहजिकच येऊन पडली.
विविध मार्गांनी आर. आर. आबांशी संपर्क साधल्यानंतर, यथावकाश मूळ बातमीचा इम्पॅक्टही छापला. त्याचवेळेस आणखी एक मोठी बातमी माझ्या हाताला लागली. ती म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू असल्याची.
आता ही बातमी मूळातच एवढी मोठी होती, की ती अगदी व्यवस्थित तयारी करून, सर्व माहिती करून आणि खातरजमा करूनच द्यावी लागणार होती। त्यामुळे आधी लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून आधी यासंबंधात माहिती मागवली. ‘कदाचित शिवाजी महाराजांची असणारी वाघनखे आमच्या संग्रहात आहेत. ती प्रदर्शनासाठी पाठविण्याबात आम्हाला विनंती करण्यात आली आहे. सुरक्षेची खात्री पटल्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ,’ असे त्यांचे उत्तर आले. अर्धे काम त्यात फत्ते झाले!
आता जबाबदारी होती आबांना स्वतःला विचारण्याची. त्यासाठी त्यांना फॅक्स केला, फोन करायचा प्रयत्न केला मात्र उत्तर काही आले नाही. त्यावेळी गणेशोत्सव चालू असल्याने साहेब गणपती पहायला गेले आहेत, असे त्यांचे कर्मचारी सांगायचे. (होय, असंच सांगायचे.) शेवटी जलसंपदा विभागातील यांत्रिकी विभागाच्या कार्यक्रमासाठी आबा येणार आहेत, असे कळाले तेव्हा तिथेच त्याना गाठायचे ठरविले. त्याच कार्यक्रमाच्या संबंधात मानार हाऊसची एक बातमी दिलेली असल्याने तिथंही अर्धे काम झाले होतेच.

त्या कार्यक्रमात तानाजी खोत याच्यासोबत नेट लावून बसलो. चार मंत्र्यांची बडबड, एका राजकीय कार्य़कर्त्याची चापलूसगिरी आणि काही सरकारी अधिकाऱयांची लाचारी सहन केल्यानंतर आबा व्यासपीठावरून उतरताना त्यांना गाठले. पाऊस मी म्हणत होता आणि इकडे आमच्या बातमीदारीचा कस लागत होता. कार्यक्रमाला आलेल्या अन्य सात-आठ बातमीदारांना झुकांडी देऊन, एकदाचा आबांचा कोट आम्हाला मिळाला.

“प्रस्ताव दिला होता त्यांना. आम्ही सुरक्षा पुरवावी अशी त्यांची मागणी आहे. ती फाईल चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आली आहे,” आर. आर. पाटील म्हणाले आणि आमचे घोडे गंगेत न्हाले (म्हणजे शेजारून वाहणाऱया मुळा नदीत) नंतर जेवणावर ताव मारला तरी पोट आधीच भरले होते.

त्यानंतर इतिहास तज्ज्ञांना विचारावे, तर बाबासाहेब पुरंदरे अमेरिकेला गेलेले. त्यामुळे त्यांच्या आधीच्या एका लेखातूनच माहिती घेतली. निनाद बेडेकर यांना फोन केला तर त्यांचे म्हणणे असे, की शिवाजी महाराजांनी अफझलखानाला वाघनखांनी नव्हे, तर तलवारीने मारले होते. कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभूषषण ग्रंथात ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांची वाघनखे आहेत, याचेही ठोस पुरावे नसून, नंतरच्या बखरींनी वाघनखांचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. हा एक नवाच पेच निर्माण झाला होता. होता म्हणजे आहे. त्यात विकिपेडियावर शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे म्हणून जे छायाचित्र आहे, ते म्हैसूरचे असल्याचे त्या फलकावर लिहिले आहे.

विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाने ते छायाचित्र खरे आहे अथवा नाही, याबाबत काहीही भाष्य केलेले नाही। मात्र मूळ वाघनखांचे छायाचित्र मला पाठविल्याचा मेल पाठविला. पण त्यात छायाचित्राची लिंक नाही. संग्रहालयाच्या संकेतस्थळावर शोध घेतला असता वाघनखांचे (टाईगर क्लॉ) एक वेगळेच छायाचित्र दिसते. मात्र त्यात महाराष्ट्र किंवा शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. असा हा घोळ आहे. अन तरीही, वाघनखांची बातमी ही माझ्या पत्रकारितेचा शिरपेच आहे!

विंचूरकर वाड्याची दुरवस्था

वघ्या महाराष्ट्रात आज गणेशोत्सव साजरा होत आहे. उत्साहाच्या या काळात, ज्या ठिकाणी या उत्सवाने बाळसे धरले, जेथे तो वाढला ती जागा मात्र आज दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाची बळी ठरत आहे. बहुतेकांना तर या जागेचे महत्त्वही माहित नाही. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेली ही वास्तु अगदी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभी आहे.

विंचूरकर वाडा ही तशी पेशवेकालीन वास्तु. पेशव्यांच्या सरदारांपैकी असलेले विठ्ठ्ल शिवदेव यांनी बांधलेला हा वाडा सुमारे १६,००० चौ। फुट आकाराचा आहे. लोकमान्य टिळक येथे १८९२ पासून १९०७ पर्यंत राहत होते. याच काळात लोकमान्यांनी १८९४ साली पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. लोकमान्यांच्याही आधी भाऊ रंगारी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गणपतीची स्थापनी केली होती. मात्र त्याला सार्वजनिक आणि सुसंगत रूप मिळाले लोकमान्यांमुळे. त्यावेळी लोकमान्य टिळक कायद्याच्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेत असत. त्यामुळे या गणपतीला ‘लॉ क्लासचा गणपती’ म्हणून ओळखले जात असे. लोकमान्य गायकवाड वाड्यात जाईपर्यंत येथेच सार्वजनिक गणपती बसत असे.

आज मात्र हा वाडा अगदीच दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्राचे घोषणाशूर गॄहमंत्री आर। आर. पाटील यांनी या वाड्याला भेट दिली होती. त्यावेळेपासून या वाड्याबद्द्ल मला उत्सुकता होत्ती. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात आम्ही या वाड्याला भेटही दिली होती. तेव्हा तिथली अवस्था पाहून मन जरा खट्टूच झाले. त्यामुळे यंदा बातमी करण्याची संधी मिळाली, तेव्हा या वाड्यावर मी लक्षच ठेवून होतो. बातमी करण्यासाठी गेलो तेव्हा कळाले, की वाड्याचा ताबा मुळात या गणेश मंडळाकडे नाहीच आहे. ‘लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट’ या मंडळाला गणपतीच्या केवळ दहा दिवसांसाठी ताबा मिळतो. इतर वेळी खादी ग्रामोद्योग मंडळाकडे हा ताबा असतो. या मंडळाचे कर्मचारी सामान ठेवण्यासाठी या खोलीचा वापर करतात, असे कळाले. ट्र्स्ट्चे एक विश्वस्त रविंद्र पठारे यांनी सांगितले, की गेल्या वर्षी तर या कर्मचार्‍यांनी खोलीतील ऐतिहासिक तसबिरी बाहेर काढण्याची मजल गाठली होती. हे ऐकून मी मराठी माणसांच्या इतिहास प्रेमाला मनातूनच साष्टांग दंडवत घातला.
पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाडा विकल्याचे त्यांच्या कानावर आले आहे. “पुढच्या वर्षी गणपती बसवू का नाही, याची आम्हाला शंकाच आहे,” पठारे म्हणाले तेव्हा परिस्थिती किती बिकट आहे, याची जाणीव झाली।
केवळ गणपतीच नाही, आणखी एका ऐतिहासिक घटनेमुळे या वाड्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही महत्त्व आहे. स्वामी विवेकानंद यांचे या वाड्यात काही दिवस वास्तव्य होते. लोकमान्य टिळक मुंबईहून पुण्याला येताना त्यांची आणि स्वामींजीची भेट झाली होती. स्वामींजीच्या विद्वत्तेने प्रभावित झालेले लोकमान्य त्यांना घरी घेऊन आले. याच विंचूरकर वाड्यातील एका खोलीत स्वामीजी राहत होते. काही दिवस वास्तव्य केल्यानंतर स्वामीजी कोणालाही न सांगता एके दिवशी निघून गेले. अशा या विलक्षण घटनेची माहिती आज केवळ मोजक्या लोकांना आहे. आमच्या वर्तमानपत्राने घेतलेल्या लोकांच्या मुलाखतीतून हीच माहिती समोर आली. खरे तर स्मृतीस्थळ म्हणून वर्षभर सुरू असावे, अशी योग्यता असलेली ही वास्तू आज शेवटच्या घटका मोजत आहे. ‘कालाय तस्मै नम:’ दुसरे काय?