श्रावणमासी “डीडी’ उपाशी

तुराज श्रावण! या महिन्याचे नाव घेतले की अनेकांमधला कवी “फणा’ वर काढतो. चहूकडे हिरवळ पसरली आहे, पावसाच्या धारा अधून-मधून उन्हाच्या तिरीपेशी लपंडाव खेळत आहेत…वातावरणात एक तजेला पसरला आहे आणि नव्या नव्या वेली जमिनीतून डोके वर काढत आहेत. पुणे शहर नसेल, तर तिथे चिमण्या-कावळे व अन्य पक्षी निसर्गाने त्यांना दिलेल्या मर्यादित आवाजात, पण हिंदी चित्रपटातील गाण्यांहून कित्येक पटींनी मधुर गाणी गात आहेत…असं काहीसं रम्य चित्र श्रावणाच्या नावासरशी डोळ्यांपुढे उभे राहते. त्यात ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ असे साक्षात बालकवींचे वचन. त्यामुळे श्रावण म्हणजे केवळ गोडवा असंच काही जणांनी वाटत राहतं. अर्थात हे फक्‍त काही जणांच्या बाबतीत.

श्रावण महिना म्हटला, की माझ्या पोटात गोळा उभा राहतो. कारण श्रावणाचा पहिला हल्ला पोटावरच होतो. या महिन्याचे आगमन होताच पहिले छूट शाकभाज्यांच्या पर्यायी अन्नावर गदा येते. आपल्या “प्राण’प्रिय खाद्यावर असे पाणी सोडण्याचे जीवावर आले, तरी कर्तव्य करावेच लागते. कारण प्रश्‍न श्रद्धेचा असतो, संस्कारांचा असतो. “ममैवांशो सर्वलोके जीवभूत सनातनः’ असे भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेत सांगितले आहे. तरीही एका विशिष्ट महिन्यात भगवंताला कोथींबीर, कारले, पालक आणि तत्सम सजीवच का चालतात आणि अन्य पदार्थ अभक्ष्य का ठरतात, याचे कोडे उलगडत नाही. अन्‌ वरून याला श्रावण”मास’ म्हणून आम्हाला खिजवायचे?

बरं, एवढ्यावरच उरकलं तर एवढ्या महिन्याभराचे फारसे दुःख वाटले नसते. प्रश्‍न येतो तो चार सोमवार, एक चतुर्थी अशा एकाहून एक एकदिवसीय कसोटींचा! काय सांगावं, या दिवसांचा सामना कसा करावा, या विवंचनेत अन्नपाणी गोड लागत नाही हो! एक तर मराठी पत्रकार असल्याने उपासमारी ही तशी पाचवीलाच पुजलेली! त्यात आणखी कसेबसे दोन घास घशाखाली घालायचे, तर त्याचीही चोरी. “चरैवेति चरैवेति एतद्‌ सत्यम्‌’ हा ज्याचा बाणा, त्याला या दिवशी ज्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागते, त्याची कल्पना इतरांना येणार नाही. वर्षाचे 357 दिवस (चार सोमवार, दोन एकादशी, एक चतुर्थी आणि एक महाशिवरात्री धरून) भलेही हा माणूस वडापावच्या गाड्याकडे तुच्छतादर्शक आढ्यतेने जातो. मात्र नेमका या दिवशी वडापावचा वास त्याला आपल्याकडे ओढून घेतो. “कळेना कळेना वळेना वळेना’ असं समर्थ रामदासांनी म्हटले आहे, त्याची प्रचिती यावेळी येते. अन्‌ उपास करणाऱ्याला तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार!

एवढे उपास केल्यानंतर मला एक शंका राहून राहून येते. उपासाच्या खाद्यांचे आणि “इंडियन पीनल कोड’चे (ग्रामीण वर्तमानपत्रांत बव्हंशी आढळणारा भारतीय दंड विधान उर्फ भा. दं. वि.) नियम एकाच व्यक्तीने केले असावेत. त्याशिवाय या दोन्ही नियमांमध्ये विचित्रपणाबाबत एवढे साम्य आढळले नसते. उपासाच्या दिवशी काय खायचं आणि काय खायचं नाही, हे लक्षात ठेवायचे म्हणजे खायची गोष्ट नाही. अहो, पिष्टमय पदार्थ असलेला साबुदाणा उपासाला चालतो, मात्र यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साळींचे पोहे निषिद्ध! दक्षिण अमेरिकेतून युरोपमार्गे भारतात आलेला बटाटा ओ.के.., वनस्पती तेलांपासून बनलेला डालडा ओ.के. मात्रत्याच वनस्पतींची भाजी हद्दपार! तांदळाची जातभाई भगर उपासाच्या दिवशी मानाने मिरविणार आणि अरबस्तानातील खजूरही शेखी मिरविणार! बाहेरच कुठे उपासाचे खावे म्हटले, तर साबुदाणा वडे आणि नायलॉन चिवडा या हॉटेलचालकांमध्ये अतिलोकप्रिय पदार्थांशिवाय अन्य काही मिळण्याची खोटी! त्यात हे वडे आणि चिवडा पामोलिव तेलातून काढलेला…तेही अन्य पदार्थ तळलेल्याच! म्हणजे करमणूक हवी म्हणून मराठी चित्रपटाला जायचं आणि प्रखर वास्तवाचं प्रतिबिंब, भावभावनांचे कंगोरे, वैचरिक घुसळण अशा नावांखाली जमेल तेवढी (अन्‌ अत्यंत स्वस्तातली)पिळवणूक सहन करून यायचं! उपास करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे अशा “सेल्फ गोल’चे पोटभर अनुभव असतातच.

श्रावणात ज्या दिवशी उपास नसतात, त्यादिवशी उपासही परवडतील असे सण असतात. ईश्‍वराने सगळे महिने तयार केल्यानंतर अनेक सण राहून गेल्याची त्याला आठवण आली आणि ते सर्व सण त्याने श्रावणातच कोंबले असावेत, असा माझा एक सिद्धांत आहे. बरं, हे सणही कसे गोडधोड करून खायचे…साग्रसंगीत पुरणाची पोळी तोडायचे. म्हणजे आमची डबलबार अडचण. गोडधोड करायचे म्हटले, की वेळेवर खायला मिळणार नाही, याची “अनुभव हीच खात्री!’ अन्‌ समजा मिळालेच तर पुरणाची पोळी खाऊन “डोळे मिटून’ ऑफिसमध्ये जायला सगळेच काही सरकारी कर्मचारी नसतात. त्यात पंचामृत, चटण्या हे जेवणाच्या ताटातले “साईड हिरो’ या महिन्यात एकदम सुपरस्टारशी स्पर्धा करायला जमतात. त्यामुळे “जेवण नको पण पदार्थ आवर,’ अशी अवस्था होऊन जाते. या महिन्यात सत्यनारायणाच्या पूजाही फॉर्ममध्ये असल्यामुळे तिकडे कुठे जेवायचे तोंडभरून आमंत्रण असतेच. इकडे श्रावणातील पाऊस व उन्हाची लपाछपी चालू असते, दुसरीकडे जेवण अन्‌ उपासाचा “मेरी गो राऊंड’ चालू असते.

उपास पुराणाच्या या अडचणींचे हे एवढे अध्याय असले, तरी या सर्व रसांचा परिपोष एका अध्यायात होतो. तो अध्याय म्हणजे उपास करणारा एकटा माणूस. त्याला उपासाचे करून द्यायला कोणी नाही, अन्‌ उपास सोडण्यासाठी करून द्यायलाही कोणी नाही. असा माणूस फारतर काय करेल, काही नाही “मेरे नैना सावन भादो…फिर भी मेरा मन उपासा…’ असे गाणे गाईल. कारण काय, तर एका दिवसाच्या उपासाने आपण मरत नाहीत, याची त्याला पुरेपूर जाणीव असते. शेवटी काय, तर व्हरायटी ऍडस्‌ स्पाईस टू लाईफ…अन्‌ कधी कधी हा मसाला उपासदार असतो…एवढंच!!!