आंध्रातील स्फोट आणि बेजबाबदार “वायएसआर’

केवळ तीन महिन्यांच्या अंतराने हैदराबाद शहरात दोन स्फोट झाले आणि त्यात सुमारे चाळीस जणांचे प्राण गेले. ज्या दिवशी हे स्फोट झाले, त्या दिवशी मक्का मस्जिदमधील स्फोटाला शंभर दिवस पूर्ण झाले होते. त्याच दिवशी दुपारी हैदराबादेतच सुमारे दोन कोटी 70 लाख रुपयांच्या बनावट नोटा दाऊदच्या हस्तकांकडून पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. या दोन्ही घटनांचे आपल्याकडच्या माध्यमांमध्ये फारसे प्रतिबिंब उमटले नाही. मी मूळ तेलुगु वाहिन्यांवरील बातम्याच त्या दिवशी पाहिल्या नसत्या तर मलाही या बाबी कळाल्या नसत्या. आंध्रातील सर्वच माध्यमांनी या बाबींवर विशेष जोर दिला आहे. मक्का मस्जिदच्या स्फोटांची उत्तरेतील माध्यमांनी त्या दिवशीचे दळण दळण्यासाठी दखल घेतली. त्यानंतर आताच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्याच विद्यार्थ्यांचे जीव गेल्यामुळे इकडील वर्तमानपत्रांनी या घटनांची अधिक नोंद घ्यावी लागत आहे.

ताज्या स्फोटानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. राजशेखर रेड्डी यांच्या प्रतिक्रियांनी जनतेत आणखी रोष निर्माण झाला आहे. “इदी आंतरजातिय उग्रवादम…पाक, अफगाणिस्तानलो मन निघु नेटवर्क विस्तरिंचलेम कदा?’ (हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये आपले गुप्तचर वाढवायला हवेत,’ या रेड्डी यांच्या विधानाची “ईनाडू’ या तेलुगुतील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्राने खिल्ली उडविली आहे. 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यानंतर जॉर्ज बुश यांनी दाखविलेल्या दहशतवाद्यांच्या नायनाटाच्या निर्धाराशी रेड्डी यांच्या विधानाची तुलना करून, “ईनाडू’ने म्हटले आहे, “”प्रत्येक हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खास शैलीत दहशतवाद्यांवर केलेला हा प्रतिहल्ला आहे.” त्यांच्या या गुळचट विधानामुळे स्फोटातील मृत आणि जखमींच्या जखमांवर मीठ चोळले गेले आहे, असे वर्तमानपत्राने म्हटले आहे. “बंगळूर, मालेगाव, लंडन, बगदाद…इथेही दहशतवादी हल्ले होतातच,’ या रेड्डी यांच्या उद्‌गारांवर तर “ईनाडू’ने म्हटले आहे, “”वा..वा! यादवी युद्धाने धुमसत असलेल्या इराकमधील बगदादशी आंध्र प्रदेशची तुलना होऊच कशी शकते. सप्टेंबर 11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत पुन्हा दहशतवाद्यांना धुमाकुळ घालता आलेला नाही, हे माहित असतानाही मुख्यमंत्री असे बोलूच कसे शकतात.”

दहशतवाद्यांनी वैफल्यातून हे कृत्य केल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. त्यावर “इनाडू’चे म्हणणे, “” इदि प्रभुत्वाल वैफल्यम. (हे दहशतवाद्यांचे नव्हे, सरकारचे अपयश आहे.”

आंध्र प्रदेश हे त्यामानाने एक गरीब राज्य आहे. मात्र आधीच्या चंद्राबाबू नायडू यांच्या कारकीर्दीत तिथे किमान शांतता तरी होती. नक्षलवाद्यांच्या मुसक्‍या आवळण्यात नायडू सरकारला बव्हंशी यश मिळाले होते. त्या तुलनेत रेड्डी यांच्या सरकारने डोळ्यांत भरण्याजोगी काहीही काम केलेले नाही. नक्षलवाद्यांवर कारवाई न करण्याचा निर्णय त्यांनी सत्तेवर येताच काही दिवसांनी जाहीर केला होता. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. गेल्याच महिन्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आंदोलनात तिथे सात पोलिस कर्मचारी ठार झाले. तिरुपतीतील जमीनी मिशनऱ्यांना वाटणे, मुस्लिमांना आरक्षण देणे अशा “नॉन इश्‍यू’मध्ये रेड्डी सरकारने वेळ घालविला. त्यामुळे आंध्रसारख्या चांगल्या व सुंदर राज्याचा बघता-बघता “इराक’ झाला आहे.