निषेध असो…

पुण्यातील कोणत्याही गल्लीबोळातील, कोणालाही सहजासहजी सापडणार नाही अशा इमारतीतील कुठल्याही एका राजकीय पक्षाचे कार्यालय. साधारण दोन खोल्या बसतील असा एकच हॉल. एका कोपऱयात मोठा टेबल. त्याच्यासमोर तीन चार खुर्च्या. सध्या या खुर्च्या रिकाम्या आहेत. पलिकडच्या बाजूस एक खिडकी. टेबलच्या थेट समोर एक टीव्ही. त्याच्यावर कुठलेतरी गाण्याचे एक चॅनल चालू असल्याचे दिसते. त्यावर हिमेश रेशमिया किंवा बेसुरेपणात त्याच्याशी स्पर्धा करेल, अशा एखाद्या गायकाचा चेहरा झळकतो. अधूनमधून काही जाहिरातीही.

हॉलमधील टेबलवर बसलेली व्यक्ती सर्वात प्रथम नजरेत भरते. साधारणतः चाळीशीची व्यक्ती. डोक्यावर मध्यम आकारचे केस, मात्र त्यांचा भांग पाडून खूप वेळ झाल्याचे चटकन जाणवते. पान किंवा गुटखा खाल्ल्यामुळे लाल झालेले ओठ. या व्यक्तीच्या खिशात एक मोबाईल आणि टेबलवर एक मोबाईल ठेवलेला. शिवाय टेबलवर एक टेलिफोन वेगळा. टेबलवर पडलेल्या वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यातून एक एक वर्तमानपत्र काढून वाचण्यात ही व्यक्ती दंग आहे. प्रत्येक पेपरमधील प्रत्येक पानाचे अत्यंत काळजीपूर्वक वाचन चालू असल्याचे दिसत आहे. तितक्यात आणखी एक व्यक्ती खोलीत प्रवेश करते. सुमारे वीस-बावीस वर्षांचा मुलगा. याच्याही तोंडात गुटखा. मात्र त्यातही कसलेतरी गाणे गुणगुणण्याचा त्याचा प्रयत्न.

“अरे नेते, कधी आलात,” युवकाचा प्रश्न. त्यावर आत्ताच असे नेत्याचे उत्तर. पाठोपाठ नेत्याचा प्रश्न, “काय रे वाचलेस का आजचे पेपर?”

“वाचले ना, काय नाय सापडलं नेते,” युवकाचे लागलीच उत्तर. दरम्यान त्याने गाण्याचे चॅनल बदलून बातम्यांचे चॅनेल लावलेले असते. त्यावर काही वेळ जाहिरातीच चालू. मुलगा पुन्हा बोलू लागतो, “सगळे चॅनेल पाहून झाले. आज काय नाहीच दिसतं. तिकडंबी ते शारुखचं पिक्चर हिट झाल्याचीच बातमी देतायत. नव्या कोण्या पिक्चरची बातच करत नाय कोणी.”

नेते उत्तर देणार एवढ्यात त्यांचा एक मोबाईल वाजतो. सवयीने ते खिशातला मोबाईल काढून बोलू लागतात, “हां, बोलतोय. हां, आरं तयार हायेत पत्रकं सगळी. पन आज काय कोणी चान्स दिलेला दिसत नाय. सगळ्या बातम्या पाहिल्या. कशावर पत्रक काढणार?.”

काही वेळ नेते पलिकडच्या व्यक्तीचं ऐकतात. त्यानंतर पुन्हा सुरू, “हां…पन आज आहे पालिकेला सुट्टी. तिथलं काय लफडं नाही कळालं. तिकडं दिल्लीतल्या सरकारनं जबानच बंद केली ना राव. कोणी काही बोलतच नाही…आरं तो कसला तरी करार आहे ना तेच्यावर. सालं कम्युनिस्ट बी आता तेच्यावर बोलत नाही त्यांचं नंदीग्राम झाल्यापासून. इकडं मुंबईतले सगळे गेलेत गुजरातला. त्यांच्याकडून बी काही ऐकायला मिळत नाही. कोणाला पकडावं आता तूच सांग. सगळा धंदा मंद झालाय भाऊ…”

नेते फोन ठेवतात. त्यानंतर काही वेळ खिडकीशी जाऊन बाहेर पाहात उभे राहतात. मध्येच हाक मारतात, “ए संज्या.” लगेच संज्या त्यांच्याजवळ जाऊन उभा राहतो. “का रे, रस्त्यावर एवढी गर्दी का,” नेते विचारतात.

“रोजच होते ना नेते. शाळा आहे ना पलिकडे. तिथल्या पोरांमुळे इथे ट्रॅफिक जॅम होतं,” संज्या प्रामाणिकपणे माहिती पुरवतो.

“अरे, मग याच्यावरच काढू ना पत्रक. या रस्त्यावर विद्यार्थ्यांमुळे गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दाद घेत नाही. याचा आम्ही निषेध करतो…,”नेत्यांनी तोंडपाठ असल्यासारखा पत्रकाचा मजकूर सांगितला. त्यांना अर्ध्या रात्री उठविलं असतं तरी हाच मजकूर त्यांनी पाकिस्तानकडून बाबर क्षेपणास्त्राची चाचणी किंवा खटखटवाडीत डांबरी रस्ता करण्याकडे दुर्लक्ष अशा कोणत्याही विषयाला धरून सांगितला असता. मात्र त्यांचा आज्ञाधारक सेवक संज्या जागचा हालत नसल्याचे पाहून नेत्यांचा पारा चढू लागतो. तेवढ्यात संज्याच तोंड उघडतो, म्हणजे आधी खिडकीतून गुटखा थुंकायला आणि त्यानंतर नेत्यांना माहिती द्यायला, “नेते, परवाच दिला ना हा मजकूर. तीन पेप्रांत छापून बी आलाय ना.”

या उत्तरावर नेत्यांचा चेहरा गोरामोरा होतो. पुन्हा खिडकीबाहेर पाहून ते शून्यांत हरवतात. पंधरा वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अशी वेळ कधी आली नव्हती. प्रसंग कोणताही येवो, बातमी वर्तमानपत्रांत नंतर छापून यायची अन नेत्यांच्या निषेधाचं पत्रक आदी वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोचायचं. एक दोन वेळेस त्यांच्याकडून पत्रक वेळेवर गेले नव्हते, त्यामुळे काही वर्तमानपत्रांनी मूळ बातमीच छापायला नकार दिला होता. नेत्यांचं पत्रक आलं नाही त्याअर्थी ती बातमी खोटी आहे, अशी बिचाऱया पत्रकारांची समजूत. इतका पत्रकारांचा नेत्यांवर विश्वास! अन आज त्याच नेत्यांवर पत्रकासाठी विषय शोधायची वेळ यावी?

नेत्यांनी एकदा टेबलामागे ठेवलेल्या लेटरहेडच्या गठ्ठ्याकडे पाहिलं. पगाराच्या दिवशी एखाद्याला प्रत्येक दुकानाच्या शो-केसमध्ये ठेवलेल्या वस्तूंना खुणवावं, तसे ती होतकरू पत्रकं त्यांना आव्हान देत होती. थोड्या वेळाने त्यांना पत्नीसमवेत एका हॉटेलमध्ये जायचं होतं. पंधरा मिनिटांच्या आत पत्रक लिहून पाठविणं आवश्यक होतं. नाहीतर उद्या छापून आलं नसतं.

विमनस्कपणे नेते पुन्हा टेबलकडे येतात. चालू असलेल्या चॅनेलवरील कोणताही कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इतका वेळ स्पोर्टस चॅनेलवर रेसलिंगची हाणामारी सुखैनैव पाहणारा संजू अस्वस्थ होतो. “चहा सांगू का,” तो विचारतो. नेते मानेनेच होकार देतात. लगेच संजू कोणातरी छोटूच्या नावाने चहाची ऑर्डर देतो.

थोड्या वेळाने चहा येतो. नेते एक घोट घेतात. दरम्यान आता टेबलवरील मोबाईल वाजलेला असतो. “हो निघालोच,” लगेच पाच मिनिटांत असं काहीबाही बोलून ते संभाषण आटोपतं घेतात. संजू आपले लक्ष नाही असं दाखवितो.

“साखर कमी टाकलीय का रे यानं,” नेत्याच्या या प्रश्नावर तो दचकतो. एका चॅनेलवर बातम्या म्हणून एका हिरोईनचं लफडं दाखवित असतात. त्यात त्याचं लक्ष असतं. चहात साखर कमी असल्यानं त्याला काहीही फरक पडलेला नसतो.

“मला बी वाटलं तसं,” तो उगाच सांगतो. इतक्यात नेते पुढला प्रश्न विचारतात, “साखर संकुलात ती बैठक होती ना रे ती आज?”.

“नाय झाली आज,” संज्या उत्तरतो, “अशा दहा बैठका लिहिल्यात त्या तुमच्या डायरीत. एक बी झाली नाही. त्यात काही झालं असतं तर आपल्याला बरं, नाही का?”

त्याच्या या उत्तरावर नेत्यांचा चेहरा अचानक उजळतो. लगेच ते मागे वळून लेटरहेडचा गठ्ठा काढतात. त्यातील एक लेटरहेड घेऊन लगेच लिहायला बसतात. थोड्या वेळाने लिहून झाल्यावर संज्याला सांगतात, “संज्या, आजचं आपलं पत्रक झालं. आता याची झेरॉक्स काढून सगळ्यांना पाठव. सालं, आलंच पाहिजे उद्या-परवा सगळीकडे.”

संज्याच्या चेहऱयावर प्रश्नचिन्हांची गर्दी होते. त्याला अजून राजकारणात गती नसल्याने पत्रकात काय लिहिलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याचा तो प्रश्न नेते सोडवतात, “ऐक काय लिहिलंय…आपल्या शहरात आणि राज्यात तसेच देशातही अनेक प्रश्नांचं थैमान सुरू आहे. त्यासाठी आमच्या संघटनेने अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर शासनाने समित्यांची नियुक्ती केली. मात्र त्या समित्यांची बैठक होत नाही. राज्याच्या या प्रश्नांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सरकारच्या या वेळकाढूपणाचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात त्वरीत काही कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत…”

नेत्यांच्या या वाक्यासरशी संज्याच्या चेहऱयावरही हास्य खेळू लागतं. निरनिराळ्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयात जाण्यासाठी पेट्रोलचा खर्च म्हणून त्यालाही शंभर-दीडशे रुपये मिळणार असतात अन आपला आजचा निषेधाचा कोटा पूर्ण झाला, या आनंदात नेते पत्नीसह सुखाचा घास घेऊ शकणार असतात…